चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ जानेवारी २०२१

Date : 21 January, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट; म्हणाले :
  • जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची बुधवारी सूत्रं स्वीकारली. अमेरिकेत झालेल्या सत्तांतराचं देशभरातून स्वागत करण्यात आलं. विविध देशांच्या प्रमुखांनी बायडेन यांचं अभिनंदन केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं.

  • बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलं. बायडेन यांचं अभिनंदन करतानाच मोदी म्हणाले,”भारत-अमेरिकेतील संबंध समान मूल्यांवर आधारित आहे. आपल्याकडे भरीव असा बहुअंगी द्विपक्षीय अजेंडा आहे. जो आर्थिक गुंतवणुकीबरोबरच उत्साही लोकांसोबतचे संबंध वृद्धिंगत करत आहे. भारत-अमेरिकेतील भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी बायडेन यांच्यासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे,” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

  • “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल मी जो बायडेन यांचं अभिनंदन करतो. भारत-अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मी बायडेन यांच्यासोबत काम करण्याची प्रतीक्षा करत आहे. अमेरिकेचं यशस्वी नेतृत्व करण्यासाठी माझ्या शुभेच्छा कारण, आपल्याला जागतिक शांतता आणि सुरक्षा पुढे नेण्यासाठी समान आव्हानांचा सामना करावा लागत आहे,” असंही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्राचे एक पाऊल मागे :
  • व्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशींवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने अखेर एक पाऊल मागे घेतले. याबाबत स्वतंत्र समिती नेमून तोडगा निघेपर्यंत तिन्ही कायद्यांना दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने बुधवारी शेतकरी संघटनांसमोर ठेवला. तसे प्रतिज्ञापत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याची तयारी केंद्राने दर्शवली. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

  • केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी संघटना यांच्यात बुधवारी विज्ञान भवन येथे झालेली दहावी बैठकही तोडग्याविना संपली. मात्र, केंद्राच्या नव्या प्रस्तावावर शुक्रवारी २२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पुन्हा बैठक होणार आहे. ‘शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या समितीचा प्रस्ताव मान्य केला तर दीड वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती दिली जाऊ  शकते’, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

  • दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनाला ५६ दिवस झाले असून, केंद्राने पहिल्यांदाच कृषी कायद्यांना स्थगिती देण्याची तयारी शेतकऱ्यांच्या बैठकीत दर्शवली. ‘शेतकरी नेत्यांशी सकारात्मक आणि योग्य दिशेने चर्चा झाली असून, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत कदाचित तोडगा निघू शकेल’, असा आशावादही तोमर यांनी व्यक्त केला.

‘आधार’विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या :
  • ‘आधार’ योजना वैध ठरवण्याच्या विरोधात २०१८ मध्ये दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

  • सर्वोच्च न्यायालयाने आधार योजना वैध ठरवताना काही तरतुदी रद्द केल्या होत्या. त्यात आधार क्रमांक, बँक खाते व मोबाइल फोन व शाळा प्रवेशाशी जोडण्याच्या कलमांचा समावेश होता. न्या. ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ४-१ अशा बहुमताने दिलेल्या निकालात २६ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या निकालावर फेरविचार करणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत.

  • न्या. धनंजय चंद्रचूड यांनी बहुमताच्या विरोधात मत दिले असून त्यांनी म्हटले आहे, की आधार विधेयक हे अर्थ विधेयक म्हणून मंजूर करण्यात आल्याच्या प्रकरणात निकाल होईपर्यंत या याचिका प्रलंबित ठेवायला हव्या होत्या. आधार विधेयक हे अर्थ विधेयक म्हणून मांडून सरकारने ते राज्यसभेत मंजूर करून घेतले होते. त्यामुळे राज्यसभेत बहुमत नसतानाही ते मंजूर झाले होते.

  • बहुमताच्या आदेशात न्यायालयाने ११ जानेवारी रोजी असे म्हटले आहे, की ज्या फेरविचार याचिका २६ सप्टेंबर २०१८ रोजी देण्यात आलेल्या अंतिम निकालाबाबत दाखल केल्या होत्या त्या पुराव्याअभावी फेटाळण्यात येत असून या निकालाचा फेरविचार करण्याची गरज नाही. मोठय़ा न्यायपीठापुढे हे प्रकरण असल्याकारणाने त्यावर फेरविचार करता येणार नाही. न्या. अशोक भूषण, न्या. एस. अब्दुल नझीर, न्या. बी.आर गवई यांनी बहुमताने हा निकाल दिला.

थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा - प्रणॉयचा संघर्षपूर्ण विजय :
  • बरगडय़ांना आणि खांद्याला झालेल्या दुखापतींची तमा न बाळगता भारताच्या एच. एस. प्रणॉयने आशियाई विजेत्या जोनाथन ख्रिस्तीला नमवून थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.

  • दुखापतींमुळे प्रणॉयने आपले सामन्यावरील लक्ष गमावू दिले नाही आणि सव्वा तास चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावरील ख्रिस्तीचा १८-२१, २१-१६, २३-२१ असा पराभव केला. मागील चार लढतींमध्ये प्रणॉयने प्रथमच इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित ख्रिस्तीला पराभूत केले.

  • पुरुष दुहेरीत एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिल जोडीने ऑलिव्हर लेडॉन-डेव्हिस आणि अभिनव मॅनोटा जोडीचा २३-२१, २१-१७ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महिला दुहेरीत लिंडा एफ्लर आणि इसाबेल हेरट्रिच जोडीने भारताच्या एन. सिक्की रेड्डी आणि अश्विन पोनप्पा यांना २१-११, २१-१९ असे पराभूत केले.

२१ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.