चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० नोव्हेंबर २०२१

Date : 20 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा - अर्जुनला विजेतेपद :
  • भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन ईरिगियासीने टाटा स्टील जलदगती बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले़  नवव्या आणि अखेरच्या डावात अर्जुनने लेव्हॉन अरोनियनला बरोबरीत रोखत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ही जलदगती स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.

  • अर्जुनने नऊपैकी साडेसहा गुणांची कमाई केली. या स्पर्धेत फक्त आर. प्रज्ञानंदविरुद्ध त्याने पराभव पत्करला़ परंतु ग्रँडमास्टर सॅम शँकलँड, ग्रँडमास्टर कार्तिकेयन मुरली, ग्रँडमास्टर परहम गॅघसूडलू, ग्रँडमास्टर ली क्वांग लिएम आणि आंतरराष्ट्रीय मास्टर आर. वैशाली यांच्याविरुद्ध विजय संपादन केले़

  • नवव्या फेरीत प्रज्ञानंद आणि मुरली यांच्यातील सामना बरोबरीत सुटला, तर विदित गुजराथीने शँकलँडशी बरोबरी साधली. परंतु बी. अधिबान आणि वैशाली यांनी अनुक्रमे लिएम आणि परहम यांच्याविरुद्ध पराभव पत्करला.

  • अरोनियन, प्रज्ञानंद आणि विदित यांच्या खात्यावर प्रत्येकी साडेपाच गुण जमा होते. परंतु अरोनियमला दुसरे, प्रज्ञानंदला तिसरे आणि विदितला चौथे स्थान मिळाले. कार्तिकेयनला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले़.

भारत-चीन संबंधांत सध्या सर्वाधिक कटूता - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची कबुली :
  • भारत आणि चीन यांच्या संबंधांचा सध्या सर्वात कटुकाळ आहे. चीनने करारांचे उल्लंघन करणाऱ्या काही कृती केल्या आहेत, ज्यासाठी त्याच्याकडे कुठलेही विश्वासार्ह स्पष्टीकरण नाही. आपल्याला द्विपक्षीय संबंध कुठे न्यायचे आहेत याचे उत्तर आता चिनी नेतृत्वालाच द्यायचे आहे, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी सांगितले.

  • शांतता राखण्यासाठी पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या प्रक्रियेची प्रगती आवश्यक असून, सर्वंकष द्विपक्षीय संबंधांच्या विकासाचा तो आधार आहे, असे भारताने चीनला सांगितले आहे.

  • पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील उर्वरित मुद्द्यांवर लवकर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय करारांचे पूर्णपणे पालन करून काम करायला हवे, यावर जयशंकर यांनी १६ सप्टेंबरला ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बेमध्ये आपले चिनी समपदस्थ वांग यी यांच्यासोबत झालेल्या यापूर्वीच्या बैठकीत भर दिला होता.

  • ‘आपले संबंध नक्की कसे आहेत आणि त्यात काय योग्य घडलेले नाही याबद्दल चीनला काही शंका असेल असे मला वाटत नाही. माझे समपदस्थ वांग यी यांना मी अनेकदा भेटलो आहे. तुम्ही अनुभव घेतलाच असेल, की मी पुरेसा स्पष्ट बोलतो आणि त्यात काही संदिग्धता नसते.

  • त्यामुळे त्यांना ऐकायची इच्छा असेल तर त्यांनी ते ऐकले असेल याची मला खात्री आहे,’ असे ‘ग्रेटर पॉवर कॉम्पिटिशन : दि इमर्जिंग वर्ल्ड ऑर्डर’ या विषयावर सिंगापूरमधील ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमिक फोरम येथे आयोजित करण्यात आलेल्या गटचर्चेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात जयशंकर यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशची निवडणूक डोळयासमोर ठेवून कृषी कायदा रद्द करण्याची घोषणा :
  • कृषिविषयक तीन कायदे आगामी संसदेच्या अधिवेशनात मागे घेण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी केली. त्यावर विविध शेतकरी नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कृषी अर्थशास्त्र अभ्यासक शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी ‘देर आए दुरुस्त आए’ असे म्हणत पंतप्रधानांच्या घोषणेचे स्वागत केले. हमीभावाचा कायदा संमत करण्याचे आश्वासन दिले असते तर दुधात साखर पडली असती. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही बाब महत्त्वाची होती, असे ते म्हणाले.

  • माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत करत ‘हम करे सो कायदा’ शेतकऱ्यांपुढे चालत नाही. सरकारला झुकावे लागले. एकही खासदार सोबत नसताना शेतकऱ्यांनी वर्षभर हे आंदोलन चालवले. या आंदोलनात अनेक बळी गेले. राजकीय लाभासाठी हा निर्णय सरकारने घेतला असला तरी आंदोलनातील जखमा शेतकरी विसरणार नसल्याचे ते म्हणाले.

  • शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व केंद्र सरकारने अहवाल देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. आम्ही तयार केलेला अहवाल जाहीर केला असता तर पंतप्रधानांना असा निर्णय घेण्याची वेळ आली नसती. उत्तर प्रदेशची निवडणूक डोळय़ासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय असून तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय घातक असल्याचे ते म्हणाले.

पेनचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा :
  • अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज टिम पेनने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. काही वर्षांपूर्वी महिला सह-कर्मचाऱ्याला अश्लील संदेश आणि छायाचित्र पाठवल्याची कबुली देत पेनने हा निर्णय जाहीर केला.

  • तीन वर्षांपूर्वी झालेल्या चेंडू फेरफार प्रकरणानंतर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद पेनकडे सोपवण्यात आले. त्याच्या काही महिन्यांपूर्वीच पेनने हे कृत्य केल्याचे समजते. आता ८ डिसेंबरपासून इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेला प्रारंभ होणार असतानाच पेनचे ते संदेश अचानक समाजमाध्यमांवर पसरल्याने त्याला नेतृत्वपदाचा राजीनामा देणे भाग पडले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहणार असल्याचे पेनने सांगितले.

  • ‘‘ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर करताना मला फार दु:ख होत आहे. चार वर्षांपूर्वी एका महिला सह-कर्मचाऱ्याला अश्लील संदेश पाठवल्याचे मी कबुल करतो. माझे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ संघटनेला मी याविषयी कळवले आहे. माझ्या कृत्यामुळे ज्यांचे हृदय दुखावले गेले, त्या सर्वांची मी माफी मागतो,’’ असे ३६ वर्षीय पेन पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाला. या वेळी त्याला अश्रू आवरणे कठीण गेले.

भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिका - रांचीत राहुल-रोहितचे राज्य :
  • मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलने (२/२५) पदार्पणाच्या लढतीत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला़ त्यानंतर सलामीवीर के. एल. राहुल (४९ चेंडूंत ६५ धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा (३६ चेंडूंत ५५ धावा) यांनी शतकी भागीदारी रचल्यामुळे भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा सात गडी आणि १६ चेंडू राखून धुव्वा उडवला.

  • न्यूझीलंडने दिलेले १५४ धावांचे लक्ष्य भारताने १७.२ षटकांत गाठून तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. उभय संघातील तिसरा सामना रविवारी कोलकाता येथे होणार आहे़

  • राहुल आणि रोहित यांनी सलग पाचव्या लढतीत किमान अर्धशतकी भागीदारी रचताना भारताच्या विजयाचा पाया रचला. राहुलने गेल्या पाच सामन्यांतील चौथे, तर रोहितने मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले. टिम साऊदीने या दोघांसह सूर्यकुमार यादवला (१) तीन षटकांच्या बाद करून सामन्यात रंगत निर्माण केली. परंतु ऋषभ पंतने (६ चेंडूंत नाबाद १२) सलग दोन षटकार लगावून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.

  • तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली. मार्टिन गप्टिल (३१) आणि डॅरेल मिचेल (३१) यांनी अवघ्या २६ चेंडूंत ४८ धावांची सलामी देत भारतावर दडपण टाकले. परंतु दीपक चहरने गप्टिलला बाद केल्यावर हर्षलने लढतीला कलाटणी दिली. त्याने मिचेल आणि ग्लेन फिलिप्स (३४) यांचे महत्त्वपूर्ण बळी मिळवले. अक्षर पटेल (१/२६) आणि रविचंद्रन अश्विन (१/१९) या फिरकी जोडीनेसुद्धा मधल्या फळीत धावा रोखण्याची भूमिका चोख बजावली.

२० नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.