चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ डिसेंबर २०२०

Date : 22 December, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी Live Tv वर घेतली करोना लस :
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीरपणे करोना लस घेतली आहे. जेव्हा करोना लस उपलब्ध होईल तेव्हा लोकांच्या मनात भीती नसावी आणि ते लस घेण्यासाठी तयार असावेत यासाठीच आपण जाहीरपणे लस घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जोय बायडन यांनी ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलमध्ये Pfizer-BioNTech ची लस घेतली.

आयपीएल’च्या नव्या हंगामात आठच संघांचा समावेश :
  • इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामात संघांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिले आहेत. त्यामुळे नियमितपणे आठ संघांतच ‘आयपीएल’ खेळवून २०२२च्या हंगामात १० संघांचा समावेश करण्याच्या विचारात ‘बीसीसीआय’ आहे. अहमदाबाद येथे २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाईल.

  • करोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच सप्टेंबर- नोव्हेंबरदरम्यान ‘आयपीएल’ खेळवण्यात आली. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या ‘आयपीएल’च्या १३व्या हंगामाच्या जेतेपदावर मुंबई इंडियन्सने नाव कोरले. २०२१मध्ये मात्र ‘आयपीएल’ भारतात खेळवण्यात येण्याची शक्यता असून या हंगामात अहमदाबादसह आणखी एका संघाचा समावेश होणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटप्रेमींमध्ये रंगत आहे. परंतु एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, यंदाच्या हंगामात ‘बीसीसीआय’ हा प्रयोग करू इच्छित नाही.

  • ‘‘आयपीएलच्या पुढील हंगामाला प्रारंभ होण्यासाठी चार महिन्यांहून कमी अवधी शिल्लक असल्याने नव्या संघांचा समावेश करणे अशक्य आहे. इंग्लंडचा यादरम्यान भारत दौरा असल्याने त्याकडेही ‘बीसीसीआय’ला लक्ष द्यावयाचे आहे.‘आयपीएल’पूर्वी सर्व खेळाडूंची लिलाव प्रक्रिया तसेच प्रायोजकांच्या निर्णयाविषयीच बराच वेळ लागण्याची शक्यता असल्याने थेट २०२२च्या हंगामातच १० संघांचा समावेश करण्याबाबत विचार केला जाईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

केंद्राच्या निमंत्रणावर शेतकरी संघटनांचा आज निर्णय :
  • वादग्रस्त शेती कायद्यांवर चर्चा करण्यासाठी पाठवलेले नवे निमंत्रण शेतकरी संघटनांनी अजून स्वीकारलेले नसले तरी पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या या प्रस्तावावर शेतकरी नेत्यांच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सोमवारी साखळी उपोषणात सहभागी होण्याला अधिक प्राधान्य दिले.

  • केंद्र सरकारने आत्तापर्यंत शेतकरी नेत्यांशी विज्ञान भवनात घेतलेल्या तीन बैठका अपयशी ठरल्यानंतर, रविवारी रात्री उशिरा कृषी मंत्रालयाकडून ४० शेतकरी नेत्यांना पुन्हा चर्चेसाठी आमंत्रणाचे पत्र पाठवले गेले. शेतकरी संघटनांनी बैठकीची तारीख निश्चित करावी असेही केंद्राकडून कळवण्यात आले. पंजाबमधील शेतकरी नेते तसेच संयुक्त किसान मोर्चा व उत्तर प्रदेशमधील नेत्यांची रविवारी बैठक झाली होती व आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवारी शेतकरी संघटनांनी प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला नाही.

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पश्चिम बंगालमध्ये पत्रकार परिषदेत, शेतकरी नेत्यांशी कृषिमंत्री दोन दिवसांत पुन्हा चर्चा करतील असे सांगितले होते. केंद्राच्या चर्चेच्या या प्रस्तावावर मात्र लोकांची दिशाभूल करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याची टीका अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने केली. तीनही कायद्यांतील प्रत्येक अनुच्छेदावरील आक्षेप केंद्रापुढे मांडलेले आहेत. त्यातील फक्त आठ आक्षेप केंद्राने स्वीकारले असून आता प्रश्न सोडवण्यास तयार असल्याचा दावा करत असल्याची टीकाही समन्वय समितीने पत्रकाद्वारे केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे निधन :
  • मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे आज(सोमवार) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

  • काल (रविवार) त्यांचा जन्मदिवस देखील  होता. दोन दिवस अगोदर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अगोदर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचेही निष्पन्न झाले होते. तेव्हा त्यांच्यावर दिल्लीतली एम्स रुग्णालयात उपचार झाले व ते करोनावर मात करून घरी परतले होते.

  • मोतीलाल वोरा यांनी अनेक वर्षे काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच, त्यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल देखील बनवण्यात आलं होतं.

करोनाचा नवीन स्ट्रेन, सौदी अरेबियाचा आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय :
  • सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय विमान सेवा आठवडयाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही  स्थगिती आणखी आठवडयाभरासाठी वाढवली जाऊ शकते. ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. हा स्ट्रेन नियंत्रणाबाहेर असल्याचं तिथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौदी अरेबियाने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • सौदीच्या जीएसीएने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. जगभरातील अनेक देश आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करत असून ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे. करोना व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन वेगाने फैलवणारा असून नियंत्रणा बाहेर असल्याचं यूकेमधल्या तज्ज्ञांच मत आहे.

  • काही अपवाद वगळता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आठवडयाभरासाठी विमानसेवा बंद करण्यात येत आहे. आणखी आठवडयाभरासाठी ही बंदी वाढवली जाऊ शकते. सौदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व परदेशी विमानांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलीय असे जीएसीएच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.

२२ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.