चालू घडामोडी आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2023

Date : 20 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर, चॅम्पियन कर्णधाराला मिळाले नाही स्थान; भारताच्या ६ खेळाडूंचा समावेश
 • अहमदाबदच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला आणि सहाव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरले. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील आपली सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. या आयसीसीच्या संघात ६ भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवणारा कर्णधार पॅट कमिन्स या संघात नाही. आयसीसीने रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवले आहे.
 • एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा रचिन रवींद्रही या संघाचा भाग नाही. याशिवाय आपल्या स्फोटक फलंदाजीने जगाला प्रभावित करणाऱ्या हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनाही आयसीसीने आपल्या संघात स्थान दिलेले नाही.

भारताच्या या ६ खेळाडूंना मिळाले आयसीसीच्या संघात स्थान -

 • सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट असलेल्या ६ भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे, तर त्यात विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश आहे. संघात समावेश असलेल्या विराट कोहलीने या स्पर्धेत सर्वाधिक ७६५ धावा केल्या. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने स्पर्धेत सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीसोबतच यष्टीमागेही चांगली कामगिरी केली.
 • टीम इंडियाच्या सहा, श्रीलंकेचा एक, न्यूझीलंडचा एक, दक्षिण आफ्रिकेचा एक आणि विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा आयसीसीच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेचा दिलशान मदुशंका, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू ॲडम झाम्पा यांचा समावेश आहे. आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक या स्पर्धेत सर्वाधिक ४ शतके झळकवणारा खेळाडू होता. याशिवाय डॅरिल मिशेलने ९ डावात ५५२ धावा केल्या. तसेच ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झाम्पाने २३ आणि श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाने २१ विकेट्स घेतल्या.
विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीने ग्लेन मॅक्सवेलचे अभिनंदन करत दिली ‘ही’ खास भेट
 • क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली आणि सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या टीम इंडियाच्या वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या. पण, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्स राखून पराभव केला आणि यासह करोडो भारतीय चाहत्यांचे आणि टीम इंडियाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले आणि ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. या सामन्यानंतर भारतीय फलंदाज विराट कोहलीला विश्वचषक २०२३ मधील ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. परंतु, त्याच्यासाठी सर्वात मोठा आनंद हा विश्वचषक ट्रॉफी उचलण्याचा होता, मात्र ते स्वप्न काही पूर्ण झाले नाही. यानंतर कोहली कितीही दु:खी झाला असला तरी त्याने आपल्या सहकाऱ्यांना आनंदी ठेवण्याचा नेहमीप्रमाणेच प्रयत्न केला, अंतिम सामन्यातही तेच दिसून आले. त्याने विश्वचषक २०२३ च्या विजेत्या संघातील खेळाडू आणि आरसीबी संघातील त्याचा सहकारी ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारली आणि विजयाबद्दल अभिनंदन केले. यानंतर त्याने मॅक्सवेलला एक खास वस्तू भेट म्हणून दिली, ही भेटवस्तू म्हणजे त्याची जर्सी.
 • विश्वचषक २०२३ फायनलनंतर पार पडलेल्या सोहळ्यात विराट कोहली मैदानात येऊन ग्लेन मॅक्सवेलला भेटला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. एक खेळाडू म्हणून विराट कोहली यावेळी कोणत्या दु:खातून जात असेल हे मॅक्सवेल समजू शकत होता, म्हणून त्याने विराटला मिठी मारत सांत्वन केले. यानंतर विराट कोहलीने त्याच्या मॅच जर्सीवर स्वाक्षरी केली आणि ग्लेन मॅक्सवेलला भेट म्हणून दिली. टीम इंडियासाठी भावूक क्षण असतानाही विराटने मोठ्या मनाने विजयी संघाचे कौतुक केले.
 • ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजेच आरसीबीमध्ये एकत्र खेळले. मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता.
 • २०२३ च्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीने ११ डावांमध्ये ९५.६२ च्या सरासरीने आणि ९०.३२ च्या स्ट्राईक रेटने एकून ७६५ धावा केल्या. यामध्ये तीन शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने वर्ल्डकपमध्ये ६८ चौकार आणि ९ षटकारही मारले. मात्र, अंतिम सामन्यात संघाला विजेतेपद मिळवता येऊ शकले नाही.
विराट ठरला विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, सचिन-युवराजच्या खास क्लबमध्ये झाला सामील
 • आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या फायनलमध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (१९ नोव्हेंबर) कांगारू संघाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. तसेच १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ मध्ये विश्वचषक जिंकला आहे. या सामन्यानंतर भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार’ देण्यात आला.
 • एकदिवसीय विश्वचषकात ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा’ पुरस्कार जिंकणारा कोहली हा भारताचा तिसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी २००३ मध्ये सचिन तेंडुलकर आणि २०११ मध्ये युवराज सिंगने हा पुरस्कार जिंकला होता. यापैकी सचिन तेंडुलकर हा फायनलमध्ये पराभूत झालेल्या टीम इंडियाचा सदस्य होता, तर युवराज सिंग विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता.
 • या विश्वचषकात प्रत्येक भारतीय फलंदाजाने धावा काढण्याची तयारी दाखवली , ज्यामुळे भारताचा नेट रन रेट वाढण्यास मदत झाली. माजी कर्णधार विराट कोहलीने संघात मुख्य फलंदाजाची भूमिका बजावली. यामुळेच टीम इंडियाने मधल्या षटकांमध्ये जास्त विकेट गमावल्या नाहीत. विराटचा फॉर्म पाहण्यासारखा आहे आणि त्याने ९५.६२ च्या सरासरीने ७६५ धावा केल्या आहेत, जे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. या काळात त्याने तीन शतके आणि सहा अर्धशतकं झळकवली आहेत. ११३ धावा ही कोहलीची या विश्वचषकातील सर्वोत्तम धावसंख्या ठरली.
१४० कोटी भारतीयांचे स्वप्न भंगलं, पराभवानंतर अनुष्का, अथिया अन् रितिका भावुक
 • आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आले होते. ट्रेव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत विश्वचषकावर नाव कोरलं आहे.
 • यानंतर भारतीय संघाला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. रोहित शर्मा, मोहम्मद सिराज, विराट कोहलीला पराभव झाल्यानंतर अश्रू अनावर झाले. अभिनेत्री अनुष्का शर्मा, शेट्टी, रितिका सजदेह आणि खेळांडूच्या कुटुंबातील सदस्यही भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
 • दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य मिळालं होतं. भारताकडून के. एल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची तर विराट कोहलीने ५४ धावांची खेळी केली. कर्णधार रोहित शर्माने अवघ्या ३१ चेंडूत ४७ धावा केल्या.
 • ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या. भारताने पहिल्या १० षटकांत ८० धावा करत दमदार सुरुवात केली होती, मात्र रोहित शर्मा बाद झाल्यानंतर धावांचा वेग कमी झाला. ११ ते ४० षटकांदरम्यान भारतीय फलंदाजांना केवळ दोनच चौकार लगावता आले.
 • प्रत्युत्तरात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने १३७ धावांची शतकी खेळी केली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या. मिचेल मार्श १५ धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद २ धावा केल्या.
विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू निवडीची नवी सुधारणा घटनाविरोधी, सुधारणेत समान संधीचे उल्लंघन; असे आहे आक्षेप…
 • राज्यातील शासकीय अकृषी विद्यापीठांच्या प्र-कुलगुरूंच्या निवडीच्या पद्धतीवर आधीच आक्षेप असताना विद्यापीठाच्या महत्त्वाच्या संविधानिक पदावर असलेल्या प्र-कुलगुरू निवडीचे अधिकार कुलगुरू आणि व्यवस्थापन परिषदेच्या हाती देण्यात आल्याने यावर आक्षेप घेतला जात आहे. ही संपूर्ण पद्धत राज्यघटनेतील सार्वजनिक रोजगाराच्या संधीच्या समानतेचे उल्लंघन असून विद्यापीठ प्राधिकारणावर सत्ता असणाऱ्यांच्या सोयीच्या व्यक्तीची या पदावर निवड केली जाण्याची शंकाही उपस्थित केली जात आहे.
 • राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यापीठ कायद्यात बदल प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र राज्यपालांनी या बदलांना मान्यता दिली नाही. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यावर प्रस्तावित बदल रद्द करण्यात आले. त्यानंतर राज्यातील विद्यापीठांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) निश्चित केलेले नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वीच्या नियमानुसार प्र-कुलगुरूंच्या निवडीसाठी कुलगुरूंकडून राज्यपालांकडे तीन नावांची शिफारस केली जायची. त्यानंतर राज्यपालांकडून एक नाव अंतिम करण्यात यायचे. मात्र आता प्र-कुलगुरू निवडीतील राज्यपालांचा सहभाग दूर करून प्र-कुलगुरूंच्या निवडीचे अधिकार कुलगुरू आणि व्यवस्थापन परिषदेकडे सोपवण्यात आले आहेत. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेने ज्या नावावर शिक्कामोर्तब केले त्यांचीच प्र-कुलगुरूपदी निवड अंतिम होणार आहे. माजी व्यवस्थापन परिषद सदस्य शिक्षणतज्ज्ञ प्रा. संजय खडक्कार यांनी या प्रक्रियेवरच आक्षेप घेतला आहे.
 • प्र-कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी पारदर्शक निवड प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. सार्वजनिक रोजगार आणि पगारदारी सरकारी पद असल्याने त्या पदाची जाहिरात करणे आवश्यक ठरते. त्यानंतर पात्र उमेदवारांकडून प्र-कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी योग्य विहित प्रक्रिया पार पाडली जाणे आवश्यक असल्याचे प्रा. खडक्कार यांचे मत आहे. भारताच्या संविधानातील कलम १६ (१) (सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता) असे नमूद करते की, राज्याअंतर्गत कोणत्याही कार्यालयात नोकरी किंवा नियुक्ती यासंबंधी सर्व नागरिकांसाठी समान संधी असेल. प्र-कुलगुरूंची नियुक्ती ही सार्वजनिक पदावर असते. सार्वजनिक पदावरील नियुक्त्यांसाठी घटनेच्या कलम १६ च्या विरुद्ध कोणतेही विशेषाधिकार असू शकत नाहीत. असे असतानाही हे अधिकार कुलगुरूंना आणि व्यवस्थापन परिषदेला देणे आक्षेपार्ह असल्याचा आरोप प्रा. खडक्कार यांनी घेतला आहे.

नव्या पद्धतीने धोका काय?

 • विद्यापीठाचे कुलगुरू कोणत्याही न्याय्य आणि निःपक्षपाती प्रक्रियेशिवाय, व्यवस्थापन मंडळ/व्यवस्थापन परिषदेसमोर प्र-कुलगुरू पदासाठी एक नाव कसे ठेवू शकतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच ही प्रक्रिया पूर्णपणे पक्षपाती आहे. आणि कुलगुरू त्यांच्या ‘सोयीच्या’ व ‘आवडीच्या’ व्यक्तीचेच नाव व्यवस्थापन मंडळ/व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक विद्यापीठात कुलगुरूंना स्वतःहून शिपाई ते कुलसचिवापर्यंत कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करण्याचा अधिकार नाही. त्यासाठी विहित पद्धत आहे. मग केवळ प्र-कुलगुरू नियुक्तीसाठीच भारताच्या संविधानाच्या कलम १४ आणि १६ चे उल्लंघन करणारी पद्धत का? असाही धोका व्यक्त केला जात आहे.
निकाराग्वाची शेनिस पॅलासिओस विश्वसुंदरी
 • मध्य अमेरिकेतील निकाराग्वा देशाच्या शेनिस पॅलासिओसने २०२३ चा ‘मिस युनिव्हर्स’ (विश्वसुंदरी) किताब जिंकला. आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत निकाराग्वाने मिळवलेले हे पहिले विजेतेपद आहे.
 • ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेचे ७२ वे पर्व शनिवारी रात्री एल साल्वादोरची राजधानी सॅन साल्वादोर येथील जोस अडोल्फो पिनेडा एरिना येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत ‘मिस थायलंड’ अँटोनिया पोर्सिल्ड ही दुसरी आली आणि ‘मिस ऑस्ट्रेलिया’ मोराया विल्सनला तृतीय क्रमांक मिळाला. हिने पटकावल्याची माहिती ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेच्या अधिकृत ‘इंस्टाग्राम पेज’वर देण्यात आली.
 • पॅलासिओसला अमेरिकेची गतविजेती आरबोनी गॅब्रिएलने विश्वसुंदरीपदाचा मुकुट प्रदान केला. पॅलासिओसने ८३ देशांतील सुंदरींमधून हा किताब जिंकण्याचा मान मिळवला. भारताच्या श्वेता शारदा हिची सर्वोत्तम २० स्पर्धकांच्या यादीत निवड झाली होती.

20 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.