चालू घडामोडी आणि दिनविशेष - 22 डिसेंबर 2023

Date : 22 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘एमपीएससी’कडून ७८ पदांसाठीच्या परीक्षेचा निकाल जाहीर
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेअंतर्गत दुय्यम निबंधक श्रेणी १-मुद्रांक निरीक्षक या संवर्गातील ७८ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यात विश्वजित पाटील यांनी खुल्या गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
  • एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. जाहीर करण्यात आलेली निवडयादी तात्पुरत्या स्वरुपाची असल्याने उमेदवारांच्या अर्जांतील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी काही उमेदवारांच्या शिफारसीमध्ये बदल होऊ शकतो. ही निवडयादी न्यायालयाच्या, न्यायाधिकरणात दाखल विविध न्यायिक प्रकरणांतील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे.
  • खेळाडू प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक प्रमाणपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकारी यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) पर्याय सादर करण्यासाठी उमेदवारांना २२ ते २८ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सादर करता येईल. या पर्यायाच्या आधारेच अंतिम शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात लहान मुलांवर सर्वाधिक अत्याचार; देशभरात १ लाख ६२ हजार गुन्हे दाखल
  • लहान मुला-मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यासंदर्भात देशभरात १ लाख ६२ हजार गुन्हे दाखल झाले आहे. मुला-मुलींवर अत्याचाराच्या गुन्ह्यात ८.७ टक्के वाढ झाली असून देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. दुसऱ्या स्थानावर मध्यप्रदेश आहे. ही माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आली आहे.
  • देशात अल्पवयीन मुला-मुलींवर अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातही महाराष्ट्रात अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनांत सर्वाधिक वाढ झाली आहे. देशभरात अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याचे १ लाख ६२ हजार ४४९ गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार आणि अन्य अत्याचाराच्या घटनांमध्ये देशभरात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात २० हजार ७६२ गुन्हे दाखल असून दुसऱ्या स्थानावर असलेल्या मध्यप्रदेशात २० हजार ४१५ गुन्हे दाखल आहेत. उत्तर प्रदेशात (१८,६८२), राजस्थानमध्ये (९३७०) आणि पाचव्या स्थानावर असलेल्या ओडिशात ८ हजार २४० गुन्हे दाखल आहेत. उत्तर प्रदेशात (९९९) सर्वाधिक अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या घटना घडल्या आहेत, तर केरळ राज्यात ९३० अल्पवयीन मुलींशी गैरकृत्य केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तेलंगणात ११३ मुलींशी अश्लील चाळे केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलीचा खून केल्याच्या १४ घटना घडल्या आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर असून तब्बल ३७ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्यानंतर खून करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

हत्याकांडात मोठी वाढ ..

  • १८ वर्षांखालील मुला-मुलींवर प्राणघातक हल्ला करून खून केल्याच्या गुन्ह्यांमध्ये देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक २४० अल्पवयीन मुला-मुलींचा खून करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात १३९ मुलांचे हत्याकांड झाल्याची नोंद आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या मध्यप्रदेशात ११२ मुलांचे हत्याकांड घडले आहेत. महाराष्ट्रात सातत्याने गुन्हेगारी वाढत असून लहान मुलांच्याही हत्याकांडात मोठी वाढ झाली आहे.

मुंबईत ३ हजार १७४ गुन्हे

  • राज्यात मुलांवर अत्याचारच्या सर्वाधिक घटना मुंबईत घडल्या आहेत. मुंबईत तब्बल ३ हजार १७४ गुन्हे दाखल असून अशा गुन्ह्यांमध्ये नागपूर दुसऱ्या स्थानावर आहे. नागपुरात ७६५ गुन्हे दाखल असून नागपुरात २०२१ मध्ये ९३६ गुन्हे दाखल होते. तिसऱ्या स्थानावर पुणे असून पुण्यात ७३२ दाखल आहेत.
‘ज्ञानवापी’च्या पुरातत्त्व सर्वेक्षण अहवालासंदर्भात सुनावणी ३ जानेवारीला; वाराणसी न्यायालयाचा निर्णय
  • वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी संकुलाच्या सर्वेक्षणाचा मोहोरबंद अहवाल उघडून, पक्षकारांना तो सुपूर्द करण्यासंदर्भात सुनावणीसाठी ३ जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे. हिंदू पक्षकारांचे वकील मदन मोहन यादव यांनी ही माहिती दिली. यादव यांनी सांगितले की, शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी ‘बार कौन्सिल’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वकिलांनी गुरुवारी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.  हे लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश ए .के. विश्वेश यांनी सुनावणीसाठी ३ जानेवारीची तारीख निश्चित केली आहे. 
  • मुस्लीम पक्षकारांचे वकील अखलाक अहमद यांनी सांगितले, की शुक्रवारी होणाऱ्या ‘बार कौन्सिल’ निवडणुकीमध्ये ते व्यग्र असल्याने न्यायालयीन कामकाजात हजर राहत नाहीत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) ने १८ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी मशीद परिसराचा सर्वेक्षण अहवाल मोहोरबंद लिफाफ्यात सादर केला होता.
  • काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेली ज्ञानवापी मशीद १७ व्या शतकात तेथे आधीपासून असलेले मंदिर पाडून बांधण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही मशीद ही हिंदू मंदिराच्या पूर्वीच्या रचनेवर बांधली गेली होती की नाही हे शोधण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. न्यायालयाने हा अहवाल जाहीर करण्यासाठी २१ डिसेंबर ही तारीख निश्चित केली होती. मुस्लीम पक्षकारांनी या दिवशी न्यायालयाने हा अहवाल सार्वजनिक स्वरूपात जाहीर करण्याची विनंती केली होती.
नाताळ, नवीन वर्षानिमित्त गोव्याला जाताय? राज्यात करोनाचा नवीन व्हेरिएंट जेएन.१ चे सर्वाधिक रुग्ण, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
  • करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ ने जागतिक आरोग्य संघटनेच्या चिंता वाढवल्या आहेत. जगभरातल्या अनेक देशांमध्ये जेएन.१ ने बाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. जेएन.१ चा भारतातही शिरकाव झाला आहे. केरळ, महाराष्ट्र, गोव्यासह भारतातल्या अनेक राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सर्वाधिक जेएन.१ बाधित रुग्ण गोव्यात आढळले असून गोवा राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. गोव्यात आतापर्यंत जेएन.१ बाधित १९ रुग्णांची नोंद झाली असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. गोव्याच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे की, सध्या तरी आपण घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण बुधवारी (२० डिसेंबर) दिवसभरात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.
  • पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने सांगितलं आहे की, ते केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एन्फ्लूएन्झासारख्या गंभीर आजारांवर आणि श्वसनाशी संबंधित संक्रमनांच्या प्रकरणांवर लक्ष ठेवणार आहेत. त्याचबरोबर गोवा सरकारही यावर लक्ष ठेवणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखालील राज्यांच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत केंद्राने देशभरातील परिस्थितीची माहिती घेतली.
  • दरम्यान, गोव्यात जेएन.१ ने बाधित १९ रुग्णांची नोंद झाली असून आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, गोव्यात नवीन व्हेरिएंटचे एकूण १९ रुग्ण आहेत. जीनोम सीक्वेन्सिंगच्या माध्यमातून केलेल्या चाचण्यांद्वारे याची नोंद करण्यात आली आहे. या १९ पैकी बहुसंख्य रुग्ण हे उत्तर गोव्यात आढळले आहेत. या सर्व रुग्णांमध्ये खोकला आणि सर्दीची लक्षणं पाहायला मिळाली आहेत. अनेक रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल न करता केवळ सात दिवस विलगीकरण कक्षात ठेवून बरे झाले आहेत. तसेच या रुग्णांच्या आतापर्यंतच्या प्रवासावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
युरोपमध्ये अनेक देशांत अतिउजवी लाट निर्माण होण्याची कारणे काय?
  • गेल्या काही वर्षांपासून युरोपमधील अनेक देशांमध्ये अतिउजव्या विचारसरणीची कमीअधिक प्रमाणात सरशी होताना दिसत आहे. रशिया-युक्रेन युद्धापासून हवामान संकटापर्यंतच्या मुद्द्यांवर अनेक देशांच्या सरकारांनी आपली भूमिका बदलली आहे. २०२४मध्ये जून महिन्यात युरोपियन पार्लमेंटच्या निवडणुका होत आहेत. युरोपमध्ये आलेल्या अतिउजव्या लाटेचा युरोपवर आणि उर्वरित जगावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा…

युरोपियन पार्लमेंटच्या निवडणुका कशा होतात?

  • युरोपियन पार्लमेंटच्या निवडणुका दर पाच वर्षांनी सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराने होतात. ४० कोटींहून अधिक नागरिक मतदान करण्यास पात्र असून भारतानंतर या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकशाही निवडणुका आहेत. युरोपातील २८ देशांची मिळून ‘युरोपियन संघ’ ही संघटना आहे. युरोपियन पार्लमेंटमध्ये २०१९ पर्यंत ७५१ सदस्य निवडून येत होते. मात्र २०२० मध्ये ब्रिटनने युरोपियन संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सदस्यांची संख्या ७०५ झाली आहे.
  • निवडणुकीची प्रक्रिया चार दिवसांची असते आणि पार्लमेंटमध्ये हव्या असलेल्या प्रतिनिधींना मतदान केले जाते. प्रत्येक देश आपले प्रतिनिधी कसे निवडायचे हे ठरवू शकतात. प्रत्येक देशाच्या लोकसंख्येच्या आकारावर आधारित जागांची संख्या भिन्न आहे. प्रत्येक सदस्य देशाला जागांचे वाटप हे अधोगती आनुपातिकतेच्या तत्त्वावर आधारित आहे. प्रत्येक देशाच्या लोकसंख्येचा आकार विचारात घेतला तर लहान देश त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त सदस्य निवडतात. सध्या सर्वाधिक सदस्य जर्मनीचे (९६) असून सायप्रस, माल्टा, लग्झेमबर्ग या देशांची सदस्य संख्या सहा आहे.

 

रिलायन्स उद्योग समूहाकडून ‘मेट्रो इंडिया’चे अधिग्रहण : 
  • रिलायन्स उद्योग समूहाची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) कडून जर्मन रिटेलर मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. २२ डिसेंबर रोजी याबाबतचा करणार करण्यात आला असून हा करार २८५० कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याची माहिती रिलायन्स उद्योग समूहाकडून जारी प्रसिद्धीपत्रकारद्वारे देण्यात आली आहे. ‘मेट्रो इंडिया’ कंपनी खरेदी केल्यानंतर ‘रिलायन्स रिटेल’ची आता डीमार्ट (D-Mart) आणि हायपर मार्केटशी थेट स्पर्धा असणार आहे.

  • मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने २००३ मध्ये भारतात आपल्या उद्योगाला सुरुवात केली होती. कॅश-अँड-कॅरी उद्योग प्रकारात व्यवसाय सुरू करणारी ही भारतातील पहिली कंपनी होती. सद्यस्थितीत कंपनीचे भारतातील २१ शहरांमध्ये ३१ मोठे स्टोअर्स आहेत. तसेच या कंपनीत तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत.

  • आज झालेल्या करारानुसार मेट्रो कंपनीचे भारतातील ३१ स्टोअर्स रिलायन्सच्या ताब्यात येणार आहेत. या स्टोअर्सच्या माध्यमातून मल्टी ब्रॅण्ड रिटेल चेन तयार करण्यात येणार आहे. मेट्रोची भारतातील ३१ घाऊक वितरण केंद्रे तसेच लँड बँक आणि इतर किरकोळ दुकाने रिलायन्सच्या मालकीची होतील. मेट्रोचा वार्षिक महसूल एक अब्ज डॉलरच्या घरात आहे.

करोनाच्या ज्या व्हेरिएंटने माजवला चीनमध्ये कहर त्याच व्हेरिएंटचा पहिला रूग्ण गुजरातमध्ये : 
  • करोनाचा त्रास जगातल्या काही देशांना भेडसावू लागला आहे. चीनमध्ये करोना व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंट BF7 ने हाहाकार माजवला आहे. या व्हेरिएंटचे रूग्ण चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. अशात याच व्हेरिएंटचा एक रूग्ण गुजरातच्या बडोदा या ठिकाणी आढळला आहे. गुजरातच्या बडोदा या शहरात BF7 या व्हेरिएंटचा एक रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

  • गुजरातमध्ये BF7 या व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळल्याची चर्चा आहे. अशात एक प्रकरण कन्फर्म झालं आहे. एक NRI महिला या व्हेरिएंटने संक्रमित झाली आहे. गुजरातमध्ये या व्हेरिएंटचा रूग्ण आढळण्याच्या आधी BF7 चे इतर रूग्णही आढळले आहेत.

  • ऑक्टोबर महिन्यातही एक रूग्ण आढळला होता. मात्र चीनमध्ये या व्हेरिएंटने कहर माजवला असताना गुजरातमध्ये एक रूग्ण आढळल्याची बातमी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं आहे. आज तकने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

अखेरच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा विजय : 
  • अ‍ॅशले गार्डनरची (३२ चेंडूंत नाबाद ६६ आणि २० धावांत २ बळी) अष्टपैलू कामगिरी आणि हिदर ग्रॅहमच्या (८ धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने मालिकेतील अखेरच्या पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ५४ धावांनी पराभव केला. या विजयाने ऑस्ट्रेलिया महिला संघाने मालिका ४-१ अशी जिंकली. अ‍ॅशले गार्डनर सामन्यासह मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.

  • प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची स्थिती १० षटकांत ४ बाद ६७ अशी बिकट झाली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही. गार्डनर आणि हॅरिस जोडीने पाचव्या गडय़ासाठी नाबाद १२९ धावांची भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत ४ बाद १९६ अशी भक्कम मजल मारून दिली. गार्डनरने आपल्या खेळीत ११ चौकार, तर हॅरिस ३५ चेंडूत सहा चौकार, चार षटकारांसह ६४ धावा करून नाबाद राहिली.

  • आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचे गडी ठराविक अंतराने गडी बाद झाले. दीप्ती शर्माची ३४ चेंडूतील ५३ धावांची खेळी हाच काय तो भारताला मिळालेला दिलासा होता. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात अखेरचा बदल म्हणून संधी मिळालेल्या हिदर ग्रॅहमने चमकदार कामगिरी करत भारताचा डाव अखेरच्या चेंडूवर १४२ धावांत संपुष्टात आला.

गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मुखपट्टी!; करोना प्रतिबंधक उपाययोजना करण्याची केंद्राची राज्यांना सूचना : 
  • चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना दिला.

  •  चीनमध्ये करोनाच्या नव्या उत्परिवर्तनामुळे मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी तज्ज्ञांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ‘‘करोनासाथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी करोना प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याबरोबरच वर्धक मात्रेसह संपूर्ण लसीकरणासाठी प्रयत्नशील राहावे’’, असे मंडाविया यांनी सांगितले.

  • जास्तीत जास्त करोना रुग्णांचे नमुने जनुक्रीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्याची सूचनाही आरोग्यमंत्री मंडाविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली. चीनसह अन्य देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे नमुने विमानतळावर तपासण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. देशातील २७-२८ टक्के पात्र नागरिकांनी करोनाची वर्धक मात्रा घेतली आहे, याकडे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी बैठकीतील उपस्थितांचे लक्ष वेधले. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीच्या वापराचा आग्रह त्यांनी धरला.

  • देशात सध्या करोनाचे ३,४०८ उपचाराधीन रुग्ण आहेत. देशात करोनाची रुग्णसंख्या कमी असली तरी चीनसह अन्य देशांत मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात करोनाचे सरासरी ५.९ लाख दैनंदिन रुग्ण आढळत आहेत.

‘आयपीएल’मध्येही प्रभावी खेळाडूचा नियम : 
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या आगामी हंगामात प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेअर) हा नियम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमाचा पहिला प्रयोग यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत झाला होता. हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यामुळे ‘आयपीएल’मध्येही हा नियम वापरला जाईल.

  • ‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’ स्पर्धेत सहभागी दहाही संघांना पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली. प्रभावी खेळाडू हा केवळ भारतीय असेल असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले आहे. ‘आयपीएल’ संघांना एका सामन्यात चार परदेशी खेळाडू खेळवण्याची मुभा असते. परंतु सामन्याच्या सुरुवातीला संघात तीनच परदेशी खेळाडूंना स्थान दिल्यास प्रभावी खेळाडू म्हणून सामन्यादरम्यान चौथा परदेशी खेळाडू मैदानावर आणण्याची संघाला परवानगी असेल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत परदेशी खेळाडूंचा आकडा चारपेक्षा अधिक होऊ शकत नाही, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे.

  • कर्णधाराला प्रभावी खेळाडूचे नाव सांगावे लागेल. डावाच्या सुरुवातीला, षटकाच्या समाप्तीनंतर, फलंदाज बाद झाल्यास किंवा फलंदाजाला दुखापतीमुळे बाहेर जावे लागल्यास प्रभावी खेळाडूला मैदानावर येता येईल. प्रभावी खेळाडू उर्वरित पूर्ण सामना खेळेल आणि तो ज्या खेळाडूची जागा घेईल, त्या खेळाडूला पुन्हा सामन्यात भाग घेता येणार नाही. तसेच प्रभावी खेळाडू कर्णधारपदही भूषवू शकणार नसल्याचे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे.


 

चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ डिसेंबर २०२१

 

केंद्राची राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे :
  • काही राज्यांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून तिचे पालन करण्याचे निर्देश सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

  • केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी राज्यांसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. रुग्णवाढीचा दर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांसाठी धोरणे राबवण्याच्या शिफारशी करण्यात आल्याचे भूषण यांनी सांगितले.

  • ज्या जिल्ह्यामध्ये एका आठवड्यात रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांपेक्षा अधिक असेल किंवा ४० टक्के खाटा रुग्णांनी व्यापल्या असतील तर त्या जिल्ह्यामध्ये निर्बंध आणि कठोर नियमावली जारी करावी.

  • रुग्णसंख्या अधिक झाल्यास रात्रीची संचारबंदी, मेळाव्यांवर निर्बंध, विवाह सोहळा, अंत्यंसंस्कार यांसाठी उपस्थित असणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा, कार्यालयीन उपस्थिती आणि सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवासी संख्या यांवर मर्यादा अशा प्रकारची नियमावली जारी करावी.

  • कंटेन्टमेंट झोनमध्ये नियमांचे पालन करणे सक्तीचे करणे. त्याशिवाय बाधितांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी कोणताही विलंब न करता प्रयोगशाळांकडे पाठवणे.

देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या २०० :
  • देशभरात ओमायक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या २०० झाली आहे. देशभरातील १२ राज्यांत ओमायक्रॉनचे रुग्ण आतापर्यंत आढळले असून ७७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने मंगळवारी दिली.

  • सर्वाधिक ओमायक्रॉन रुग्णांचे नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीत झाली असून या दोन्ही राज्यांत प्रत्येकी ५४ रुग्णांची नोंद झाली आहे. तेलंगणामध्ये २०, कर्नाटक १९, राजस्थान १८, केरळ १५ आणि गुजरात १४ रुग्णांची नोंद झाली आहे.

  • गेल्या २४ तासांत ५,३२६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या ५८१ दिवसांतील रुग्णसंख्येतील सर्वात कमी नोंद आहे. देशभरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता तीन कोटी ४७ लाख ५२,१६४ झाली आहे.

  • उपचाराधीन रुग्णांची संख्या ७९,०९७ असून गेल्या ५७४ दिवसांतील ही सर्वात कमी नोंद आहे. गेल्या २४ तासांत ४५३ रुग्णांचा मृत्यू झाला असून करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या चार लाख ७८,००७ झाली आहे.

विवाह वयाचे विधेयक स्थायी समितीकडे; लोकसभेत विरोधकांच्या आक्षेपानंतर निर्णय :
  • महिलांचे विवाहाचे कायदेसंमत वय १८ ऐवजी २१ करणारे बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्ती विधेयक केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी लोकसभेत सादर केले. पण विरोधकांनी घेतलेल्या अनेक आक्षेपांनंतर हे विधेयक सविस्तर चर्चेसाठी स्थायी समितीकडे पाठवण्यात आले. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने या दुरुस्ती विधेयकाला मान्यता दिली होती.

  • वेगवेगळ्या धर्मांमध्ये मुलींच्या लग्नाचे किमान वय वेगवेगळे असून या दुरुस्तीद्वारे सहा व्यक्तिगत कायद्यांमध्ये बदल केले जातील आणि मुलींच्या लग्नाचे कायदेसंमत वय मुलांप्रमाणे २१ वर्षे केले जाईल. भारतीय ख्रिश्चन, पारशी, मुस्लीम, हिंदू या धर्मांतील लग्न व घटस्फोट कायदे, तसेच विशेष विवाह कायदा आणि परदेशी विवाह कायदा आदी कायद्यांमध्ये या विधेयकाद्वारे दुरुस्ती केली जाणार आहे. या दुरुस्तीमुळे विवाहविषयक सर्व कायद्यांमध्ये बदल होणार असून लग्नाच्या कायदेसंमत वयामध्ये समानता येणार असल्याचे इराणी म्हणाल्या.

  • मात्र काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई, तृणमूल काँग्रेसचे सौगत राय, एमआयएमचे असादुद्दीन ओवैसी आदींनी या दुरुस्ती विधेयकाला विरोध केला. इतक्या घाईघाईने हे विधेयक मांडण्याची गरज का होती, असा आक्षेप या सदस्यांनी घेतला. चर्चा न करता विधेयक संमत करण्याचा केंद्राचा हेतू स्पष्ट होतो, असे अधीर रंजन म्हणाले.

  • दोनदा वा तीनदा केंद्र सरकारने विरोधकांशी चर्चा न करता लोकसभेत विधेयक मांडले आहे. कामकाज सल्लागार समितीतही या विधेयकावर सहमती झाली नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडला.

भारतविरोधी यूट्यूब वाहिन्या, संकेतस्थळांवर बंदी; केंद्रीय माहिती प्रसारण खात्याचा निर्णय :
  • राष्ट्रविरोधी माहिती आणि खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने २० यूट्यूब वाहिन्या आणि दोन संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

  • माहिती प्रसारण खात्याने सोमवारी याबाबत दोन आदेश काढले. यूट्यूबला आदेश देऊन २० वाहिन्या बंद करण्यास सांगितले, तर दोन संकेतस्थळांवरही बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत.

  • यूट्यूबवरील २० वाहिन्या पाकिस्तानातून चालवल्या जात असून त्यांद्वारे भारतासंबंधी संवेदनशील विषयांबाबत चुकीची आणि तथ्यहीन माहिती आणि बातम्या प्रसारित केल्या जातात.

  • काश्मीर प्रश्न, भारतीय सैन्य, अल्पसंख्याक समुदाय, राम मंदिर, जनरल बिपिन रावत यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर भावना भडकवणारी आणि दिशाभूल करणारी माहिती या वाहिन्या व संकेतस्थळांवरून देण्यात येत असल्याने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे माहिती प्रसारण खात्याचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी सांगितले.

राज्य सेवा आयोग प्राथमिक परीक्षा २०२१ प्रवेशपत्र जारी; या लिंकवरून असं डाउनलोड करा :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा परीक्षा २०२१ साठी प्रवेशपत्र जारी केले आहे. प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी स्वतःची नोंदणी केली आहे ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही राज्य सेवा प्राथमिक परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित केली आहे. एकूण १०० गुणांसाठी परीक्षा घेतली जाईल. प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांना मुख्य परीक्षेत बसण्याची संधी दिली जाईल.

  • सर्वप्रथम उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर यावं.
  • मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ प्रवेशपत्राशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर स्क्रीनवर लॉगिन पेज दिसेल.
  • विनंती केलेली सर्व माहिती भरून लॉग इन करा.
  • आता तुमचे प्रवेशपत्र तुमच्या समोर दिसेल.
  • तपासा आणि डाउनलोड करा.
IPL 2022 मेगा ऑक्शनबाबत ‘मोठं’ अपडेट, जाणून घ्या कधी होणार खेळाडूंचा लिलाव :
  • इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२२) आगामी हंगाम लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांच्या समावेशासह होणार आहे. बीसीसीसीआय दोन्ही संघांना आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात उत्तम संघ तयार करण्याची संधी देईल.

  • जुन्या आठ फ्रेंचायझींनी काही खेळाडूंना कायम ठेवले, कारण त्यांना जास्तीत जास्त चार खेळाडू निवडण्याची परवानगी होती. बीसीसीआयने अद्याप मेगा लिलावाची तारीख जाहीर केली नसली, तरी आता एका नवीन अहवालानुसार आयपीएल २०२२चा लिलाव फेब्रुवारीमध्ये होऊ शकतो.

  • बीसीसीआय CVC कॅपिटल पार्टनर्सच्या स्वीकृती स्थितीवर चर्चा करत आहे, जे अहमदाबाद फ्रेंचायझी विकत घेतल्यानंतर वादात सापडले होते. CVC कॅपिटलने अहमदाबाद फ्रेंचायझीसाठी अदानी समूहाला मागे टाकण्यासाठी ५,६०० कोटी रुपयांची दुसरी सर्वोच्च बोली लावली, परंतु सट्टेबाजी कंपन्यांशी त्यांच्या कथित संबंधांमुळे ते लवकरच बोर्डाच्या देखरेखीखाली आले.

  • एका अहवालानुसार, आयपीएल २०२२ मेगा लिलाव फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल आणि बंगळुरू आणि हैदराबाद हे मेगा इव्हेंट आयोजित करण्यासाठी आघाडीवर आहेत. cricket.com वर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, “हा लिलाव फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. बंगळुरू आणि हैदराबाद ही दोन शहरे आहेत, आयपीएल लिलावासाठी आघाडीवर आहेत.”

22 डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.