चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ फेब्रुवारी २०२०

Date : 22 February, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पाकिस्तान ‘करडय़ा यादी’तच कायम : 
  • नवी दिल्ली : ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ने (एफएटीएफ) पाकिस्तानला ‘करडय़ा यादी’तच कायम ठेवले असून लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांना होणारे आर्थिक साहाय्य रोखण्यात अपयश आल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

  • दहशतवादी कारवायांना होणारे अर्थसाह्य़ रोखण्यात यश आल्याचा दावा करून ‘एफएटीएफ’च्या तावडीतून सुटका करून घेण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न फोल ठरले आहेत.

  • ‘एफएटीएफ’च्या पॅरिसमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला करडय़ा यादीतच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जूनपर्यंत व्यापक कृती योजना पूर्ण न केल्यास त्याचा पाकिस्तानच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला दिला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

  • लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिद्दीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना होणाऱ्या अर्थसाह्य़ावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एफएटीएफ’ने केलेल्या २७ सूचनांपैकी पाकिस्तानने केवळ काही सूचनांचेच पालन केले आहे, याची ‘एफएटीएफ’ने नोंद घेतली. या दहशतवादी संघटनांचा भारतात हल्ले करण्यात हात आहे. पाकिस्तानने जूनपर्यंत आपली व्यापक कृती योजना पूर्ण केली पाहिजे, असे ‘एफएटीएफ’ने म्हटले आहे.

‘सीएफएसएल’ अहवालाअभावी गुमनामी बाबांचे गूढ कायम : 
  • कोलकाता : गुमनामी बाबा म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते असे मानले जाते, पण हे गूढ आता अधिक गहिरे झाले आहे, कारण कोलकात्यातील सीएफएसएल प्रयोगशाळेने  गुमनामी बाबाच्या दातांचा इलेक्ट्रोफेरोग्राम हा उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.

  • इलेक्ट्रोफेरोग्राममध्ये अशा  माहितीचा असा संच असतो जी डीएनए क्रमवारी यंत्राने तयार केलेली असते व ती माहिती व्यक्तीच्या डीएनए ओळख चाचणीसाठी वापरली जात असते.

  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत विशेष प्रेम असलेल्या सयाक सेन यांनी पाठवलेल्या माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात सीएफएसएलचे मुख्य माहिती अधिकारी बी. पी. मिश्रा यांनी म्हटले आहे की, या प्रकरणी इलेक्ट्रोफेरोग्राम अहवाल कोलकात्याच्या सीएफएसएल प्रयोगशाळेकडे उपलब्ध नाही.

  • ४ फेब्रुवारी २०२० रोजी दिलेल्या उत्तरात त्यांनी म्हटले आहे की, यावर जर अपील करायचे असेल तर ते सीएफएसएल कोलकाता या संस्थेच्या अपील अधिकाऱ्यांकडे करावे लागेल.  तीस दिवसातच असे अपील करता येईल.

चीनमध्ये करोना बळींची संख्या २,२३६ : 
  • बीजिंग : चीनमध्ये करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या आता २,२३६ झाली असून आणखी ११८ मृत्यू गुरुवारी झाले आहेत. हुबेई प्रांतातच मृतांची संख्या अधिक आहे. एकूण निश्चित रुग्णांची संख्या ७५,६४५ झाली आहे. बुधवारी ११४ जणांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे आता पुन्हा संख्या वाढली आहे.

  • नवीन रुग्ण संसर्गाची संख्या महिनाभरात प्रथमच कमी झाली आहे. गुरुवार अखेरीस २,२३६ जण मरण पावले असून देशात दिवसभरात ११८ बळी गेले, त्यात आता ८८९ नवीन निश्चित रुग्णही सापडले आहेत. एकूण १,६१४ संशयित दिवसभरात सापडले असून ५,२०६ जणांवर संसर्गाचा संशय आहे. ११८ मधील ११५ बळी हुबेईत गेले असून उर्वरित झेजियांग, चोनक्विंग व युन्नान येथे मरण पावले आहेत.

  • गुरुवार अखेरीस उपचारानंतर घरी पाठवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १८,२६४ झाली आहे. हुबेई प्रांत हे विषाणूचे केंद्रस्थान ठरले असून तेथे ४११ नवीन रुग्ण सापडले आहेत. तेथील एकूण रुग्णांची संख्या ६२,४२२ झाली असून वुहानमध्ये एकूण ४५,३४६ रुग्णांची निश्चिती झाली आहे. रुग्णालयात ४२,०५६ लोक दाखल असून त्यापैकी  ८९७९ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट : 
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झालेली ही पहिलीच भेट आहे.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सगळेच मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेत असतात. हा एक शिष्टाचार समजला जातो. या भेटीत मुख्यमंत्री हे आपल्या राज्याचे प्रश्नही त्यांच्यापुढे मांडत असतात.

  • 25 वर्षांपासून शिवसेना हा भाजपाचा मित्रपक्ष होता. मात्र महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपासोबत काडीमोड घेतला आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. त्यानंतर ही भेट महत्त्वाची मानली जात होती.

नसबंदीचं कर्मचाऱ्यांना टार्गेट, कमलनाथ सरकारचा अजब निर्णय : 
  • मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने पुरुष बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवा आद्यादेश जारी केला आहे. २०१९-२० या वर्षात जर कमीत कमी एकाची नसबंदी करण्यात अपयश आल्यास त्याचं वेतन कपात केलं जाईल, असा आदेश कमलनाथ सरकारनं जारी केला आहे.

  • काही प्रसारमाध्यांच्या वृत्तानुसार, नसबंदीसंबंधी दिलेलं टार्गेट पुर्ण न केल्यास त्या कर्मचाऱ्याला सक्तीची निवृत्ती दिली जाईल. या आद्यादेशामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारवर टीका होत आहे. राष्ट्रीय कुटुंब नियोजन सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार मध्य प्रदेशातील ०.५ टक्के पुरुषांनी नसबंदी केली आहे.

  • राष्ट्रीय कुटुंब नियोजनाच्या सर्वेक्षण अहवाल पुढे करत राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) ने जिल्हाधिकारी, मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांना झिरो वर्क आऊटपूट देणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिलेत. काम नाही, तर पगारही नाही, या तत्तावर काम करावं, असे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच पुरुष कर्मचाऱ्यांना कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत नसबंदीसाठी लक्ष्य देण्यात यावं, असंही यामध्ये म्हटलेय.

कृषी अधिकारी म्हणून मुलींची लक्षणीय संख्येत निवड : 
  • वर्धा : महिलांसाठी लांबच्या समजल्या जाणाऱ्या कृषी खात्यात प्रथमच लक्षणीय संख्येत कृषी अधिकारी म्हणून मुलींची निवड झाली आहे.

  • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने कृषी सेवा गट?ब अंतर्गत ८३ उमेदवारांची शिफारस कृषी खात्याकडे केली आहे. यापैकी जवळपास एक तृतियांश महिला असून परिविक्षाधीन कालावधीसाठी कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती प्रस्तावित आहे. शिक्षणात वैद्यकीय व अभियांत्रिकीपाठोपाठ कृषी शिक्षणास प्राधान्य मिळत असल्याचे कृषी महाविद्यालयातील प्रवेशासाठी चाललेल्या चढाओढीतून दिसून येते. कृषी खात्यात महिला अधिकाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी  आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने निवड झालेल्या महिला अधिकाऱ्यांमुळे आगामी काळात कृषी खात्याची सूत्रे महिलांकडे जाण्याची चिन्हे आहेत.

  • निवडप्राप्त सर्व महिलांना एक महिन्याच्या आत रूजू व्हायचे आहे. महिला आरक्षित पदावर शिफारस झालेल्या महिला उमेदवारांच्या प्रमाणपत्राची तपासणी महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात येणार आहे. नेमणूक झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमास हजेरी लावणे अनिवार्य आहे.

  • कृषी विभागातील ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यासंदर्भात म्हणाल्या, कृषी खात्यात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती स्वागतार्ह आहे. निवड झालेल्या ९० टक्के महिला या शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतीविषयक प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न त्या अधिक तत्परतेने सोडवण्याची अपेक्षा आहे.

२२ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.