चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० जानेवारी २०२१

Date : 20 January, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘हा’ विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहिल -उद्धव ठाकरे :
  • प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आणि अनेक खेळाडूंना दुखापतीनं ग्रासलेलं असताना भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात शानदार कामगिरी केली.

  • महत्त्वाचं म्हणजे ‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाची विजयाची परंपरा भारतानं गुंडाळत २-१ मालिका जिंकली. विजयानंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अभिमान व्यक्त केला आहे.

  • भारताने चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या जोरदार विजयासह मालिका जिंकल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे व टीमचे अभिनंदन केले आहे. “गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील,” असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुलींना वसतिगृहासाठी मिळणार १० हजार रुपयांपर्यंत अनुदान :
  • जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबविल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहासाठी सात हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी दहा हजार रुपये एक रकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

  • याशिवाय मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारीरिक विकासाठी प्रशिक्षण या योजनेमध्ये जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षण यासाठी आता प्रति प्रशिक्षणार्थी ६०० रुपयांऐवजी १ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. इयत्ता सातवी ते बारावी पास मुलीना संगणकाबाबतचे ज्ञान, कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, तसेच ज्या कुटुंबाचे उत्पन्न ५० हजार रुपये असलेल्या कुटुंबातील मुलींना देण्यात येत होता. आता कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा १ लाख २० हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

  • तसेच, महिला व बालकल्याण विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बालकल्याण समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात या समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाचे १० टक्के निधीतून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत काही नवीन बाबी तसेच काही बाबींची दर्जान्नत्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी :
  • राज्याच्या राजकारणात ज्वलंत बनत चाललेल्या मराठा आरक्षण प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. मागील सुनावणी वेळी न्यायालयानं मराठा आरक्षणावरील स्थगित हटवण्यास नकार देत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता. मात्र, या प्रकरणावर पाच दिवस आधी म्हणजेच आजपासून (२० जानेवारी) सुनावणी होणार आहे.

  • सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारनं हे प्रकरण पाच सदस्यीय घटनांपीठाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची मागणी केली होती. मात्र, ९ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला होता. तसेच २५ जानेवारीपासून मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर अंतिम सुनावणी घेण्यात येईल, असं सांगितलं होतं. मात्र, आजपासूनच या प्रकरणावर सुनावणी सुरू होत आहे.

  • न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती अब्दुल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट यांचा समावेश असलेल्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. राज्याच्या अनुषंगानं आणि ठाकरे सरकारच्या दृष्टीनं हा मुद्दा महत्त्वाचा बनलेला असल्यानं सगळ्याचं या सुनावणीकडं लक्ष असणार आहे.

या’ दोन देशांपासून भारताने सावध रहावे; जाता जाता ट्रम्प प्रशासनाचा मैत्रीपूर्ण सल्ला :
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. अवघ्या काही तासांनंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. यापूर्वी मावळते राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी दिलेल्या भाषणामध्ये अमेरिकेतील जनतेला संबोधित केलं.

  • यामध्ये त्यांनी ६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या राजधानीमध्ये कॅपिटॉल हिल येथे झालेल्या हिंसेबद्दल दु:ख व्यक्त केलं. तसेच ट्रम्प सरकारने चीनलाही इशारा दिला. याचवेळी ट्रम्प प्रशासनाने मित्रदेश असणाऱ्या भारताला दोन देशांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

  • ट्रम्प सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून काम करणाऱ्या माइक पोम्पिओ यांनी भारतासाठी एक खास ट्विट केलं आहे. यामध्ये पोम्पिओ यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचे आभार मानले आहे.

  • “ब्रिक्स लक्षात आहे का?,” असा प्रश्न विचारत या ट्विटला पोम्पिओ यांनी सुरुवात केलीय. ब्रिक्स ही ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद आहे. या ट्विटमध्ये पोम्पिओ यांनी ‘बी’ आणि ‘आय’च्या लोकांना ‘सी’ आणि ‘आर’पासून धोका आहे असं म्हटलं आहे. म्हणजेच ब्राझील आणि इंडिया म्हणजेच भारतीय नागरिकांना चीन आणि रशियापासून धोका असल्याचं पोम्पिओ म्हणाले आहेत. ट्र्म्प प्रशासनाच्या काळात भारत आणि अमेरिकेच्या संबंध कायमच मैत्रीपूर्ण राहिले. अनेकदा ट्रम्प आणि मोदी यांनी एकमेकांचे भरभरुन कौतुक केल्याचंही पहायला मिळाल.

२० जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.