चालू घडामोडी आणि दिनविशेष - 21 ऑक्टोबर 2023

Date : 21 October, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अम्पायर वाईड बॉल कधी देऊ शकतात, कधी नाही? विराटच्या बाबतीत योग्य निर्णय झाला का? जाणून घ्या!
  • १९ ऑक्टोबर २०२३ रोजी वर्ल्डकप २०२३ मधील भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना पार पडला. भारतानं बांगलादेशवर सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीनं त्याच्या कारकिर्दीतलं ४८वं एकदिवसीय शतक झळकावलं. मात्र, भारताचा विजय, विश्वचषकातील खेळी किंवा विराट कोहलीचं शतक यापेक्षाही जास्त चर्चेत आला तो नसूम अहमदनं विराट कोहलीला टाकलेला ४२व्या ओव्हरमधला पहिला बॉल! हा बॉल वाईड होता की नाही? यावर सध्या नेटिझन्समध्ये चर्चा चालू आहे. त्यावरून नेमके वाईड बॉलसंदर्भातले क्रिकेटमधले नियम काय आहेत? इथपर्यंत ही चर्चा आली आहे. हे नियम नेमकं काय सांगतात? आणि त्यात विराटबाबत घडलेल्या प्रसंगासाठी लागू होईल असा काही नियम आहे का? जाणून घेऊया…

नियम आले कुठून?

  • खरंतर नियम काय आहेत याआधीही हे नियम आले कुठून? हे जाणून घेऊयात. एमसीसी अर्थात मेरिलबोन क्रिकेट क्लबकडून क्रिकेटसंदर्भातली नियमावली तयार केली जाते. जर काही काळानंतर तिचा आढावा घेणं, त्यात सुधारणा आवश्यक असेल तर ती करणं, त्यात नव्याने नियम समाविष्ट करणं किंवा कालबाह्य झालेले नियम रद्द करणं अशा प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्या एमसीसी पार पाडते. लंडनच्या लॉर्ड्समध्ये या संस्थेचं कार्यालय आहे. या क्लबकडून पहिला नियमांचा ड्राफ्ट १७४४ साली तयार करण्यात आला. ऑक्टोबर २०१७पर्यंत एमसीसीनं सात वेळा नियमांचा आढावा, बदल, त्यात नव्याने भर घातली आहे. २०१७च्या ताज्या प्रतीची तिसरी आवृत्ती १ ऑक्टोबर २०२२ सालापासून म्हणजे अवघ्या वर्षभरापूर्वीपासून अंमलात आली आहे.
  • क्रिकेट कसं खेळलं जावं, त्यासाठी कोणते नियम लागू असावेत, क्रिकेटच्या वेगवेगळ्या बाजू कोणत्या, त्यासाठी कोणते नियम कोणत्या परिस्थितीत लागू केले जावेत असा प्रकारच्या अनेक नियमांचा त्यात अंतर्भाव आहे. यातच २२व्या क्रमांकाचा नियम हा वाईड बॉल संदर्भातला आहे.
महसा अमिनीला युरोपीय महासंघाचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार
  • गेल्या वर्षी इराणमध्ये पोलीस कोठडीत मरण पावलेल्या महसा अमिनी या २२ वर्षांच्या कुर्दिश- इराणी तरुणीला गुरुवारी युरोपीय महासंघाचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. या तरुणीच्या मृत्यूमुळे इराणमधील पुराणमतवादी धर्मसत्ताक राज्यपद्धतीच्या विरोधात जगभरात निदर्शने करण्यात आली होती.सोव्हिएत रशियातील बंडखोर अँद्रेई साखारोव्ह याच्या नावाने असलेला युरोपीय महासंघाचा हा पुरस्कार, मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य यांचे संरक्षण करणाऱ्या व्यक्ती किंवा गटांसाठी १९८८ साली स्थापन करण्यात आला. नोबेल पुरस्कार विजेता असलेला साखारोव्ह १९८९ साली मरण पावला होता.
  • हिजाब घालणे अनिवार्य करणाऱ्या इराणच्या कायद्याचे कथितरीत्या उल्लंघन केल्याबद्दल अमिनी हिला अटक करण्यात आली होती व नंतर पोलीस कोठडीत तिचा मृत्यू झाला. तिचा ‘भीषण खून’ हा कलाटणी देणारा टप्पा ठरला व तो दिवस ‘कलंकित दिवस’ म्हणून ओळखला जाईल, असे युरोपीय महासंघाचे अध्यक्ष रॉबर्टा मेत्सोला म्हणाले.
  • या वर्षी अंतिम यादीत समावेश करण्यात आलेल्यांमध्ये निकारागुआतील मानवाधिकारांसाठी लढा देणाऱ्या विल्मा नुनेझ डी एस्कॉर्सिआ आणि रोमन कॅथलिक धर्मगुरू रोलँडो अल्वारेझ, तसेच ‘मुक्त, सुरक्षित व कायदेशीर गर्भपातासाठी’ लढय़ाचे नेतृत्व करणाऱ्या पोलंड, एल साल्वाडोर व अमेरिका येथील तीन महिलांचा समावेश होता.
पहिल्या ‘नमो भारत’चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
  • दिल्ली-मेरठ रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमच्या (आरआरटीएस) १७ किलोमीटरच्या टप्प्यातील पहिल्या ‘नमो भारत’ रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवला. अशाच प्रकारच्या सेवांनी लवकरच उत्तर प्रदेश, हरियाणा व राजस्थानमधील अनेक शहरे जोडली जातील, असे त्यांनी याप्रसंगी जाहीर केले.
  • दिल्ली- गाझियाबाद- मेरठ आरआरटीएसचा ८२ किलोमीटरचा संपूर्ण टप्पा येत्या दीड वर्षांत पूर्ण केला जाईल, असे सांगतानाच, त्याच्या उद्घाटनासाठी मीच पुन्हा येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
  • ‘‘चार वर्षांपूर्वी मी दिल्ली- गाझियाबाद- मेरठ रीजनल कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी केली. आज साहिबाबाद ते दुहाई डेपो या मार्गावर ‘नमो भारत’ गाडय़ांच्या सेवा सुरू झाल्या आहेत. मी पूर्वीही सांगितले होते आणि आताही सांगतो, की आम्ही जे प्रकल्प सुरू करतो त्यांचे उद्घाटन करतो,’’ असे पंतप्रधान म्हणाले.
  • ‘‘दीड वर्षांनंतर हा दिल्ली-मेरठ टप्पा पूर्ण होईल तेव्हा मी तुमच्या सेवेत पुन्हा हजर असेन,’’ असे मोदी यांनी सांगितले. त्यांनी बंगळूरु मेट्रोच्या दोन टप्प्यांचे आभासी उद्घाटनही केले.
  • उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी प्रभृती या कार्यक्रमाला उपस्थित होते.
  • ‘‘भारताच्या पहिल्या जलदगती रेल्वे सेवेला- नमो भारत रेल्वे- हिरवा झेंडा दाखवण्यात आल्यामुळे हा ऐतिहासिक क्षण आहे,’’ असे उद्गार मोदी यांनी काढले. ‘‘अमृत भारत, वंदे भारत व नमो भारत या त्रयी या दशकाच्या अखेरीस आधुनिक रेल्वेच्या प्रतीक बनतील,’’ असेही ते म्हणाले.
आकाशी झेप घे रे…! गगनयान मोहिमेची आज होणार पहिली उड्डाण चाचणी, कुठे पाहता येणार थेट प्रक्षेपण?
  • चांद्रयान ३ च्या यशस्वी उड्डाण आणि लॅण्डिगनंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) गगनयान मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयान मोहिमेच्या व्हिकल टेस्ट फ्लाईटचं आज पहिलं परिक्षण (चाचणी उड्डाण) केलं जाणार आहे. गगयान मिशनचं चाचणी उड्डाण टीव्ही डी १ आज सकाळी लॉन्च केलं जाणार आहे. इस्रोने मानवासहित ही योजना आखली असून क्रू मॉडेलला सुरक्षितरित्या उतरण्याची तयारी पूर्ण केली आहे.

आजचा दिवस महत्त्वाचा

  • गगनयान मोहिमेत ३ सदस्यांची टीम ३ दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या ४०० किमी वरच्या कक्षेत पाठवलं जाणार आहे. हे क्रु मॉडेल समुद्रात सुरक्षितपणे उतरवले जाईल. जर या मोहिमेत भारत यशस्वी झाला तर असं करणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. त्यामुळे आजचा क्षण भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे.

कुठे पाहाल प्रक्षेपण?

  • या चाचणीला पुढील काहीच मिनिटांत सुरुवात होणार आहे. https://facebook.com/ISRO आणि https://youtube.com/watch व्यतिरिक्त ISRO वेबसाइट http://isro.gov.in येथे तुम्ही गगनयान मोहिमेचं थेट प्रक्षेपण पाहु शकणार आहात.

काय आहे गगनयान मोहीम ?

  • गगनयान प्रकल्प, मानवयुक्त अंतराळ मोहिमा पाठविण्याची भारताची क्षमता दाखवत आहे. आत्तापर्यंत भारतासह विविध देशांच्या अंतराळवीरांनी अवकाश वारी केली. रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच स्वबळावर म्हणजेच स्वतःच्या रॉकेटच्या–प्रक्षेपकाच्या साहाय्याने अवकाशात अंतराळवीरांना पाठवलेले आहे. आता चौथा देश म्हणून भारत या पंक्तीत बसेल. म्हणजेच भारत स्वबळावर देशाच्या नागरिकांना अवकाशात पाठवणार असून या मोहिमेला ‘गगनयान’ हे नाव देण्यात आलं. गगनयान मोहिमेसाठी अवकाशात जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले GSLV Mk3 हे प्रक्षेपक रॉकेट सज्ज आहे, तर अंतराळवीर ज्या यानातून प्रवास करणार आहेत, त्या क्रू मॉडेलच्या प्रत्यक्ष चाचण्या घेण्यात येणार आहेत.
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदवार्ता उत्सव विशेष गाड्या धावणार; वाचा कुठे आणि केव्हा…
  • दिवाळीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता अमरावती-पुणे आणि बडनेरा-नाशिक दरम्यान उत्सव विशेष मेमू रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या दोन गाड्यांच्या एकूण ३६ फेऱ्या होणार आहेत.
  • अमरावती-पुणे मेमू गाडी क्रमांक ०१२०९ विशेष मेमू अमरावती येथून ०५ ते नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी आणि बुधवारी १२.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२१० विशेष मेमू पुणे येथून ०६ ते २० नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवार आणि सोमवारी ०६.३५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १९.५० वाजता पोहोचेल. या गाडीला अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, उरुळी, हडपसर आणि पुणे येथे थांबा आहे. गाडीला आठ कार मेमू रेक राहणार आहे.
  • बडनेरा-नाशिक मेमू गाडी क्रमांक ०१२११ विशेष मेमू बडनेरा येथून दि. ०६ ते १९ नोव्हेंबरपर्यंत दररोज ११.०५ वाजता सुटेल आणि नाशिक येथे त्याच दिवशी १९.४० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२१२ विशेष मेमू नाशिक येथून ०६ ते १९ नोव्हेंबरपर्यंत दररोज २१.१५ वाजता सुटेल आणि बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिक येथे थांबे आहेत. या दोन विशेष गाड्यांमुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना विशेष सोय उपलब्ध होणार आहे.
कंत्राटी भरतीचे विभागांना मुक्तद्वार; रद्द झालेल्या कंपन्याच पुन्हा शिरकाव करण्याची शक्यता
  • चौफेर टीका आणि स्वपक्षियांच्या दबावानंतर सामुहिक कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी विभागांना आवश्यकेनुसार कंत्राटी भरतीचे अधिकार देण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
  • सरकारी निर्णयामुळे काम रद्द झालेल्या काही कंपन्या विभागांच्या कंत्राटी पद्धतीत शिरकाव करण्याची भीतीही मंत्रालयात व्यक्त केली जात आहे. राज्य कामगार विभागाच्या १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळांमध्ये आवश्यक कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यासाठी मनुष्यबळ पुरविण्यासाठी नऊ संस्थांची नियुक्ती केली. मात्र हा निर्णय केवळ मंत्रालय किंवा शासनकीय विभागापुरता मर्यादित न ठेवता सरकारने या निर्णयाची व्याप्ती थेट महापालिका, नगरपालिका, महामंडळांपर्यंत वाढविली होती.
  • या नऊ संस्थांमध्ये काही सरकारमधील नेत्यांच्याच संस्थांचा सहभाग होता. एक संस्था निविदेत पात्र ठरली होती मात्र अंतिम होईपर्यंत त्यावर अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केल्याने या संस्थेची निवड रद्द करण्यात आली होती.  हा निर्णय घेताना ठेकेदार संस्थांना कोटय़वधींना नफा कसा होईल याकडे लक्ष देण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करुन हा निर्णय रद्द करण्याची व नव्याने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणण्याची मागणी केली होती.
  • त्यानंतर या संस्थांना १८ ते २० टक्के सेवाशुल्क देऊन उर्वरित रक्कम कामगारांना देण्याबाबतची सुधारणा करुन या निर्णयाची अंमलबजाणी सुरु करण्यात आली  होती.

महामंडळ, पालिकांमध्ये वाव?

  • १४ मार्चच्या निर्णयाद्वारे निवड करण्यात आलेल्या नऊ संस्थांची निविदा रद्द होणार असून त्याद्वारे काही विभागांनी सुरु केलेली भरती प्रक्रियाही रद्द होणार आहे. मात्र विभाग, पालिकांना त्यांच्या गरजेनुसार कंत्राटी भरतीचे अधिकार राहतील असे फडणवीस यांनी स्पष्ट केल्याने, महामंडळ आणि पालिकांमध्ये पूर्वीप्रमाणेच मनमानीपणे भरतीचे द्वार मोकळे झाले आहे.

 

अमोल काळे ‘एमसीए’च्या अध्यक्षपदी ; अजिंक्य नाईक सचिवपदी; निवडणुकीत पवार-शेलार गटाची बाजी :
  • राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या अमोल काळे यांची गुरुवारी मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झाली.

  • ‘एमसीए’च्या बहुचर्चित निवडणुकीमध्ये सहसचिवपदी दीपक पाटील आणि मुंबई प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या अध्यक्षपदी विहंग सरनाईक यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत मुंबई क्रिकेट गट, म्हाडदळकर गट आणि शरद पवार-आशीष शेलार पवार गट रिंगणात असल्याने निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे होती. अखेर पवार-शेलार गटाने वर्चस्व राखले.

  • अध्यक्षपदासाठी मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार माजी कसोटीपटू संदीप पाटील आणि पवार-शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे यांच्यात चुरस असल्याचे दिसून आली. अखेर काळे यांनी १८३-१५८ अशी बाजी मारली. सचिवपदासाठी अजिंक्य नाईक, मयांक खांडवाला आणि माजी अध्यक्ष रवी सावंत यांचे सुपुत्र नील सावंत यांमध्ये तिरंगी लढत होती. अजिंक्य नाईक यांनी २८६ गुणांसह विजय नोंदवला. खजिनदारपदी अरमान मलिक आणि जगदीश आचरेकर यांच्यात चुरस पाहायला मिळाली. मलिक यांनी आचरेकर यांच्यावर १६२-१६१ असा विजय मिळवला.

  • कार्यकारिणी परिषद सदस्यपदाच्या नऊ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये मिलिंद नार्वेकर (२२१ मते), नीलेश भोसले (२१९), कौशिक गोडबोले (२०५), अभय हडप (२०५), सूरज समत (१७०), आमदार जितेंद्र आव्हाड (१६३), मंगेश साटम (१५७), संदीप विचारे (१५४), प्रमोद यादव (१५२) या उमेदवारांनी विजय मिळवले.

‘एमपीएससी’च्या संगणकाधारित परीक्षेला विरोध ; गैरप्रकाराची विद्यार्थी संघटनांना भीती :
  • आरोग्य विभाग, टीईटी अशा संगणकाधारित परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा अनुभव पाठीशी असतानाही पारदर्शी परीक्षेसाठी विश्वास असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही (एमपीएससी) सरळसेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा संगणकाधारित घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला स्पर्धा परीक्षार्थीच्या काही संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे.

  • आयोगातर्फे  सरळसेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा संगणकाधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ४० संवर्गाची चाळणी परीक्षा होणार असून यामुळे परीक्षा प्रक्रिया वेगवान होऊ शकेल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.

  • आतापर्यंत विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरती प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने घेण्यात येत होती. मात्र, त्यामध्ये बदल करून संगणकाधारित पद्धतीने घेण्यात येणार आहे. या निर्णयाला आता विरोध होत आहे.

  • आरोग्य विभाग, टीईटी परीक्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोग्य विभागाची परीक्षाही रद्द करावी लागली. त्यामुळे संगणकाधारित पद्धतीने एमपीएससीने परीक्षा घेतल्यास गैरप्रकार होण्याची भीती स्पर्धा परीक्षार्थीकडून व्यक्त करण्यात येते. होतकरू विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत असल्याने पारदर्शी परीक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या एमपीएससीने अशा पद्धतीने परीक्षा घेऊ नये, अशी मागणी होत आहे.

जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलचा गौरव; मुख्यमंत्र्यांकडून २ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर :
  • जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यास रोख २ कोटी रुपये देण्याचे आज(गुरुवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

  • राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केले असून राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला.

  • कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत भारताचा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. त्याबद्द्ल आज बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी रुद्रांक्ष पाटीलने केलेल्या कामगिरीची माहिती दिली.

  • २०२४ ला फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा पहिला कोटा त्याला मिळाला आहे. रुद्रांक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळे त्याचं कौतुक केलं जात आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे.

ब्रिटनमध्ये राजकीय उलथापालथ, लिझ ट्रस यांनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा :
  • लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारून अवघे काही आठवडेच झाले होते. पुढील आठवड्यात नव्या पंतप्रधानांची निवड करण्यात येईल.

  • पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ब्रिटनमधील महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी काही धोरणांची अंमलबजावणी केली. मात्र त्यांनी ब्रिटनचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर अवघ्या सहा आठवड्यांत त्यांनी पक्षाचा विश्वास गमावला आहे. याच कारणामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • लिझ ट्रस यांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र अवघ्या ४५ दिवसांमध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मागील काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये अन्नधान्यांच्या दरांमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. याच कारणमुळे येथील महागाई ४० वर्षांतील उच्चांकावर पोहोचली आहे.

  • गेल्या महिन्यात झालेली दरवाढ ही १९८०नंतरची सर्वात मोठी असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे आर्थिक आणि राजकीय संकटात असलेल्या लिझ ट्रस सरकारसमोर महागाईवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. ब्रिटनमधील महागाई आणि राबवलेल्या अर्थविषयक धोरणामुळे लिझ यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

21 ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.