चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ एप्रिल २०२१

Date : 22 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अरे बापरे! भारतात जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद :
  • भारतात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

  • धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.

‘प्राणवायू’वरून दिल्ली-हरियाणात वाक्युद्ध :
  • दिल्लीतील अनेक रुग्णालये सलग दुसऱ्या दिवशी प्राणवायूच्या टंचाईमुळे रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी धडपड करत असतानाच, या शहराला होणारा प्राणवायूचा पुरवठा रोखत असल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बुधवारी हरियाणा सरकारवर केला.

  • आपल्या प्रशासनातील कुणीही काहीही रोखून धरलेले नसल्याचे सांगून हरियाणा सरकारने या आरोपाचे जोरदार खंडन केले.

  • केंद्र सरकारने दिल्लीचा प्राणवायूचा कोटा ३७८ मेट्रिक टनांवरून ७०० मेट्रिक टनांपर्यंत वाढवावा अशी मागणी ‘आप’ सरकार करीत आलेले आहे, असे सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तथापि, राज्यांसाठीचा प्राणवायूचा कोटा ठरवून देणाऱ्या केंद्राने याबाबत काहीही पाऊल उचललेले नाही, असे ते म्हणाले.

  • ‘वाढलेला वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने आमचा ऑक्सिजनचा कोटा ७०० टनांपर्यंत वाढवावा, अशी आम्ही पुन्हा मागणी करत आहोत. उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थानसह अनेक राज्यांतील रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये भरती आहेत’, असे सिसोदिया यांनी सांगितले. हरियाणा सरकारच्या एका अधिकाऱ्याने फरीदाबादमधील संयंत्रातून दिल्लीला होणारा पुरवठा रोखला असल्याचा दावा त्यांनी केला.

एअर इंडियानं ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमानं केली रद्द; २४ ते ३० एप्रिलदरम्यान सेवा बंद :
  • भारतात करोनाचे रुग्ण आणि करोनामुळे होणारे मृत्यू या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर इतर काही देशांनी भारतातून येणाऱ्या किंवा भारतात जाणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर आता एअर इंडियानं ब्रिटनला जाणाऱ्या आणि ब्रिटनहून येणाऱ्या आपल्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या आहेत.

  • २४ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान नवे निर्बंध लागू असणार आहेत. एअर इंडियानं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने घातलेल्या निर्बंधांनंतर भारतातील आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे.

  • एअर इंडियानं बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, ‘भारत आणि ब्रिटन यादरम्यान प्रवास करणार असलेल्या प्रवाशांनी नोंद घ्यावी की यूकेकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर यूकेला जाणाऱ्या किंवा यूकेहून येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट्स २४ एप्रिल ते ३० एप्रिल यादरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. तिकिटांच्या परताव्यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाईल’, असं ट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

  • २४ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये दिल्ली आणि मुंबईहून यूकेला जाणारी एक फ्लाईट आठवड्यातून एकदा पाठवण्याचा विचार सुरू असून त्यासंदर्भात लवकरच कळवलं जाईल, असं देखील एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यांना एक लस ४०० रुपयांना तर खासगी रुग्णालयांना…; पुनावाला यांनी जाहीर केल्या किंमती :
  • सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने भारत सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

  • भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी देत असल्याची घोषणा सोमवारी केली. या निर्णयाचं आपण स्वागत करत असल्याचं ‘कोव्हिशिल्ड’ची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

  • नव्या धोरणामुळे लसीकरणाची क्षमता वाढवता येईल तसेच राज्य सरकार, खासगी रुग्णालये आणि लसीकरण केंद्राना थेट लस देता येईल यासंदर्भात सीरमने समाधान व्यक्त केलं आहे. त्याचसोबत सीरमने खुल्या बाजारात लसीची किंमत किती असेल याचीही माहिती दिली आहे. अदर पुनावाला यांनी प्रसारमाध्यमांना लसीच्या किंमतीसंदर्भात माहिती दिलीय.

  • पुढील दोन महिन्यांमध्ये आम्ही लस निर्मिती क्षमता वाढवणार असल्याचं सीरमने स्पष्ट केलं आहे. या पुढे आम्ही उत्पादन घेत असणाऱ्या एकूण लसींपैकी ५० टक्के लसी या भारत सरकारसाठी राखीव असतील. या लसी भारत सरकारच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत वितरित करण्यात येतील. उर्वरित ५० टक्के लसी राज्य सरकारांना आणि खासगी रुग्णालयांना विकल्या जातील असं सीरमने म्हटलं आहे.

२२ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.