राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे संकेत गायकवाड यांनी यापूर्वीच दिले होते. बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावले जातील असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
दरवर्षी साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होते. मात्र यंदा करोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या. त्यानंतर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. गायकवाड यांनी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा संभाळल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जो बायडेन यांनी भारतीयांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बायडेन यांनी अमेरिकेच्या इमीग्रेशन पॉलिसीमध्ये (स्थलांतर धोरणांमध्ये) मोठे बदल करण्यास सुरुवात केलीय.
बायडेन यांनी अमेरिकन काँग्रेससमोर बोलताना एक नवीन कायदा तयार करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. या कायद्यामुळे एक कोटी १० लाख अप्रवासी नागरिकांना म्हणजेच कायमस्वरुपी अमेरिकेमध्ये स्थायिक होण्यासाठी गेलेल्या भारतीयांना स्थानिक म्हणून दर्जा मिळण्याबरोबरच अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याच्या मार्गातील अनेक अडथळे दूर होणार आहेत.
यात लाखो भारतीयांचाही समावेश आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील कोट्यावधी अप्रवासी नागरिकांवर देश सोडून जाण्याची टांगती तलवार होती. मात्र अध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर बायडेन यांनी ट्रम्प यांचे अनेक निर्णय रद्द केले असून त्यामध्ये या स्थलांतर धोरणांमधील बदलांचाही समावेश आहे. बायडेन प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेत स्थायिक होण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
बायडेन यांनी जारी केलेल्या नवीन आदेशामुळे कायदेशीर कागदपत्र नसतानाही अमेरिकेत वास्तव्य करत असणाऱ्यांना फायदा होणार आहे. अमेरिकेमध्ये अशा लोकांची संख्या एक कोटी १० लाख इतकी आहे. त्यापैकी पाच लाख नागरिक हे मूळचे भारतीय आहेत. बायडेन यांनी पहिल्याच दिवशी घेतलेला हा निर्णय ट्रम्प यांच्या धोरणांच्या अगदी उलट आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून कामकाजाच्या पहिल्याच दिवशी जो बायडेन यांनी १५ कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली असून, आपले पूर्वसुरी डोनाल्ड ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबतचे काही महत्त्वाचे निर्णय फिरवले आहेत.
हवामान बदलाबाबतच्या पॅरिस करारात पुन्हा सहभागी होणे, जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिकेची माघार थांबवणे, मुस्लिमांना केलेली प्रवासबंदी रद्द करणे आणि मेक्सिको सीमेवरील भिंतीचे बांधकाम तत्काळ थांबवणे यांसारख्या विविध विषयांचा या कार्यकारी आदेशांमध्ये समावेश आहे.
पहिल्या आदेशान्वये त्यांनी अमेरिकी लोकांना १०० दिवस मुखपट्टी घालण्याचे आवाहन केले आहे.
‘आजच्या कार्यकारी आदेशांचा मला अभिमान आहे आणि मी अमेरिकी लोकांना जी आश्वासने दिली ती पाळण्याची मी आज सुरुवात करत आहे. आम्हाला बराच पल्ला गाठायचा आहे. या केवळ कार्यकारी कृती आहेत. त्या महत्त्वाच्या आहेत, पण आम्हाला ज्या अनेक गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी त्याबाबत कायदे करणे आम्हाला गरजेचे आहे’, असे व्हाइट हाऊसच्या ओव्हल कार्यालयात बुधवारी कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केल्यानंतर बायडेन यांनी पत्रकारांना सांगितले.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची एक इमारत गुरुवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. इमारतीचे बांधकाम सुरु होते. या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने या आगीमुळे ‘कोव्हिशिल्ड’ लस निर्मितीच्या उत्पादनावर कुठलाही परिणाम झालेला नाही. सध्या सर्वांचेच लक्ष या जीवरक्षक लसीकडे लागले आहे.
देशात शनिवारपासूनच लसीकरणाला सुरुवात झालीय. आतापर्यंत लाखो लोकांना या लसीचे डोस देण्यात आले आहेत. पुण्यातील या अग्नि दुर्घटनेनंतर आज सीरम इन्स्टिट्यूटने म्यानमार, सेशेल्स आणि मॉरिशेस या देशांना ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा साठा पाठवून दिला.
अदर पूनावाला काय म्हणाले - सर्व सरकारी संस्था आणि लोकांना मी हे निश्चितपणे सांगू शकतो की कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही. कोव्हिशिल्डची निर्मिती अनेक इमारतींमध्ये केली जाते. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अशी एखादी घटना घडलीच तर लस सुरक्षित रहावी म्हणून मी मुद्दाम अशाप्रकारची रचना करुन ठेवली आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी ट्विटरवरुन दिली आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी पुणे पोलीस आणि अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत - पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना सीरम इन्स्टिट्यूटकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांपैकी दोन जण पुण्यातील असून अन्य दोन जण उत्तर प्रदेश व एकजण बिहारमधील आहे. हे सर्वजण कंत्राटी मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.
देशामध्ये करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या अंमलबजावणीला १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलीय. मात्र आता दुसऱ्या टप्प्यामध्ये राजकीय नेत्यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार यांच्याबरोबरच इतर आजार असणाऱ्या राजकीय नेत्यांचे लसीकरण केलं जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे अनेक दिग्गज नेते हे ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. ८० हून अधिक वय असणाऱ्या नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एचडी देवगौडा यांच्याबरोबरच भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.
सरकारने करोना लसीकरणाची मोहीम टप्प्याटप्प्यांमध्ये राबवली जाणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यामध्ये सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मंत्र्यांबरोबर नेत्यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. यात अगदी पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.
सध्याची आकडेवारी पाहिली तर लोकसभेमधील तीनशेहून अधिक नेते ५० पेक्षा जास्त वर्षांचे आहेत. तर राज्यसभेमधील २०० हून अधिक खासदार हे वयाची पन्नाशी ओलांडलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये भारत सरकार तीन कोटी वैद्यकीय कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांना करोनाची लस देणार असून दुसरा टप्पा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल, असं हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.