चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ जानेवारी २०२3

Date : 21 January, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धा : ऑस्ट्रेलिया उपांत्यपूर्व फेरीत

  • ब्लेक गोव्हर्सने नोंदवलेल्या चार गोलच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेला ९-२ अशी धूळ चारत विश्वचषक हॉकी स्पर्धेत अ-गटातून थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता त्यांची गाठ मलेशिया आणि स्पेन यांच्यातील विजेत्या संघाशी २४ जानेवारीला पडणार आहे.
  • ऑस्ट्रेलियाच्या विजयात गोव्हर्सने पेनल्टी स्ट्रोकसह नोंदवलेल्या चार गोलचा प्रमुख वाटा होता. त्याने चौथ्या, १५, १९ आणि २०व्या मिनिटाला गोल केले. यात एक गोल कॉर्नर, तर एक स्ट्रोकवर गोल होता. ऑस्ट्रेलियासाठी अन्य गोल टॉम क्रेग (१०व्या मि.), जॅक हार्वी (२२व्या मि.), डॅनिएल बिल (२८व्या मि.), जेरेमी हेवर्ड (३२व्या मि.) व टीम ब्रँड (४७व्या मि.) यांनी केले. दक्षिण आफ्रिकेसाठी एनटुली एन्कोबिले (आठव्या मि.) आणि कॉक टेव्हिन (५८व्या मि.) यांनी गोल केले.
  • अ-गटातील अन्य सामन्यात अर्जेटिनाने अखेरच्या मिनिटाला गोल करून फ्रान्सला ५-५ असे बरोबरीत रोखले. अर्जेटिना दुसऱ्या स्थानावर राहिले. अखेरच्या मिनिटाला व्हिक्टर चार्लेटने स्ट्रोकवर गोल करून फ्रान्सला ५-४ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, पुढच्या काही सेकंदांत अर्जेटिनाने चार कॉर्नर मिळवले आणि अखेरच्या सेकंदाला डेल्ला टोरेने कॉर्नर सत्कारणी लावताना अर्जेटिनाला बरोबरी साधून दिली. फ्रान्सकडून चार्लेटने चार, तर टिनेवेज एन्टिनेने एक गोल केला. 
  • अर्जेटिनासाठी टोरेने तीन, तर किनन निकोलस, फेरेरोने एकेक गोल केला. दुसरीकडे, बेल्जियमने जपानचा ७-१ असा पराभव केला. या विजयासह बेल्जियमने ब-गटातून अव्वल स्थान मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ब-गटातील अन्य सामन्यात जर्मनीने कोरियावर ७-२ अशी मात केली.

मेटा, ट्विटरनंतर गुगलही १२ हजार जणांना नोकरीवरून काढणार, सुंदर पिचाईंची ईमेलद्वारे घोषणा

  • गुगलची मातृसंस्था असणारी अल्फाबेट ही कंपनी सुमारे १२ हजार जणांना नोकरीवरून काढणार आहे. संबंधित कंपनीने जगभरातील एकूण कर्मचार्‍यांपैकी ६ टक्के नोकरीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोकरकपातीचा जागतिक स्तरावर आणि संपूर्ण कंपनीतील कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी शुक्रवारी एका ईमेलद्वारे नोकरकपातीची घोषणा केली. या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी आपण घेत आहे, असंही पिचाई यांनी ईमेलमध्ये लिहिलं.
  • मागील काही काळात तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मेटा, ट्विटर आणि अॅमेझॉनसह इतर अनेक कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. ढासळती जागतिक अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गुगलनेही नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला.
  • विशेष म्हणजे Google ही सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीत लाखो लोक काम करतात. ही कंपनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात टाळत आहे. परंतु डिजीटल जाहिरातींमध्ये कंपनीला मंदीचा सामना करावा लागत आहे. परिणामी ही नोकरकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • पिचाई यांनी ईमेलमध्ये लिहिलं, “आमचं लक्ष्य अधिक स्पष्ट करण्यासाठी हा महत्त्वाचा क्षण आहे. कंपनीचं भांडवल आणि कंपनीतील वर्कफोर्स योग्य दिशेनं वळवणे हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे.”

अमनजोत कौरचा मोठा धमाका; पदार्पणाच्या सामन्यातच मोडला ९ वर्षापूर्वीचा ‘हा’ विक्रम

  • भारतीय महिला क्रिकेट संघाला पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळायचे आहे. याआधी महिला संघ तिरंगी मालिका खेळत आहे, ज्यामध्ये त्यांचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. या सामन्यात स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने २७ धावांनी शानदार विजय नोंदवला. या सामन्यात आपला पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या अमनजोत कौरने एक मोठ्या विक्रमाला गवसनी घातली.
  • फलंदाज अमनजोत कौरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले. तिने ३० चेंडूत ४१ धावांची मॅचविनिंग खेळी खेळली. या कारणास्तव तिला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. या सामन्यात दीप्ती शर्माने अष्टपैलू कामगिरी केली. या सामन्यात भारतीय महिला संघाने ६ बाद १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकचा संघ ९ बाद १२० धावांच करु शकला.
  • या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. अमनजोत कौर क्रिजवर येईपर्यंत भारतीय संघ रुळावर आला नव्हता आणि निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यावेळी धावफलकावर फक्त ६९ धावा होत्या. त्यानंतर दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरने संघाचा डाव सावरला. अमनजोत कौर पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी करताना ३० चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.

देशातील रस्ते बांधणी : गडकरींनी केली दहापट अधिक गुंतवणूक

  • देशात सर्वच कमी – अधिक प्रमाणात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. २०१२-१३ मध्ये देशात प्राधिकरणाकडून रस्त्यांवर १७ हजार ३७७.७९ कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०२१-२२ मध्ये हा खर्च १ लाख ७२ हजार ३०१.७० कोटींवर गेला. २०१२-१३ च्या तुलनेत रस्त्यांसाठीच्या निधीत तब्बल दहा पट वाढ नोंदवल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.
  • देशात २०१३-१४ मध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने रस्त्यांवर २० हजार ६०१.३१ कोटी रुपयांचा खर्च केला. २०१४-१५ मध्ये हा खर्च वाढून २३ हजार ७८९.७२ कोटी होता. २०१५-१६ मध्ये हा खर्च ४२ हजार ६८९.४९ कोटी, २०१६-१७ मध्ये हा खर्च ४८ हजार ८५७.५१ कोटी, २०१७-१८ मध्ये हा खर्च ८३ हजार २३०.५८ कोटी, २०१८-१९ मध्ये हा खर्च ९५ हजार २०६.६४ कोटी, २०१९-२० मध्ये हा खर्च १ लाख ४ हजार ६४.४१ कोटी, २०२०-२१ मध्ये हा खर्च १ लाख २५ हजार ३५०.४१ कोटी, २०२१-२२ मध्ये हा खर्च १ लाख ७२ हजार ३०१.७० कोटी होता. त्यामुळे, गेल्या पाच वर्षांत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला रस्त्यांसाठी भरभरून निधी मिळाल्याचेही माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले. या खात्याची जबाबदारी नागपूरकर असलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आहे, हे विशेष.
    खासगी क्षेत्राने केलेल्या निधीत मात्र घट - भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातील रस्त्यांवर खासगी क्षेत्राने २०१२-१३ मध्ये १९ हजार ८८६.५२ कोटींचा खर्च केला होता. हा खर्च २०१३-१४ मध्ये २१ हजार १५५.४७ कोटी, २०१४-१५ मध्ये १७ हजार २९३.१२ कोटी, २०१५-१६ मध्ये २७ हजार ३६७.९६ कोटी, २०१६-१७ मध्ये १५ हजार ४५३.६४ कोटी, २०१७-१८ मध्ये १६ हजार ४१३.६४ कोटी, २०१८-१९ मध्ये २१ हजार ६०५.३२ कोटी, २०२०-२१ मध्ये १२ हजार ४७५.५३ कोटी, २०२१-२२ मध्ये १९ हजार २०६.१४ कोटी रुपये नोंदवल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.

गतिमान विकासामुळे रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधींत वाढ : मोदी; मेळाव्यात ७१ हजारांवर युवकांना नियुक्तिपत्रे

  • ‘‘भारत गतिमान विकास करत असून, पायाभूत सुविधा व संबंधित क्षेत्रांत मोठी प्रगती होत आहे. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही निर्माण करत आहेत. आपल्या सरकारने भरती प्रक्रियेत पारदर्शकता व गतिमानतेस उत्तेजन दिले. त्यात व्यापक बदल करताना ती अधिक सुव्यवस्थित व कालबद्ध केली आहे,’’ असा दावा माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली.
  • दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध सरकारी विभागांसाठी निवड झालेल्या ७१ हजार ४२६ तरुणांना नियुक्तिपत्रांचे वाटप शुक्रवारी झालेल्या रोजगार मेळाव्यात करण्यात आले. यावेळी मोदी म्हणाले, की देशात आयोजित केले जाणारे रोजगार मेळावे हे त्यांच्या सरकारचे वैशिष्टय़ बनले आहेत. आपले सरकार केलेला संकल्प पूर्ण करते, हे या उपक्रमांद्वारे स्पष्टपणे दिसते.
  • मोदी म्हणाले, की हा उपक्रम केवळ यशस्वी उमेदवारांमध्येच नव्हे तर कोटय़वधी कुटुंबांमध्ये नवी आशा पल्लवीत करेल. येत्या काही दिवसांत आणखी लाखो कुटुंबांतील सदस्यांना सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत. मोदींनी यावेळी केंद्र सरकारसह राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि भाजप सत्तेत असलेल्या राज्यांत सातत्याने आयोजित केल्या जाणार्या रोजगार मेळाव्यांचा यावेळी उल्लेख केला. लवकरच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तराखंड अशा अनेक राज्यांते हे मेळावे घेतले जातील, अशी माहितीही दिली.
  • मोदी यांनी सांगितले, की सातत्याने होणारे हे रोजगार मेळावे आता आमच्या सरकारची ओळख बनले आहेत. आमचे सरकार केलेला संकल्प कसा सिद्ध करते, हे यावरून दिसते. पारदर्शक पद्धतीने भरती आणि पदोन्नती तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. ही पारदर्शकता या युवकांना अधिक समर्थपणे स्पर्धेत सहभागी होण्यास प्रवृत्त करते. आमचे सरकार या संदर्भात सातत्याने काम करत आहे.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ जानेवारी २०२२
ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी :

‘ब्रह्मोस’ या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राची भारताने गुरुवारी ओडिशाच्या किनाऱ्याजवळ यशस्वी चाचणी केली.

‘कंट्रोल सिस्टीम’सह नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या या क्षेपणास्त्राचे चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजवरून सकाळी १०.४५च्या सुमारास चाचणी प्रक्षेपण करण्यात आले, अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) एका सूत्राने दिली. या चाचणीच्या तपशिलांचे विश्लेषण करण्यात येत असल्याचेही तो म्हणाला.

पुरोगामी भारताचा उदय!; पंतप्रधानांचे गौरवोद्गार :

ज्याचे विचार आणि दृष्टिकोन हे नावीन्यपूर्ण आणि निर्णय पुरोगामी आहेत, असा भारत उदयाला येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. ज्यात कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला स्थान नाही अशी रचना देशात निर्माण होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

 व्यक्तीची प्रगती ही राष्ट्राच्या प्रगतीशी जोडली गेली असल्याचे मोदी यांनी ‘आझादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर’च्या उद्घाटन समारंभात दूरसंवादाद्वारे केलेल्या प्रमुख भाषणात सांगितले आणि देशाच्या उत्थानासाठी प्रत्येकाच्या कर्तव्याला महत्त्व देण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

 विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगतानाच, अशा प्रयत्नांना प्रत्युत्तर देण्याची आणि देशाचे योग्य चित्र उभे करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

 कर्तव्यावर भर देताना पंतप्रधांनांनी सांगितले की, ‘‘आपल्याला हे मान्य करायला हवे, की स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये आपला समाज, आपला देश आणि आपणा सर्वांना एक प्रकारच्या अस्वस्थतेने ग्रासले आहे. आपण आपल्या कर्तव्यांपासून दूर गेलो आणि त्यांना प्राधान्य दिले नाही, याची ही अस्वस्थता आहे.’’

बी ७७७’ विमाने पुन्हा सुरू :

‘बोईंग बी ७७७’ प्रकारातील भारतातून अमेरिकेला जाणारी सहा विमाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय एअर इंडियाकडून घेण्यात आला. या विमानांच्या निर्मात्याने ही विमाने चालवण्यास कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर एअर इंडियाकडून हा निर्णय घेण्यात आला.

भारत-अमेरिका मार्गावरील आठ विमाने रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियाने बुधवारी घेतला होता. उत्तर अमेरिकेत ५जी इंटरनेटमुळे या विमानांच्या रेडिओ अल्टिमीटरमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

अमेरिकेच्या केंद्रीय विमान वाहतूक प्रशासनाने गुरुवारी सांगितले की, ‘बोईंग बी ७७७’सह काही प्रकारच्या विमानांमध्ये विशिष्ट प्रकारचे रेडिओ अल्टिमीटर बसवण्यात आले असून ५जी सेवेमुळे त्यांच्यावर परिणाम होणार नाही.

अमेरिकेच्या स्पष्टीकरणानंतर एअर इंडियाने विमाने रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला. ‘बोईंग बी ७७७’प्रकारातील पहिले विमान गुरुवारी सकाळी न्यूयॉर्कला रवाना झाले. त्यानंतर शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्कोला विमाने रवाना झाली.

आयसीसीने जाहीर केले वेळापत्रक - भारत - पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार :

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या यंदाच्या T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार भारत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेशसह सुपर 12 मध्ये आहे. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडचे चार संघ १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यास पात्र ठरण्यासाठी आमनेसामने असतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर 12 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

तर, भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी एमसीजी येथे पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. T20 विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान खेळवले जाणार आहेत.

संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे. पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध, २७ ऑक्टोबर रोजी अ गटातील उपविजेत्यासह दुसरा, ३० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा, त्यानंतर चौथा सामना २ नोव्हेंबर रोजी बांगलादेशशी आणि पाचवा सामना ६ नोव्हेंबर रोजी गट ब विजेत्यासह होईल.

२१ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.