चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ मे २०२०

Date : 21 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पाकिस्ताननं पुन्हा पसरले हात; हवंय २ अब्ज डॉलर्सचं कर्ज :
  • पाकिस्तान सरकारसमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभं राहिलं आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान सरकारनं जागतिक वित्तीय संस्थांकडे कर्ज मागण्याची योजना तयार केली आहे. करोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला मदतीची आवश्यकता आहे, तर देशाची तिजोरी झपाट्याने रिकामी होत असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे.

  • पाकिस्ताननं जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे. त्यांनी मागितलेलं हे कर्ज जी २० देशांकडून मागण्यात आलेल्या कर्जाच्या तुलनेत अधिक आहे. एक्स्प्रेस ट्रिब्युननं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पाकिस्ताननं जी २० देशांकडून १.८ अब्ज डॉलर्सच्या मदतीची मागणी केली आहे.

  • आशियाई विकास बँकेनं पाकिस्तानला करोनाच्या पार्श्वभूमीवर आपात्कालिन कर्ज म्हणून ३०.५ कोटी रूपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे करोनाविरोधात लढण्यासाठी आवश्यक उपकरणं, तसंच गरीब महिलांना आर्थिक मदतही करण्यात येणार आहे.

यूपीएससी पूर्व परीक्षेच्या तारखेची घोषणा ५ जूनला :
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी)घेण्यात येणाऱ्या सनदी सेवा पूर्व परीक्षेची तारीख ५ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. टाळेबंदीमुळे ३१ मे रोजीची ही नियोजित पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली.

  • लोकसेवा आयोगाने बुधवारी परिस्थितीचा आढावा घेतला. टाळेबंदीच्या नव्या टप्प्यातही अनेक र्निबध कायम ठेवण्यात आलेले असल्याने सद्य:स्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे ५ जून रोजी आयोगाची पुन्हा बैठक घेण्यात येईल. त्यात आढावा घेऊन परीक्षेच्या तारखेबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे आयोगाने स्पष्ट केले.

देशांतर्गत विमानसेवा सोमवारपासून :
  • देशांतर्गत प्रवासी विमानसेवा सोमवार, २५ मेपासून टप्प्याटप्प्याने सुरू होईल, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी ट्विटद्वारे जाहीर केले. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा कधी सुरू होईल, याबाबतची अनिश्चितता कायम आहे.

  • विमानसेवा हिरव्या श्रेणीतील शहरांमध्ये सुरू केली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळूरु, चेन्नई आदी महानगरांमध्ये ही सेवा सुरू करायची असेल तर राज्य सरकारांचे मतही विचारात घेतले जाऊ  शकते. करोनाकालीन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातील व त्यांची माहिती यथावकाश दिली जाईल, असे पुरी यांनी सांगितले.

  • नव्या नियमांची यादी तयार करण्यात आली असून, त्याबद्दल गेल्या आठवडय़ात विमान कंपन्या, तसेच विमानतळ प्राधिकरणाकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. मधली प्रवासी जागा रिकामी ठेवण्याचा निर्णय घेतला तरी पुरेसे शारीरिक अंतर राखले जात नाही. करोनासंदर्भातील नियमांचे पालन करायचे, तर विमानातील प्रवाशांची संख्या आणखी कमी करावी लागेल. तसे केले तर विमानप्रवास ३३ टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

‘आयुष्मान भारत योजनेचा १ कोटी लोकांना लाभ’ :
  • आयुष्मान भारत योजनेत आतापर्यंत एक कोटी लोकांना मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले आहे. या योजनेचा अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम झाला असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • सप्टेंबर २०१८ मध्ये मोदी यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उर्फ आयुष्मान भारत योजना जाहीर केली होती. जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून या योजनेने नावलौकिक मिळवला.

  • पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आयुष्मान भारत योजनेचे एकूण १ कोटी लाभार्थी आतापर्यंत झाले आहेत, दोन वर्षांत हे साध्य केले आहे त्यातून अनेक लोकांचे जीव वाचले आहेत. जे लाभार्थी आहेत त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. आयुष्मान भारत योजनेशी निगडित असलेले डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांचेही पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले आहेत.

दहावी-बारावीच्या परीक्षांना केंद्राकडून हिरवा कंदिल; राज्यांच्या मागणीनंतर परवानगी :
  • करोनानं देशात हातपाय पसरल्यानंतर शैक्षणिक क्षेत्राचं वेळापत्रकच कोलमडलं आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. त्यानंतर सातत्यानं तीन वेळा लॉकडाउन वाढवण्यात आल्यानं दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता.

  • अनेक राज्यातील बोर्डाच्या परीक्षांसह सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राज्यांच्या मागणीनंतर केंद्रानं दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. याविषयी केंद्रानं नियमावलीही जारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याविषयी माहिती दिली.

  • सीबीएसई बोर्ड आणि अनेक राज्यांनी दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भात केंद्राकडं विनंती केली होती. केंद्र सरकारनं चौथ्या लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यांकडून होणाऱ्या मागणीला परवानगी दिली आहे.

  • राज्य शैक्षणिक मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांना परीक्षा घेण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी तसं पत्र राज्यांच्या सचिवांना पाठवलं असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याविषयी माहिती दिली.

सीमावादात भारताला साथ देत अमेरिकेने चीनला सुनावलं :
  • चीन बरोबर सुरु असलेल्या वादामध्ये अमेरिकेने भारताला साथ दिली आहे. पूर्व लडाखमध्ये विनाकारण तणाव निर्माण करणाऱ्या चीनला अमेरिकेने सुनावलं आहे. चीनच्या कृतीमधून त्यांचा त्रास देण्याचा हेतू दिसून येतो. दक्षिण चीनचा समुद्र असो किंवा भारतीय सीमा या चकमकींवरुन चीनपासून असलेला धोका लक्षात येतो असे अमेरिकेने म्हटले आहे. दक्षिण व मध्य आशियासाठीच्या अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अ‍ॅलिस वेल्स यांनी ही टीका केली आहे.

  • “दक्षिण चीनचा समुद्र असो किंवा भारतीय सीमा चीनची आक्रमकता फक्त शब्दांपुरती मर्यादीत नाही. चीनचे चिथावणीखोर आणि दुसऱ्यांना त्रासदायक ठरणारे वर्तन आपण पाहत आहोत. त्यातून चीनला आपल्या वाढत्या शक्तीचा नेमका कसा उपयोग करायचा आहे? हा प्रश्न निर्माण होतो” असे अ‍ॅलिस वेल्स पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

  • यापूर्वी भारत-चीनमध्ये सीमावाद झाले. त्यावेळी अमेरिकेने थेट भूमिका घेतली नव्हती. पण यावेळी अमेरिकेने चीनला थेट फटकारले आहे. यामागे करोना व्हायरस सुद्धा एक कारण आहे. कारण करोना व्हायरसमुळे अमेरिकेत चीन विरोधात मोठया प्रमाणावर संताप आहे. ट्रम्प प्रशासनाने तर या व्हायरसच्या फैलावासाठी चीनला जबाबदार धरले आहे.

२१ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.