चालू घडामोडी आणि दिनविशेष - 22 जानेवारी 2024

Date : 22 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इथिओपियाच्या धावपटूंनीच पुन्हा मुंबई गाजवली!
 • प्रतिष्ठेच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या धावपटूंना आपले वर्चस्व राखण्यात यश आले. सलग दुसऱ्या वर्षी इथिओपियाच्या धावपटूंनी ‘एलिट’ पुरुष आणि महिला या दोनही गटांमध्ये बाजी मारली. विशेष म्हणजे, पुरुषांमध्ये हायले लेमीला आपले जेतेपद राखण्यात यश आले. पुरुष गटात अव्वल दहा धावपटूंपैकी पाच हे इथिओपिया, तीन केनिया आणि दोन भारताचे होते. महिलांमध्ये मात्र इथिओपियाने पूर्णपणे वर्चस्व राखले. अव्वल आठही धावपटू इथिओपियाच्या होत्या. यात अबेराश मिन्सेवोने जेतेपद पटकावले.
 • रविवारी झालेल्या मुंबई मॅरेथॉनच्या १९व्या पर्वात विविध गटांमध्ये मिळून ५६ हजार धावपटूंनी सहभाग नोंदवला. यात सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा हायले लेमीने जिंकली. लेमीने ४२.१९५ किलोमीटरचे अंतर २ तास ७ मिनिटे आणि ५० सेकंद अशा वेळेसह पूर्ण करत ‘एलिट’ पुरुष गटात अग्रस्थान मिळवले. परंतु गतवर्षीच्या विक्रमी वेळेपासून तो १८ सेकंद दूर राहिला. महिलांमध्ये अबेराशने २ तास २६ मिनिटे आणि ०६ सेकंद अशा वेळेची नोंद करत जेतेपद मिळवले. गतवर्षी अंचलेम हेमानोतने विक्रमी २ तास २४ मिनिटे आणि १५ सेकंद अशा वेळेसह बाजी मारली होती. यंदा मात्र हेमानोतला (२ तास २९ मिनिटे ५८ सेकंद) सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
 • ‘एलिट’ गटात भारतीयांमध्ये श्रीनू बुगाथा (२ तास १७ मिनिटे २९ सेकंद) पुरुषांमध्ये, तर निरमाबेन भारतजी ठाकोर (२ तास ४७ मिनिटे ११ सेकंद) महिलांमध्ये विजयी ठरले. ऑलिम्पिकपटू आणि गतविजेत्या गोपी थोनाक्कलला यंदा दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने २ तास १८ मिनिटे आणि ३७ सेकंद अशा वेळेत मॅरेथॉन पूर्ण केली. शेर सिंह तन्वर (२ तास १९ मिनिटे ३७ सेकंद) तिसऱ्या स्थानावर आला. महिलांमध्ये रेश्मा केवाते (३ तास ३ मिनिटे ३४ सेकंद) आणि श्यामली सिंग (३ तास ४ मिनिटे ३५ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले.
 • ‘एलिट’ गटात पुरुषांमध्ये हेमानोत अलेव (२ तास ९ मिनिटे ०३ सेकंद) दुसऱ्या, तर मितकू ताफा (२ तास ९ मिनिटे ५८ सेकंद) तिसऱ्या स्थानावर आले. महिलांमध्ये मुलुहाबत सेगा (२ तास २६ मिनिटे ५१ सेकंद) आणि मेदहिन बेईने (२ तास २७ मिनिटे ३४ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. पुरुषांमध्ये अव्वल तीनही धावपटूंनी ३० किमीचे अंतर १ तास ३१ मिनिटे ०५ सेकंदांत पूर्ण केले होते. मात्र, अखेरच्या काही किलोमीटरमध्ये लेमीने आपला वेग वाढवला आणि सलग दुसऱ्यांदा मॅरेथॉन जिंकली.
बाबरी मशिदीचा निकाल देणाऱ्या खंडपीठातील ‘हे’ न्यायाधीश प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजर राहणार
 • सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने २०१९ साली अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेचा निकाल दिला होता. या खंडपीठात तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. डी.वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दूल नझीर यांचा समावेश होता. खंडपीठाने अनेक दशकांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला होता. या न्यायाधीशांपैकी कोण कोण आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहे, याबाबत प्रश्न विचारला जात आहे.
 • टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई, विद्यमान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायाधीश नझीर हे सोमवारी, २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. तर न्या. अशोक भूषण हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
 • माजी न्या. गोगोई निवृत्त झाल्यानंतर त्यांना २०२० साली राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले होते. गोगोई सध्या विविध सामाजिक उपक्रमात व्यस्त आहेत. अनाथालय चालविणे, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सेवा उपक्रम करण्याचे काम ते करत आहेत. गोगोई यांच्या मातोश्रींनी अनेक वर्षांपूर्वी सुरू केलेला समाजसेवेचा वसा ते पुढे नेत आहेत. तसेच खासदार निधीतून ते आसाममधील विविध ठिकाणी पायाभूत सुविधा तयार करण्यात सहकार्य करत आहेत.
 • विद्यमान सरन्यायाधीश हे सोमवारी (२२ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात कामकाजात व्यस्त राहणार आहेत. धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहण्यापेक्षा त्यांनी न्यायालयातील कामकाजाला अधिक महत्त्व दिले आहे. तर न्या. शरद बोबडे हे नागपूरमध्ये आपल्या मुळ घरात निवृत्त आयुष्य जगत आहेत. त्यांनी प्राणप्रतिष्ठेला जाण्याबाबतचा निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही.
 • न्या. अब्दूल नझीर हे त्या खंडपीठातील एकमेव मुस्लीम न्यायाधीश होते. ते सध्या आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत. त्यांनी नियोजित कार्यक्रमामुळे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहता येणार नसल्याचे सांगितले आहे.
 • राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणारे एकमेव न्यायाधीश न्या. भूषण यांना राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायासन लवादाचे (NCLAT) अध्यक्ष म्हणून ८ नोव्हेंबर २०२१ रोजी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे.
 • राम मंदिर-बाबरी मशीद वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अंतिम निर्णय घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, २.७७ एकरची वादग्रस्त जमीन रामलल्लाचे जन्मस्थान आहे. न्यायालयाने ही जमीन भारत सरकारने नंतर स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा निर्णय दिला होता. न्यायालयाने सरकारला उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला स्वतंत्र पाच एकर जमीन देण्यास सांगितले होते जेणेकरून बोर्ड मशीद बांधू शकेल. ६ डिसेंबर १९९२ रोजी एका जमावाने बाबरी मशीद पाडली. यानंतर राम मंदिर आंदोलनाने वेगळे वळण घेतलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हा पहिला असा निकाल होता, कोणत्याही न्यायाधीशाचे नाव टाकलेले नाही.
अडचणीतून निरमाबेनचे अभूतपूर्व यश!
 • घरामध्ये खेळांची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही निरमाबेन ठाकोरने लांब पल्ल्यांच्या शर्यतीत कारकीर्द घडवण्याचे स्वप्न पाहिले. रविवारी झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये तिने प्रथम स्थान पटकावत सर्वाचे लक्ष वेधले. अनेक अडचणींवर मात करत निरमाबेन आज यशस्वी अ‍ॅथलीट आहे. तिचा इथवरचा प्रवास अभूतपूर्व असाच होता.
 • ‘‘गुजरातमध्ये मी सराव करत असताना माझी कामगिरी समाधानकारक होत नव्हती. त्यावेळी माझ्या प्रशिक्षकांनी बाहेर जाऊन प्रशिक्षण घेण्यास सांगितले. मग, मी नाशिकमध्ये सराव करू लागले. तेथील वातावरणात माझ्या कामगिरीत सुधारणा पाहायला मिळाली. गेल्या तीन वर्षांपासून मी नाशिकमध्येच सराव करत आहे,’’ असे निरमाबेनने नमूद केले.
 • ‘मी यापूर्वीही पळायचे, पण त्यावेळी धावण्याला फार गंभीरपणे मी घेतले नव्हते. यानंतर मी गांभीर्याने सराव केला व माझी कामगिरी उंचावली. मग, मी सातत्याने सरावावर अधिक भर दिला. मी केनियाहून आल्यानंतर नाशिकमध्ये सराव केला व त्यानंतर पुणे मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. तेथून माझा आत्मविश्वास दुणावला. या मॅरेथॉनमध्ये ३ तास ७ मिनिटे वेळेची नोंद केली. मग झालेल्या २०२१मध्ये मी इंद्रा मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये २ तास ५० मिनिटे अशी वेळ नोंदवली आणि या कामगिरीमुळे मला आणखी प्रोत्साहन मिळाले. मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना मला ‘पेसर’मुळे बराच फायदा झाला,’’ असे निरमाबेन म्हणाली.
प्रभू श्री राम मंदिरासाठी १०१ किलो सोनं दान, कोण आहे सर्वात मोठे दानशूर? वाचा…
 • भारताच्या इतिहासात आणखी एका नव्या अध्यायाला सुरूवात होत आहे. अयोध्येत प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आज ( २२ जानेवारी ) पार पडणार आहे. यासाठी अयोध्या नगरी आणि देशभरात उत्सहाचं वातावरण आहे. श्री राम मंदिराची निर्मिती राम भक्तांनी दिलेल्या दानातून झाली आहे. श्री राम मंदिरासाठी देश आणि जगभरातील करोडो भक्तांनी कोट्यावधींचं दान दिलं आहे.
 • श्री राम मंदिराच्या निर्मितीसाठी सगळ्यात मोठं दान सूरतमधील एका हिरे व्यापाऱ्यानं दिलं आहे. या हिरे व्यापाऱ्यानं दान देण्याच्याबाबतीत मोठ्या-मोठ्या उद्योगपतींनाही मागे टाकलं आहे. सूरतमधील हिरे व्यापारी असलेल्या लाखी कुटुंबानं श्री राम जन्मभूमी मंदिरासाठी १०१ किलो सोन्याचं दान दिलं आहे. याचा वापर श्री राम मंदिरातील दरवाज्यांवर सोन्याचा मुलामा देण्यासाठी होणार आहे.
 • दिलीप कुमार वी. लाखी सूरतमधील सर्वात मोठ्या हिरे व्यापाऱ्यापैकी एक आहेत. लाखी कुटुंबानं श्री राम जन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्टला आतापर्यंतचे सर्वातं मोठं दान दिल्याचं सांगितलं जातंय. मंदिरातील दरवाजे, गर्भगृह, त्रिशूळ, डमरू, स्तंभ यासह मंदिरातील तळमजल्यावर असलेल्या १४ दरवाज्यांसाठी १०१ किलो सोनं लाखी कुटुंबानं दान केलं आहे.
 • सद्यस्थितीला १० ग्रॅम सोन्याची किंमत ६४ ते ६५ हजाराच्या आसपास आहे. त्यानुसार एक किलो सोन्याची किंमत ६४ लाख ते ६५ लाख होते. तर, १०१ किलो सोन्याची किंमत ६६ कोटी रूपयांच्या घरात जाते.
आधी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर, मग रुग्णालय प्रशासनाने निर्णय बदलला; AIIMS च्या नव्या निवेदनात काय?
 • अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील रामभक्त आतुर आहेत. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना हाफ डे म्हणजे अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली आहे. तर महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवसाची सुट्टी लागू केली आहे. तर, विविध राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवसाची सुट्टी आहे. परिणामी अनेक सरकारी आस्थापने, सेवा केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे मिळाल्याने दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा ( एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) विभागही २२ जानेवारी रोजी २.३० वाजेपर्यंत बंद राहणार होता. परंतु, यामुळे देशभरात गदारोळ झाल्याने रुग्णालय आस्थापनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आहे.
 • दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा ( एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सोमवारीही खुला राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर करून माहिती दिली. AIIMS प्रशासनाने रविवारी जारी केलेल्या ताज्या निवेदनात म्हटले आहे की, “रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आणि रूग्ण सेवा सुविधा सुलभ करण्यासाठी बाह्यरुग्ण सेवांसह सर्व क्लिनिकल सेवा खुल्या राहतील. सर्व केंद्रप्रमुख, विभागप्रमुख, युनिट्स आणि शाखा अधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी हे त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.
 • शनिवारी, रुग्णालय आस्थापनाने जाहीर केले होते की २२ जानेवारी रोजी दुपारी २.२३० वाजेपर्यंत ओपीडी बंद ठेवली जाईल. फक्त आपत्कालीन आणि गंभीर सेवा सामान्यपणे कार्यरत राहतील. एम्सच्या ओपीडीमध्ये दररोज सरासरी १५,००० रुग्ण उपचारार्थ येतात.

 

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर :
 • महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या प्रात्येक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. माहितीनुसार, दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी २०२२ पासून सुरु होतील आणि १४ मार्चपर्यंत चालतील. तर, बारावीच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चच्या दरम्यान होतील.

 • तथापि, मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अपडेट्ससाठी, तुम्ही एमएसबीएसएचएसईच्या (MSBSHSE) अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in ला भेट देऊ शकता.

 • महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार आहेत. तर, बारावीची लेखी परीक्षा ४ मार्चला सुरु होणार असून ती ३० एप्रिलपर्यंत चालेल.

पंतप्रधान मोदी जगात भारी… सर्वाधिक Approval Rating सहीत ठरले सर्वात लोकप्रिय नेते :
 • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक स्तरावरील एका सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक लोकप्रिय म्हणजेच लोकमान्यता असणारे नेते म्हणून पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळालं आहे.

 • पंतप्रधान मोदींची मान्यता गुणांकन म्हणजेच अ‍ॅप्रूव्हल रेटिंग हे जगातील इतर कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वाधिक आहे. ७१ टक्क्यांसाहीत मोदींनी या यादीमध्ये पहिलं स्थान मिळवलंय. अमेरिकतील ग्लोबल लीडर अ‍ॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलंय.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते ठरले आहे. त्यांनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे.

 • मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी यासारख्या नेत्यांचाही या यादीमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी समावेश आहे.

बिल गेट्स यांनी केलं पाकिस्तानचं कौतुक; पंतप्रधान इम्रान खान यांना फोन करत म्हणाले :
 • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

 • यावेळी इम्रान खान यांनी बिल गेट्ससोबत पोलिओ निर्मुलन आणि करोना महामारीबद्दल चर्चा केली. बिल गेट्स यांची संस्था सध्या पोलिओ निर्मुलनासह अन्य अनेक क्षेत्रांमध्ये पाकिस्तानची मदत करत आहे.

 • पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी गेट्स यांच्याशी संवाद साधताना जगभरात गरिबी, रोगराई आणि असमानतेशी लढण्यासाठी गेट्स फाऊंडेशन करत असलेल्या कामाचं कौतुक केलं. या चर्चेची माहिती पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून एका निवेदनाद्वारे देण्यात आली. यामध्ये असा उल्लेख होता की, इम्रान खान यांनी पाकिस्तानात बिल एँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने केलेल्या कामाचं कौतुक केलं.

 • पोलिओ निर्मुलनासाठी पाकिस्तान करत असलेल्या प्रयत्नांचं बिल गेट्स यांनी कौतुकही केलं आहे. बिल गेट्स यांनी सांगितलं की त्यांची संस्था पोलिओ निर्मुलनासाठी सातत्याने काम करत राहील. त्याचबरोबर पाकिस्तानातली लसीकरण मोहीम यशस्वी झाल्याचंही बिल गेट्स यांनी बोलून दाखवलं. त्यांनी आश्वासन दिलं की गेट्स फाऊंडेशन पाकिस्तानला कायम समर्थन देईल. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केलं आहे.

भारताची सलामी पाकिस्तानशी ; ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर :
 • भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट मोहिमेला प्रारंभ मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर २३ ऑक्टोबरला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध लढतीने होणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले.

 • गतवर्षी संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघ ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धामध्ये प्रथमच पाकिस्तानकडून हरला. अव्वल-१२ फेरीमधील भारताचा दुसरा सामना २७ ऑक्टोबरला अ-गटातून उपविजेत्या ठरलेल्या संघाशी होणार आहे.

 • मग भारत ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेशी, तर २ नोव्हेंबरला बांगलादेशशी सामना करणार आहे. ६ नोव्हेंबरला भारताचा अव्वल-१२ फेरीमधील अखेरचा सामना ब-गटातील विजेत्याशी होईल.

 • दोन गटांचा समावेश असललेल्या अव्वल-१२ फेरीस २२ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड लढतीने प्रारंभ होईल. याच दोन सघांमध्ये गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला होता. १ नोव्हेंबरला न्यूझीलंडचा संघ इंग्लंडशी लढत देईल. २०२१मध्ये न्यूझीलंडने उपांत्य सामन्यात इंग्लंडला नमवले होते.

राज्यात गेल्या २४ तासांत ४८ हजार २७० नव्या करोना बाधितांची भर; ५२ रुग्णांचा मृत्यू :
 • राज्यातील करोनाची रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात करोनाच्या ४८ हजार २७०  नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात दिवसभरात ४२, ३९१ रुग्ण करोवर मात करुन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी राज्यात करोनाच्या ४६ हजार  १९७ करोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आता पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

 • गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाचे ५००८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत शुक्रवारी १२,९१३ रुग्णांनी करोनवर मात केली आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १४,१७८ आहे.

 • राज्यात शुक्रवारी १४४ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत २३४३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद  झाली आहे. त्यापैकी ११७१ रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

२२ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.