राम मंदिर उद्घाटनानिमित्त राज्य सरकारचा मोठा निर्णय, २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. संपूर्ण देशभरात आत्तापासूनच या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टने देशभरातील हजारो दिग्गजांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. तसेच मंदिर ट्रस्ट या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करणार आहे. त्यामुळे देशभरातील नागरिक दृकश्राव्य माध्यमातून हा सोहळा पाहू शकतील. दरम्यान, मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी २२ जानेवारी रोजी हाफ डे घोषित केला आहे. पाठोपाठ महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही मोठा निर्णय जाहीर केला आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गोव्यापाठोठ महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारनेही येत्या २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती की, राज्य सरकारने येत्या २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. राज्य मंत्रिमंडळाने ही मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक काढून ही सुट्टी जाहीर केली आहे.
महाराष्ट्राआधी उत्तर प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड सरकारने २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तर केंद्र सरकारने हाफ डे घोषित केला आहे.
सहा दिवस बँका बंद
हजरत मोहम्मद अली यांच्या जयंतीनिमित्त २५ जानेवारी रोजी बँकांना सुट्टी असणार आहे. तर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी आहे. त्यामुळे या दिवशीदेखील बँका बंद असतील. २७ जानेवारी रोजी या महिन्यातला चौथा शनिवार असल्याने याही दिवशी बँका बंद असणार आहेत. २१ आणि २८ जानेवारी रोजी रविवार आहे. तर २२ जानेवारी रोजी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याचाच अर्थ २१ जानेवारी ते २८ जानेवारी या आठ दिवसांपैकी केवळ दोनच दिवस (२३, २४ जानेवारी) बँका सुरू असतील.
नवऱ्याचा पाठिंबा, कुटुंबाची साथ; ‘एमपीएससी’त मुलींमध्ये पूजा वंजारी राज्यात अव्वल
एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात मुलींमध्ये पिंपरी- चिंचवडची पूजा वंजारी अव्वल आली आहे. संसार आणि अभ्यास अशी कसरत करून तिने हे यश संपादन केल्याने तिचे विशेष कौतुक होत आहे. पूजाला तिच्या पतीचा पाठिंबा मिळाला. एक वेळ स्वयंपाक राहू दे मात्र अभ्यास कर, असं तिच्या पतीने ठणकावून तिला सांगितलं. स्पर्धा परीक्षेसाठी पती खंबीरपणे पाठीशी उभे राहिले, असं पूजाने लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितले.
९०० पैकी ५७०.२५ गुण मिळवत पूजा राज्यात मुलींमध्ये अव्वल आली आहे. शैक्षणिक आणि शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या पूजाला आपण अधिकारी होऊ शकतो असा विश्वास आधीपासूनच होता. तो खऱ्या अर्थाने एमपीएससी (MPSC) उत्तीर्ण करत तिने सत्यात उतरवला आहे. आठव्या वेळी ती यश संपादन करू शकली.
लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना पूजा म्हणाली, हा क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. आम्ही सर्व खूप आनंदी आहोत. अनेक वर्षांच्या कष्टाचे चीज झाले आहे. माझ्या कुटुंबात माहेरी वडील शेती करतात तशी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. २०१५ मध्ये ठरवलं होतं की आपण एमपीएससी करायची. मी अधिकारी होऊ शकते असा मला विश्वास होता.
पुढे ती म्हणाली, एमपीएससीमध्ये यशापेक्षा अपयश जास्त बघावं लागतं हे तितकंच खरं आहे. ते माझ्या बाबतीत खरंही ठरलं. कोविड काळात स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या यशात कुटुंबाचा मोठा वाटा आहे. माझं लग्न झालेलं आहे. लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात. अनेक मुली लग्नानंतर शिक्षणाबाबतची स्वप्न तिथेच सोडून देतात. माझ्या बाबतीत मात्र पतीचे खूप सहकार्य मला मिळाले. माझे पती खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. घरात एक वेळ स्वयंपाक करू नकोस पण अभ्यास कर, असं पती नेहमी म्हणायचे असं पूजा म्हणाली.
‘शक्तिपीठ’ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग, ७६० ऐवजी आता ८०५ किमी; ‘एमएसआरडीसी’कडून राज्य सरकारला प्रस्ताव सादर
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या संरेखनानुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता ७६० किमीऐवजी ८०५ किमी लांबीचा असणार आहे. एमएसआरडीसीने संरेखन अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारला पाठवला आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. संरेखन आणि आराखडा शक्य तितक्या लवकर मंजूर करून घेण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे.
राज्यातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएसआरडीसीने ४२१७ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग यापैकीच. समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा, ७०१ किमी लांबीचा महामार्ग आहे. पण आता समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे.
‘शक्तिपीठ’ महामार्गाची चाचपणी झाली तेव्हा हा प्रकल्प समृद्धीपेक्षा अधिक लांबीचा अर्थात ७६० किमीचा असेल असे स्पष्ट झाले होते. मात्र आता एमएसआरडीसीने या महामार्गाचे संरेखन अर्थात महामार्ग कुठून आणि कसा जाईल यासंबंधीचा मार्ग निश्चित केला आहे. या संरेखनानुसार आता ‘शक्तिपीठ’ महामार्ग ७६० किमीऐवजी ८०५ किमी लांबीचा असेल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. सुरुवातीला ढोबळमानाने संरेखन ठरविले जाते. मात्र प्रत्यक्षात सविस्तर संरेखन होते, तेव्हा अनेक बाबींचा विचार करून संरेखन करावे लागते. त्यानुसार केलेल्या संरेखनात महामार्ग ४५ किमीने वाढला आहे. आता हे संरेखन अंतिम करण्यासाठी यासंबंधीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारला पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘या’ देशाचं भारताच्या पावलावर पाऊल, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश, चौथ्या प्रयत्नात यशस्वी
जपानचं स्लिम मून मिशन यशस्वी झालं आहे. या चांद्रमोहिमेअंतर्गत जपानने त्यांचं अवकाशयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलं आहे. याद्वारे जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. जपानच्या आधी भारत, रशिया, अमेरिका आणि चीन हे देश चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरले आहेत. स्लिम म्हणजे स्मार्ट लँडर फॉर इन्वेस्टिगेटिंग मून मिशन (SLIM – Smart Lander for Investigating Moon). या यशस्वी मोहिमेनंतर जपानची अंतराळ संशोधन संस्था JAXA चं जगभरात कौतुक होत आहे.
गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी जपानी अंतराळ संशोधन केंद्राचं हे अवकाशयान चंद्राच्या दिशेनं झेपावलं होतं. चार महिन्यांच्या प्रवासानंतर हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. २५ डिसेंबर रोजी या यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. या यानाची लांबी २.४ मीटर आणि रुंदी २.७ मीटर इतकी आहे. या यानाच्या लँडरचं वजन २०० किलो इतकं आहे. यामध्ये रडार, लेजर रेंज फाइंडर आणि व्हिजन बेस्ड नेव्हिगेशन सिस्टिम आहे.
या अवकाशयानावरील कॅमेरे चंद्राच्या पृष्ठभागाचे, तिथल्या दगड-मातीचे स्पष्ट फोटो क्लिक करतील आणि ते JAXA ला पाठवले जातील. तसेच यामध्ये लुनार एक्स्पोरेशन व्हेईकल आणि लुनार रोबोटदेखील आहे. यामध्ये वापरण्यात आलेलं पिन पॉइंट लँडिंग तंत्रज्ञान हे अशी अवकाशयानं इतर ग्रहांवर उतरवण्यासाठी योग्य आहें असं JAXA ने म्हटलं आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रावरील लँडिंग केलेल्या जागेपासून १०० मीटरपर्यंतच्या परिसराचं सर्वेक्षण केलं जाईल, असंही JAXA ने सांगितलं आहे.
लँडिंग साईट आहे ‘खास’
ज्या जागेवर हे यान उतरवण्यात आलं त्या लँडिंग साईटला शिओली क्रेटर असं नाव देण्यात आलं आहे. हा चंद्रावरील सर्वाधिक गडद अंधार असलेला परिसर आहे. चंद्राचा पृष्ठभाग पाहिल्यास त्यावरील एक सर्वाद गडद काळा डाग म्हणजे ही लँडिंग साईट आहे. चंद्रावर असा आणखी एक डाग (गडद अंधार असलेला प्रदेश) आहे. मेयर नेक्टारिस असं त्या साईटचं नाव आहे. या जागेला चंद्राचा समुद्रदेखील म्हटलं जातं. जपाने अंतराळ संशोधन केंद्र आता शिओली क्रेटर प्रदेशात संशोधन करणार आहे.
मधुर हास्य! कपाळावर टिळा, कोदंडधारी राम मूर्तीचे प्रसन्न भाव पाहून आपोआप हात जोडले जातील
देशभरातील नागरिकांना प्रतीक्षा असलेल्या अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन येत्या २२ जानेवारी रोजी केलं जाणार आहे. या दिवशी मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टने देशभरातील अनेग दिग्गजांना, मोठ्या नेत्यांना, कलाकार, खेळाडू आणि साधू-संतांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. हजारोंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल.
दरम्यान, १८ जानेवारी रोजी मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आली. या मंदिरातला मूर्तीचा पहिला फोटो आता समोर आला आहे. ही मूर्ती मंदिरात आणताना एका वस्त्रात गुंडाळली होती. तसेच मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती. आत ती पट्टी काढण्यात आली आहे. त्यामुळे श्रीरामाचं दर्शन झालं आहे. मंदिरात रामलल्ला म्हणजेच बाळ रुपातील रामाची मूर्ती असणार आहे. तसेच शिल्पकार अरुण योगीराज यांनी शाळीग्राम दगडापासून घडवलेली रामाची मूर्तीही असणार आहे. अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती गाभाऱ्यात ठेवण्यात आली आहे. याच मूर्तीचा फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावर या फोटोची चर्चा होतेय.
रामाची ही मूर्ती खूप आकर्षक आहे. मधुर हास्य, कपाळावर टिळा, हातात सोन्याचा धनुष्यबाण असलेल्या रामाचं लोभस रूप या मूर्तीत पाहायला मिळालं आहे. मूर्तीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेल्या सर्व कामगारांनी गाभाऱ्यात मूर्ती ठेवल्यानंतर हात जोडून प्रार्थनादेखील केली. तसेच रामनामाचा जप केला.
अरूण योगीराज यांनी साकारली श्रीरामाची मूर्ती
कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. मैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत. अरुण योगीराज यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्पं साकारली आहेत. अरुण यांच्या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेलं आहे. अरुण यांचे वडील योगीराज हे देखील कुशल शिल्पकार. तर, त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना मैसूरच्या राजानं संरक्षण दिलं होतं.
देशभरातील पन्नास टक्क्यांहून अधिक प्राथमिक शिक्षकांकडे किमान पात्रतेचा अभाव
देशभरातील प्राथमिक शिक्षकांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक शिक्षक हे शिक्षणशास्त्र पदविका, पदवी असे किमान पात्रता निकष पूर्ण करणारे नाहीत, तर बहुसंख्य शाळांमध्ये गणित, विज्ञान आणि इंग्रजी अध्यापनासाठी त्या विषयांतील पदवीधर शिक्षक नसल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने केलेल्या अभ्यासातून उघड झाले आहे.
असरच्या अहवालातून नुकतेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अधोगतीचे दाखले मिळाल्यानंतर आता देशभरातील शाळांमधील शिक्षकांची स्थितीही फारशी बरी नसल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सेंटर फॉर एक्सलन्स इन टीचर्स एज्युकेशनने केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांतून दिसते आहे. देशभरातील प्राथमिक शिक्षकांपैकी अवघे ४६ टक्के शिक्षक हे शिक्षणशास्त्रातील पदविकाधारक (डीएड), किंवा पदवीधारक (बीएड) आहेत. खासगी शाळांमध्ये अपात्र शिक्षकांची संख्या तुलनेने अधिक आहे. पदवीचे शिक्षण ज्या विषयात घेतले आहे त्याच विषयाचे अध्यापन करण्याची संधी ६८ ते ७० टक्के शिक्षकांना मिळाली असली तरी गणित, विज्ञान, इंग्रजी विषय शिकवण्यासाठी शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे शिक्षण गणित विज्ञान किंवा इंग्रजी विषय शिकवण्यासाठी पदवीचे शिक्षण या विषयांतील नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे विषय शिकवणाऱ्या शिक्षकांपैकी ३५ ते ४० टक्के शिक्षकांची पदवी गणित, विज्ञान किंवा इंग्रजी विषयांतील नाही.
या अहवालाचे प्रकाशन गुरूवारी केंद्रीय शालेय शिक्षण सचिव संजय कुमार यांच्या हस्ते, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, सेंटर फॉर एक्सलन्स इन टीचर्स एज्युकेशनच्या अध्यक्ष पद्मा शारंगपाणी यांच्या उपस्थितीत करण्यात आहे.
खासगी शाळांचा वरचष्मा, तरी शिक्षकांची पळवणूक
एकूण शिक्षकांपैकी खासगी शिक्षणसंस्थांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक शिक्षक हे खासगी शिक्षणसंस्थांमध्ये कार्यरत आहेत. तेथे त्यांना पायाभूत सुविधा अधिक चांगल्या मिळतात. मात्र, खासगी संस्थांतील शिक्षकांना अल्प वेतनावर काम करावे लागत असल्याचे दिसते आहे. पन्नास टक्क्यांहून अधिक शिक्षकांना कोणतीही हमी, कायदेशीर कंत्राट याशिवायच काम करावे लागते.
पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता रोखला
राज्यातील दहाही पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मंजूर असलेला प्रोत्साहन भत्ता रोखण्यात आला आहे. त्यामुळे या प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नाशिक, जालना, लातूर, नागपूर, केगाव (सोलापूर), मरोळ-मुंबई, अकोला, दौंड-नानवीज, खंडाळा, तुरची, धुळे या शहरात पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत. या प्रशिक्षण केंद्रातूनच राज्यभरातून आलेल्या नवनियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. याच प्रशिक्षण केंद्रामधून शस्त्र आणि शारीरिक शिक्षणासह कायद्याचे ज्ञानार्जन होते.
प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांची पहिली शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस खात्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हीच बाब हेरून फेब्रुवारी १९९९ ला गृहविभागाने प्रशिक्षण केंद्रात नियुक्ती झालेल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक टप्पा पदोन्नती बहाल केली. या निर्णयामुळे ‘साईड पोस्टिंग’ असली तरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंद होता.
तब्बल १६ वर्षांनंतर गृहविभागाला उपरती आली आणि त्यांनी नोव्हेंबर २०१५ ला एक टप्पा पदोन्नती अचानकपणे बंद केली. पदोन्नतीऐवजी ३० टक्के प्रोत्साहन भत्ता मंजूर केला. तशा प्रकारचा आदेश तत्कालिन विशेष पोलीस महानिरीक्षक अर्चना त्यागी यांनी काढला. त्यामुळे प्रशिक्षण केंद्रात असंतोष निर्माण झाला.
एमपीएससीच्या चाळणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीतील चाळणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता या परीक्षा ८ फेब्रुवारीला होणार आहेत.
एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. नगरविकास, विधी आणि न्याय, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य, सार्वजनिक आरोग्य या विभागांतील पदांसाठी गेल्यावर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच ही परीक्षा ३० जानेवारीला घेण्याचे नियोजन एमपीएससीने केले होते. मात्र, प्रशासकीय कारणास्तव या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
आता ८ फेब्रुवारीला वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. २६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकातील अटीशर्तींमध्ये बदल करण्यात आले नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.
राष्ट्रपतींचे अभिभाषण संसदेच्या नव्या इमारतीमध्ये
केंद्रीय गृहबांधणी व नागरी विकास मंत्रालयाने संसदेच्या नव्या इमारतीच्या अंतरंगाची छायाचित्रे प्रसिद्ध केल्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे सत्र तरी नव्या जोशात सुरू होऊ शकते. यासंदर्भात केंद्र सरकारने अजूनही संदिग्धता कायम ठेवली असली तरी, राष्ट्रपतींचे अभिभाषण नव्या इमारतीमध्ये होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.
‘सेंट्रल विस्ता’ प्रकल्पाअंतर्गत संसदेची नवी इमारत बांधली जात असून गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीमध्ये घेण्याचा मनोदय केंद्र सरकारकडून व्यक्त केला गेला होता.
मात्र, हिवाळी अधिवेशनापर्यंत बांधकाम पूर्ण न झाल्याने संसदभवनाच्या जुन्या इमारतीमध्ये संपूर्ण अधिवेशन घेतले गेले. नव्या वर्षांतील पहिले अधिवेशन म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पाही जुन्या इमारतीमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदाचा अर्थसंकल्प जुन्या इमारतीमध्ये सादर करतील, असे समजते.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सुरू होत असून पहिल्या दिवशी राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल तसेच, आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध केले जाईल. दुसऱ्या दिवशी, १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होईल. संसदेच्या नव्या इमारतीच्या अंतरंगातील काम पूर्ण झाले तर अधिवेशनाचा दुसरा टप्पा नव्या इमारतीमध्ये घेतला जाऊ शकतो. नव्या इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी खासदारांना स्मार्ट कार्ड दिले जाणार असून ती लवकरच उपलब्ध करू दिली जाणार आहेत. नव्या संसदभवनामध्ये मध्यवर्ती सभागृह नसेल पण, दोन्ही सदनांतील सदस्य बसू शकतील एवढी लोकसभेच्या सभागृहाची क्षमता असल्याने इथेच राष्ट्रपतींचे अभिभाषण होऊ शकेल.
महिलांसाठी अनुकूल शहरांत पुणे दुसऱ्या क्रमांकावर… चेन्नईचा पहिला क्रमांक
स्त्री शिक्षणासाठी आणि नोकरी-उद्योग व्यवसायासाठी घराबाहेर पडू लागली. प्रवास करु लागली, तशा तिच्या गरजाही वाढल्या. या गरजांकडे अजूनही पुरेसे लक्ष दिलं जातं असं नाही. पण मोठ्या शहरांमध्ये किमान काही प्रमाणात का होईना विचार होऊ लागला आहे हे खरं आहे.
अर्थात अजूनही महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता अशा अनेक सुधारणा होणं बाकी आहे, अशा निकषांचा विचार करूनच एक सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये चेन्नई शहर हे महिलांसाठी सर्वांत चांगलं सुरक्षित शहर असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर पुणे दुसऱ्या क्रमांवार आहे. त्यानंतर बंगळुरू, हैदराबाद आणि मुंबईचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे राजधानी दिल्ली यामध्ये १४ व्या क्रमांकावर आहे.
देशातील राजधानीच्या फक्त १० शहरांनी पहिल्या २५ शहरांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. टॅलेंट स्ट्रॅटेजी कन्सल्टींग फर्म ‘अवतार’ (Avtar)च्या वतीने हा अहवाल तयार करण्यात आला आहे, यामध्ये एकूण १११ शहरांची यादी देण्यात आली आहे.
या सर्वेक्षणामध्ये फक्त महिलांची सुरक्षितता हा मुद्दा होता. पण तोच एकमेव मुद्दा नव्हता. तर यामध्ये राजकीयदृष्ट्टया, सामाजिक-आर्थिकदृष्ट्या, पर्यावरणदृष्ट्या आणि महिलांच्या विकासाच्या दृष्टीने कोणती शहरं उत्तम कामगिरी करत आहेत असे निकष होते. विशेष म्हणजे यामध्ये उत्तरेकडील राज्यांमधील शहरांपेक्षा दक्षिणेकडील शहरांनी बाजी मारल्याचं दिसून येत आहे.
या संस्थेनं सर्वेक्षण करताना पाच महत्त्वाचे निकष ठेवले होते- राहण्यासाठीच्या सुविधा, सुरक्षितता, महिला प्रतिनिधित्व आणि महिला सक्षमीकरणासाठी उचलण्यात आलेली पावले हे निकष होते. तसंच या शहरांमध्ये काम करत असलेल्या विविध संघटना आणि यापैकी किती संघटना विशेषत: महिलांसाठी काम करत आहेत हा मुद्दाही विचारात घेण्यात आला होता. दक्षिण किंवा पश्चिमेकडील राज्यांमधील राजकीय, ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता या राज्यांमध्ये महिलांना रोजगाराच्या संधी जास्त असणं स्वाभाविक आहे असं अवतार ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष सौंदर्य राजेश यांचं म्हणणं आहे.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न देणार राजीनामा; म्हणाल्या, “आता ती वेळ…”
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच यापुढं निवडणूक लढणार नसल्याचंही अर्डर्न यांनी जाहीर केलं आहे. गुरुवारी पक्षाची कॉकस बैठक पार पडली. या बैठकीत ७ फेब्रुवारीपर्यंत राजीनामा देणार असल्याचं अर्डर्न यांनी सांगितलं. यामुळे सर्वांनाच एक धक्का बसला.
न्यूझीलंडमध्ये ऑक्टोंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. गुरुवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत अर्डर्न यांनी म्हटलं की, “आता ती वेळ आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी विचार केली की, माझ्याकडं देशाचं नेतृत्व करण्याची शक्ती आहे का? पण मला याचं उत्तर नाही मिळालं. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.”
“पंतप्रधान म्हणून साडेपाच वर्षे खडतर होती. पण, राजकीय नेता देखील शेवटी माणूसच आहे. जोपर्यंत आमच्यावर जबाबदारी होती, ती चोख पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आम्ही केल्या. खरा नेता तो आहे, ज्याला पद सोडण्याची योग्य वेळ माहिती असते. मात्र, याचा अर्थ मी कमकुवत आहे, असा मुळीच नाही,” असं अर्डर्न यांनी सांगितलं.
सर्वात तरुण पंतप्रधान - २०१७ साली जेसिंडा अर्डर्न या सर्वात तरुण महिला पंतप्रधान बनल्या. करोना महामारी, दोन मस्जिदींवर दहशतवादी हल्ला, ज्वालामुखी विस्फोट अशा खडतर काळातही न्यूझीलंडचं नेतृत्व जेसिंडा अर्डर्न यांनी केलं आहे.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० जानेवारी २०२२
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा - भारताचे विदित, अर्जुन आघाडीवर :
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेतील मास्टर्स आणि चॅलेंजर्स विभागात अनुक्रमे भारताचा विदित गुजराथी आणि अर्जुन इरिगेसी यांनी आघाडी मिळवली आहे. याव्यतिरिक्त आर. प्रज्ञानंदने पहिल्या विजयाची नोंद केली.मास्टर्स विभागातील चौथ्या फेरीच्या सामन्यात ग्रँडमास्टर विदितने रशियाच्या आंद्रे इसिपेन्कोला बरोबरीत रोखले.
विदितच्या खात्यात चौथ्या फेरीअंती ३ गुण असून जगज्जेत्या मॅग्नल कार्लसनसह एकूण सहा जण २.५ गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहेत. तिसऱ्या फेरीत पराभव पत्करणाऱ्या प्रज्ञानंदने स्वीडनच्या निल्स ग्रँडेलियसला धूळ चारून एकूण गुणसंख्या दोनवर नेली. कार्लसनला जॉर्डन फोरेस्टविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. पाचवी फेरी गुरुवारी होईल.
चॅलेंजर्स विभागात १८ वर्षीय अर्जुनने रोवन वोगेलला नमवून आघाडी मिळवली. चौथ्या फेरीअखेर अर्जुनच्या खात्यात ३.५ गुण जमा आहेत. सूर्यशेखर गांगुलीने डॅनिएल डर्धाला बरोबरीत रोखून एकूण गुणसंख्या २.५वर नेली. तो सध्या संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारत- अमेरिका मार्गावरील विमाने रद्द :
उत्तर अमेरिकेत ५ जी इंटरनेट लागू करण्यात आल्याने विमानांच्या संचालनात (नेव्हिगेशन) अडथळा येऊ शकतो म्हणून एअर इंडियाने भारत- अमेरिका मार्गावरील १४ विमानोड्डाणे बुधवारपासून रद्द केली.
अमेरिकेत ५ जी इंटरनेटमुळे उद्भवलेल्या परिस्थतीवर मात करण्यासाठी भारतातील हवाई वाहतूक नियामक आपल्या विमान कंपन्यांशी समन्वयाने काम करीत आहे, असे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) प्रमुख अरुण कुमार यांनी पीटीआयला सांगितले.
१५-१८ वयोगटातील ५० टक्के मुलांना पहिली मात्रा :
देशातील १५ ते १८ वयोगटातील ५० टक्के मुलांनी करोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा घेतली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली. देशातील तरुणाईचा लसीकरणाचा एक टप्पा पूर्ण होणे हे प्रेरणादायी आहे, असे मंडाविया म्हणाले.
१५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ३ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. दोन आठवड्यांतच निम्म्याहून अधिक मुलांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. करोनाशी लढा देणाऱ्या भारतासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे, असे मंडाविया यांनी सांगितले. ‘शाब्बास माझ्या तरुण मित्रांनो! लसीकरणाबाबत असलेला तुमचा उत्साह देशातील अन्या नागरिकांना प्रेरणा देणारा आहे,’ असे कौतुकोद्गार आरोग्यमंत्र्यांनी काढले.
१५ ते १८ वयोगटाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लवकरच १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु?; वर्षा गायकवाड यांची महत्वाची माहिती :
करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावरुन नाराजी आणि विरोध होत आहे. विद्यार्थी पालकांसह शिक्षकांनीही सरसकट शाळा बंद विरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे.
शाळा बंद करण्यापेक्षा नियोजन करून शाळा सुरू ठेवाव्या, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यासंबंधी सरकार निर्णय घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “मधील काळात शिक्षणतज्ज्ञ किंवा पालक संघटनांशी चर्चा झाली त्यावेळी आम्हाला पत्रं, निवदेनं प्राप्त झाली. शाळा सुरु झाल्या पाहिजे असं अनेकांचं म्हणणं होतं. पण मधील काळात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याने सरकारने शाळा, महाविद्यायलं सुरु करु नयेत असा निर्णय घेतला होता”.
“तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला. त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव सादर केला आहे. येत्या सोमवारपासून शाळा सुरु कऱण्याचा विचार करावा असं प्रस्तावात सांगण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेतला जावा. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली असून सकारात्मक प्रतिसाद येईल अशी अपेक्षा आहे,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.
औरंगाबाद मेट्रो जालन्यापर्यंत जोडण्याची मागणी :
सध्या प्रस्तावित असलेला औरंगाबाद येथील वाळूज ते शेंद्रा औद्योगिक वसाहती दरम्यानचा मेट्रो रेल्वे मार्ग पुढे जालना औद्योगिक वसाहतीपर्यंत न्यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली असतानाच आणखी आजी-माजी लोकप्रतिनिधींनी या मागणीची री ओढली आहे.
महामेट्रोच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात वाळूज ते शेंद्रा औद्योगिक वसाहत आणि बिडकीन ते हर्सुलदरम्यान दोन मेट्रो रेल्वे मार्ग प्रस्तावित आहेत. हा प्रस्ताव सध्या विचाराधीन असून त्या संदर्भातील तपशीलवार प्रकल्प अहवालास (डीपीआर) आणखी काही महिने लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर खोतकर म्हणाले, शेंद्रा येथील औद्योगिक वसाहत आणि जालना येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीदरम्यान जवळपास ३५ किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे प्रस्तावित मेट्रो रेल्वेमार्ग पुढे जालना औद्योगिक वसाहतीपर्यंत नेणे सयुक्तिक ठरणार आहे.
जालना जिल्ह्याचा ८० टक्के भाग पूर्वी औरंगाबाद जिल्ह्याचाच भाग होता. जालना आणि औरंगाबाद शहरांमध्ये दैनंदिन दळणवळण मोठ्या प्रमाणावर असते. जालना औद्योगिक वसाहतीचा तिसरा टप्पा आता विकसित झालेला आहे. या वसाहतीमधील कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
त्यामुळे वाळूज आणि शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या दरम्यान महामेट्रोच्या माध्यमातून मेट्रो रेल्वे मार्ग टाकण्याचा डीपीआर तयार करताना तो तेवढ्या मर्यादेतच ठेवू नये. तर ही मेट्रो रेल्वे जालना औद्योगिक वसाहतीपर्यंत नेण्याचा विचार करून डीपीआर तयार करावा, अशी अपेक्षा खोतकर यांनी व्यक्त केली.
सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा :
भारताची तारांकित टेनिसपटू सानिया मिर्झाने २०२२ हे कारकीर्दीतील अखेरचे वर्ष असल्याची घोषणा बुधवारी केली आहे.
मार्च २०१९मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर ३५ वर्षीय सानियाने पुनरागमन केले. मात्र करोनाच्या साथीमुळे तिच्या वाटचालीवर परिणाम झाला. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभवानंतर सानियाने निवृत्तीची घोषणा केली. महिला एकेरीतही सानियाने जागतिक क्रमवारीत २७व्या क्रमांकापर्यंत मुसंडी मारली होती. परंतु मनगटाच्या दुखापतीमुळे सानियाने एकेरीऐवजी दुहेरीकडे लक्ष केंद्रीत केले आणि तिला अनपेक्षित यश मिळाले.
‘‘मला वाटले आता खेळू नये, म्हणून निवृत्तीच्या निर्णयापर्यंत आलेले नाही. अनेक कारणे याला जबाबदार आहेत. मला दुखापतीतून सावरायलाही बराच वेळ लागत आहे. माझा मुलगा तीन वर्षांचा आहे. त्याला सोबत घेऊन स्पर्धेसाठीचा प्रवास करणे हा जोखमीचा आहे. जे मला अधिक महत्त्वाचे वाटते,’’ असे सानियाने सांगितले.