चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ एप्रिल २०२१

Date : 21 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकी नागरिकांना भारतात येण्यास मज्जाव :
  • भारतात करोना विषाणूची दुसरी लाट चालू असून नागरिकांनी त्या देशात जाऊ नये, असे आवाहन अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना केले आहे. सेंटर फॉर डिसीज अँड कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैज्ञानिक माहितीवर आधारित प्रवास सूचना अमेरिकेत वेळोवेळी जारी करण्यात येत असतात. त्यानुसार सध्या भारतात करोनाची दुसरी लाट सुरू असून तेथे लोकांनी प्रवास करू नये, असे म्हटले आहे.

  • सीडीसीने कोविड १९ साथीबाबत भारतात प्रवेश करू नये यासाठी चार क्रमांकाचा इशारा जारी केला असून भारतात करोना विषाणूची लाट गंभीर असल्याचे म्हटले आहे. सोमवारी सीडीसीने म्हटले आहे की, कोविड १९ साथरोग हा मानवतेला मोठा धोका असून त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, त्यामुळे कुणीही भारतात प्रवास करू नये. 

  • लस घेतली असलेल्या लोकांनाही भारतात  जाऊ नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. भारतात प्रवास करणे अगदीच अनिवार्य असेल तर लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे.

“राज्यांनी लॉकडाउनकडे अंतिम पर्याय म्हणूनच पाहावं” :
  • देशात करोनाची रुग्णसंख्या आणि त्यापाठोपाठ करोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना धीर देतानाच करोनासाठी देश पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी देखील माहिती दिली.

  • “सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचं कौतुक करतो. तुम्ही करोनाच्या पहिल्या लाटेत देखील आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाचवलं होतं. आज तुम्ही पुन्हा या संकटात दिवस-रात्र मेहनत घेत आहात. कठिणात कठीण परिस्थितीत आपण धीर सोडता कामा नये. आपण योग्य दिशेने निर्णय घेतला तरच आपल्याला विजय मिळू शकेल”, असं मोदी यावेळी म्हणाले.

  • “आजच्या स्थितीत आपल्याला देशाला लॉकडाउनपासून वाचवायचं आहे. राज्यांनी देखील लॉकडाउनला अंतिम पर्याय म्हणून पाहावं. लॉकडाउनपासून वाचण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण आर्थव्यवस्थेसोबतच देशवासीयांच्या आरोग्याती देखील काळजी घेऊया”, असं मोदी यावेळी म्हणाले.

इयान नेपोमनियाची आघाडीवर :
  • जवळपास १३ महिन्यांच्या कालावधीनंतर फिडे कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेला (जगज्जेत्यासाठीचा आव्हानवीर) रशियातील येकातेरिनबर्ग येथे प्रारंभ झाला असून नवव्या फेरीअखेर रशियाच्या इयान नेपोमनियाची याने ५.५ गुणांसह आघाडी घेतली आहे.

  • नेपोमनियाची याने आपल्याच देशाच्या अलेक्झांडर ग्रिशूकविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. आठव्या फेरीत मॅक्सिम वचिएर-लॅग्रेव्हवर थरारक विजय मिळवणाऱ्या अमेरिकेच्या फॅबियानो करुआना याने किरील अलेकसेंको याला बरोबरीत रोखले. या कामगिरीमुळे करुआना पाच गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. नेदरलँड्सच्या अनिश गिरीने चीनच्या वँग हाओविरुद्धचा डाव जिंकत पाच गुणांसह तिसरे स्थान प्राप्त केले आहे.

  • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी मॅग्नस कार्लसनचा आव्हानवीर निवडण्यासाठी खेळवण्यात येणारी ही स्पर्धा गेल्या वर्षी मार्च महिन्यात थांबवण्यात आली होती. करोनाच्या पहिल्या लाटेमुळे अर्धवट स्थितीत असलेली ही स्पर्धा आता सुरू झाली असून २७ एप्रिलपर्यंत १४ फेऱ्या रंगणार आहेत.

१८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण; योगी सरकारचा निर्णय :
  • १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यास केंद्राने परवानगी आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करोना पॉझिटिव्ह आढळले असून सध्या विलगीकरणात आहेत.

  • उत्तर प्रदेशात वीकेण्ड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाउन असेल. तसंच नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींना परवानगी नाही.

  • योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, “मंत्रिमंडळ बैठकीत उत्तर प्रदेशातील १८ वर्षाच्या पुढील सर्वांना करोना लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचा पराभव होईल आणि भारत जिंकेल”.

२१ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.