जागतिक नेमबाजी स्पर्धा: अखिलमुळे भारताला पाचवा ‘ऑलिम्पिक कोटा’
भारताच्या अखिल शेरॉनने जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुरुष विभागातील रायफल थ्री-पोझिशन प्रकारात रविवारी कांस्यपदक पटकावताना भारताला पाचवा ‘ऑलिम्पिक कोटा’ मिळवून दिला.
पात्रता फेरीत शेरॉन ५८५ गुणांसह सहाव्या स्थानावर राहिला होता. अंतिम फेरीत शेरॉनने ४५० गुणांची कमाई करताना कांस्यपदक मिळवले. अंतिम फेरीतील पहिले चार क्रमांकांचे खेळाडू देशासाठी ‘ऑलिम्पिक कोटा’ मिळवतात. ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्झांडर श्मिरलने ४६२.५ गुणांसह सुवर्ण, तर चेक प्रजासत्ताकच्या पीटर निम्बस्र्कीने ४५९.२ गुणांसह रौप्यपदक पटकावले.
भारतासाठी यापूर्वी भोवनीश मेडीरत्ता (पुरुष ट्रॅप), जगज्जेता रुद्रांक्ष पाटील (१० मीटर एअर रायफल पुरुष), स्वप्निल कुसळे (५० मीटर रायफल थ्री-पोझिशन पुरुष) व मेहुली घोष (१० मीटर एअर रायफल महिला) यांनी ‘ऑलिम्पिक कोटा’ निश्चित केले आहेत.
दरम्यान, भारताच्या महिलांनी २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धा प्रकारात सुवर्णपदक कमावले. रिदम सांगवान, ईशा सिंह आणि मनू भाकर यांच्या संघाने एकत्रित १७४४ गुणांची कमाई करताना ही सोनेरी कामगिरी केली. अंतिम फेरीत भारतीय संघाने तैवानच्या तिएन शिया, तु यी त्झु आणि वु शिया यिंग (१७४३) या संघाचा पराभव केला. चीनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, अखिल शेरॉन, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, निरज कुमार यांनी एकत्रित १७५० गुणांसह पुरुषांच्या राफल थ्री-पोझिशन प्रकारात सांघिक सुवर्णपदक पटकावले. अखिलचे दिवसभरातील हे दुसरे पदक ठरले. सुवर्णपदकाबरोबर ‘ऑलिम्पिक कोटा’ मिळवल्याचा आनंद असल्याचे अखिलने सांगितले. वैयक्तिक प्रकारात अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. प्रयत्न कमी पडले. हा ‘ऑलिम्पिक कोटा’ मी देशाला अर्पण करतो, असेही अखिल म्हणाला.
चांद्रयान ३ चंद्रावर उतरताना कधी व कुठे पाहाल? वेळ जाणून घ्या
लँडर मॉड्यूल (LM) ने त्याचे दुसरे आणि अंतिम डी-बूस्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर भारताचे चांद्रयान-3 हे २० ऑगस्टला चंद्राच्या आणखीन जवळ पोहोचले आहे. आता, लँडर एका कक्षेत पोहोचला असून चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू अवघ्या २५ किमी दूर आहे तर सर्वात दूरचा बिंदू १३४ किमी अंतरावर आहे. यासंदर्भात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) माहिती दिली असून आता मॉड्युलची अंतर्गत तपासणी केली जाईल आणि नियुक्त ठिकाणी लँडिंगसाठी सूर्योदयाची प्रतीक्षा आहे असेही सांगितले आहे.
१४ जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रावरील भारताची तिसरी मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आली. काही आठवड्यांनंतर, ५ ऑगस्ट रोजी लँडरने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता आणि आता चांद्रयान ३ लँडिंगसाठी सज्ज झाले आहे. हे लँडिंग नेमके कधी व कुठे होईल तसेच तुम्हाला ते कुठे पाहता येणार आहे याविषयी जाणून घेऊया.
चांद्रयान- ३ चे लँडिंग कधी आणि कुठे होईल?
लँडर मॉड्यूल २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे, जर हे लँडिंग यशस्वी झाले तर भारत हा पराक्रम साध्य करणारा अमेरिका, चीन आणि रशियानंतर चौथा देश बनणार आहे. इस्रोने एका ट्विटद्वारे ऐतिहासिक लँडिंगची तारीख आणि वेळ जाहीर केली असून २३ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे.
इस्रोने यापूर्वी माहिती दिली होती की लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्न करेल. लँडरचा चंद्राच्या पृष्ठभागावर स्पर्श झाल्यानंतरही, त्याचे मॉड्यूल पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी चंद्राभोवती फिरत राहील.
चांद्रयान ३ चे लँडिंग कधी आणि कुठे पहावे?
ISRO च्या माहितीनुसार, जगभरात कुठूनही तुम्ही चांद्रयान-3 मोहिम लाईव्ह पाहू शकता. बुधवारी २३ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून हे स्ट्रीमिंग थेट प्रक्षेपित केले जाईल. आपण ISRO वेबसाइट, YouTube, ISRO चे Facebook पेज आणि DD National TV चॅनल इथे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकणार आहात. यासंदर्भातील सर्व अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या मुख्य पृष्ठावरसुद्धा आपल्याला माहिती मिळवता येईल.
रशिया अपयशी, आता भारत प्रयत्न करणार; पण चंद्रावर अलगद उतरणारे पाहिले यान कोणते, कोणत्या देशाचे होते?
४ ऑक्टोबर १९५७ ला सोव्हिएत रशियाने (soviat russia) जगातील पहिला कृत्रिम उपग्रह स्फुटनिक (Sputnik 1) अवकाशात पाठवला आणि तेव्हा शीत युद्धासाठी आणखी एक मैदान खरं तर अवकाश उपलब्ध झाले. अवकाशात विविध प्रकारचे उपग्रह पाठवत कुरघोडी करण्याची स्पर्धा तेव्हाचे शक्तीशाली देश अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये सुरु झाली.
विविध उपग्रह पाठवत रशियाने पुढील काही वर्षे ही आघाडी टीकवत अनेक विक्रम रचले. अखरे रशियाच्या आधी अंतराळवीर चंद्रावर उतरवत अमेरिकेने ही अत्यंत खार्चिक पण अवकाश तंत्रज्ञानात आमुलाग्र बदल करणारी अवकाश स्पर्धा जिंकत रशियाला मागे टाकले.
मात्र सोव्हिएत रशियाने चंद्राच्या बाबतीत अनेक विक्रम रचले. चंद्राच्या जवळून जाणारे पहिले यान, चंद्राचे छायाचित्र घेणारे पहिले यान, तेव्हापर्यंत कधीही न दिसलेल्या चंद्राच्या मागच्या बाजूचे छायाचित्र काढणारे पहिले यान, चंद्रावर आदळवत पहिले मानवी अस्तित्व उमटवणारे पहिले यान, चंद्राचा उपग्रह म्हणून प्रदक्षिणा घालणारे पहिले यान म्हणून रशियाच्या विविध यान-उपग्रहांनी यशस्वी कामगिरी बजावली.
यामध्ये आणखी एक पराक्रम तेव्हाच्या सोव्हिएत रशियाच्या तंत्रज्ञानांनी करुन दाखवला. चंद्रावर अलगद उतरण्याची (soft landing) स्पर्धा अमेरिका आणि रशियामध्ये सुरुच होती. चंद्रापर्यंत पोहचतांना दोन्ही देशांना अनेक मोहिमांच्या अपयशाला सामोरं जावं लागलं. मात्र ३ फेब्रुवारी १९६६ रशियाचे Luna 9 हे यान चंद्राच्या विषुववृत्तावर यशस्वीपणे अलगद उतरले.
प्रज्ञावान प्रज्ञानंद विश्वचषकाच्या अंतिम फेरीत; जेतेपदासाठी कार्लसनशी गाठ
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आपली स्वप्नवत घोडदौड कायम राखताना अमेरिकेच्या फॅबियानो कारूआनाला पराभवाचा धक्का देत सोमवारी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदासाठी त्याला अव्वल जागतिक बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला नमवण्याची किमया साधावी लागेल.
पारंपरिक पद्धतीचे दोन डाव बरोबरीत सुटल्यानंतर ‘टायब्रेकर’मध्ये गेलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत १८ वर्षीय प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या कारूआनाला ३.५-२.५ अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा प्रज्ञानंद हा विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. आनंदने सन २००० आणि २००२मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. मात्र, त्यावेळी ही स्पर्धा साखळी आणि बाद पद्धतीने खेळवली जात होती. तर २००५पासून विश्वचषक स्पर्धा केवळ बाद फेरी पद्धतीने खेळवली जात आहे. त्यामुळे प्रज्ञानंदच्या यशाला विशेष महत्त्व आहे.
यंदाच्या विश्वचषकात प्रज्ञानंदने यापूर्वी दुसरा मानांकित हिकारू नाकामुरा आणि भारतीय सहकारी अर्जुन एरिगेसी यांसारख्या खेळाडूंचा पराभव केला होता. त्याने कारूआनाविरुद्धही अप्रतिम खेळ केला. प्रज्ञानंद आणि कारूआना यांच्यातील पारंपरिक पद्धतीचे दोन आणि ‘टायब्रेकर’मधील दोन डाव बरोबरीत सुटले. मात्र, १० मिनिटांच्या पहिल्या जलद डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रज्ञानंदने विजय नोंदवला. दुसऱ्या डावात कारूआनाला पांढऱ्या मोहऱ्यांनी विजय मिळवता आला नाही आणि प्रज्ञानंदचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले.
पारंपरिक पद्धतीच्या डावात कारूआनाचे पारडे जड होते. मात्र, दोन्ही डावांत त्याने धोका पत्करणे टाळले आणि लढत ‘टायब्रेकर’मध्ये गेली. ‘टायब्रेकर’मध्ये चाली रचण्यासाठी बुद्धिबळपटूंकडे कमी वेळ असतो आणि या दडपणाखालीच खेळ उंचावणारा म्हणून प्रज्ञानंद ओळखला जातो. याचाच प्रत्यय कारूआनाविरुद्धच्या लढतीत आला. मात्र, प्रज्ञानंदने योजनाबद्ध खेळ करताना सामन्याचे पारडे आपल्याकडे झुकवले होते.
तलाठी भरती परीक्षेत अडथळे; तांत्रिक अडचणींमुळे दोन तास विलंब; ‘टीसीएस’ला कारणे दाखवा नोटीस
तांत्रिक बिघाडामुळे तलाठी भरतीच्या ऑनलाइन परीक्षेला सोमवारी दोन तास विलंब झाला. मात्र, परीक्षा सुरळीत पार पडली. नियोजित वेळेपेक्षा विलंब झाल्याने परीक्षा घेणाऱ्या ‘टीसीएस’ कंपनीला भूमी अभिलेख विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच तलाठी भरतीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून, परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नसल्याची स्पष्टोक्ती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आली.
तलाठी भरतीसाठी यंदा १० लाख ४० हजार ७१३ असे विक्रमी अर्ज छाननीअंती प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. सोमवारी सकाळचे पहिले सत्र नऊ ते ११ या वेळेत होणार होते. मात्र, टीसीएस कंपनीच्या डाटा सेंटर सव्र्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोन तासांच्या विलंबानंतर हे सत्र सुरू झाले. टीसीएस कंपनी आणि त्यांचे डाटा सेंटर यांनी देशभरातील परीक्षांबाबत हा तांत्रिक बिघाड झाल्याचे भूमी अभिलेख विभागाला कळविले. त्यानंतर तातडीने प्रत्येक जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांना प्रथम सत्रातील परीक्षा विलंबाने सुरू होणार असल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार सर्व परीक्षा केंद्रांवरील उमेदवारांना स्थानिक प्रशासनाकडून सूचना देण्यात आली होती, अशी माहिती अप्पर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
टीसीएस कंपनीकडून तांत्रिक बिघाड दूर करून राज्यातील सर्व ११५ केंद्रांवर सकाळी ११ वाजता परीक्षा सुरू करण्यात आली. पहिल्या सत्राला विलंब झाल्याने साहजिकच त्यानंतरच्या दोन्ही सत्रांनाही दोन तास विलंब झाला. याबाबतची माहितीदेखील स्थानिक प्रशासनाकडून संबंधित उमेदवारांना देण्यात आली. दिव्यांग उमेदवारांना सोमवारच्या दुसऱ्या सत्रात अतिरिक्त असणारा वेळही देण्यात आला. याबाबत शासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करीत असल्याचेही अप्पर जमाबंदी आयुक्त रायते यांनी सांगितले.
सोमवारी तांत्रिक कारणांमुळे परीक्षेला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. नेमका कशामुळे विलंब झाला, याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील सत्रातील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मुंबई अर्ध-मॅरेथॉन स्पर्धा - छगन, कविताला जेतेपद :
महाराष्ट्राच्या छगन बोंबले आणि आंध्र प्रदेशच्या कविता रेड्डीने रविवारी झालेल्या मुंबई अर्ध-मॅरेथॉनमध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे जेतेपद मिळवले.
छगनने २१ किमीची शर्यत १ तास आणि १६.११ सेकंद अशा वेळेत पूर्ण केली. या शर्यतीत भगतसिंग वळवीने (१:१७.५१ सेकंद) दुसरे, तर अनिल जिंदलने (१:१८.२० सेकंद) तिसरे स्थान मिळवले. महिलांमध्ये कविताने १ तास आणि ३७.०३ सेकंद अशी वेळ नोंदवत अग्रस्थान मिळवले. तन्मया करमरकर (१:४०.१८ सेकंद) आणि केतकी साठे (१:४४:५५ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने या शर्यतीच्या सुरुवातीला झेंडा दाखवला.
पुरुषांच्या १० किमी शर्यतीत अमित माळीने ३३ मिनिटे आणि ४२ सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. करण शर्मा (३३:४४ सेकंद) दुसऱ्या आणि संजय झाकणे (३३:५० सेकंद) तिसऱ्या स्थानी राहिले. महिलांच्या शर्यतीत रोहिनी पाटीलने ४१ मिनिटे, ३२ सेकंद अशा वेळेसह अग्रस्थान पटकावले. प्रियंका पैकाराव (४२:२६ सेकंद) आणि प्रियंका कैलाशने (४३:५१ सेकंद ) अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले.
लक्ष्य, प्रणॉयवर भारताची भिस्त ; जागतिक बॅडिमटन स्पर्धेला आजपासून सुरुवात :
दुखापतीमुळे माघार घ्यावी लागलेल्या पी. व्ही. सिंधूच्या अनुपस्थितीत सोमवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेत युवा लक्ष्य सेन आणि अनुभवी एचएस प्रणॉयवर भारताची भिस्त असणार आहे.
जागतिक स्पर्धेत एका सुवर्णपदकासह एकूण पाच पदके जिंकणाऱ्या सिंधूला घोटय़ाच्या दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. तिच्या अनुपस्थितीत प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत आणि प्रामुख्याने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या लक्ष्यच्या कामगिरीकडे भारतीय चाहत्यांची नजर असेल.
भारतीय खेळाडू २०११ पासून जागतिक स्पर्धेत रिकाम्या हाताने परतलेले नाहीत. गेल्या वर्षी पुरुष विभागात श्रीकांत आणि लक्ष्य यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळविले होते. परंतु यंदा त्यांना अधिक अवघड आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. गेल्या वर्षी केंटो मोमोटा, तसेच इंडोनेशियाचे जोनाथन क्रिस्टी आणि अँथनी गिंटिंग यांनी जागतिक स्पर्धेतून माघार घेतली होती. या वेळी मात्र सर्व प्रमुख खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.
असे असले तरी भारतीय पुरुष खेळाडूंना सुवर्णपदकासाठी दावेदार मानले जात आहे. गेल्या काही महिन्यांत त्यांनी आपली छाप पाडली आहे. लक्ष्यने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पणात सुवर्णपदकाला गवसणी घातली. ऑल इंग्लंड स्पर्धेचे उपविजेतेपदही त्याच्या गाठीशी आहे. तसेच थॉमस चषक विजेतेपदातही लक्ष्यचा मोलाचा वाटा होता.
शालेय अभ्यासक्रमात ‘जवानांच्या शौर्यकथा’ ; राज्यात पुढील वर्षांपासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची शक्यता :
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त नवे शैक्षणिक धोरण राबवण्याची तयारी संपूर्ण देशभर करण्यात आली आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता शालेय अभ्यासक्रमात ‘जवानांच्या शौर्यकथां’चा समावेश करण्यात येणार आहे.
करोना संकटामुळे शाळा दोन वर्षे बंद होत्या. त्यामुळे नवे शैक्षणिक धोरण राबवणे सरकारला शक्य झाले नाही. आता पुढील शैक्षणिक वर्षांपासून नवा अभ्यासक्रम राबवला जाणार असल्याचे संकेत आहेत. अभ्यासक्रमात बदल करून त्यांत जवानांच्या शौर्यकथांचा समावेश करण्याचे सूतोवाच नुकतेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि सैन्यदलांतील अधिकारीही उपस्थित होते.
‘वीरगाथा’ अधिक व्यापक - २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत वीरगाथा प्रकल्पांतर्गत स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात आठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना निबंध, कविता, रेखाचित्रे आणि ‘मल्टिमीडिया’ सादरीकरणाच्या माध्यमातून शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावरील प्रेरणादायी कथांचे सादरीकरण करण्यास सांगण्यात आले होते. भविष्यात या स्पर्धेचे स्वरूप अधिक व्यापक होणार असून एक कोटी विद्यार्थी सहभागी व्हावेत, असे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी अभ्यासक्रमात सैनिकांच्या शौर्यकथांचा समावेश करण्यात येणार आहे.
सशस्त्र दलांशी सल्लामसलत - या अभ्यासक्रमाची मांडणी करण्यासाठी सशस्त्र दलांशी सल्लामसलत केली जाणार आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमात जवानांचे धाडसी कार्य आणि सशस्त्र दलांमधील जवानांच्या बलिदान कथांचा समावेश केला जाणार आहे.
अजमल कसाब, संजय दत्त ते अनिल देशमुख आणि संजय राऊत; मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातील कोठडी क्रमांक १२ ची कहाणी :
मुंबईतील आर्थर रोड कारागृह भारतातील सर्वात चर्चेत असलेला कारागृह आहे. या कारागृहात एका वेळी ८०४ कैदी राहू शकतात. मात्र मुंबई शहर जसे गजबजलेले आहे अगदी तशाच पद्धतीने या कारागृहातदेखील कैद्यांची मोठी गर्दी आहे. या कारागृहाची क्षमता ८०४ कैद्यांची असली तरी येथे सध्या ३००० कैद्यांना ठेवण्यात आलंय. २०१८ साली विजय माल्याचे प्रत्यापर्ण करण्याची मागणी होत असताना माल्याच्या वकिलांनी भारतीय तुरुंगातील याच स्थितीचा उल्लेख करत माल्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने याबाबतचे सविस्तर वृत्त दिलेले आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळवीर भरतीय कारागृह आणि आर्थर रोड तुरुंगाच्या परिस्थितीवर टीका होऊ लागल्यानंतर येथे १२ नंबरची विशेष कोठडी तयार करण्यात आली. आर्थर रोडवर असलेल्या या तुरुंगाची निर्मिती १९२५ साली करण्यात आली. या तुरुंगाच्या भिंती दगड आणि काँक्रिटच्या आहेत. असे असले तरी या तुरुंगातील १२ नंबरची कोठही कारागृहाच्या दुनियेत एखाद्या फाईव्ह स्टार हॉटलपेक्षा कमी नाही.
डिजिटल क्षेत्रातील कंपन्यांची संसदीय समितीकडून चौकशी ; अॅपल, गूगल, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि मायक्रोसॉफ्टचा समावेश :
डिजिटल क्षेत्रात मक्तेदारी निर्माण करणाऱ्या प्रथांचा अवलंब केल्याबद्दल चौकशी करणाऱ्या संसदीय समितीपुढे येत्या मंगळवारी अॅपल, गूगल, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांचे भारतातील प्रतिनिधी बाजू मांडण्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा यांनी रविवारी दिली.
बाजारातील स्पर्धेचे विविध पैलू, विशेषत: तंत्रज्ञान क्षेत्रातील बडय़ा कंपन्यांकडून अवलंबिल्या जाणाऱ्या व्यापार प्रथांवर संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीकडून लक्ष ठेवले जाते. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या नोटिशीनुसार, संसदीय समितीच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवरील विषय हा बडय़ा तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून मक्तेदारीच्या आरोपांबाबत त्यांची बाजू ऐकून घेणे, हा आहे.
जपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या सिन्हा यांनी सांगितले की, याप्रकरणी समितीने भारताच्या स्पर्धा आयोगाशी तसेच कॉर्पोरेट मंत्रालय आणि संबंधित कंपन्यांशीही चर्चा केली आहे.
सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने यापूर्वी खाद्यपदार्थ पुरवठादार स्विगी आणि झोमॅटो, ई कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट, कॅब अॅग्रिगेटर ओला, हॉटेल अॅग्रिगेटर ओयो यांसह ऑल इंडिया गेमिंग असोसिएशन आदींनाही चौकशीसाठी बोलाविले होते.
डिजिटल क्षेत्रातील मक्तेदारीसंबंधीच्या अनेक तक्रारींवर स्पर्धा आयोगाकडून सध्या चौकशी सुरू आहे. अशा प्रकरणांबाबत आयोगाने २८ एप्रिल रोजी संसदीय समितीपुढे सादरीकरण केले होते.