चालू घडामोडी आणि दिनविशेष - 22 एप्रिल 2023

Date : 22 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
WTC ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा; ऋषभ पंतसह तीन भारतीय खेळाडूंचा समावेश
  • आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जून ते ११ जून दरम्यान लंडनमध्ये खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने बुधवारी १९ मार्चला टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे. ज्यामध्ये एकाहून एक खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारताच्याही तीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. ज्यामध्ये ऋषभ पंत, रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन आश्विनच्या नावाचा समावेश आहे.
  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यामुळे टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. यामध्ये पंत, जडेजा आणि आश्विनचं मोठं योगदान होतं. अंतिम सामन्यात ऋषभ पंत खेळताना दिसणार नाही. कारण अपघातामुळं ऋषभ पंतला दुखापत झाली. त्यामुळे ऋषभ पूर्णपणे रिकव्हर झाला नाहीय.
  • ऋषभ पंतने १२ सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. याचदरम्यान ४३.४० च्या सरासरीनं ८६८ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकांचाही समावेश आहे. १४६ हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. रविंद्र जडेजानेही १२ सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. त्याने चमकदार कामगिरी करत दोन शतकांच्या जोरावर ६७३ धावा केल्या. तसंच गोलंदाजीतही कमाल दाखवत ३ इनिंगमध्ये पाच विकेट्स घेत एकूण ४३ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्यामाध्यमातून जाहीर केलेली WTC टीम ऑफ द टूर्नामेंट

  • उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, बाबर आझम, जो रूट, ट्रॅविस हेड, रविंद्र जडेजा, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन आश्विन, पॅट कमिन्स (कर्णधार), कगिसो रबाडा आणि जेम्स एंडरसन
मराठा आरक्षणाबाबत शिंदे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
  • सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं होतं. त्यानंतर राज्य सरकार आणि मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. गुरुवारी ( २० एप्रिल ) सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणाबाबत सुनावणी पार पडली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली होती. यातच आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
  • मराठा आरक्षणाबाबत आज ( २१ एप्रिल ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीला मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत आणि अन्य मंत्री उपस्थित होते. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात उपचारात्मक ( क्युरेटिव्ह ) याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी. याशिवाय मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी विस्तृत सर्वे करावा लागेल. हा सर्वे करतांना नेमण्यात येणारी संस्था सुद्धा निष्पक्ष, कार्यक्षम असणे गरजेची आहे. या संस्थेस सर्व प्रकारच्या सुविधा, मनुष्यबळ, प्रशासनाचे सहकार्य उपलब्ध करून देण्यात यावे,” अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
  • सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी म्हटलं, “मराठा समाजाच्या ३१०० उमेदवारांना राज्य शासनाने अधिसंख्य पदावर नियुक्ती दिली आहे. सारथीच्या माध्यमातून समाजाच्या मुलांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे.”
कर्मचाऱ्यांवर धाकदपटशाचा आरोप, ब्रिटनच्या उपपंतप्रधानांचा राजीनामा
  • ब्रिटनचे उपपंतप्रधान डॉमिनिक राब यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. त्यांच्यावर निरनिराळय़ा खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप होता. अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी राब हे आपल्यावर दादागिरी करतात असा आरोप केला होता. चौकशीअंती त्याचा अहवाल पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडे गुरुवारी सादर करण्यात आला. त्यानंतर राब यांनी राजीनामा दिला, त्यांचा राजीनामा स्वीकारताना सुनक यांनी दु:ख व्यक्त केले.
  • राब हे सुनक यांचे निकटवर्तीय आहेत, त्यामुळे या घडामोडींमुळे त्यांना धक्का बसला आहे.  डॉमिनिक राब न्यायमंत्री असताना सरकारी अधिकाऱ्यांना धाकदपटशा दाखवत असत, त्याबरोबरच त्यांच्याशी अपमानास्पद वर्तन करत असत असे तपासामध्ये आढळून आले.  बैठकांमध्ये बोलताना त्यांनी सरकारी कामाचा उल्लेख ‘अतिशय निरुपयोगी’ आणि ‘त्रासदायक’ असा केला होता. त्याशिवाय परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून कर्मचाऱ्याचा अपमान केल्याचेही आढळून आले.
  • राब यांचा राजीनामा स्वीकारताना सुनक यांनी लिहिले की, या घडामोडींचा नकारात्मक परिणाम होतो, भविष्यात असे प्रसंग घडू नयेत यासाठी सर्व संबंधितांनी खबरदारी घ्यायला हवी. तसेच आरोप खरे ठरल्यास राजीनामा देईन हे आपले शब्द खरे केल्याबद्दल त्यांनी राब यांची प्रशंसा केली. अहवालामध्ये आपल्या वर्तनाविषयी दोन दावे स्वीकारण्यात आले आहेत, असे राब यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. मात्र, आपण काम चांगले व्हावे म्हणूनच कठोर वर्तन करत होतो असा दावा त्यांनी केला आहे. ही प्रक्रिया सदोष आहे आणि यासंबंधी धोकादायक पायंडे पाडले जात असल्याची टीका त्यांनी केली. राब यांच्या राजीनाम्यानंतर सुनक यांना आता मंत्रिमंडळामध्ये बदल करावे लागणार आहेत.
“माझ्या या दौऱ्याचा उद्देश…”; भारत भेटीपूर्वी बिलावल भुट्टोंनी स्पष्ट केली भूमिका!
  • पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. ४ आणि ५ मे रोजी होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीला ते हजेरी लावतील. बिलावल भुट्टो यांच्या भारतभेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान चर्चा नव्याने सुरू होण्यास संधी मिळेल अशी अपेक्षा असतानाच त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो?

  • दुनिया न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुखातीत त्यांनी भारत दौऱ्याबाबत भूमिका स्पष्ट केली. माझ्या आगामी भारत दौऱ्याचा उद्देश केवळ शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला हजेरी लावणे एवढाच आहे. याकडे द्विपक्षीय दौऱ्याच्या दृष्टीकोनातून बघू नये, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर दोन्ही देशातील संबंधांबाबत चर्चा होईल, अशी शक्यता कमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

१२ वर्षांत भारत दौऱ्यावर येणारे पहिले परराष्ट्र मंत्री

  • बिलावल भुट्टो जरदारी हे गेल्या १२ वर्षात भारत दौऱ्यावर येणारे पाकिस्तानचे पहिले परराष्ट्र मंत्री असणार आहेत. यापूर्वी तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार या २०११ साली भारत दौऱ्यावर आल्या होत्या. गोव्यात होणाऱ्या या बैठकीला भारत, पाकिस्तान, चीन, रशिया, कझाकस्तान, तजाकिस्तान, उबेकिस्तान, किर्गिझस्तानचे प्रतिनिधी सहभागी होतील.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव

  • मुंबईमध्ये झालेला २६/११ चा हल्ला, पठाणकोट हल्ला, उरी हल्ला, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. गेल्या काही वर्षापासून दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये कोणत्याही प्रकाराचा संवाद झालेला नाही.
कर्नाटकात २२४ जागांसाठी ३,६०० उमेदवारांचे अर्ज
  • Karnataka elections 2023 कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी २२४ मतदारसंघांसाठी ३ हजार ६०० पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले. अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यामुळे दाखल झालेल्या एकूण अर्जाची संख्या ५ हजार १०२ इतकी झाली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे गुरुवारी १ हजार ६९१ उमेदवारांनी अर्ज भरले. अर्जाची छाननी शुक्रवारी होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
  • कर्नाटकात १३ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती, अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत २४ एप्रिल ही आहे. मतदान एकाच टप्प्यात १० मे रोजी होणार आहे, तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक अर्ज भरणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. दाखल झालेल्या अर्जापैकी ४ हजार ७१० अर्ज हे ३ हजार ३२७ पुरुष उमेदवारांनी भरले आहेत. तर ३०४ महिला उमेदवारांनी ३९१ अर्ज भरले आहेत. एक अर्ज तृतीयपंथीय उमेदवाराने भरला आहे अशी माहिती कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकऱ्यांनी दिली.
  • स्वत:ला भाजपचे म्हणवणाऱ्या उमदेवारांनी ७०७ अर्ज भरले आहेत, काँग्रेसच्या ६५१ तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या उमेदवारांनी ४५५ अर्ज भरले आहेत. उर्रविरत अर्ज लहान पक्ष आणि अपक्षांनी भरले आहेत. एक उमेदवार जास्तीत जास्त ४ अर्ज भरू शकतो.

 

आशियाई कुस्ती स्पर्धा :सरिता, सुषमाला कांस्य :
  • सरिता मोर आणि सुषमा शोकीन यांनी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरुवारी कांस्यपदके कमावली.

  • ५९ किलो वजनी गटात सरिताने दोन पराभवांनंतर उझबेकिस्तानच्या दिलफुझा एम्बेटोव्हावर तांत्रिक गुणाधिक्याच्या बळावर मात केली, तर डायना कायुमोव्हाला ५-२ असे हरवले. याचप्रमाणे ५५ किलो गटात सुषमाने कझाकस्तानच्या अलटायन शेगायेव्हावर ५-० असा शानदार विजय मिळवला, तर उझबेकिस्तानच्या सार्बिनाझ जीनबाईव्हाला चीतपट केले.

अमेरिकी काँग्रेस सदस्याच्या पाकव्याप्त काश्मीर दौऱ्याचा भारताकडून निषेध :
  • अमेरिका काँग्रेसच्या सदस्य इल्हन ओमर यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला असून भारताने त्याचा निषेध केला आहे. यातून इल्हन यांची संकुचित मानसिकता दिसून येते, असे भारताने म्हटले आहे.

  • भारताचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिदम बागची यांनी पत्रकारांशी बोलताना इल्हन यांच्या या दौऱ्यावर टीका केली.  त्या सध्या पाकिस्तानच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. बागची म्हणाले की, भारतीय संघराज्याचा भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने बळकावला आहे आणि त्याच भागाचा इल्हन यांनी दौरा केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.

  • यातून त्यांची संकुचित मानसिकता दिसून येते. त्यांच्या मानसिकतेशी आम्हाला देणेघेणे नाही, पण या दौऱ्यामुळे भारताच्या प्रादेशिक एकात्मिकतेचे तसेच सार्वभौमत्वाचे उल्लंघन होत असल्यामुळे आम्ही त्याचा निषेध करीत आहोत.

  • अफगाणिस्तानात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत बागची यांना विचारणा केली असता, तेथील घडामोडींवर भारताचे लक्ष आहे, असे त्यांनी सांगितले. सर्वच दहशतवादी कारवायांचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी नमुद केले.

अंतर्गत सुरक्षेसाठी देशस्तरावर माहिती संकलन ; राष्ट्रीय विदानिर्मितीची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा :
  • देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी राष्ट्रीय माहिती-विदा (डाटाबेस) निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) १३ व्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात दिली.

  • दहशतवादी कृत्ये, दहशतवादी संघटनांना होणारा आर्थिक पुरवठा, बनावट चलनी नोटांद्वारे होणारे बेकायदा व्यवहार, अमली पदार्थाचा पुरवठा-विक्री, विविध प्रकारची तस्करी आणि अन्य गंभीर गुन्ह्यांशी संबंधित सविस्तर माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. देशातील पोलीस तसेच अन्य तपास यंत्रणांकडे जमा होणारी गुन्हेगारीविषयक माहितीचे एकमेकांना आदानप्रदान झाले पाहिजे. एका तपास यंत्रणेकडे जमा झालेली माहिती दुसऱ्या यंत्रणेला मिळाली नाही तर त्याचा दहशतवादासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासावर परिणाम होण्याची शक्यता असते, असा मुद्दा शहा यांनी मांडला.

  • तपास यंत्रणांच्या गुन्ह्यांच्या तपासपद्धतीवरही शहा यांनी टिप्पणी केली. एखाद्या गुन्ह्यातील संशयितावर शारीरिक अत्याचार (थर्ड डिग्री) करून गुन्हा वदवून घेण्याच्या पद्धत आता योग्य ठरणार नाही. कुठल्याही गुन्ह्याचा तपास प्रगत तंत्राच्या वा माहिती-विदेच्या आधारे झाला पाहिजे. तपासपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणायची असेल तर, देशांतर्गत माहिती-विदा निर्माण करावा लागेल. तसेच, देशांतर्गत तपास यंत्रणांना न्यायवैज्ञक शास्त्रामध्ये (डिजिटल फोरॅन्सिक) पारंगत व्हावे लागेल, अशी सूचना शहा यांनी केली.

  • ‘एनआयए’च्या वेगवान तपासामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना तसेच, नक्षलग्रस्त भागांमध्ये माओवाद्यांना होणाऱ्या आर्थिक स्त्रोतांची नाकाबंदी होऊ लागली आहे. ‘एनआयए’ने या प्रकरणांमध्ये १०५ गुन्हे नोंदवले, त्यापैकी ९४ गुन्ह्यांतील ८७६ आरोपींविरोधात आरोपत्र दाखल करण्यात आले आहे. आत्तापर्यंत १०० दोषींना शिक्षाही झाली आहे, अशी माहितीही शहा यांनी दिली.

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार लोकार्पण :
  • मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनाला मुहूर्त अखेर ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २ मे रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आज महामार्गाचा दौरा करणार असून यावेळी यासंबंधी अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात वाशीम जिल्ह्यातील शेलू बाजार ते नागपूर असा २४० किमीचा मार्ग वाहतुकीकरता खुला होणार आहे.

  • एकनाथ शिंदे यांनी याआधी वैजापूरमधील कार्यक्रमात बोलताना २ मे रोजी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल असं सांगितलं होतं. पण २६ टोलनाक्यांवरील टोलवसुलीसाठीची निविदा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) रद्द करण्यात आली होती आहे. निविदा रद्द केल्यानंतर गुरुवारी टोलवसुलीसाठी नव्याने निविदा मागविण्यात आली होती. त्यामुळे २ मे रोजी होणारे नागपूर ते शेलू बाजार, वाशीम अशा २१० किमीच्या मार्गाचे उद्घाटन अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत होती.

  • समृद्धी महामार्गाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे प्रकल्पाचे काम विलंबाने सुरू आहे. असे असताना नागपूर ते सेलू बाजार, वाशीम या २१० किमीच्या टप्प्यातील १०० टक्के काम पूर्ण झालं आहे. निविदा सादर करण्यासाठी २५ एप्रिल अंतिम तारीख असून २ मेपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून टोल यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण कऱण्याचं आव्हान सध्या आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हे ७०० किमी अंतर केवळ सात तासांमध्ये पार करता येणार आहे.

१४ वर्षीय उन्नत्ती बॅडिमटन संघात :
  • उदयोन्मुख बॅडिमटनपटू उन्नत्ती हुडाची चालू वर्षांतील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात निवड झाली आहे. भारतीय बॅडिमटन संघटनेने आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसह थॉमस-उबेर चषकासाठी भारतीय संघाची घोषणा गुरुवारी केली.

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सहा दिवसांच्या निवड चाचणी स्पर्धेतील कामगिरीआधारे हा संघ निवडण्यात आला आहे. पी. व्ही. सिंधूवर राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत मदार असेल. पुरुषांमध्ये लक्ष्य सेन, किदम्बी श्रीकांत यांच्यावर संघाची धुरा आहे.

  • भारतीय संघ :

  • • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : पुरुष : लक्ष्य सेन, किदम्बी श्रीकांत, सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी आणि बी. सुमीत रेड्डी; महिला : पी. व्ही. सिंधू, आकर्षी कश्यप, त्रिसा जॉली, गायत्री पी., अश्विनी पोनप्पा

  • • आशियाई क्रीडा स्पर्धा आणि थॉमस-उबेर चषक : पुरुष : लक्ष्य सेन, किदम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय, प्रियांशू राजावत, चिराग शेट्टी, सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी, ध्रुव कपिला, एमआर अर्जुन, विष्णू वर्धन गौड, कृष्ण प्रसाद गारिगा; महिला : पी. व्ही. सिंधू, आकर्षी कश्यप, अश्मित चलिहा, उन्नत्ती हुडा, त्रिसा जॉली, गायत्री पी, एन. सिक्की रेड्डी, अश्विनी पोनप्पा, तनिषा क्रॅस्ट्रो आणि श्रुती मिश्रा

२२ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.