आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ESPNCricinfo शी बोलत असताना याबद्दल माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल असं पटेल म्हणाले. स्पर्धेच्या तारखांबद्दल अद्याप पटेल यांनी कोणतीही माहिती दिली नसली तरीही याआधी प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तानुसार २६ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर या काळात बीसीसीआय तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे.
“आयसीसी टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकललं जाईल याची वाट आम्ही पाहत होतो. आयसीसीने याबद्दलची घोषणा केल्यानंतर आम्ही भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. आम्हाला परवानगी मिळेल अशी आशा आहे”, पटेल यांनी माहिती दिली. दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन मैदानांवर ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेला चाहत्यांना परवानगी असेल की नाही याबद्दल विचारलं असता तो निर्णय UAE मधील सरकारचा असल्याचं पटेल यांनी सांगितलं.
आयपीएल स्पर्धा आटोपल्यानंतर भारतीय खेळाडू तिकडून ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. त्यांना पुढील दौऱ्यासाठी पुरेसा वेळ मिळावा व इतर आवश्यक नियमांचं पालन व्हावं यासाठी ७ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार असल्याचं कळतंय.
गोंडवाना विद्यापीठाकडून करोनाचे संकट लक्षात घेता विद्यार्थ्यांना महाविद्यालयापर्यंत न बोलवता घर बसल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाशी संलग्न ६० टक्के महाविद्यालयांनी देखील ऑनलाइन प्रवेशाची व्यवस्था केली आहे.
गडचिरोली व चंद्रपूर या जुळ्या जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेत एकूण ३६ हजार ६९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरवर्षी यातील बहुसंख्य विद्यार्थी विविध अभ्यासक्रमासाठी मुंबई, पुणे, नागपूर, हैद्राबाद, बंगलोर, अमरावती अशा मोठ्या शहरांमध्ये जात होते. मात्र, यावर्षी करोनाचे संकट लक्षात घेता बहुतांश विद्यार्थी याच जिल्ह्यात मुक्कामी राहण्याचा अंदाज आहे. त्यानुसार विविध अभियांत्रिकी, व्यवस्थापन तथा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. करोनाचे संकट लक्षात घेता गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थ्यांना महाविद्यालयापर्यंत न येऊ देता थेट ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून राबवण्यात येणार आहे.
त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी घर बसल्या आवडत्या विद्याशाखेत प्रवेश घ्यावा असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून तयारी करून ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ६० टक्के महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रवेशाची तयारी पूर्ण केली असल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिल चिताडे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी बुधवारपासून राज्यातील करोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेली क्षेत्र वगळता लॉकडाउन होणार नाही असं जाहीर केलं आहे. इतर राज्यांप्रमाणे करोना विषाणूचा विळखा कर्नाटकालाही बसला होता. यावर उपाय म्हणून बंगळुरु आणि इतर महत्वाच्या भागांमध्ये कर्नाटक सरकारने लॉकडाउनची घोषणा केली होती.
या लॉकडाउनचा कालावधी बुधावरी संपल्यानंतर कन्टेनमेंट झोनचा अपवाद वगळात राज्यात लॉकडाउन होणार नाही असं येडियुरप्पांनी जाहीर केलं आहे. करोना विषाणूचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आयोजित केलेल्या उपाययोजनांची माहिती देत असताना येडियुरप्पांनी ही घोषणा केली.
“उद्यापासून राज्यात लॉकडाउन होणार नाही. लोकांनी आता कमावर परतायला हवं. अर्थव्यवस्थेला हातभार लागणं हे गरजेचं आहे. अर्थव्यवस्था सुरळीत राखून आपल्याला करोनाचा सामना करायचा आहे. लॉकडाउन हे समस्येवरचा उपाय नाही. कन्टेनमेंट झोनचा अपवाद वगळता आता कुठेही निर्बंध नसतील.” यावेळी बोलत असताना येडियुरप्पांनी राज्यातील जनतेला सरकारने आखून दिलेले सर्व नियम पाळण्याचं आवाहन केलं.
बाहेर जाताना मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, स्वच्छता यासारख्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असल्याचं येडियुरप्पा म्हणाले. सध्याच्या घडीला करोनाचा सामना करण्यासाठी हाच उपाय असल्यामुळे नागरिकांनी सरकारी यंत्रणांना मदत करावी असं आवाहनही येडियुरप्पांनी केलं.
करोना व्हायरसाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून अद्यापही नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलेलं नाही. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्याऐवजी अजून बिकट होईल असं सांगितलं आहे. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. एप्रिल महिन्याच्या अखेरीस पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली. एफपीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
“आपल्या देशातील काही ठिकाणी परिस्थिती सुधारत आहे. मात्र काही ठिकाणी अद्यापही चिंतेची बाब आहे. परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अजून बिकट होत जाणं जास्त दुर्दैवी आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं. “दक्षिण अमेरिकेतील अनेक भागांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असून चिंताजनक परिस्थिती आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
अमेरिकेत करोनाचा कहर असून आतापर्यंत १ लाख ४१ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी देशवासियांना करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क वापरा असं आवाहन केलं. “जेव्हा तुम्हाला सोशल डिस्टनसिंग पाळणं शक्य नाही तेव्हा तुम्ही मास्क वापरा असं आम्ही प्रत्येकाला सांगत आहोत,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा सरकारने मंगळवारी रात्री केली. या घोषणेनुसार आता माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी आणि बीपीओ कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत घरुनच काम करता येणार आहे. वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ जुलै रोजी संपत होती. मात्र त्याआधीच ही मुदत पाच महिन्यांनी वाढवली आहे. यासंदर्भातील माहिती दूरसंचार विभागाने मंगळवारी रात्री ट्विटवरुन दिली आहे.
“करोनाच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागाने घरुन काम करण्यासंदर्भातील अटी आणि नियमांमध्ये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत शिथिल करण्यात आल्या आहेत,” असे ट्विट दूरसंचार विभागाने केलं आहे.
आयटी क्षेत्रातील ८५ टक्के कर्मचारी सध्या घरुनच काम करत आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेसंदर्भातील कर्मचारी कार्यालयांमध्ये जाऊन काम करत आहेत. यापूर्वीही दूरसंचार विभागाने ३० एप्रिल रोजी वर्क फ्रॉम होमसंदर्भातील मुदत संपण्याआधीच ती ३१ जुलैपर्यंत वाढवली होती. राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान ही घोषणा केली होती.
सर्वात आधी १३ मार्च रोजी सरकारने आयटी कंपन्यांनी घरुन काम कऱण्याची परवानगी देण्यासंदर्भात सूचना जारी केल्या होत्या. हा कालावधी आधी ३० एप्रिल आणि त्यानंतर ३१ जुलै रोजी संपणार होता. मात्र आता तो थेट ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच हा वर्क फ्रॉम होमचा कालावधी आता एकूण ९ महिन्यांचा झाला आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.