चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ फेब्रुवारी २०२०

Date : 21 February, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ट्रम्प -मोदी रोड-शोसाठी दोन लाख जण हजर राहणार : 
  • अहमदाबाद : भारत दौऱ्यावर येणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड-शो अहमदाबादमध्ये २४ फेब्रुवारी रोजी होणार असून त्यावेळी २२ कि.मी. मार्गावर दोन लाखांपेक्षा कमी लोक त्यांच्या स्वागतासाठी हजर असतील, असे गुरुवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. अमेरिकेच्या अध्यक्षांनी दावा केल्यापेक्षा स्वागतासाठी येणाऱ्या लोकांची संख्या कितीतरी कमी आहे.

  • अहमदाबादमधील स्टेडियम आणि विमानतळ यादरम्यान ७० लाख लोक स्वागतासाठी येतील असे मोदी यांनी म्हटल्याने आपण उत्साहित झालो आहोत, असे ट्रम्प यांनी अलीकडेच म्हटले होते. मात्र अहमदाबादमधील एकूण लोकसंख्याच जवळपास ७० लाख इतकी असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम अहमदाबादमधील मोतेरा क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार आहे. विमानतळ ते स्टेडियम या २२ कि.मी. मार्गावर एक ते दोन लाख लोक दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी हजर असतील, असे अधिकाऱ्यांना वाटत आहे.

कौतुकास्पद! भारतीय वंशाचे श्रीनिवासन बनले अमेरिकेत मुख्य न्यायाधीश : 
  • भारतीय वंशाचे कायदातज्ज्ञ पद्मनाभन श्रीकांत ऊर्फ श्री श्रीनिवासन (५२) यांनी इतिहास रचला आहे. अमेरिकेतील फेडरल सर्किट न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. चंदीगड या ठिकाणी जन्मलेले श्रीनिवासन आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खालोखाल महत्त्व असलेल्या फेडरल सर्किट न्यायालयाचे प्रमुखपद सांभाळणार आहेत.

  • श्रीनिवासन हे भारतीय-अमेरिकन आहेत. या पदावर कार्यरत असणारे ५२ वर्षीय श्रीनिवासन दक्षिण आशियाई वंशाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत. अमेरिकेतील द्वितीय उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश म्हणून श्रीनिवासन यांनी काम पाहिले आहे.

  • श्रीनिवासन उच्च श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण असून, स्टॅनफोर्ड विधी विद्यालयातून उच्च श्रेणीत त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आहे. न्यायाधीश जे. हारवी विल्कीन्सन यांचे सहायक म्हणून आपल्या व्यावसायिक जीवनाला सुरूवात करणारे श्रीनिवासन आता अमेरिकेत मुख्य न्यायाधीश बनले आहेत.

गृहमंत्र्यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला चीनचा आक्षेप : 
  • बीजिंग : अरुणाचल प्रदेश स्थापना दिन कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुरुवारी तेथे गेले असून त्याला चीनने जोरदार हरकत घेतली आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनने केला आहे. गृहमंत्र्यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीमुळे चीनच्या प्रांतिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाले असल्याने या भेटीला ठाम विरोध असल्याचे चीनने म्हटले आहे.

  • अमित शहा हे अरुणाचल प्रदेश राज्यनिर्मितीला ३४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी त्याचप्रमाणे उद्योग आणि रस्त्यांबाबतच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी तेथे गेले आहेत. अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगण्यासाठी चीन नेहमीच भारतीय नेत्याने तेथे भेट दिल्यास त्याला हरकत घेत असतो.

  • तिबेटच्या दक्षिण भागाबाबत चीनची भूमिका सुस्पष्ट असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले आहे. अरुणाचल प्रदेशला चीनने कधीही मान्यता दिलेली नाही आणि भारतीय नेत्याने तेथे भेट दिल्याने प्रांतिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन होत असल्याचा दावा चीनने केला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने सीमा प्रश्न अधिक बिकट होईल अशी कृती टाळावी, अशी विनंती चीनने केली आहे. हा सीमा प्रश्न सोडविण्यासाठी आतापर्यंत भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या २२ फेऱ्या झाल्या आहेत.

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट - भारताचे विश्वविजेतेपदाचे उद्दिष्ट : 
  • सिडनी : महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारपासून भारत आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीने सुरुवात होत आहे. विश्वचषक स्पर्धेत अडखळत कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने यंदा मात्र कामगिरीत सातत्य राखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • कामगिरीत सातत्य नसणे, ही समस्या भारताला गेल्या अनेक महिन्यांपासून सतावत आहे. नुकत्याच झालेल्या तिरंगी स्पर्धेतही भारताला याचाच फटका बसला. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे भारताला विजेतेपदावर नाव कोरता आले नाही. बाद फेरीत मजल मारल्यावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या बलाढय़ प्रतिस्पध्र्याना नमवायचे असल्यास भारताच्या मधल्या फळीला कामगिरी उंचवावी लागणार आहे. मधल्या फळीतील फलंदाजांची हाराकिरी यावर भारताला आता मेहनत घ्यावी लागणार आहे.

  • १६ वर्षीय युवा फलंदाज शफाली वर्मा हिने बऱ्याचदा भारताला दमदार सुरुवात करून दिली आहे. मात्र सलामीवीर स्मृती मानधनाचे कामगिरीतील असातत्य भारताला भोवत आहे. जेमिमा रॉड्रिग्जने आतापर्यंत आपली छाप पाडली आहे. तिच्याकडून भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार हरमनप्रीतकडून मोठय़ा आशा असताना तिच्या अपयशाचा भारताला फटका बसला आहे. त्यामुळे या सर्वावर भारताला लवकरात लवकरत तोडगा काढावा लागणार आहे.

२१ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.