चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ जून २०२१

Updated On : Jun 21, 2021 | Category : Current Affairs


आजपासून मोफत लसीकरण :
 • केंद्र सरकारचे नवे लसीकरण धोरण आज, सोमवारपासून अमलात येत आहे. या धोरणानुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येईल. मात्र, राज्यात प्राधान्याने ३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण होणार आहे.

 • सर्वोच्च न्यायालयाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचे केंद्राचे धोरण मनमानी पद्धतीचे आणि तर्कशून्य असल्याचे भाष्य केले होते. त्यानंतर काही दिवसांनी केंद्राने नवे धोरण जाहीर केले. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आज, २१ जूनपासून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा या महिन्याच्या सुरुवातीला केली होती.

 • नव्या धोरणानुसार १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकार लसउत्पादकांकडून उपलब्ध लसमात्रांपैकी ७५ टक्के मात्रा खरेदी करून त्यांचा राज्यांना पुरवठा करणार आहे. लसीकरणासाठी राज्यांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

 • सोमवारपासून सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येईल. अर्थात काही राज्यांनी आधीच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण सुरू केले आहे.

एक हजार मीटरचे अंतर अवघ्या सहा मिनिटात धावून पूर्ण :
 • आर्या पंकज टाकोणे या तीन वर्षीय चिमुरडीने एक हजार मीटरचे अंतर अवघ्या सहा मिनिटात धावून पूर्ण करीत विक्रमाला गवसणी घातली आहे.

 • एशिया बुक ऑफ  रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ  रेकॉड्समध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली. पूलगाव येथे राहणाऱ्या आर्याने वध्रेतील गांधी पुतळा ते सेंट अ‍ॅन्थनी स्कूल या दरम्यानचे एक किलोमीटरचे अंतर सहा मिनिट व एका सेकंदात पार केले.

 • इंडिया बुकसाठी हे अंतर धावण्यास आठ मिनिटे तर एशिया बुकतर्फे  सात मिनिटांचा वेळ आर्याला देण्यात आला होता. मात्र आर्याने हे अंतर त्यापेक्षाही कमी वेळात म्हणजे सहा मिनिटे एका सेकंदात पूर्ण करीत विक्रमाची नोंद केली. त्याची घोषणा संस्थेचे आयोजक डॉ. मनोज तत्त्ववादी यांनी केली.

 • दीड वर्षांपासून आर्याने पूर्वतयारी सुरू केली होती. पोलीस कर्मचारी असलेल्या तिच्या वडिलांनी त्यादृष्टीने कसून तयारी करून घेतली होती.

 • खासदार रामदास तडस यांच्या हस्ते तिला विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी अमरावतीत झालेल्या मॅरेथॉनमध्ये आर्या धावली होती. सर्वात लहान धावपटू म्हणून तिने पुरस्कार जिंकला होता.

 भारत-पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची पुढील आठवड्यात भेट :
 • भारत आणि पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे पालन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चार महिन्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोभाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोइद युसुफ यांची पुढील आठवड्यात दुशान्बे येथे भेट होणार आहे.

 • ताजिकिस्तानच्या राजधानीत होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत दोभाल आणि युसुफ सहभागी होणार आहेत. दोभाल हे २३-२४ जून रोजी बैठकीला स्वत: हजर राहणार आहेत. या बैठकीला अफगाणिस्तानचे एनएसए हमदुल्लाह मोहीब, रशियाचे एनएसए निकोलाय पॅट्शेव्ह आणि चीन, कझाकस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचे एनएसएही हजर राहणार आहेत.

 • अफगाणिस्तानमधील अस्थिर स्थिती आणि भारत व पाकिस्तानमध्ये गेल्या चार महिन्यांपासून असलेली शांतता या पाश्र्वाभूमीवर दोभाल यांचा बैठकीतील सहभाग आणि द्विपक्षीय बैठक महत्त्वाची असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, युसुफ यांच्यासमवेतची भेट अद्याप ठरलेली नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

 • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची एससीओची शेवटची बैठक वादळी ठरली होती, जम्मू-काश्मीरला नकाशामध्ये पाकिस्तानचा भाग दाखविण्यात आले होते आणि त्याच्या निषेधार्थ दोभाल बैठकीतून निघून गेले होते. भारताने या बेकायदेशीर नकाशाला तीव्र हरकत घेतली होती आणि रशियानेही या नकाशाचा वापर न करण्याबाबत पाकिस्तानचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता.

काश्मीरमधील १४ नेत्यांना केंद्राचे  बैठकीसाठी आमंत्रण :
 • पूर्वाश्रमीच्या जम्मू-काश्मीर राज्याच्या ४ माजी मुख्यमंत्र्यांसह सध्याच्या या केंद्रशासित प्रदेशातील १४ नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २४ जूनला नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

 • जम्मू-काश्मीरमधील पुढील कार्यवाहीबाबत विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीसाठी या नेत्यांना आमंत्रित करण्यासाठी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

 • आमंत्रित करण्यात आलेल्यांमध्ये फारुक अब्दुल्ला व त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद व पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती या ४ माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे नेते तारा चंद, पीपल्स कॉन्फरन्सचे मुझफ्फर हुसेन बेग, तसेच भाजपचे नेते निर्मल सिंह व कविंदर गुप्ता या ४ माजी उपमुख्यमंत्र्यांनाही बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे.

 • याशिवाय, माकपचे नेते मोहम्मद युसूफ तारिगामी, जम्मू व काश्मीर अपना पार्टीचे प्रमुख अल्ताफ बुखारी, पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन, जे-के काँग्रेसचे प्रमुख जी.ए. मीर, भाजपचे रविंदर रैना आणि पँथर्स पार्टीचे नेते भीम सिंह यांचाही आमंत्रितांमध्ये समावेश आहे.

२०२८ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ‘बीसीसीआय’ची दावेदारी :
 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रत्येक दोन वर्षांनी जागतिक दर्जाच्या क्रिकेट स्पर्धेची तयारी दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) २०२४ पासून सुरू होणाऱ्या आठ वर्षांच्या कार्यक्रमपत्रिकेत भारताने दोन विश्वचषकासह तीन जागतिक स्पर्धासाठी दावेदारी केली आहे.

 • ‘बीसीसीआय’च्या ऑनलाइन कार्यकारी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  ‘बीसीसीआय’ने २०२५ची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा, २०२८ची ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि २०३१मध्ये होणाऱ्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषकासाठी दावेदारी केली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.

 • २०१७नंतर न झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे, असे नुकतेच ‘आयसीसी’ने स्पष्ट केले होते. त्यानुसार आगामी कार्यक्रमपत्रिकेत त्याचा समावेश करण्यात येणार आहे.

 • २०२३च्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषकानंतर भारताने आगामी योजना यावेळी स्पष्ट केल्या. पुढील कार्यक्रमपत्रिकेत एकदिवसीय विश्वचषकात १४ आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकात १६ संघ असतील, असे ‘आयसीसी’ने म्हटले आहे.

२१ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)