चालू घडामोडी आणि दिनविशेष - 21 एप्रिल 2023

Date : 21 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एमबीए, एमएमएस सीईटी आता 6 मे रोजी; पुनर्परीक्षेसाठी 13 हजार 271 विद्यार्थ्यांची नोंदणी
  • व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए, एमएमएस) अभ्यासक्रमाच्या पुनर्परीक्षेसाठी १३ हजार २७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ३० एप्रिलला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ घेतली जाणार असल्याने एमबीए, एमएमएस सीईटी आता ३० एप्रिलऐवजी ६ मे रोजी घेतली जाणार आहे.
  • एमबीए, एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) २५ आणि २६ मार्च रोजी राज्य सीईटी सेलमार्फत राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने राज्यातील १९१ केंद्रांवर घेण्यात आली. मात्र तांत्रिक कारणामुळे काही विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्याने यंत्रणाच बंद पडली होती. तर काही ठिकाणी सर्व्हरला अडचणी आल्याने विद्यार्थ्यांना सीईटी देता आली नाही. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी जोर धरू लागली.
  • विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन राज्य सीईटी सेलने चौकशी समिती स्थापन केली. चौकशी समितीच्या अहवालानुसार तांत्रिक अडचणींमुळे सीईटी देता न आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी देण्यासाठी पुनर्परीक्षेची घोषणा करण्यात आली. संबंधित विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी ११ एप्रिलची मुदत देण्यात आली. त्यानुसार १३ हजार २७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
  • एमबीए, एमएमएस सीईटी ३० एप्रिलला घेण्यात येणार होती. मात्र ३० एप्रिलला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ घेतली जाणार असल्याने एमबीए, एमएमएस सीईटी आता ३० एप्रिलऐवजी ६ मे रोजी सकाळी नऊ ते साडेअकरा या वेळेत घेतली जाणार असल्याची माहिती सीईटी सेलने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील वस्तुस्थिती तपासण्यासाठी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
  • डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी ( १६ एप्रिल ) ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारमधील मंत्री उपस्थित होते. पण, या कार्यक्रमाला गालबोट लागलं.
  • खारघर येथील मैदानावर झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमाला धर्मधिकारी यांचे लाखो अनुयायी दाखल झाले होते. दुपारी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी तापमान ४२ अंश सेल्सियस होते. त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरु होते.
  • पण, उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा विरोधी पक्षाने केला होता. त्यापार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्यासाठी एकसदस्यीय समिती राज्य सरकारने नियुक्त केली आहे.
  • महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती असेल. एक महिन्याच्या आत ही समिती आपला अहवाल सादर करेल. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाबद्दल कोणत्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे, याबाबतही ही समिती सरकारला शिफारस करणार आहे.
ट्विटरने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सचिन तेंडुलकर यांच्यासह ‘या’ मोठ्या कलाकारांचे ‘Blue Tick’ हटवले
  • मायक्रोब्लॉगिंग साईट असणाऱ्या Twitter ने सर्व वापरकर्ते आणि संस्थांच्या अकाऊंटवरून लीगसी व्हेइरिफिकेशन Blue Tick हटवली आहे. आता फक्त ‘ट्विटर ब्लू’ साठी पेड सब्स्क्रिप्शन घेणाऱ्याच वापरकर्त्यांना त्यांच्या प्रोफाईलवर व्हेरिफिकेशन ‘ब्लू टिक’ मार्क यापुढे दिसणार आहे. मात्र हे पाऊल ट्विटरने अचानकपणे घेतलेले नाही. या आधी याबद्दल ट्विटरकडून वापरकर्त्यांना सूचना देण्यात येत होत्या. ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतले नसेल त्यांच्या प्रोफाईलवर ब्लू टीक दिसणार नाही.
  • ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ब्लू टिक हटवण्यासंदर्भात अंतिम तारीख देखील काही दिवसांपूर्वी ट्विट करत सांगितली होती. २० एप्रिल पासून म्हणजेच आजपासून ब्लू टिक हटवली जाणार आहे. त्याप्रमाणे ट्विटरने आजपासून ब्लू टिक हटवली आहे. ट्विटरने हटवलेल्या ब्लू टिक मध्ये अनेक मोठे राजकारणी आणि बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. ज्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ब्लू टिक हटवण्यात आली आहे.

ब्लू टिकसाठी किती पैसे मोजावे लागणार ?

  • Twitter Blue ची किंमत ही प्रत्येक ठिकाणानुसार बदलत असते आणि तुम्ही कसे साइन अप करता यावर अवलंबून असते. भारतातातील वेब वापरकर्त्यांना ट्विटर ब्लू साठी दर महिन्याला ६५० रुपये आणि Android आणि iOS वापरकर्त्यांना दर महिन्याला ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. ट्विटरच्या या निर्णयामुळे प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार, सरकारी अधिकारी आणि सामान्य लोकांना यापूर्वी मोफत ब्लु टिक मिळत होती त्यासाठी त्यांना आता पैसे मोजावे लागणार आहेत.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर
  • पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो यांचे पुत्र बिलावल भुत्तो पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) बैठक ४ आणि ५ मे रोजी होत आहे. त्यामध्ये बिलावल सहभागी होतील, अशी घोषणा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी केली. बिलावल यांच्या भारतभेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान चर्चा नव्याने सुरू होण्यास संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

  • गोव्यामध्ये ४ आणि ५ मे रोजी होणाऱ्या एससीओच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमध्ये बिलावल भुत्तो पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज बलुच यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे बिघडले आहेत. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत बालाकोटमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळावर हल्ला केला. केंद्र सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर हे संबंध अधिक बिघडले. या पार्श्वभूमीवर बिलावल भुत्तो यांची भेट द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. 

तुरळक उच्चपदस्थ भेटी

  • २०११ – पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खर यांची भारताला भेट

  • २०१४ – पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थिती

  • २०१५ – तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची पाकिस्तानला भेट

  • २०१५ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानला भेट


 

देशात जानेवारीनंतर करोनाची ‘आर-व्हॅल्यू’ १ हून अधिक :
  • करोना महासाथीच्या तिसऱ्या लाटेनंतर भारताची कोविड-१९ साठी प्रभावी पुनरुत्पादन संख्या (आर-व्हॅल्यू) जानेवारीनंतर प्रथमच १ पेक्षा जास्त झाली आहे. लोकसंख्येत करोनाचा फैलाव किती झपाटय़ाने होत आहे, याची ‘आर-व्हॅल्यू’ ही निदर्शक आहे.

  •  गेल्या काही आठवडय़ांत स्थिर वाढ झालेली आर-व्हॅल्यू १२ ते १८ एप्रिल या कालावधीत १.०७ होती, असे चेन्नईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमधील संशोधक सिताभ्रा सिन्हा यांनी सांगितले.  यापूर्वीच्या आठवडय़ात ती ०.९३ इतकी होती.

  • करोनाचा संसर्ग झालेली प्रत्येक व्यक्ती हा संसर्ग सरासरी किमान एका व्यक्तीपर्यंत पसरवत आहे, असे दर्शवणारी आर-व्हॅल्यू १ हा ‘उंबरठा’ असून यानंतर संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. सिन्हा म्हणाले, ‘ही लाट असेल का हे आताच सांगता येणार नाही. गेल्या ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये आर-व्हॅल्यू १ पेक्षा अधिक होती, परंतु तिला लाट म्हणता आले नाही. १ पेक्षा अधिकची आर-व्हॅल्यू म्हणजे लाट आहे असे म्हणता येत नाही, मात्र  १० दिवसांत संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत.’

उपचारांसाठी भारतात येणाऱ्यांना मिळणार आयुष व्हिसा; पारंपारिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांची मोठी घोषणा :
  • परदेशी नागरिकांसाठी लवकरच विशेष आयुष व्हिसा सुरू करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. याच्या मदतीने भारताबाहेर राहणारे लोक येथे येऊन पारंपारिक औषधांनी उपचार घेऊ शकतील. गांधीनगरमध्ये जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, आयुष हॉलमार्क लवकरच लॉन्च केला जाईल, जेणेकरून भारतात बनवलेल्या उत्कृष्ट दर्जाची आयुष उत्पादने सहज ओळखता येतील. शेतकऱ्यांना औषधी वनस्पती वाढवण्यासाठी आणि बाजारात विकण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ई-मार्केटप्लेसच्या विस्ताराबाबतही पंतप्रधान मोदींनी भाष्य केले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारतात पारंपारिक उपचार घेण्यासाठी येणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी लवकरच विशेष आयुष व्हिसा दिला जईल असं जाहीर केलं. “आयुष थेरपीचा लाभ घेण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी भारत लवकरच एक विशेष आयुष व्हिसा श्रेणी सुरू करणार आहे,” असं मोदी म्हणाले.

  • “आयुषच्या क्षेत्रात गुंतवणुकीच्या आणि नवे उपक्रम राबवण्याच्या शक्यता अमर्याद आहेत. आम्ही आधीच आयुष औषधे, पूरक आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनात अभूतपूर्व वाढ पाहत आहोत. आम्ही एक खास आयुष हॉलमार्क बनवणार आहोत. हा हॉलमार्क भारतात उत्पादन करण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांना लागू केला जाईल,” असंही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

  • जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ, केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे गांधीनगरमध्ये आयुष गुंतवणूक शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.

पाकिस्तानातील महिला विद्यापीठाची विद्यार्थिनींना स्मार्टफोन वापरण्यास बंदी :
  • पाकिस्तानातील पुराणमतवादी अशा वायव्य प्रांतातील एका महिला विद्यापीठाने विद्यार्थिनींना शैक्षणिक परिसरात स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातली आहे.

  •  महिला विद्यापीठ स्वाबी हे खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात आहे. तालिबानी दहशतवादी या भागात सक्रिय असून ते अधुनमधून मुलींच्या शाळांना लक्ष्य करत असतात.

  •  ‘२० एप्रिलपासून महिला विद्यापीठ स्वाबीच्या परिसरात स्मार्टफोन/ टचस्क्रीन मोबाइल किंवा टॅबलेट वापरण्याची मुभा राहणार नाही,’ अशी अधिसूचना विद्यापीठाच्या प्रमुखांनी जारी केल्याचे वृत्त समा टीव्हीने दिले.

  • ‘विद्यापीठ असतानाच्या वेळेत विद्यार्थी समाजमाध्यम अ‍ॅप्सचा अतोनात वापर करतात असे आढळून आले आहे. यामुळे त्यांचे शिक्षण, वर्तणूक व कामगिरी यांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे, विद्यापीठाच्या वेळेत विद्यार्थ्यांनी मोबाइल फोन वावरू नये असे निर्देश देण्यात येत आहेत,’ असे अधिसूचनेत नमूद केले आहे. या सूचनेचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येऊन त्यांना ५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. खैबर पख्तुन्ख्वा प्रांतातील विद्यापीठे विद्यार्थिनींवर नेहमीच ड्रेस कोड व केशरचनेसह अनेक कठोर निर्बंध लागू करतात. त्यांनी विद्यार्थिनींना सलवार कमीज हा पोशाख बंधनकारक केला आहे.

‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या दणक्याने युद्धनौकेची झालेली अवस्था बघा, क्षेपणास्त्रामध्ये स्फोटके असती तर :
  • ‘ब्रह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्राच्या ( Brahmos Cruise Missile ) दणक्याने नुकसान झालेल्या युद्धनौकेचे फोटो समोर आले आहेत. काल आयएनएस दिल्ली ( INS Delhi ) या युद्धनौकेवरुन ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. भारतीय नौदलातील ( Indian Navy ) एका निवृत्त झालेल्या युद्धनौकेला यानिमित्ताने लक्ष्य करण्यात आले.

  • तब्बल तीन हजार किलोमीटर प्रति तास एवढ्या प्रचंड वेगाने ब्रह्मोस क्षेपणास्त्र युद्धनौकेवर आदळले. जमिनीवरुन हवेत मारा करत हवेतून येणारे लक्ष्य भेदणाऱ्या संरक्षण प्रणालीला अशा वेगवान ब्रह्मोसचा वेध घेणे हे अत्यंत अवघड असल्याचं ब्रह्मोसची निर्मिती करणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे या ब्रह्मोस क्षेपणास्त्रावर स्फोटकं नव्हती. नुसतं वेगाने आदळल्यानेच युद्धनौकेला भगडाद पडले आणि त्यानंतर युद्धनौका बुडाली. जर क्षेपणास्त्रावर स्फोटकं असती तर युद्धनौकेचा स्फोट होत आणि तिचे मोठे नुकसान झाले असते आणि युद्धनौका काही मिनिटातच बुडाली असती.

  • ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे आधीच नौदलाच्या विविध युद्धनौकांवर तैनात करण्यात आलं आहे. रजपुत, तलवार, शिवलिक, कोलकता, विशाखापट्टणम, निलगिरी अशा युद्धनौकांवर हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात आहे. तर नुकतंच दिल्ली वर्गातील युद्धनौकांवर ब्रह्मोस ही क्षेपणास्त्र प्रणाली बसवण्यात आली आहे, या वर्गातील आयएनएस दिल्ली युद्धनौकेवरुन काल चाचणी घेण्यात आली होती.

  • अशा चाचण्या या युद्धनौकेच्या सरावाचा एक भाग असतात. यामुळे क्षेपणास्त्र हाताळण्याचा, वापरण्याचा, युद्धकालिन परिस्थितीला समोरे जाण्याचा नौसेनिकांना अनुभव मिळतोच पण त्याचबरोबर क्षेपणास्त्रांची गुणवत्ता सुद्धा तपासून बघितली जाते. ध्वनीच्या तीनपटे वेगाने ३०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरचा लक्ष्यभेद करण्याची ब्रह्मोस क्षेपणास्त्राची क्षमता आहे. यामुळे युद्धनौकांच्या मारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

किरॉन पोलार्डची निवृत्ती :
  • वेस्ट इंडिजच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारांचा कर्णधार किरॉन पोलार्डने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पण, जगभरातील ट्वेन्टी-२० आणि टेन-१० लीगमध्ये तो खेळत राहणार आहे.

  • २००७मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण करणाऱ्या ३४ वर्षीय पोलार्डने आपली शेवटची मालिका भारताविरुद्ध खेळली होती. ‘आयपीएल’मध्ये तो बरीच वर्षे मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. ‘‘पूर्णत: विचाराअंती मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

  • १०व्या वर्षांपासून विंडीजकडून खेळण्याचे माझे स्वप्न होते. ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी १५ वर्षांहून अधिक काळ खेळलो,’’ असे पोलार्डने ‘इंस्टाग्राम’वर म्हटले आहे. त्याने १२३ एकदिवसीय सामन्यांत २,७०६ धावा केल्या व ५५ बळी मिळवले. तर, १०१ ट्वेन्टी-२० सामन्यांत १,५६९ धावांसह ४४ बळी घेतले आहेत.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या :
  • राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील बदल्यांना आणि बढत्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. गृह मंत्रालयाने बुधवारी  या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नवीन नियुक्त्यांचे आदेश जारी केले आहेत.

  • मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुख सहआयुक्त मििलद भारंबे यांच्या खांद्यावर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी देत विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर भारंबे यांच्या जागी सुहास वारके हे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

  • धडक कारवाई आणि निर्णयांमुळे सध्या राज्यात चर्चेत असलेले नाशिक शहरचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची राज्य पोलिसांच्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर व्हीआयपी सुरक्षा विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांना बढती देऊन नाशिक शहर पोलीस उपायुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

  • पुणे शहराचे सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची राज्य मानवी हक्क आयोग येथे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करत मुंबई पोलीस दलातील पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना बढती देत पुणे शहर सहआयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. ठाणे शहराचे सहआयुक्त सुरेशकुमार मेकला यांची गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

२१ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.