४,६४४ तलाठी पदांसाठी ११,५०,२६५ अर्ज ! विक्रमी संख्येमुळे २० दिवस परीक्षा प्रक्रिया, दररोज ५० ते ६० हजार जणांची चाचणी
‘जे लिहिले लल्लाटी.. तेही बदले तल्लाठी..’ अशी म्हण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रचलित आहे. कदाचित त्यामुळेच तलाठी होण्यासाठी अनेक उच्चशिक्षित तरुणांसह लाखो जण खटपट करतात. आताही राज्य शासनाच्या महसूल विभागाकडे ४ हजार ६४४ तलाठी पदांसाठी तब्बल साडेअकरा लाख अर्ज आले आहेत. या विक्रमी संख्येमुळे विविध केंद्रांवर तीन पाळय़ांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने ४६४४ तलाठी पदांसाठी अर्ज मागविले होते. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तीन आठवडय़ांची मुदत देण्यात आली होती. खुल्या गटात एक हजार तर इतर गटांसाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले होते. १७ जुलै ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र, उमेदवारांच्या आग्रहास्तव याला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री अर्ज भरण्याची मुदत संपली तेव्हा ११ लाख ५० हजार २६५ अर्ज प्राप्त झाले होते.
दाखल अर्जापैकी सुमारे दहा लाख उमेदवारांनी शुल्क भरले आहे. शुल्क भरण्यासाठी गुरुवापर्यंत (२० जुलै) मुदत आहे. जे उमेदवार परीक्षा शुल्क भरतील, तेच परीक्षेस पात्र असल्याचे भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची वेळ आणि तारीख जाहीर केली जाईल. उमेदवारांच्या जास्त संख्येमुळे दररोज ५० ते ६० हजार उमेदवारांची राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून ही प्रक्रिया २० दिवस चालण्याची शक्यता असल्याचे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले. परीक्षेच्या निकालानंतर निवडसूची तयार होऊन पदांवर कर्मचारी रुजू होण्यास नवे वर्ष उजाडण्याची शक्यता आहे.
लाखो उच्चशिक्षितही स्पर्धेत यावेळच्या तलाठी भरतीमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापन, संगणक शास्त्र, विज्ञान, कला, वाणिज्य आदी शाखांमध्ये पदव्युत्तर पदवीधारकांनीही मोठय़ा प्रमाणात अर्ज केल्याची माहिती जमाबंदी आयुक्तालयाकडून देण्यात आली.
कर्नाटक विधानसभेतून भाजपचे दहा सदस्य निलंबित
भाजप सदस्यांच्या गदारोळामुळे कर्नाटक विधानसभेत बुधवारी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली. भाजप सदस्यांनी विधेयकाच्या प्रती फाडून विधानसभेचे उपाध्यक्ष रुद्राप्पा लामनी यांच्यावर भिरकावल्या. यामुळे दहा सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. ३ ते २१ जुलै या कालावधीत हे अधिवेशन होत आहे.
विरोधकांच्या बंगळूरु येथील बैठकीवेळी विविध नेत्यांच्या स्वागतासाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा आरोप करत भाजपने हौदात धाव घेतली. या गोंधळात पाच विधेयके संमत करण्यात आली. विधेयके संमत झाल्यावर विधानसभा अध्यक्ष यू.टी. हैदर यांनी कामकाज तहकूब न करता अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संतप्त झालेल्या भाजप सदस्यांनी गदारोळ केला. त्यात काही सदस्यांनी विधेकाच्या प्रति फाडून उपाध्यक्षांवर भिरकावल्या.
दलित असल्यानेच भाजप सदस्यांनी लक्ष्य केल्याचा आरोप लामनी यांनी केला. दरम्यान, भाजप तसेच धर्मनिरपेक्ष जनता दलाने विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. तसेच सभागृहाबाहेर निदर्शने करणारे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भारतीय पासपोर्टवर किती देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येतं? जगात सर्वात शक्तीशाली पासपोर्ट कोणाचा?
अमेरिका, रशिया, जपानसारख्या देशांचा संपूर्ण जगावर प्रभाव आहे. यातल्या काही देशांमधील नागरिकांना त्या-त्या देशांच्या पासपोर्टवर जगभरातल्या अनेक देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येतं. जपान हा देश या बाबतीत अव्वल स्थानावर होता. परंतु तो मान आता सिंगापूरने पटकावला आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्सने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्व देशांत शक्तिशाली ठरला आहे. कारण सिंगापूरच्या पासपोर्टवर नागरिकांना जगभरातल्या १९२ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येतं.
व्हिसा-मुक्त राष्ट्रांच्या ताज्या क्रमवारीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून अव्वल स्थानावर असलेला जपान तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. जपानी पासपोर्टवर नागरिक १८९ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरू शकतात. जर्मनी, इटली आणि स्पेन हे देश या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर जपानबरोबर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रिया, फिनलॅन्ड, फ्रान्स, लक्झम्बर्ग, दक्षिण कोरिया आणि स्वीडन ही राष्ट्रं आहेत.
दरम्यान, भारताने गेल्या वर्षीपेक्षा ५ स्थानांनी आपली स्थिती सुधारली आहे. भारत आता व्हिसामुक्त राष्ट्रांच्या यादीत ८० व्या क्रमांकावर आहे. भारतीय पासपोर्टवर नागरिक ५७ देशांमध्ये फिरू शकतात. ८० व्या क्रमांकावर भारतासह टोगो आणि सेनेगल ही राष्ट्रेही आहेत.
दशकभरापूर्वी या यादीत अव्वल स्थानावर असलेल्या अमेरिकेची घसरण सुरूच आहे. अमेरिका दोन स्थानांनी घसरून आठव्या स्थानावर आली आहे. तर युनायटेड किंगडमने दोन स्थानांची झेप घेत पाचवा क्रमांक पटकावला आहे.
‘चांद्रयान ३’च्या शिलेदारांना वर्षभर पगारच मिळाला नाही; तरी मोहिमेत उचलला मोलाचा वाटा!
भारताच्या अवकाश संशोधन कार्यक्रमातलं मोठं पाऊल म्हणून चांद्रयान ३ मोहिमेकडे पाहिलं जातं. चांद्रयान २ च्या अपयशानंतर चांद्रयान ३ मोहिमेवर इस्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्वच संबंधितांनी प्रचंड मेहनत घेतली. १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चं श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आलं. २३ ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातून भारताच्या कामगिरीचं कौतुक केलं जात असताना या मोहिमेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शिलेदारांना गेल्या वर्षभरापासून पगारच मिळाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे!
‘द वायर’नं आयएएनएसच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. लाँच पॅडच्या सहाय्याने चांद्रयान ३ चं प्रक्षेपण करण्यात आलं. तेच लाँचपॅड बनवणाऱ्या कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून पगारच मिळाला नसल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन (HEC) कंपनीनं चांद्रयान ३ मोहिमेसाठी लाँचपॅड तयार केलं आहे. झारखंडच्या रांचीमध्ये या कंपनीचं मुख्यालय आहे. मात्र, या कंपनीत निधीअभावी गेल्या १७ महिन्यांपासून कर्मचारी व अधिकाऱ्यांना पगारच मिळाला नाहीये.
‘INDIA’ नावाचा अयोग्य वापर; २६ विरोधी पक्षांविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल
मंगळवारी (१८ जुलै) बंगळुरू येथे विरोधी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला देशातील प्रमुख २६ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विरोधी पक्षांच्या आघाडीचं नवीन नामकरणही करण्यात आलं. या आघाडीचं नामकरण ‘INDIA’ अर्थात ‘Indian National Developmental Inclusive Alliance’ असं करण्यात आलं आहे. या नामकरणानंतर दुसऱ्याच दिवशी २६ विरोधी पक्षांविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी ‘इंडिया’ नावाचा अयोग्य वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी २६ विरोधी पक्षांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार अविनीश मिश्रा यांनी केली आहे.
‘या’ राजकीय पक्षांविरोधात गुन्हा दाखल
इंडियन नॅशनल काँग्रेस (INC)
ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC)
द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK)
आम आदमी पक्ष (AAP)
जनता दल (संयुक्त)
राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)
झारखंड मुक्ती मोर्चा (JMM)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) – (शरद पवार गट)
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (NC)
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP)
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय)
रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (RSP)
शिवसेना (UBT)
समाजवादी पक्ष (एसपी)
राष्ट्रीय लोक दल (आरएलडी)
अपना दल (कमेरवादी)
ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक
मरुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (MDMK)
विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK)
कोंगुनाडू मक्कल देसाई काची (KMDK)
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी)
मनिथनेय मक्कल काची (MMK),
इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML)
केरळ काँग्रेस (M)
केरळ काँग्रेस (जोसेफ)
विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - अनिष-रिदम जोडीला मिश्र गटात कांस्यपदक :
युवा नेमबाज अनिष भानवाला आणि रिदम सांगवान यांनी ‘आयएसएसएफ’ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतील २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटात कांस्यपदक पटकावले.
भारताच्या या जोडीने चेक प्रजासत्ताकच्या अॅना डेडोव्हा आणि मार्टिन पोधरास्की जोडीला १६-१२ अशा फरकाने नमवले. या जोडीने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील हे दुसरे पदक पटकावले. यापूर्वी, त्यांनी मार्चमध्ये कैरो येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले होते.
२५ मीटर रायफल मिश्र सांघिक गटात विजयवीर सिधू आणि सिमरनप्रीत कौर ब्रार यांना सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. याचप्रमाणे ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स मिश्र सांघिक गटात भारताच्या दोन जोडय़ांचे पदक थोडक्यात हुकले. संजीव राजपूत आणि अंजुम मुदगिलला पाचवे तर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि आशी चौक्सी जोडीला सहावे स्थान मिळाले. या स्पर्धेत भारताने १४ पदकांसह (पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्यपदके) पदकतालिकेत अग्रस्थान कायम राखले आहे.
आता गुगल मॅपवरही औरंगाबादच्या जागी दिसणार ‘संभाजी नगर’ :
औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती. या निर्णयानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. मात्र यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नव्या सरकारतर्फे यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे होणारच, नामांतराला स्थगिती दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा विषय खूपच चर्चेत आहे. नामांतराचा मुद्दा तापलेला असतानाच एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे. गुगल मॅप्सवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजी नगर’ करण्यात आले आहे. इतकेच नाही तर गुगलवरही औरंगाबादचे नाव बदलण्यात आले आहे. आता गुगलवर औरंगाबाद शहर असं टाइप केल्यानंतर तिथे औरंगाबादच्या जागी संभाजीनगर असं लिहून येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकराने मंजुरी दिली असली तरीही एमआयएमने या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे आता गुगल मॅपवर संभाजीनगर असा उल्लेख आल्याने पुन्हा वादाला तोंड फुटणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऋषी सुनक यांची आघाडी :
ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेतेपद आणि देशाचे पंतप्रधानपद यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेत भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी पुन्हा आघाडी घेतली. मंगळवारी झालेल्या मतदानाच्या फेरीत त्यांना सर्वाधिक पसंती मिळाली. या फेरीत केमी बदनोच यांचे आव्हान संपुष्टात आले.
त्यामुळे या पदांवर दावा करणाऱ्या दोन उमेदवारांत समावेश होण्यासाठी सुनक हे अल्प अंतरावर आहेत. माजी चॅन्सेलर असलेल्या सुनक यांना चौथ्या फेरीत त्यांच्या पक्षातून ११८ मते मिळाली.
अंतिम फेरीच्या लढतीत कायम राहण्यासाठी या पक्षाची १२० मते किंवा एकतृतीयांश खासदारांचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे.
लांबणीवर पडलेली आशियाई क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी २३ सप्टेंबरपासून :
लांबणीवर पडलेली आशियाई क्रीडा स्पर्धा हांगझो येथे पुढील वर्षी २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे, अशी घोषणा मंगळवारी आशियाई ऑलिम्पिक परिषदेने केली आहे.
आशियाई स्पर्धेचे १९वे पर्व १० ते २५ या सप्टेंबर या दरम्यान होणार होते. परंतु चीनमधील करोनाच्या साथीमुळे ६ मे रोजी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.
‘‘कृती दलाकडून गेले दोन महिने चीन ऑलिम्पिक समिती, हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धा संयोजन समिती आणि अन्य भागधारकांशी तारखांसदर्भात चर्चा सुरू होती. अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या कार्यक्रमपत्रिकांचा अंदाज घेऊनच कृती दलाने सुचवलेल्या तारखांना संयोजन समितीने मंजुरी दिली,’’ अशी माहिती चीन ऑलिम्पिक समितीने दिली.
भारतीय कुस्ती महासंघाची नाराजी - आशियाई स्पर्धेच्या तारखांबाबत भारतीय कुस्ती महासंघाने नाराजी प्रदर्शित केली आहे. कारण जागतिक अजिंक्यपद स्पर्धा रशियात १६ ते २४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. परंतु आशियाई स्पर्धेला २३ सप्टेंबरपासूनच प्रारंभ होणार आहे. त्यामुळे कुस्तीपटूंपुढे लागोपाठच्या स्पर्धाची आव्हाने असतील. भारतीय कुस्तीपटूंना रशियातून थेट चीनला रवाना व्हावे लागणार आहे. जागतिक स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा लाभला आहे.
रुपयाची ऐतिहासिक पडझड; डॉलरच्या तुलनेत गाठला ८० चा टप्पा :
भारतीय चलन रुपयाचं डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमुल्यन झालंय. मंगळवारी (१९ जुलै) ८०.०५ रुपये प्रति डॉलरपर्यंत ही पडझड झाली. आजपर्यतच्या इतिहासातील हे रुपयाचं सर्वात निचांकी मूल्य आहे. मागील काही दिवसांपासून रुपयाच्या मुल्यात सातत्याने पडझड सुरू आहे. मागील सत्रात रुपया ७९.९७ रुपये प्रति डॉलर होता. मंगळवारी सकाळी रुपयाची सुरुवात ७९.९८ प्रति डॉलरने झाली आणि लगेचच रुपयाचं मूल्य आणखी कमी होऊन ८०.०५ प्रति डॉलर झालं.
रुपयाचं मूल्य ८०.०५ पर्यंत खाली आल्यावर ते रुपया ७९.९३/९४ प्रति डॉलर ट्रेंड करत होता. सोमवारी परदेशी चलन बाजारात अमेरिकेन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १६ पैशांनी घसरला आणि ७९.९८ प्रति डॉलरवर बाजार बंद झाला. मंगळवारी बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच रुपयाची ऐतिहासिक पडझड होऊन ८०.०५ च्या स्तरावर गेला.
शुक्रवारी रुपयाच्या मुल्यात १७ पैशांची वाढ झाली आणि बाजार ७९.८२ प्रति डॉलरवर बंद झाला. त्यामुळे काही दिवस रुपयाचं मूल्य ७९.७९ ते ८०.२० प्रति डॉलर असेल, असा अंदाज बाजार विश्लेषकांनी वर्तवला आहे.