चालू घडामोडी आणि दिनविशेष - 20 ऑक्टोबर 2023

Date : 20 October, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विराटला वाईड बॉल न देण्याचा अम्पायरचा निर्णय योग्य होता की अयोग्य? चॅटजीपीटीनं सांगितला ‘हा’ नियम!
  • वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या चर्चेसाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. पहिली म्हणजे २००७ मध्ये बांगलादेशनं साखळी सामन्यात भारताचा पराभव करून भारताचं वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आणलं होतं. त्याचं उट्टं आता भारतानं काढल्याचं नेटिझन्स म्हणत आहेत. दुसरं म्हणजे या सामन्यातील विजयामुळे भारताची विजयी घोडदौड कायम राहिली आहे. तिसरं म्हणजे विराट कोहलीनं कारकिर्दीतलं ४८वं एकदिवसीय व वर्ल्डकपमधलं धावांचा पाठलाग करतानाचं पहिलं शतक साजरं केलं. पण या सगळ्याहून जास्त चर्चा आहे ती म्हणजे अम्पायर रिचर्ड केटलबॉरो यांनी विराट कोहलीला न दिलेल्या वाईड बॉलची! हा निर्णय योग्य होता की अयोग्य? असा वाद सोशल मीडियावर रंगू लागला आहे.
  • बांगलादेशनं या सामन्यात पहिली फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी २५७ धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित-शुबमन गिल जोडीनं भारताला दणदणीत सलामी मिळवून दिली. या पायाच्या जोरावर पुढे विराट कोहली व के. एल. राहुल यांनी विजयाचा कळस चढवला. त्यामुळे भारतानं बांगलादेशवर तब्बल सात विकेट्स राखून अगदी लीलया विजय मिळवला! यादरम्यान विराट कोहलीनं त्याचं शतकही साजरं केलं.

नेमकं काय झालं त्या षटकात?

  • विराट कोहली वैयक्तिक ७३ धावांवर असताना भारताला विजयासाठी २८ धावा आवश्यक होत्या. तेव्हापासूनच के. एल. राहुलनं विराट कोहलीलाच अधिकाधिक खेळण्याची संधी मिळेल याची काळजी घेतली. ४२व्या षटकात विजयासाठी २ धावा शिल्लक असताना विराट कोहलीला शतकासाठी तीन धावा आवश्यक होत्या. तेव्हा बांगलादेशचा फिरकीपटू नसूम अहमदनं विराटला वाईड बॉल टाकला. त्यामुळे एक रन कमी होतोय की काय? अशी भीती विराटसह सर्व क्रिकेट चाहत्यांना वाटू लागली. त्याच भावनेनं विराटनं अम्पायर रिचर्ड केटलबॉरो यांच्याकडे पाहिलं. पण त्यांनी वाईड बॉल दिलाच नाही आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला!
देशातील सर्वाधिक रुंद आणि राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा तयार; समृद्धी महामार्गाच्या १४ व्या पॅकेजचे काम पूर्ण
  • मुंबई ते नागपूरदरम्यानचा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या काही तासांमध्ये पार व्हावा तसेच उत्कृष्ट वाहतूक सेवेमुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे. नुकतेच समृद्धी महामार्गाच्या पिंपरी सदरोद्दिन ते वशाळा बुद्रुक या १३.१ किमी लांब, ९.१२ मीटर उंच, तर १७.६ मीटर रुंद अशा १४ व्या पॅकेजचे बांधकाम पूर्ण झाले. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याच्या प्रतीक्षेत आहे. 
  • महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची संकल्पना आखली. त्यानुसार आतापर्यंत महामार्गाचे १३ पॅकेजचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पॅकेज लवकरच पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी असा एकूण ५२० किमीचा पॅकेज मे २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर शिर्डी ते भारवीर हा टप्पादेखील सुरू झाला.
  • अत्यंत आव्हानात्मक भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीवर मात करत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नाशिकमधील पिंपरी सदरोद्दिन ते नाशिकमधील वशाळा बुद्रुक हा एकूण १३.१ किलोमीटरचा अत्यंत अवघड टप्पा अखेर यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. यात ८ किमीचा बोगदा, २ किमीचा पुल आणि ३ किमीच्या रस्त्याचा समावेश आहे. या मार्गादरम्यान दोन पुल बांधण्यात आले असून एकाची लांबी ९१० मीटर, तर दुसऱ्याची लांबी १२९५ मीटर एवढी आहे. १२९५ मीटर लांबी असलेल्या पुलाची उंची ६० मीटर इतकी असून समृद्धी महामार्ग प्रकल्पातील सर्वाधिक उंच पुल म्हणून याला ओळखले जात आहे. पावसाचे पाणी बोगद्यात शिरू नये यासाठी २०० मीटरपर्यंत शेड टनेल बनविण्यात आले आहे.
  • विहित मुदतीपेक्षा ३ महिने अगोदर या पॅकेजचे बांधकाम पूर्ण झाले आहे. कमी कालावधीत दर्जेदार कामाचा उत्तम नमुना या पॅकेजच्या माध्यमातून दिसून आला आहे. जोरदार पाऊस, दाटीवाटीचे जंगल आणि खडकाळ डोंगरातून एनएटीएम प्रणालीचा वापर करत ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर या कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक शेखरदास यांच्या नेतृत्वात केवळ दोन वर्षाच्या कालावधीत हे पॅकेज पूर्ण करण्यात आले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपविण्यात आला आहे, असे शेखरदास यांनी स्पष्ट केले.
राज्यभरात ऑक्टोबर हिटमुळे काहिली… जाणून घ्या राज्यभरातील तापमानाची स्थिती
  • राज्यभरात ऑक्टोबर हिटच्या झळांनी अंगाची काहिली होत आहे. बुधवारी मुंबईला उष्णतेच्या झळांचा फटका बसला. सातांक्रुजमध्ये सर्वाधिक ३६.४ अंश सेल्शिअसची नोंद झाली आहे. विदर्भात कमाल तापमान सरासरी ३५ अंश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३४ अंश सेल्सिअसवर गेले होते. २५ ऑक्टोबरपर्यंत ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
  • हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील सांताक्रुजमध्ये बुधवारी सर्वाधिक ३६.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. डहाणूत ३४.७, कुलाब्यात ३३.२ अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भात मागील दहा दिवसांपासून पारा सरासरी ३५ अंशांवर आहे. बुधवारी अकोल्यात ३६.२, यवतमाळमध्ये ३५.७, वाशीम, वर्ध्यात ३५.०, ब्रह्मपुरीत (चंद्रपूर) ३५.३ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यात परभणीत ३४.७, नांदेडमध्ये ३४.६ आणि औरंगाबादमध्ये ३३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापुरात ३६, पुणे, सांगलीत ३४.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
  • राज्यातून मोसमी वारे माघारी गेल्यानंतर हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर येत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होताना दिसत आहे. ही स्थिती २५ ऑक्टोबरपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. यंदा एल-निनोचे वर्ष असल्यामुळे सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद होत आहे. हिवाळ्यातही कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
नव्या जलदगती रेल्वेचे ‘नमो भारत’ नामकरण; दिल्ली-मेरठ मार्गावरील पहिल्या गाडीचे आज उद्घाटन
  • ‘रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम’ (आरआरटीपी) या योजनेंतर्गत नव्या रेल्वे गाडय़ांचे नामकरण ‘नमो भारत’ असे करण्यात आले आहे. या गाडय़ांचा पहिला ताफा दिल्ली-मेरठ मार्गावर शनिवार, २१ ऑक्टोबरपासून धावणार असून त्याचे उद्घाटन आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
  • स्थानिक दळणवळण अधिक जलद आणि आरामदायी करण्यासाठी आरआरटीपी योजना सुरू करण्यात आली होती. याचा पहिला टप्पा म्हणून १७ किलोमीटर लांबीच्या दिल्ली-गाझियाबाद-मेरठ मार्गाचे भूमिपूजन ८ मार्च २०१९ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या मार्गावरील साहिदाबाद-दुहाई डेपो या स्थानकांदरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान करतील. या मार्गावर गाझियाबाद, गुलधर, दुहाई ही स्थानके आहेत. आरआरटीपी या ताशी १८० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या मध्यम-जलदगती रेल्वे आहेत. आरआरटीपी योजनेत पाच ते १५ मिनिटांना एक गाडी सोडण्यात येणार असून राष्ट्रीय राजधानी परिसरात असे आठ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यातील दिल्ली-मेरठ, दिल्ली-अलवर आणि दिल्ली-पानिपत या मार्गाना प्राधान्य देण्यात आले आहे.
  • आरआरटीपी योजनेतील रेल्वे गाडय़ांना ‘नमो भारत’ नाव देण्यावरून काँग्रेसने टीका केली आहे. ‘नमो स्टेडियमनंतर आता नमो ट्रेन. त्यांच्या आत्ममग्नतेला कोणतीही सीमा नाही,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर दिली. तर ‘भारत कशाला? फक्त देशाचे नाव नमो करून टाका, म्हणजे काम होईल,’ असा टोमणा काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी लगावला.
रोहित शर्माने बांगलादेश क्रिकेट सामन्याच्या दोन तास आधी अखेर भरला दंड, वाचा नेमकं काय घडलं
  • पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर भरधाव वेगात वाहन चालवणे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला चांगलेच महागात पडले आहे. एकाच दिवशी दोन वेळा नियमांचे भंग करत भरधाव वेगात कार चालवली आहे. याबाबतची बातमी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्याने ऐन भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामना सुरू होण्याच्या दोन तास अगोदर रोहितने ऑनलाइन पद्धतीने दंड भरला.
  • पुण्यात भारत विरुद्ध बांग्लादेश क्रिकेट सामना असल्याने रोहित शर्मा मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होता. तेव्हा, भरधाव वेगात असलेली कार सीसीटीव्हीत कैद झाली आणि वेगमर्यादा ओलांडली असल्याचं स्पष्ट झालं. १७ ऑक्टोबरला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून रोहित शर्मा त्याच्या निळ्या रंगाच्या वाहनाने पुण्याच्या दिशेने येत होता. भरधाव कारचा वेग हा द्रुतगती महामार्गावर लागलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला. कारचा वेग ११४ ते ११७ असल्याचं महामार्ग पोलिसांनी सांगितले. त्यामुळे रोहितला दोन हजारांचा दंड झाला. त्याच दिवशी पुण्यात रोहितला सोडून त्याचे वाहन परत जात असताना पुन्हा दोन हजारांचा दंड झाला.
  • पुण्यात भारत विरुद्ध बांगलादेश हा क्रिकेट सामना असल्याने रोहितला दोन दिवस आधी येणे क्रमप्राप्त होते, त्याच्या खासगी कारने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून येत असताना त्याला दंड झाला. ही बाब तत्काळ लक्षात येताच १९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याच्या दोन तास आधी रोहितने चार हजारांचा दंड भरला, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

 

डेन्मार्क खुली बॅडिमटन स्पर्धा : लक्ष्य, प्रणॉयची आगेकूच :
  • भारताच्या लक्ष्य सेन आणि एच.एस. प्रणॉय यांनी डेन्मार्क खुल्या बॅडिमटन स्पर्धेत आपापल्या सामन्यात चमकदार विजयासह पुरुष एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला एकेरीत सायना नेहवालचे आव्हान पराभूत झाल्याने संपुष्टात आले.

  • लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या अ‍ॅन्थनी गिंटिंगचे आव्हान २१-१६, २१-१२ असे सहज मोडून काढले. सामन्याच्या सुरुवातीपासून चांगल्या लयीत असलेल्या लक्ष्यने गिटिंगविरुद्ध चांगला खेळ केला. पहिल्या गेममध्ये गिंटिंगने आव्हान उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र लक्ष्यने उत्कृष्ट फटकांच्या साहाय्याने गेम जिंकला.

  • दुसऱ्या गेममध्येही त्याने हीच लय कायम राखत गेमसह सामन्यात विजय मिळवला.अन्य सामन्यात, एच.एस. प्रणॉयने चीनच्या झाओ जुन पेंगचा २१-१३, २२-२० असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये फारसे आव्हान न मिळालेल्या प्रणॉयसमोर दुसऱ्या गेममध्ये पेंगकडून प्रतिकार सहन करावा लागला. मात्र, आपला खेळ उंचावत प्रणॉयने विजय नोंदवला.

  • महिला एकेरीत सायना नेहवालला चीनच्या झांग यी मानकडून तीन गेमच्या लढतीत १७-२१, २१-१९, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी जोडीने दक्षिण कोरियाच्या कांग मिन ह्यूक-सेओ सेऊंग जाए जोडीचा २१-१५, २१-१९ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला.

अमेरिकेकडून ३०७ पुरातन वस्तू, मूर्ती भारताला परत ; चोरी, तस्करीच्या माध्यमातून प्राचीन ठेवा परदेशात; १५ वर्षांच्या तपासाला यश :
  • अमेरिकेने १५ वर्षांच्या तपासानंतर ३०७ पुरातन वस्तू व मूर्ती भारताला परत केल्या आहेत. या वस्तूंची किंमत ४० लाख अमेरिकी डॉलर असून चोरी आणि तस्करीद्वारे या वस्तू अमेरिकेत नेण्यात आल्या होत्या. यापैकी बहुसंख्य पुरातन वस्तू कुख्यात कला व्यापारी सुभाष कपूर याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

  • मॅनहॅटनचे जिल्हा दंडाधिकारी अ‍ॅल्विन ब्रॅग यांनी सोमवारी ४० लाख अमेरिकी डॉलरच्या ३०७ पुरातन वस्तू भारताला परत करण्याची घोषणा केली. सुभाष कपूरच्या कार्यालयात जिल्हा दंडाधिकारीच्या अधिकाऱ्यांनी मारलेल्या छापेमारीत २३५ पुरातन वस्तू जप्त करण्यात आल्या. अफगाणिस्तान, कंबोडिया, भारत, इंडोनेशिया, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड या देशांतील चोरी केलेल्या किंवा तस्करी केलेल्या पुरातन वस्तूंची विक्री करण्याचे काम सुभाष कपूर करतो, असे ब्रॅग यांनी सांगितले.

  • न्यू यॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासात झालेल्या एका कार्यक्रमात मॅनहॅटनच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या वस्तू परत केल्या. भारताचे महावाणिज्यदूत रणधीर जैस्वाल आणि अमेरिकी गृह सुरक्षा विभागाचे कार्यवाहक ख्रिस्तोफर लाऊ यांच्या उपस्थतीत या वस्तू परत करण्यात आल्या.

  • ‘‘या पुरातन वस्तू तस्करांनी भारतातील विविध भागांतून चोरल्या होत्या. या वस्तूंच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आम्हाला या वस्तू भारतातील नागरिकांना परत करताना अभिमान वाटत आहे,’’ असे ब्रॅग या कार्यक्रमात म्हणाले.

मल्लिकार्जुन खरगे की शशी थरूर? आज मिळणार काँग्रेसला नवा अध्यक्ष :
  • काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी (१७ ऑक्टोबर) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर हे दोन मोठे नेते आमनेसामने होते. दरम्यान, आज मतमोजणी होणार असून दोघांपैकी कोण काँग्रेस अध्यक्षपदावर विराजमान होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन दशकानंतर पहिल्यांदाच काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे.

  • सोमवारी ( १७ ऑक्टोबर ) रोजी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी ९६ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत काँग्रेस प्रदेश समित्यांच्या ९,९०० प्रतिनिधींपैकी ९,५०० प्रतिनिधींनी मतदान केले. अनेक छोट्या राज्यांत १०० टक्के, तर मोठ्या राज्यांत जवळपास ९० टक्के मतदान झाले होते.

  • या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होती. खरगे यांना अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा होता. मात्र, शशी थरूर यांनीही राज्याराज्यांत प्रचार करून समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला.

२० ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.