चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० ऑक्टोबर २०२०

Date : 20 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ड्रॅगनला झटका, मलाबार युद्ध कवायतीसाठी भारताने जोडला एक नवा मित्र :
  • दरवर्षी आयोजित होणाऱ्या मलाबार नौदल युद्ध कवायतींमध्ये आता आणखी एक देश सहभागी होणार आहे. या युद्ध कवायतीच्या निमित्ताने भारताने एक नवीन मित्र जोडला आहे. पूर्व लडाख सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनसाठी हा एक झटका आहे. कारण मलाबार नौदल कवायतीच्या निमित्ताने चीन विरोधात एक भक्कम आघाडी उभी करण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत.

  • आता भारत, अमेरिका आणि जपानसह ऑस्ट्रेलियन नौदलही मलाबार युद्ध कवायतीमध्ये सहभागी होणार आहे. आतापर्यंत फक्त भारत, अमेरिका आणि जपान हे तीनच देश या कवायतीमध्ये सहभागी व्हायचे. नोव्हेंबर महिन्यात हा युद्धाभ्यास होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाला या कवायतीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देण्याविषयी विचार सुरु होता.

  • या निर्णयावर चीनची प्रतिक्रिया काय असेल? याबद्दल थोडी चिंता होती. भारताप्रमाणेच चीनचे अमेरिका, जपान या देशांबरोबरही फारसे जमत नाही. ऑस्ट्रेलिया बरोबरही त्यांचे तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. या महिन्याच्या सुरुवातील टोक्योमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड गटाची बैठक पार पडली.

  • क्वाड गटातील चारही देश चीनच्या विस्तारवादी आणि वर्चस्व गाजवण्याच्या प्रवृत्तीमुळे त्रस्त आहेत. दक्षिण चीन समुद्र आणि व्यापारावरुन चीनचा अमेरिकेबरोबर वाद सुरु आहे. भारताबरोबर सीमावाद चालू आहे. “मलाबार कवायती २०२० ऑस्ट्रेलियन संरक्षण दलासाठी एक मोठी संधी आहे” असे ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया यापूर्वी २००७ साली शेवटचे मलाबार कवायतीमध्ये सहभागी झाला होता.

करोनावरील संभाव्य उपचारासाठी भारतीय वंशाच्या मुलीस पुरस्कार :
  • भारतीय वंशाच्या अमेरिकी मुलीस करोनावरील संभाव्य उपचार पद्धतीसाठी २५ हजार डॉलर्सचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अनिका छेब्रोलू ही टेक्सासमधील फ्रिस्को येथे आठव्या इयत्तेत शिकत असून तिने ‘थ्री एम यंग सायंटिस्ट’ चॅलेंज स्पर्धेत भाग घेतला होता. तिने सिलिको पद्धतीने औषधी रेणू शोधण्याची पद्धत प्रस्तावित केली असून हा रेणू सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणूच्या घातक प्रथिनाला जाऊन चिकटतो.

  • थ्री एम ही अमेरिकेतील उत्पादन कंपनी आहे. छेब्रोलू  हिला गेल्या वर्षी इन्फ्लुएंझा झाला होता त्यावेळी तिने त्यावर उपाय शोधण्याचे ठरवले होते पण नंतर करोनाचा नवीन विषाणू आला त्यामुळे तिने त्यावर लक्ष केंद्रित केले. यात तिला थ्रीएमच्या वैज्ञानिकांनी औषध कसे विकसित करतात याचे प्रशिक्षण दिले. यावर्षीच्या ‘थ्रीएम’ तरुण शास्त्रज्ञ स्पर्धेतील १० अंतिम उमेदवारांत तिचा समावेश होता.

  • यात तिला थ्री एमच्या वैज्ञानिक डॉ. महफूझा अली यांचे मार्गदर्शन लाभले. अली यांनी तिला वैज्ञानिक पद्धती समजून दिल्या. त्यानंतर तिने वैज्ञानिकांसमोर तिचा प्रकल्प सादर केला. विज्ञान हा जीवनाचा व विश्वाचा आधार आहे ते समजून घेण्यासाठी अजून बराच प्रवास बाकी आहे असे छेब्रोलू हिने म्हटले आहे. ती वैद्यकीय संशोधक  होऊ इच्छिते.

रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घ्या :
  • जगभर रोजगाराचे स्वरूप बदलत असून तरुण पिढीला त्या बदलांशी जुळवून घ्यावे लागेल. हे बदलते स्वरूप काय आहे हे ओळखून त्यानुसार शिक्षण आत्मसात करण्यातही लवचीकता दाखवावी लागेल. कडव्या स्पध्रेला सामोरे जावे लागेल, त्यासाठी बहुविध शिक्षणाची जोड द्यावी लागेल, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हैसूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना दिला.

  • या कार्यक्रमात पंतप्रधानांनी दूरचित्रवाणी संवादाद्वारे नव्या शैक्षणिक धोरणातील बदलाचा हेतू स्पष्ट केला. सध्याचे युग कौशल्यावर आधारित असल्यामुळे नव्या पिढीला कौशल्ये मिळवावी लागतील. काहींना नव्याने कौशल्ये शिकावी लागतील. वेळप्रसंगी स्वत:कडे असलेल्या कौशल्यांचा विस्तार करावा लागेल. नवनवी कौशल्ये मिळवण्यासाठी देशातील शिक्षण पद्धतीही त्या दृष्टीने विकसित केली पाहिजे. म्हणूनच नव्या शैक्षणिक धोरणाचा अवलंब करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे मोदी म्हणाले.

  • २०१४ मध्ये देशात १३ आयआयएम होत्या, त्यात सात नव्या संस्थांची भर घालण्यात आली. गेल्या ७० वर्षांमध्ये सात ‘एम्स’ होत्या, आता आणखी आठ एम्स स्थापन झाल्या आहेत वा त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयआयटींची संख्या १६ वरून २५ वर नेण्यात आली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

हवाई दलाच्या MI-35 हेलिकॉप्टरवरुन SANT क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :
  • भारतीय हवाई दलाच्या एमआय-३५ हिंद गनशिप हेलिकॉप्टरवरुन सोमवारी स्टँड ऑफ अँटी टँक (SANT) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आली. अशाच आणखी एका क्षेपणास्त्राची पुढील २४ तासांत चाचणी घेण्यात येणार आहे. इंडियन डिफेन्स रिसर्च विंगने आपल्या वेबसाईटवर याची माहिती दिली आहे.

  • SANT हे हवेतून मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. डीआरडीओच्या ‘इमरत’ या संसोधन संस्थेच्यावतीने आणि भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. ७ ते ८ किमी रेंज असलेल्या हेलिना क्षेपणास्त्राची ही सुधारित आवृत्ती असून नव्या SANT क्षेपणास्त्राची रेंज १५ ते २० किमी आहे.

  • भारतीय हवाई दल (IAF) आणि भारतीय लष्करातील एव्हिएशन कॉर्प्स (AAC) यांची एकत्रितरित्या ४,००० SANT क्षेपणास्त्राची गरज आहे. सन २०२१ च्या शेवटापर्यंत ही मागणी डीआरडीओकडून पूर्ण करण्यात येणार आहे.

  • एएलएच रुद्र एमके ४ आणि हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या ताफ्यांसाठी SANT हे हवेतून मारा करणारे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र विकसित करण्यात आलं आहे.

दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये :
  • दरवर्षी दहावी-बारावीच्या निकालानंतर जुलै – ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाते. यंदा करोना संसर्गामुळे पुरवणी परीक्षेबाबत काहीच स्पष्टता नव्हती. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र राज्य मंडळाने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

  • दहावी आणि बारावीच्या फेर परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेतल्या जाणार आहेत. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच १०वी तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी यांच्या परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणार आहेत.

  • राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने लॉकडाउन आणि संचारबंदी जाहीर केली होती. याचा कालावधी वाढल्याने मार्च २०२० मध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल लागण्यासाठी जुलै २०२० हा महिना उजाडला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा ही आता जुलै-ऑगस्टऐवजी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे.

  • परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रं ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

भारताच्या महिलाही उपांत्यपूर्व फेरीत :
  • भारताच्या महिला संघानेही पुरुषांपाठोपाठ आशिया ऑनलाइन नेशन्स सांघिक बुद्धिबळ स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्विस पद्धतीने झालेल्या प्राथमिक फेरीनुसार भारताच्या महिला संघाने तीनही विजयांची नोंद सोमवारी केली.

  • भारतासमोर उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानचे आव्हान असेल. प्राथमिक फेरीत भारताने सर्वाधिक १६ गुणांची कमाई केली. त्याखालोखाल फिलिपाइन्स आणि इराण यांचे प्रत्येकी १३ गुण आहेत. भारताने सोमवारी फिलिपाइन्सवर ३-१ असा विजय मिळवला. आठव्या फेरीत भारताने कझाकस्तानचा २.५-१.५ असा पराभव केला. भारताने नवव्या आणि अखेरच्या फेरीत व्हिएतनामला २.५-१.५ असे नमवले.

  • फिलिपाइन्सविरुद्धच्या सातव्या फेरीत झालेल्या लढतीत भारताकडून मेरी अ‍ॅन गोम्स आणि पी. वी. नंदिधा यांनी विजय नोंदवले. आर. वैशाली आणि पद्मिनी राऊत यांना मात्र बरोबरी स्वीकारावी लागली.

  • कझाकस्तानविरुद्धच्या लढतीत नंदिधाने पुन्हा विजयाची नोंद केली. राऊतलादेखील विजय मिळवता आला. मात्र कझाकस्तानविरुद्ध वैशालीला पराभव पत्करावा लागला, तर भक्ती कुलकर्णीचा डाव बरोबरीत संपला. व्हिएतनामविरुद्धच्या लढतीत वैशाली व गोम्स यांना विजय मिळवता आले. मात्र भक्तीचा त्या फेरीत पराभव झाला.  भारताच्या आतापर्यंतच्या ९ फेऱ्यांच्या यशात वैशालीने सर्वाधिक योगदान देत ६.५ गुण मिळवले. गोम्सने पाच गुण मिळवले.

२० ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.