चालू घडामोडी आणि दिनविशेष - 21 डिसेंबर 2023

Date : 21 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शैक्षणिक अभ्यासक्रमातून आता निवडणूक प्रक्रियेचे धडे… नेमके होणार काय? 
  • देशातील निवडणूक प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच जागरूक करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि भारत निवडणूक आयोग यांच्यात करार करण्यात आला असून, त्या अनुषंगाने उच्च शिक्षणातील विद्यापीठ, महाविद्यालय स्तरावर मतदार शिक्षण आणि निवडणूक साक्षरता या विषयी अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले आहेत.
  • युजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांना लोकशाही, मतदान आदी प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी अभ्यासक्रमाची निर्मिती करणे, त्यासाठीचे श्रेयांक निश्चित करणे, वयाची १७ वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा मतदार नोंदणीसाठी संस्थास्तरावरील आराखडा तयार करून एआयएसएसई आणि युडायइस संकेतस्थळाला जोडणे, संबंधित विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करणे, अध्यापनासाठी शिक्षक-प्राध्यापकांना ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने प्रशिक्षित करणे, विद्यार्थ्यांमध्ये मतदान आणि त्याबाबतचे प्रक्रियेबाबत जागरूक करण्यासाठी अभियान राबवण्यासंदर्भातील सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
  • निवडणूक प्रक्रियेमध्ये, विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, भारतीय निवडणूक आयोगाचे मोबाइल उपयोजन, बॅलेट युनिट, मतदान विभाग, नियंत्रण विभाग, पीठासीन अधिकारी, दोन मतदान अधिकारी, पोलिंग एजंट, मतदान कप्पे आदींबाबतची माहिती दिली जाईल. निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देऊन जागरूक करण्याचा उद्देश आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया समजावण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये अभिरूप निवडणूक (मॉक पोल) घेतली जाणार आहे. तसेच येत्या २५ जानेवारी रोजी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
सांगलीत शनिवार, रविवारी ३६ वे राज्य पक्षीमित्र संमेलन
  • महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या मान्यतेने आणि बर्ड साँग एज्युकेशन रिसर्च आणि पब्लिकेशन क्लब सांगलीच्या पुढाकाराने ३६  वे महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संमेलन २३ आणि २४ डिसेंबरला शांतीनिकेतन लोक विद्यापीठाच्या निसर्गरम्य प्रांगणात संपन्न होणार असून त्याला जोडूनच  २२  डिसेंबरला पक्षांची भाषा या विषयांवर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदही होणार असल्याची माहिती संमेलनाच्या आयोजन कमिटीचे अध्यक्ष शरद आपटे यांनी बुधवारी दिली. 
  • संमेलनाचे उदघाटन, पश्चिम घाट पर्यावरण आणि संरक्षक राजेंद्र केरकर यांच्या हस्ते होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ वन्यजीव अभ्यासक आणि संवर्धक माजी मानद वन्यजीव रक्षक तथा महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य अजित ऊर्फ पापा पाटील हे असणार आहेत. तर ज्येष्ठ वन्य जीव अभ्यासात बीएनएचएसचे संचालक आणि सातपुडा फाउंडेशनचे संस्थापक किशोर रिठे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सदर,संमेलनात भारती विद्यापीठाचे पर्यावरण शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक  डॉ.इरच भरूचा, फेदर लायब्ररीच्या संस्थापिका इशा मुन्शी, आयसर पुण्याचे श्रेयस माणगावे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
  • या दोन दिवसीय संमेलनात पिसे व पिसारा या प्रमुख विषयांवर सादरीकरणे, शोध निबंध, विद्यार्थ्यांचे शोध निबंध, ज्येष्ठ पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक शरद आपटे यांची मुलाखत, सहली, वृक्षदिंडी, प्रदर्शने, पुस्तक प्रकाशने अशा कार्यक्रमांची रेलचल असणार आहे. दरम्यान  २२ डिसेंबरला पक्ष्यांची भाषा या विषयावरील परिषदेत डॉक्टर एरिच भरूचा, किशोर रिठे, इशा मुन्शि, शरद आपटे मार्गदर्शन करणार आहेत.
संसदेत ‘इंडिया’चे ९३ खासदार शिल्लक; आणखी दोघांचे निलंबन
  • संसदेच्या सुरक्षाभंगप्रकरणी लोकसभेत फलक घेऊन आलेले केरळ काँग्रेस (एम)चे  सी. थॉमस आणि माकपचे ए. एम. आरिफ या आणखी दोन विरोधी खासदारांना बुधवारी निलंबित करण्यात आले. त्यामुळे संसदेतील निलंबित खासदारांची संख्या १४३ झाली असून दोन्ही सदनांमध्ये ‘इंडिया’ महाआघाडीतील फक्त ९३ खासदार उरले आहेत.
  • लोकसभेमध्ये काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे १०, तृणमूल काँग्रेसचे ९, तर द्रमुकच्या ८ खासदारांवर अद्याप तरी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. लोकसभेत ‘इंडिया’चे ४३ खासदार निलंबनमुक्त असल्याने ते अधिवेशनाच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात. मात्र, बुधवारी यापैकी एकही खासदार सभागृहामध्ये उपस्थित नव्हता.
  • राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, मनमोहन सिंग, शरद पवार, राघव चड्ढा, संजय राऊत, शिबू सोरेन, मिसा भारती, जयंत चौधरी आदी ‘इंडिया’च्या ५० खासदारांवर निलंबनाची कारवाई झालेली नाही. संसदेतील सुरक्षाभंगाच्या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी विरोधी खासदार करत होते. त्यांच्या न्याय्य मागणीला अव्हेरून १४३ खासदारांना निलंबित करण्यात आले असून ही कारवाई ताबडतोब मागे घ्यावी, अशी मागणी खरगे यांनी संसदेबाहेर केली.दोन्ही सदनांमधील बहुतांश विरोधी खासदारांना निलंबित केल्यामुळे दिवसभर सभागृहांमध्ये प्रचंड शांतता होती. विरोधी बाकांवरच नव्हे तर सत्ताधारी बाकांवरही तुरळक हजेरी होती.
JN.1 या नव्या विषाणूला घाबरण्याची गरज नाही, राज्य सरकार तयार
  • कोरोना विषाणूच्या नव्या जेएन.१ या उपप्रकाराचा प्रादुर्भाव सध्या देशभरात पसरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केरळ आणि कर्नाटक सरकारने खबरदारीचे उपाय योजले आहेतच.
  • त्याशिवाय महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्थाही अलर्ट मोडवर असल्याचे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. नव्या विषाणूचा संसर्ग झालेला एक रुग्ण महाराष्ट्रात आढळला असला तरी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असेही आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर! मोहम्मद शमीसह २६ जणांना अर्जुन पुरस्कार, सात्विक-चिरागला खेलरत्न
  • क्रीडा पुरस्कारांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतातील दोन युवा बॅडमिंटन स्टार्सची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या वर्षीचा खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. या दोघांनी जगभरात बॅडमिंटन दुहेरीत भारताचे नाव लौकिक मिळवले आहे. क्रीडा मंत्रालयाने या सर्व नावांना दुजोरा दिला आहे.
  • जानेवारीमध्ये सर्व खेळाडूंचा गौरव करण्यात येणार असून त्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादरम्यान हे क्रीडा पुरस्कार दिले जातील. खेळाडूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानित करण्यात येणार्‍या खेळाडूंची निवड त्यांच्या त्या वर्षातील कामगिरीच्या आधारे केली जाते. क्रीडा विभाग त्याच्या नावाची शिफारस करतो. अर्जुन पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांच्या यादीत लांब उडीपटू श्रीशंकर, स्टार पॅरा अॅथलीट शीतल देवी, स्टार महिला हॉकीपटू सुशीला चानू यांच्यासह २६ खेळाडूंचा समावेश आहे.
  • क्रीडा मंत्रालयाच्या माहितीनुसार, विविध समित्यांच्या शिफारशींच्या आधारे आणि सखोल तपासणीनंतर सरकारने या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. मंत्रालयाने सन्मानित करण्यात येणार्‍या खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची यादीही प्रसिद्ध केली आहे.

 

‘या’ घटना ठरल्या महिलांसाठी लक्षणीय : 
  • Best Decision for women in 2022 Flashback २०२२ मधील काही महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे महिलांची उमेद तर वाढली आहेच शिवाय आजवर पुरूषप्रधान समजल्या गेलेल्या क्षेत्रांचे दालनही त्यांच्यासाठी याच वर्षात खुले झाले आहे. वर्षभरात झालेले हे सकारात्मक बदल पुढल्या पिढ्यांसाठी नक्कीच ऐतिहासिक आणि संस्मरणीय असणार आहेत. हे बदल घडावेत यासाठी आजवर कित्येक महिलांनी अनेक पातळ्यांवर आपापल्यापरीने संघर्ष केला. देशामध्ये समता केवळ तात्त्विक पातळीवर न राहता त्याचा मुक्त मनाने स्वीकार व्हावा, त्याची अमलबजावणी व्हावी यासाठी महिलांनी आपले लढे सुरू ठेवले आणि हे सकारात्मक निर्णय म्हणजे त्या संघर्षाची फलश्रुती आहे, असे म्हणता येईल.

  • स्त्री ही अपत्याची एकमेव नैसर्गिक पालक असल्याने त्या मातेला अपत्याचे आडनाव ठरविण्याचा कायदेशीर अधिकार आणि स्वातंत्र्य देणारा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने जुलै २०२२ मध्ये दिला. तर २० ते २४ आठवडे गर्भार असलेल्या महिलेला सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार सप्टेंबर २०२२ मध्ये मिळाला. त्यासंदर्भातील निवाडा देताना सर्वोच्च न्यायालय म्हणते की, गर्भ धारण करणारी महिला विवाहित आहे वा नाही याहीपेक्षा तिला हा गर्भ ठेवण्याची इच्छा आहे अथवा नाही, हे महत्त्वाचे आहे. गर्भाची वाढ स्त्रीच्या पोटी होत असल्याने त्यासंबंधीचा निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य तिला असल्याचे स्पष्ट मत न्यायालयाने याप्रसंगी व्यक्त केले.

  • वैवाहिक बलात्काराला गुन्ह्याचा दर्जा दिला जावा यासाठी भारतीय महिला अजूनही संघर्ष करत आहेत. या पार्श्वभूमीवर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एका निवाड्यादरम्यान केलेल्या विधानामुळे महिलांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खंडपीठासमोर एका अविवाहित महिलेने गर्भपाताच्या परवानगीसाठी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सुरू होती. गर्भधारणेला २० ते २४ आठवडे उलटून गेल्यानंतर तिने ही याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भातील सुनावणीमधे न्यायालयाने महिलांवर अनेकदा त्यांच्या जोडीदाराकडूनच लैंगिक अत्याचार केले जातात आणि त्यामुळे गर्भधारणा होते, असे म्हणत वैवाहिक बलात्कार हा बलात्कारच आहे, हे स्पष्ट केले. बलात्काराच्या व्याख्येमध्ये यापुढे वैवाहिक बलात्काराचाही समावेश होईल, असे महत्त्वपूर्ण विधान न्यायालयाने केले. देशातील महिला विवाहित असो वा अविवाहित, ती सुरक्षित आणि कायदेशीर पद्धतीने गर्भपात करू शकते, असा निर्णय न्यायालयाने दिला.

मराठी वंशीय लिओ वराडकर आयर्लंडचे दुसऱ्यांदा पंतप्रधान… काय आहे हे व्यक्तिमत्त्व : 
  • आयर्लंडच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या लिओ वराडकर यांची पुन्हा निवड झाली आहे. मूळचे कोकणातील असलेल्या वराडकर यांनी २०१७मध्ये आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर २०२०च्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. मात्र अडीच वर्षांनंतर वराडकर पुन्हा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवडून आले आहेत. वराडकर यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांना आलेले यश यांचा धांडोळा.

  • लिओ वराडकर यांची पंतप्रधानपदी निवड कशी - आयर्लंडमध्ये ताओइसेच हे पद महत्त्वाचे मानले जाते. ताओइसेच हा पंतप्रधानपदासाठीचा आयरिश शब्द आहे. ४३ वर्षीय वराडकर यांचा ‘फाइन गाएल’ हा पक्ष आणि मायकल मार्टिन यांचा ‘फियाना फेल’ या पक्षांत परस्परसामंजस्याने सत्तेचे आवर्तन झाले आहे. २०२०च्या निवडणुकीत आयर्लंडमधील ग्रीन्स पक्षासह या दोन्ही पक्षांनी आघाडी केली. त्यांच्यातील समझोत्यानुसार पंतप्रधानपदाची सूत्रे आलटून- पालटून येतात. २०१७ मध्ये फाइन गाएल पक्षाची सूत्रे हाती घेतलेल्या वराडकर यांना पंतप्रधानपद मिळाले. एक नवीन आणि आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले.

  • आयर्लंडच्या इतिहासात सर्वात तरुण पंतप्रधान असलेल्या वराडकर यांना २०२० मध्ये पंतप्रधानपद गमवावे लागले. २०२०च्या आघाडीच्य अटीनुसार फियाना फेलचे मायकल मार्टिन यांना पंतप्रधानपद मिळाले, वराडकर यांना उपपंतप्रधानपद मिळाले. अडीच वर्षांनंतर अटीनुसार पुन्हा पंतप्रधानपदी लिओ वराडकर विराजमान झाले.

अखेरच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा विजय : 
  • अ‍ॅशले गार्डनरची (३२ चेंडूंत नाबाद ६६ आणि २० धावांत २ बळी) अष्टपैलू कामगिरी आणि हिदर ग्रॅहमच्या (८ धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने मालिकेतील अखेरच्या पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ५४ धावांनी पराभव केला. या विजयाने ऑस्ट्रेलिया महिला संघाने मालिका ४-१ अशी जिंकली. अ‍ॅशले गार्डनर सामन्यासह मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.

  • प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची स्थिती १० षटकांत ४ बाद ६७ अशी बिकट झाली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही. गार्डनर आणि हॅरिस जोडीने पाचव्या गडय़ासाठी नाबाद १२९ धावांची भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत ४ बाद १९६ अशी भक्कम मजल मारून दिली. गार्डनरने आपल्या खेळीत ११ चौकार, तर हॅरिस ३५ चेंडूत सहा चौकार, चार षटकारांसह ६४ धावा करून नाबाद राहिली.

  • आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचे गडी ठराविक अंतराने गडी बाद झाले. दीप्ती शर्माची ३४ चेंडूतील ५३ धावांची खेळी हाच काय तो भारताला मिळालेला दिलासा होता. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात अखेरचा बदल म्हणून संधी मिळालेल्या हिदर ग्रॅहमने चमकदार कामगिरी करत भारताचा डाव अखेरच्या चेंडूवर १४२ धावांत संपुष्टात आला.

एलॉन मस्क ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा देणार; स्वत:च केलं जाहीर, पण घातली ‘ही’ अट; ट्वीट व्हायरल : 
  • गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर कंपनीचे कार्यकारी अधिकारी अर्थात CEO एलॉन मस्क यांनी घेतलेल्या एका पोलची जोरदार चर्चा आहे. या पोलमध्ये एलॉन मस्क यांनी आपण ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हावं का? असा प्रश्न विचारला होता. त्यापुढे एक पाऊल जात जो काही निर्णय नेटिझन्स या पोलमधून देतील, तो मला मान्य असेल, असंही मस्क यांनी म्हटलं होतं. जवळपास ५७.५ टक्के ट्विटर युजर्सनं यावर ‘हो’चा कौल दिला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे आता एलॉन मस्क खरंच सीईओपदावरून पायउतार होणार का? अशी चर्चा सुरू झालेली असतानाच मस्क यांनी मोठं विधान केलं आहे. यासंदर्भात त्यांनी केलेलं ट्वीट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमका काय होता हा पोल?

  • एलॉन मस्क यांनी दोन दिवसांपूर्वी, अर्थात १९ डिसेंबर रोजी एलॉन मस्क यांनी एक पोल ट्विटरवर सुरू केला होता. अशा प्रकारचे पोल मस्क यांनी याआधीही अनेकदा घेतले आहेत. त्या त्या वेळी आलेल्या निकालांवर मस्क यांनी लगेच किंवा कालांतराने अंमलबजावणीही केली आहे. त्यामुळेच या पोलवर जोरदार चर्चा सुरू झाली होती. कारण या पोलमध्ये मस्क यांनी आपण पायउतार व्हावं का? असा प्रश्न विचारला होता. “मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हायला हवं का? या पोलचा येणारा निकाल मला मान्य असेल, मी तो पाळेन”, असं एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

  • कदाचित एलॉन मस्क यांच्याही अपेक्षेच्या उलट जाऊन ट्विटर युजर्सनं कौल दिला. तब्बल ५७.५ टक्के युजर्सनं पदावरून पायउतार होण्याच्या बाजूने मत दिलं. त्यामुळे हे निकाल मान्य करून एलॉन मस्क पदावरून पायउतार होतील का? अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली. त्यावर काल दिवसभर मस्क यांच्याकडून कोणतंही ट्वीट करण्यात आलं नाही. अखेर आज भारतीय वेळेनुसार सकाळी सातच्या सुमारास मस्क यांनी ट्वीट करत सूचक विधान केलं आहे.

  • “ट्विटरच्या CEO पदाची जबाबदारी घेणारी कुणी मूर्ख व्यक्ती मला सापडली, की मी लगेच या पदावरून पायउतार होईन. त्यानंतर मी कंपनीच्या सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमचं काम पाहीन”, असं मस्क यांनी म्हटलं आहे. आता मस्क यांच्या या ट्वीटचा नेमका अर्थ काय? याची चर्चा सुरू झाली आहे. याचा अर्थ एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा मिश्किलपणे युजर्सचा कौल उडवून लावला की भावी वाटचालीसंदर्भात संकेत दिलेत, यावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

चीनमधील करोनाच्या उद्रेकामुळे भारत सावध; नमुन्यांचे ‘जनुकीय क्रमनिर्धारण’ वाढविण्याची केंद्राची राज्यांना सूचना : 
  • चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणुतील नव्या उत्परिवर्तनाची माहिती मिळवण्यासाठी दैनंदिन करोना चाचण्यांत आढळलेल्या नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याची सूचना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने मंगळवारी केली.

  • याबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की असे र्सवकष जनुकीय क्रमनिर्धारण केल्यास देशात उत्परिवर्तित करोना विषाणूंच्या नवीन प्रकारांचा वेळेवर मागोवा व शोध घेणे शक्य होईल. सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी विषाणूचा प्रतिबंध करणे आवश्यक असून त्यासाठी उपाययोजना करणे सोपे जाईल. या पत्रात भूषण यांनी अधोरेखित केले, की विषाणू चाचणी, करोना प्रकरणांचा मागोवा, उपचार, लसीकरण व कोविड प्रतिबंधक वर्तन या पाच स्तरांवर धोरणात भर देण्यात येणार आहे. देशात सध्या आठवडाभरात १२०० रुग्ण आढळत आहेत. अजूनही जगभरात कोविड-१९ चे आव्हान कायम आहे. कारण जगभरात अजूनही ३५ लाख रुग्णांची दर आठवडय़ाला नोंद होत आहे.

  • या वर्षी जूनमध्ये आरोग्य मंत्रालयाने निश्चित केलेल्या करोना प्रतिबंधक वर्तणुकीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ या पत्रात देण्यात आला असून, या विषाणूंच्या नवीन उत्परिवर्तित प्रकारांचा प्रादुर्भाव शोधण्यासाठी संशयित व बाधित प्रकरणांचा लवकर मागोवा, विलगीकरण, चाचणी आणि वेळेवर उपचारांचे व्यवस्थापन आवश्यक आहे. या संदर्भात सध्या जागतिक परिस्थितीचे निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

  • आज आढावा बैठक जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी महत्त्वाची बैठक बोलाविली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता आरोग्य मंत्री अन्य देशांमधील करोनाची स्थिती आणि साथ रोखण्यासाठी भारताने केलेल्या तयारीचा आढावा घेतील, अशी माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.


चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ डिसेंबर २०२१

 

मोदी सरकारचा मोठा निर्णय… Anti-India ठपका ठेवत २० YouTube Channels वर घातली बंदी :
  • भारताने सोमवारी २० युट्यूब चॅनेल्स आणि दोन वेबसाईटवर बंदी घातली आहे. भारतविरोधी प्रचार करणारी ही चॅनेल्स आणि वेबसाईट्स पाकिस्तानमधून हाताळल्या जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुधारित माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील बदलांनुसार हा बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचं इकॉनमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

  • माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी यूट्यूब आणि टेलिकॉम विभागाला पाठवलेल्या पत्रामध्ये देशाच्या एकतेला आणि सर्वभौमत्वाला धोका पोहचवणारा कंटेंट आणि अशा माध्यमांना तातडीने ब्लॉक करण्यात यावं असे आदेश दिले होते. या प्रकरणाशीसंबधित सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हा खुलासा केला आहे.

  • पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या सहकार्याने इंटरनेटवरुन भारताविरोधी प्रचारकी साहित्याचं प्रसारण केलं जात होतं. अशापद्धतीने चुकीची माहिती पसरवणाऱ्या गटांपैकी एका गटाचं नाव ‘नया पाकिस्तान’ असं असल्याचं माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. या युट्यूब चॅनेलला दोन मिलियन सबस्क्रायबर आहेत. काश्मीर, शेतकरी आंदोलन, अयोध्या प्रकरण यासारख्या गोष्टींबद्दल या चॅनेलवरुन खोटी माहिती दिली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. हेच कारण देत या चॅनेलवर बंदी घालण्याचे आदेश जारी करण्यात आलेत.

प्रदीप कुमार रावत भारताचे चीनमधील नवे राजदूत :
  • ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी प्रदीप कुमार रावत यांची भारताचे चीनमधील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते विक्रम मिस्री यांची जागा घेणार आहेत.

  • भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) १९९० सालच्या तुकडीचे अधिकारी असलेले रावत हे सध्या नेदरलॅण्ड्समध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत. ‘ते नव्या नियुक्तीची सूत्रे लवकरच स्वीकारतील,’ असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका संक्षिप्त निवेदनात सांगितले.

  • पूर्व लडाखच्या सीमेवरील तिढा रेंगाळत असतानाच रावत यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी हाँगकाँग व बीजिंगमध्ये काम केलेले आहे. सप्टेंबर २०१७ ते डिसेंबर २०२० या काळात ते इंडोनेशिया व तिमोर-लेस्ते या देशांमध्ये भारताचे राजदूत होते. ते चीनमधील मँडरीन भाषा अस्खलितपणे बोलू शकतात.

WHO म्हणतंय, “Omicron वेगाने पसरतोय, लसीकरण पूर्ण झालेल्यांबरोबरच करोना होऊन गेलेल्यांना :
  • करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव डेल्टापेक्षा अधिक वेगाने होत असल्याची माहिती सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिली आहे. इतकच नाही तर लसीकरण पूर्ण झालेल्या किंवा यापूर्वी करोना होऊन गेलेल्यांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

  • डब्ल्यूएओचे महानिर्देशक ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी जिनेवामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सध्याच्या करोना परिस्थितीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रेडोस यांनी, “आता समोर आलेल्या पुराव्यांनुसार करोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत फारच वेगाने पसरत आहे,” असं म्हटलंय.

  • ट्रेडोस यांनी करोना प्रतिबंधक लसीचे सर्व डोस घेतलेल्यांना किंवा यापूर्वी करोनावर मात केलेल्यांमध्येही या नवीन विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केलीय. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगामधील ८९ देशांमध्ये करोनाच्या या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केलाय.

  • कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका असणाऱ्या भागांमध्ये रुग्णसंख्या दीड ते तीन दिवसांमध्ये दुप्पटीने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये मोठ्याप्रमाणात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होत आहे.

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांचे निधन :
  • अभ्यासू कलाशिक्षक, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत दत्तात्रय जोशी(वय-७७) यांचे आज (सोमवार) ब्रेन हॅमरेजने निधन झाले.

  • १७ डिसेंबरपासून शाहू स्मारक भवन येथे सुमित्रा भावे स्मृती महोत्सव सुरु झाला. दुसर्‍या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचे आज निधन झाले.

  • कोल्हापूरातील कला क्षेत्राबरोबरच चित्रपट क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान होते. नाना पाटेकर आणि स्मिता पाटील अभिनीत सूत्रधार या हिंदी चित्रपटापासून त्यांनी आपल्या दिग्दर्शकीय कारकिर्दीस सुरूवात केली. टक्कर, निर्मला मच्छिंद्र कांबळी, जगज्जनी श्री महालक्ष्मी असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. आकाशवाणीवर अनेक कार्यक्रमांंच्या संहितांचे लेखन केले.

  • जीवनसंध्या दृष्ट यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. येथील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राचे ते संचालक होते. येथे झालेल्या ६३ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते.

२१ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.