चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ ऑक्टोबर २०१९

Date : 21 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात पहिल्या दोन तासात झाले २२ टक्के मतदान :
  • संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पहिल्या एका तासांमध्ये राज्यात अवघे पाच टक्के मतदान झाले आहे. असे असले तरी जुन्नर मतदारसंघामध्ये पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी नऊ वाजेपर्यंत २२ टक्के मतदान झाले आहे.

  • जुन्नरमध्ये तिहेरी लढत पहायला मिळत आहे. शिवसेनेकडून शरद सोनावणे निवडणुकीच्या रिंगणात आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मनसेचा एकमेव आमदार निवडून म्हणून चार वर्ष चर्चेत असलेल्या सोनावणे यांनी याच वर्षी ११ मार्च रोजी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. सोनावणेंसमोर कडवे आवाहन आहे ते राष्ट्रवादीच्या अतुल बेनके यांचे. जुन्नर तालुक्यामधील राष्ट्रवादीच्या युवा मंचचे अध्यक्ष असणारे बेनके यांचीही मतदारसंघामध्ये चांगलीच चर्चा आहे. त्याशिवाय शिवसेनेच्या आशा बुचके यांनी बंडखोरी केली असून त्या अपक्ष म्हणून या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

  • जुन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शरद सोनावणे यांच्या पक्षप्रवेशावर तीव्र विरोध दर्शवला होता. आमची भूमिका ऐकून न घेता शरद सोनावणे यांना उमेदवारी दिली तर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदाचा सामूहिक राजीनामा देतील, असा इशाराही दिल्याची चर्चा होती. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या बुडत्या नौकेला शरद सोनावणे यांनी वाचवलं होतं. मात्र मार्चमध्ये सोनावणे यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला. सोनावणे यांचा शिवसेना प्रवेश हा राज ठाकरेंसाठी मोठा धक्काच मानला जात आहे. जुन्नरमधील तिहेरी लढतीकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

पंतप्रधानांच्या मध्यस्थीनंतर अमोल यादव यांना उड्डाण परवाना मंजूर :
  • प्रायोगिक विमान तयार करणारे मुंबईकर वैमानिक अमोल यादव यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतल्यानंतर तातडीने चक्रे फिरून यादव यांना विमान उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक संचालकांकडून मंजुरी मिळाली आहे.

  • कॅप्टन अमोल यादव यांनी मुंबईच्या एका उपनगरातील त्यांच्या घराच्या गच्चीवर सहा आसनी विमान तयार केले आहे. त्याला परिपूर्ण स्वरूप देण्यासाठी त्यांनी १८ वर्षे खर्च केली आहेत.

  • नागरी हवाई वाहतूक संचालकांकडून (डीजीसीए) नियमानुसार ‘उड्डाणाचा परवाना’ (परमिट टू फ्लाय) मिळण्याच्या प्रक्रियेला मंजुरीसाठी २०११ सालापासून यादव यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांवरून त्यांना तीन दिवसांपूर्वीच ही मंजुरी मिळाली.

  • अमोल यादव हे परवाना मिळण्यासाठी झगडत असल्याचे कळल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब पंतप्रधान मोदी यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर मोदी यांच्या मध्यस्थीमुळे या तरुण वैमानिकाच्या विनंतीवर तातडीने प्रक्रिया झाली आणि त्यांना डीजीसीएकडून ‘उड्डाणाचा परवाना’ मिळाला.

देशासाठी जागतिक सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय :
  • तुषार वैती - गेल्या २० वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी मोठी झेप घेईन, याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण आता ‘आशिया-श्री’ किताब जिंकल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून देण्याचे माझे ध्येय आहे, असे मत भारताचा शरीरसौष्ठवपटू रोहित शेट्टीने व्यक्त केले. अलीकडेच इंडोनेशिया येथे झालेल्या ‘आशिया-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या मुंबईकर रोहितच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी केलेली ही बातचीत-

  •  ‘आशिया-श्री’ सुवर्णपदक विजेतेपदापर्यंतचा प्रवास कसा होता - २००१पासून मी शरीरबांधणी करण्यास सुरुवात केल्यानंतर तब्बल १० वर्षांनी मी स्पर्धामध्ये उतरण्यास सुरुवात केली. पहिल्याच वर्षी चार विजेतेपदांना गवसणी घातल्यानंतर माझा आत्मविश्वासही उंचावला. आपला मुलगा काही तरी चांगले काम करतोय, हे पाहून घरच्यांनीही मला पाठिंबा देण्याचे ठरवले. वडील फुटबॉलपटू असल्याने आपल्या मुलानेही क्रीडा क्षेत्रात नाव कमवावे, ही त्यांची इच्छा होती. आता भारतातील माझ्या प्रत्येक स्पर्धेला वडील आवर्जून हजेरी लावतात.

आरेतील वृक्षतोडीबाबत आज सुनावणी :
  • आरेतील वृक्षतोडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सोमवारी, पर्यावरणविषयक खटल्यांचे कामकाज पाहणाऱ्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. दोन आठवडय़ांपूर्वी वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली होती.

  • या वृक्षतोडीविरोधात ग्रेटर नोएडामधील विधि शाखेचा विद्यार्थी रिषभ रंजन याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना वृक्षतोडीस स्थगिती देण्याची विनंती करणारे पत्र लिहिले होते. त्याची गंभीर दखल घेऊन या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने सुट्टीकालीन विशेष खंडपीठ स्थापन करून ७ ऑक्टोबर रोजी त्यावर तातडीने सुनावणी घेतली. या सुनावणीत वृक्षतोडीला स्थगिती देऊन हे प्रकरण पर्यावरणविषयक खंडपीठाकडे सुपूर्द करण्यात आले.

  • आरेची गणना जंगलात होत नसल्याचे राज्य सरकारचे म्हणणे मान्य करून ४ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने आरेतील वृक्षतोडीला संमती दिली होती. या निकालानंतर त्याच रात्री वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली. तेथील २१३४ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी जितकी झाडे कापणे गरजेचे होते तेवढी वृक्षतोड झालेली आहे. त्यासाठी आता आणखी झाडे कापली जाणार नाहीत, असे राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले होते.

'या' मंडळींचा आदर्श; वयाचा, आजाराचा विचार न करता यांनी मतदानाचा हक्क बजावला :
  • नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सुट्टी असल्याने अनेक जण मतदान करण्याऐवजी घरीच आराम करण्याचा किंवा बाहेर फिरायला जाण्याच बेत आखतात. मात्र मतदान आपलं कर्तव्य आहे, याचा अनेकांना विसर पडतो. मात्र समाजात अशीही काही मंडळी आहेत, ज्यांना कठीण परिस्थितीतही आपल्या कर्तव्याची जाणिव आहे.

  • नाशिकच्या प्रकाश पवार यांनी सकाळी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत पवार यांनी मतदान केलं. प्रकाश पवार हे डायलिसिसचे रुग्ण असून गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर अशोक स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्यांना बाहेर पडू नका, असा सल्ला दिला होता. मात्र पवार यांनी डॉक्टरांचा सल्ला दुर्लक्ष करत मतदान केलं आहे. तरुणांपासून सगळ्यांसाठीच हे एक आदर्श आहेत.

  • याच ठिकाणी नीलिमा लोया या 81 वर्षीय आजींनी बायपासची शस्त्रक्रिया झालेली असताना आपल्या पतीसोबत मतदानाचा हक्क बजावला. या आजींना गुडघे दुखीचाही त्रास आहे. मात्र कसलीही पर्वा न करता त्यांनी आपलं मतदान केलं. याशिवाय त्यांनी तरुणांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे.

दिनविशेष :
  • भारतीय पोलीस स्मृती दिन

महत्वाच्या घटना 

  • १८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.

  • १८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.

  • १९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.

  • १९४३: सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.

  • १९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.

  • १९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.

  • १९८३: प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.

  • १९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.

  • १९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

  • १९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  • २००२: मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.

जन्म

  • १८३३: स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १८९६)

  • १८८७: भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६१)

  • १९१७: गायक व संगीतकार राम फाटक यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर २००२)

  • १९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर यांचा जन्म.

  • १९३१: हिन्दी चित्रपट अभिनेते व निर्माते शम्मी कपूर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट २०११)

  • १९४९: इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचा जन्म.

मृत्यू 

  • १४२२: फ्रान्सचा राजा चार्ल्स (सहावा) यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १३८०)

  • १८३५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १७७५)

  • १९८१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: ३१ जानेवारी १८९६ – धारवाड, कर्नाटक)

  • १९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२१)

  • १९९५: अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९२५)

  • २०१०: भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९४९)

  • २०१२: चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते यश चोप्रा यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.