चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ ऑक्टोबर २०२१

Date : 21 October, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
HSC, SSC पुरवणी परीक्षा निकाल: बारावीचा निकाल २७.३१ टक्के तर दहावीचा निकाल २९.१४ टक्के :
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (२० ऑक्टोबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. त्या शिवाय मंडळाने या निकालांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सविस्तर आकडेवारी जाहीर केली आहे.

  • १२ वीच्या नवीन अभ्याक्रमानुसार या परिक्षेला यंदा २ हजार १०९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी १ हजार ८०९ विद्यार्थी परिक्षेला हजर राहिले त्यापैकी ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही २५.८७ टक्के इतकी आहे.

  • १२ वीच्या जुन्या अभ्याक्रमानुसारच्या परिक्षेसाठी १२ हजार ५३४ जणांनी अर्ज केलेला. त्यापैकी १२ हजार १६० जण परिक्षेला उपस्थित राहिले. या १२ हजार १६० जणांपैकी ३ हजार ३२२ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाणे २७.३१ टक्के इतकं आहे.

  • १० वीच्या निकालामध्ये १२ हजार ३६३ अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी केवळ तीन हजार ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. १० हजार ४७७ जणांनी १० वीची परिक्षा दिली होती. उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी २९.१४ टक्के इतकी आहे.

मुंबई विमानतळावर प्रवासीसंख्येचा विक्रम :
  • करोनाकाळातील विमान प्रवासासंदर्भात लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याने गेले दीड वर्ष फारशी वर्दळ नसलेले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा गजबजू लागले आहे. १७ ऑक्टोबरला दिवसभरात ९१ हजार ९०४ एवढ्या विक्रमी संख्येने विमानतळावर प्रवाशांनी हजेरी लावली.

  • रविवारी १७ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ वरून एकू ण ७५ हजार ९४४ प्रवाशांनी प्रवास केला, त्यापैकी ३७ हजार ३१५ प्रवासी विमानतळावर उतरले, तर ३८ हजार ६२९ प्रवाशांनी येथून देशांतर्गत आणि देशाबाहेर प्रवास के ला. तर टर्मिनल १ वरून ७ हजार ६९० प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास के ला, ८ हजार २७० प्रवासी विमानतळावर उतरले.

  • टर्मिनल १ वरून ४१४ देशांतर्गत उड्डाणे करण्यात आली. तर टर्मिनल २ वरून झालेल्या ४९४ उड्डाणांपैकी ४१५ देशांतर्गत आणि ७९ आंतरराष्ट्रीय हवाईमार्गावरील उड्डाणे होती. देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांची सर्वाधिक पसंती इंडिगोच्या विमानसेवेला मिळाली, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एअर इंडियाच्या विमानसेवेचा लाभ १० हजार २२६ एवढ्या प्रवाशांनी घेतला. ही सर्वाधिक प्रवासीसंख्या असल्याचे सांगितले जाते.

  • टर्मिनल १ आणि टर्मिनल २ या दोन्ही विमानतळावरून दिल्ली, बंगळूरु आणि गोवा या तिन्ही ठिकाणांहून सर्वाधिक प्रवाशांनी ये-जा के ली. दैनंदिन उड्डाणांची संख्या सतत वाढत असल्याने टर्मिनल २ अपुरे पडू लागले होते. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच टर्मिनल १ वरून हवाई उड्डाण सुरू झाल्याने व्यवस्थापनावरचा भार कमी झाला आहे.

फेसबुकचे नाव बदलण्याचे संकेत :
  • फेसबुक ही समाजमाध्यम कंपनी पुढील आठवड्यात नावात बदल करणार असल्याचे वृत्त ‘दी व्हर्ज’ या नियतकालिकाने दिले असून त्यात थेट सूत्रांचा हवाला देण्यात आला आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी २८ ऑक्टोबरला होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक बैठकीत नवीन नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

  • दरम्यान, फेसबुकने ही अफवा आहे की, अंदाज यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. व्यावसायिक कामकाजाबाबत अमेरिकी सरकारकडून कंपनीची छाननी चालू असताना नाव बदलण्याचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकेतील दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी कंपनीच्या कामकाज पद्धतीवर टीका केली असून नियमांचे पालन होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

  • इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑक्युलस यासह फेसबुक हे एकाच कंपनीचे समाजमाध्यम असून त्याचे रिब्र्रँडग करण्याची योजना यात आहे. सिलिकॉन व्हॅलीत कंपन्यांनी त्यांची नावे बदलण्यारचे किंवा सेवा विस्तारण्याचे प्रकार नवीन नाहीत. गुगलने अशाच पद्धतीने २०१५ मध्ये अल्फाबेट इनकार्पोरेशन ही कंपनी तयार करून विस्तार केला होता, त्यात शोधन व जाहिरात या पलीकडे व्यवसायाचा हेतू होता.

  • दूरस्थ भागात आरोग्य तंत्रज्ञान पोहोचवण्याचेही उद्देश त्यात होते. ऑनलाइन सेवा क्षेत्रात फेसबुकचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी त्याचे नाव बदलले जाण्याची शक्यता असून लोक आभासी माध्यमात वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करीत असतात. त्याचा लाभ उठवण्याचाही कंपनीचा प्रयत्न असावा असे दिसते. व्हर्चु्अल रिअ‍ॅलटी क्षेत्रात फेसबुकने मोठी गुंतवणूक केली असून तीन अब्ज वापरकर्ते वेगवेगळ्या साधने व उपयोजनांच्या माध्यमातून एकत्र जोडले जातील असा प्रयत्न आहे.

केंद्राकडून हवाई क्षेत्राला नवी ऊर्जा - पंतप्रधान :
  • हवाई वाहतूक क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुशीनगर येथील नवीन विमानतळाचे उद्घाटन करताना सांगितले. कुशीनगर येथे गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले होते. त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • नवीन विमानतळासाठी २६० कोटी रुपये खर्च आला असून जगातील बौद्ध धर्मक्षेत्रे जोडण्याचा सरकारचा विचार आहे. पंतप्रधान मोदी उद्घाटनप्रसंगी म्हणाले, की या विमानतळामुळे वेगवेगळी ठिकाणे जोडली जाणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. भगवान बुद्धांशी संबंधित क्षेत्रे विकसित करण्याचा सरकारचा मानस असून त्यात कुशीनगरचा विकास वेगाने केला जाईल. उत्तर प्रदेश व केंद्र सरकारचा त्यावर भर आहे.

  • एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या निर्णयावर त्यांनी सांगितले, की एअर इंडियाचे खासगीकरण हे महत्त्वाचे पाऊल असून आता हवाई क्षेत्र व्यावसायिक तत्त्वावर चालवण्याची गरज आहे. या निर्णयामुळे हवाई वाहतूक क्षेत्राला उत्तेजन मिळणार असून त्याला नवी ऊर्जा प्राप्त होईल. संरक्षण हवाई क्षेत्र नागरी वापरासाठी मुक्त करण्याच्या निर्णयाचाही त्यांनी उल्लेख केला.

रशियामध्ये करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी पुतिन यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय :
  • करोना महामारीने रशियामध्ये सध्या थैमान घातलेलं आहे. करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरू असून, करोनाबाधितांचे मृत्यू देखील मोठ्याप्रमाणावर होत आहेत. या पार्श्वभूमवीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक मोठा निर्णय घेतला असून, त्यानुसार बुधवारी मंत्रिमंडळाच्या विना कामकाजाचा आठवडा घोषित करण्याच्या आणि रशियन कामगारांना त्यांच्या कार्यालयांपासून दूर ठेवण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. कराण, करोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या विक्रमी वाढली आहे.

  • सरकारी टास्क फोर्सने बुधवारी, मागील २४ तासांमध्ये १ हजार २८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. ही संख्या महमारीच्या सुरूवातीपासूनची सर्वाधिक आहे. यामुळे रशियात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची आतापर्यंतची संख्या २२६,३५३ झाली आहे. जी युरोपात आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

  • पुतिन यांनी म्हटले की, ते ३० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विना कामकाज कालावधी सुरू करण्याच्या प्रस्तावास पाठिंबा देत आहेत आणि पुढील आठवड्यापर्यंत तो विस्तारित करत आहेत. अगोदरच सात पैकी चार दिवस राज्याच्या सुट्ट्या आहेत. त्यांनी हे देखील सांगितले की, काही ठिकाणी जिथे परिस्थिती सर्वाधिक धोकादायक आहे, तिथे काम न करण्याच कालावधी शनिवापासून सुरू होऊ शकतो.

  • काही भागात, वाढत्या संसर्गामुळे अधिकाऱ्यांना नागरिकांना वैद्यकीय मदत स्थगित करावी लागली होती. कारण आरोग्य सेवा सुविधांना करोनाबाधित रूग्णांच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडण्यात आले होते.

श्रीलंका ‘अव्वल-१२’ फेरीत :
  • वनिंदू हसरंगाची (७१ धावा आणि १ बळी) अष्टपैलू चमक आणि फिरकीपटू महीष थिक्षनाच्या (३/१७) प्रभावी गोलंदाजीमुळे श्रीलंकेने ट्वेन्टी-२० विश्वचषकात आयर्लंडला ७० धावांनी नामोहरम केले. सलग दुसऱ्या विजयासह श्रीलंकेने ‘अ’ गटातून ‘अव्वल-१२’ फेरी गाठणारा पहिला संघ ठरण्याचा मान मिळवला.

  • श्रीलंकेने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ १८.३ षटकांत १०१ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून कर्णधार अँडी बलबिरीनने (४१) एकाकी झुंज दिली. आता आयर्लंड आणि नामिबिया यांच्यातील लढतीचा विजेता या गटातून श्रीलंकेसह पुढील फेरीत आगेकूच करेल.

  • तत्पूर्वी, डावखुरा वेगवान गोलंदाज जोश लिटिलच्या (४/२३) प्रभावी माऱ्यामुळे श्रीलंकेची दुसऱ्याच षटकांत ३ बाद ८ धावा अशी अवस्था झाली. मात्र हसरंगा आणि पथुम निस्सांका यांनी चौथ्या गड्यासाठी १२३ धावांची  भागीदारी रचून संघाला सावरले. अखेरच्या षटकांत कर्णधार दसून शनाकाने (११ चेंडूंत नाबाद २१) फटकेबाजी केल्यामुळे श्रीलंकेने ७ बाद १७१ धावांपर्यंत मजल मारली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जेम्स पॅटिन्सनची निवृत्ती :
  • तंदुरुस्तीच्या कारणास्तव अ‍ॅशेस मालिकेसाठी संघात स्थान मिळू शकणार नसल्याची खात्री पटल्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

  • ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना ३१ वर्षीय पॅटिन्सनने २१ कसोटी सामन्यांत ८१ बळी, १५ एकदिवसीय सामन्यांत १६ बळी आणि ४ ट्वेन्टी-२० सामन्यांत ३ बळी घेतले आहेत. मात्र व्हिक्टोरिया संघाकडून स्थानिक क्रिकेट खेळत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. याच संघाकडून सराव करीत असताना काही दिवसांपूर्वी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

  • ब्रिस्बेन येथे डिसेंबर २०११मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पॅटिन्सनने मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या साथीने पदार्पण केले होते. कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना सिडनीत जानेवारी २०२०मध्ये न्यूझीलंडविरुद्धच तो खेळला. सप्टेंबर २०१५मध्ये लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध तो शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

२१ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.