चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ मे २०२१

Updated On : May 21, 2021 | Category : Current Affairs


पिनरायी विजयन केरळच्या मुख्यमंत्रिपदी :
 • ६ एप्रिलला झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) नेतृत्व करून तिला ऐतिहासिक असा सलग विजय मिळवून देणारे माकपचे ज्येष्ठ नेते पिनरायी विजयन यांनी गुरुवारी २० मंत्र्यांसह दुसऱ्यांदा केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

 • सेंट्रल स्टेडियममध्ये झालेल्या साध्या कार्यक्रमात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी ७७ वर्षांचे विजयन व त्यांचे मंत्री यांना पदाची शपथ दिली. करोनाविषयक नियम पाळून हा कार्यक्रम झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून विजयन यांचे अभिनंदन केले.

 • मुख्यमंत्र्यांसह १५ मंत्र्यांनी राज्यघटनेच्या नावाने, तर पाचजणांनी ईश्वाराच्या नावाने शपथ घेतली. माकपच्या नेतृत्वाखालील या मंत्रिमंडळातील इंडियन नॅशनल लीगचे प्रतिनिधी असलेले अहमद देवरकोविल यांनी अल्लाच्या नावाने शपथ घेतली. करोना संसर्गाच्या पाश्र्वाभूमीवर विरोधक काँग्रेस- यूडीएफच्या नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी टाळली.

 • महासाथीची परिस्थिती लक्षात घेऊन कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवावी, असे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी सरकारला दिले होते.

अमेरिकेची भारताला ५० कोटी अमेरिकी डॉलरची मदत :
 • अमेरिकेने भारताला आतापर्यंत ५० कोटी अमेरिकी डॉलरहून अधिक किमतीची करोनासंबंधीची मदत केली असल्याचे व्हाइट हाऊसने बुधवारी सांगितले. इतर देशांना ८ कोटी लशी पुरवण्याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

 • ‘अमेरिकेचे संघराज्य सरकार व राज्य सरकारे, अमेरिकी कंपन्या, संस्था व नागरिक यांच्याकडून मिळालेल्या योगदानापोटी अमेरिकेने भारताला आतापर्यंत ५० कोटी अमेरिकी डॉलरहून अधिक किमतीची कोविडविषयक मदत केली आहे’, असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन प्साकी यांनी आभासी पत्रकार परिषदेत सांगितले.

 • बायडेन प्रशासन आता करोना महासाथीमुळे प्रभावित झालेल्या दक्षिण आशियातील इतर देशांना मदत पुरवण्याच्या दृष्टीने काम करत आहे. आरोग्यविषयक मदतसामुग्री, प्राणवायू, एन-९५ मुखपट्ट्या, जलद नैदानिक चाचण्यांच्या किट्स आणि औषधे सात विमानांतून आतापर्यंत रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती प्साकी यांनी दिली

 • अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या ६ कोटी आणि इतर तीन मान्यताप्राप्त लशींच्या २ कोटी अशा करोना प्रतिबंधक लशींच्या ८ कोटी मात्रा पुरवण्याबाबत सध्या आम्ही मध्यस्थता प्रक्रियेच्या माध्यमातून काम करत आहोत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

“लिव्ह-इन संबंध कायद्याने गुन्हा नाहीत”, हरयाणा उच्च न्यायालयानं केलं स्पष्ट! वाचा सविस्तर :
 • भारतामध्ये परंपरागत पद्धतीने विवाह व्यवस्था ही स्त्री-पुरुषांना एकत्र राहण्यासाठी आवश्यक अशी प्रणाली मानली गेली. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपचा स्वीकार करताना काही जोडपी दिसू लागली. या प्रकारच्या संबंधांना मोठ्या प्रमाणावर विरोध होऊ लागला.

 • अनेकदा न्यायालयीन लढा देखील झाला. मात्र, आजपर्यंत कोणत्याच न्यायालयाने लिव्ह-इन संबंध बेकायदेशीर असल्याचं म्हटलेलं नाही. त्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिगत जीवनावरील परिणामांवर मोठी चर्चा झाली. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने यासंदर्भातल्या एका प्रकरणाच्या सुनावणीमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपची कायदेशीर चौकट, सामाजिक स्वीकारार्हता आणि हरकतीच्या मुद्यांवर सविस्तर भूमिका स्पष्ट केली.

 • काही दिवसांपूर्वीच पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या एका खंडपीठाने “लिव्ह-इन संबंध सामाजिक आणि नैतिकदृष्ट्य अस्वीकारार्ह” असल्याचं नमूद केलं होतं. आज पुन्हा एकदा तशाच एका प्रकरणात नव्या खंडपीठाने मात्र लिव्ह-इन संबंध कायद्याने गुन्हा नाहीत अशा आशयाची भूमिका स्पष्ट केली आहे.

 • लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने नातेवाईकांकडून संरक्षण मिळण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. अशीच मागणी आधीच्या खंडपीठाने दुसऱ्या प्रकरणात फेटाळून लावली होती. मात्र, न्यायमूर्ती सुधीर मित्तल यांच्या खंडपीठाने ही मागणी ग्राह्य धरत लिव्ह-इन संबंधांची चौकट निकालावेळी समजावून सांगितली.

महात्मा गांधींच्या संगमनेर भेटीला शंभर वर्षे पूर्ण :
 • लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व महात्मा गांधींकडे गेले. टिळकांच्या कामाला पुढे नेण्यासाठी महात्माजींनी टिळक स्वराज्य फंडाची घोषणा केली आणि त्यासाठी देशव्यापी दौरा आखला. या दौऱ्याचा एक भाग म्हणून महात्मा गांधी संगमनेरला आले होते. या घटनेला उद्या (२१ मे ) १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

 • शंभर  वर्षांनंतर देखील महात्मा गांधी यांच्या विचाराच्या स्मृती संगमनेरकरांनी दिलेल्या मानपत्राच्या रूपाने जतन करून ठेवल्या आहे.

 • संगमनेरातल्या काकासाहेब पिंगळे, बापूसाहेब पारेगावकर, तुकाराम निऱ्हाळी, गंगाधर दळवी, मुरलीधर जयरामदास मालपाणी, जगन्नाथ दळवी, गणेश सखाराम सराफ, लालसाहेब पीरजादे, शिवनारायण नावंदर, बाबुराव ठाकूर, शंकरराव संतवकील आदी पुढारी मंडळींनी महात्मा गांधींना संगमनेरला येण्याचे निमंत्रण दिले.

 • गांधीजींनी ते स्वीकारले आणि २१ मे १९२१ रोजी महात्मा गांधी नाशिकहून थेट संगमनेरात पोहोचले. संगमनेरच्या भूमीला महात्मा गांधी यांचे पाय लागल्याने संगमनेरकर आनंदित झाले होते. गांधी त्या दिवशी शहरातील श्रीचंद वीरचंद गुजराती यांच्याकडे मुक्कामाला थांबले होते. या वेळी त्यांच्यासोबत महादेवभाई देसाई हे देखील होते.

पुन्हा एकदा सुरु होणार आयपीएल?; बीसीसीआयकडून इंग्लंड बोर्डाला पत्र :
 • करोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी बीसीसीआयकडून प्रयत्न सुरु आहेत. करोना संकटामुळे अर्ध्यातच आयपीएल स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढवली होती.

 • परिस्थितीनुसार आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल असं बीसीसीआयाने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला पत्र लिहिलं असून आयपीएलसाठी वेळ मिळावा यासाठी कसोटी मालिका निर्धारित वेळेच्या एक आठवडा आधी खेळवला जावी अशी विनंती केली आहे.

 • बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला लिहिलेल्या पत्रात भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांची कसोटी मालिका एक आठवडा आधी खेळवली जावी अशी विनंती केली आहे. नियोजित वेळेनुसार, ४ ऑगस्टला पहिली कसोटी खेळली जाणार आहे. बीसीसीआयच्या मागणीवर अद्याप इंग्लंड बोर्डाकडून उत्तर आलेलं नाही. 

युव्हेंटसला इटालियन चषकाचे जेतेपद :
 • युव्हेंटसला या मोसमात चमकदार कामगिरी करता आली नसली तरी मोसमाअखेरीस त्यांनी अ‍ॅटलांटाचा २-१ असा पराभव करत इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

 • युव्हेंटसचे हे इटालियन चषकाचे १४वे तर अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे पहिले जेतेपद ठरले. दुजान कुलुसेवस्की याने ३१व्या मिनिटाला युव्हेंटसचे खाते खोलल्यानंतर अ‍ॅटलांटाने रस्लन मलिनोवस्की (४१व्या मिनिटाला) याच्या गोलमुळे सामन्यात बरोबरी साधली.

 • मात्र फेडेरिको चिएसा याने ७३व्या मिनिटाला निर्णायक गोल करत युव्हेंटसला जेतेपद मिळवून दिले. मोसमातील दुसरे जेतेपद पटकावल्यानंतर आंद्रिया पिलरे यांनी युव्हेंटसच्या प्रशिक्षकपदी कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली.

२१ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)