चालू घडामोडी आणि दिनविशेष - 20 फेब्रुवारी 2024

Date : 20 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
AI मुळे नोकऱ्या जाणार की वाढणार? आयबीएम इंडियाचे प्रमुख काय म्हणतात नक्की वाचा!
  • गेल्या काही दिवसांपासून एआय या नव्या तंत्रज्ञानाची प्रचंड चर्चा आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असल्याचंही म्हटलं जातंय. क्रिएटीव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांना या एआयचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे एआयच्या उदयामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. परंतु, एआयमुळे नोकऱ्या जाणार नसून नोकऱ्यांमध्ये वाढ होईल, असा विश्वास आयबीएम इंडिया आणि दक्षिण आशियाचे संचालक संदीप पटेल यांनी व्यक्त केलाय. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
  • आयएएनएस या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी तंत्रज्ञानात झालेली प्रगती आणि त्यावर आधारी नवकल्पनांबाबत त्यांची निरिक्षणे शेअर केली. “एआयमुळे नोकरींच्या संधीमध्ये वाढ होणार आहे. जेव्हा नव्या नोकरीची भूमिका असते तेव्हा सर्व भीती व्यक्त करतात”, असं संदीप पटेल म्हणाले. यावेळी त्यांनी इंटरनेट क्रांतीचाही उल्लेख केला. “इंटरनेटमुळे वृत्तपत्र छपाईसारख्या अनेक विशिष्ट क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्या. परंतु, वेब डिझाईन, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग आणि वेब प्रकाशनसारख्या नवीन नोकऱ्या उदयास आल्या. या नव्या नोकऱ्यांमुळे आता लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे”, असंही संदीप पटेल म्हणाले.

रिस्किलिंग काळाची गरज

  • पटेल यांनी रिस्किलींगचा मुद्दा अधोरेखित केला. “सध्या ४६ टक्के भारतीय कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑटोमेशन आणि एआय टुल्सससह सहयोग करण्यासाठी सक्रियपणे प्रशिक्षण देत आहेत किंवा त्यांना पुन्हा कौशल्य शिकवत आहेत. जे या दिशेने पुढील प्रयत्नांसाठी महत्त्वपूर्ण वाव दर्शवितात.”
  • “या परिस्थितीची सरकारला चांगली जाणीव असल्याचंही ते म्हणाले. ते म्हणाले की, अनेक संस्थांमध्ये अनेक कर्मचारी नवं एआय आणि ऑटोमेशन टुल्ससह काम करण्यास उत्सुक आहेत. सध्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचं सर्वांत मोठं आव्हान आहे. प्रत्येकजण कोडर किंवा एआय डेव्हलपर असू शकत नाही. परंतु, या विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे गरजेचं आहे”, असंही ते म्हणाले.
शिवजयंती महोत्सवात हजारो मशालींनी उजळून निघाला किल्ले अजिंक्यतारा
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या रविवारी रात्री किल्ले अजिंक्यतारावर मशाल महोत्सव आणि लेजर शोचे आयोजन करण्यात आले. यामुळे किल्ले अजिंक्यतारा हजारो मशालींनी उजळून निघाला, तर सातारा शहर लेजर शोच्या प्रकाशात न्हाऊन निघाले.
  • आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव समिती यांच्यावतीने रविवारी किल्ले अजिंक्यतावर मशाल महोत्सव, सुनील लाड (कवलापूर, सांगली) यांचे व्याख्यान आणि विविध संस्था व व्यक्तींचा सन्मान सोहळा उत्साहात झाला. या कार्यक्रमाला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, अनेक मान्यवर, असंख्य कार्यकर्ते आणि हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.
  • रात्री सातच्या सुमारास युवक व युवतींचे जथ्थेच्या जथ्थे हातात मशाली घेऊन गडावर आले. गडावर सर्वत्र हे मावळे हातात मशाल घेऊन उभे राहिले. यानंतर एक- एक मशाल पेटु लागली आणि हजारो मशाली गडाच्या सर्व तटबंदीवर पेटल्या. यामुळे अजिंक्यतारा उजळून निघाला. किल्ल्यावरून सातारा शहरावर लेजर शो टाकण्यात आला. यामुळे सातारा शहर वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशात न्हाऊन निघाले.
  • गडावरील राज सदरेवर व्याख्याते सुनील लाड यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात झाला. लाड यांनी छत्रपती शिवरायांच्या विविध पराक्रम आणि कार्याचा लेखाजोखा व्याख्यानात मांडला. यावेळी कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला.
मुख्य माहिती आयुक्तपदासाठी योग्य उमेदवार सापडेना!शेखर चन्ने , प्रदीप व्यास यांची विभागीय आयुक्तपदी वर्णी
  • वर्षभरानंतरही सरकारला राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदासाठी योग्य व्यक्ती सापडेना. माहिती आयुक्तपदासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांसह सुमारे शंबरहून अधिक जणांनी अर्ज केले होते. मात्र त्यातून एकही योग्य उमेदवार सरकारला सापडला नाही. त्यामुळे मुख्य माहिती आयुक्तपदासाठी पुन्हा शोध प्रक्रिया राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्य प्रशासन विभागास दिले आहेत.
  • विभागीय माहिती आयुक्तपदी सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रदीप व्यास, शेखर चन्ने यांच्यासह तिघांची शिफारस करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांचा कार्यकाल फेब्रुवारी २०२३ मध्ये संपल्यापासून हे पद रिक्त आहे. नाशिक, बृहन्मुंबई, कोकण, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर माहिती आयुक्तांपैकी केवळ समीर सहाय- पुणे, राहुल पांडे- नागपूर आणि भूपेंद्र गुरव- नाशिक अशी तीनच माहिती आयुक्तांची पदे भरलेली आहेत. परिणामी सहाय्य यांच्याकडे सध्या पुण्याशिवाय राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि छत्रपती संभाजी नगर व बृहन्मुंबई माहिती आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. तर राहुल पांडे यांच्याकडे अमरावतीचा आणि गुरव यांच्याकडे कोकणचा अतिरिक्त कार्यभार आहे.
  • परिणामी सध्या केवळ तीन आयुक्तांवर राज्यातील माहिती अधिकाराची धुरा असल्याने आयोगाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे सुमारे एक लाखाहून अधिक अपिले प्रलंबित आहेत. त्यामध्ये डिसेंबरअखेर ८८ हजार अपिले तर २५ हजार तक्रारींचा समावेश आहे. आयुक्तपदाच्या या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने जाहिरात काढून पात्र व्यक्तींसाठी राबविलेल्या शोधमोहिमेनुसार सेवानिवृत्त तसेच सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले काही सनदी अधिकारी, माहिती अधिकार कायद्याचे जाणकार अशा सुमारे सव्वाशे जणांनी विविध पदांसाठी अर्ज केले होते. मात्र यातून एकही व्यक्त मुख्य माहिती आयुक्तपदासाठी पात्र सापडली नाही.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदींच्या समितीने शेखर चन्ने, प्रदीप व्यास यांच्यासह तिघांची माहिती आयुक्तपदासाठी शिफारस केली असून एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे. तर माहिती आयुक्तपदासाठी अर्ज दाखल केलेल्या सव्वाशे जणांपेकी मुख्य माहिती आयुक्तपदासाठी एकही सुयोग्य उमेदवार नसल्याचे सांगत नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारला आपल्या मर्जीतील व्यक्तीची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करायची असून त्यासाठी पुन्हा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.
‘कॅशलेस’ हेल्थ इन्शुरन्स बंद! खासगी रुग्णालयांचा निर्णय; विमा कंपन्यांकडे बोट
  • सध्या अनेक खासगी रुग्णालयांकडून आरोग्य विम्याची ( हेल्थ इन्शुरन्स) कॅशलेस सुविधा बंद करण्यात आली आहे. विमा कंपन्या मनमानी आणि जाचक अटी लादत असल्याचे रुग्णालयांचे म्हणणे आहे. यातच आता देशातील कोणत्याही रुग्णालयात ‘कॅशलेस’ आरोग्यविमा सुविधेचा लाभ घेता येईल, असे परिपत्रक जनरल इन्शुरन्स कौन्सिलने (जीआयसी) काढले आहे. त्यामुळे हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाने रुग्णालयांना नव्याने कॅशलेस सुविधा न घेण्याची सूचना केली आहे. यामुळे विमा घेऊनही रुग्णांची कोंडी होऊ लागली आहे.
  • मागील काही काळापासून अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे बंद केले आहे. यामुळे रुग्णांना उपचाराचा खर्च आधी करावा लागत असून, नंतर त्याची भरपाई विमा कंपन्यांकडून घ्यावी लागत आहे. विमा कंपन्यांकडून वेळेत पैसे मिळत नसल्याची अनेक रुग्णालयांची तक्रार आहे. याचबरोबर उपचाराच्या खर्चाचे दरपत्रकही विमा कंपन्यांनी निश्चित केलेले नाही. या कंपन्या मनमानी पद्धतीने रुग्णालयांवर त्यांचे कमी दर लादत आहेत. त्यामुळेही रुग्णालयांमध्ये अस्वस्थता आहे.
  • तेच जीआयसीने सर्व रुग्णालयांत कॅशलेस सुविधा देण्याचे परिपत्रक काढले. आधीच कॅशलेसवरून गदारोळ सुरू असताना या परिपत्रकामुळे गोंधळ आणखी वाढला आहे. जीआयसीने कोणतीही पूर्वतयारी न करता हे परिपत्रक काढले. त्याची कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाणार याबद्दलही स्पष्टता नाही. त्यामुळे नवीन कॅशलेस विमा सुविधेमध्ये सहभागी न होण्याच्या सूचना इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाने रुग्णालयांना केल्या आहेत.
  • कॅशलेस विम्याची सुविधा देताना रुग्णालयांना विमा कंपन्यांकडून कमी दर दिले जातात. नवीन दरपत्रक निश्चित करावे, अशी रुग्णालयांची मागणी आहे. मात्र, विमा कंपन्यांनी नवीन दर निश्चित न केल्याने शहरातील अनेक मोठ्या रुग्णालयांनी १ जानेवारीपासून कॅशलेस सुविधा बंद केली. त्यामुळे रुग्णांना आरोग्य विमा असूनही ही सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे.
जसप्रीत बुमराह रांची कसोटीचा भाग असणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण?
  • राजकोटमध्ये इंग्लंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने जसप्रीत बुमराहला रांची कसोटीतून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रांचीमध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी मुकेश कुमार किंवा अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते. मात्र, धरमशाला येथे होणाऱ्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराह संघात परतणार आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात केएल राहुल परतण्याची शक्यता आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया सध्या २-१ ने आघाडीवर आहे.
  • क्रिकबझच्या रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत राजकोटहून रांचीला जाणार नाही. जसप्रीत बुमराह राजकोटहून थेट अहमदाबादला रवाना होणार आहे. मात्र, जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला रांचीमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीत विश्रांती दिली जाणार नाही. जसप्रीत बुमराहच्या कामाचा ताण हाताळण्यासाठी संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराहने या मालिकेत ८०.५ षटके टाकली आहेत. त्याचबरोबर बुमराह या मालिकेत भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत मालिकेत १७ विकेट्स घेतल्या आहेत.

बुमराहच्या जागी मुकेश कुमारला मिळणार संधी -

  • मात्र जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या मालिकेतील पाचही कसोटी सामने खेळणार नसल्याचे या मालिकेपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. मोहम्मद सिराजला मालिकेतील दुसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आणि तो राजकोटला परतला. दुसऱ्या कसोटीनंतर मुकेश कुमारला संघातून मुक्त करण्यात आले. रांची येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी मुकेश कुमार संघात परतणार आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी मुकेश कुमार प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. मुकेश कुमार खेळत नसेल, तर संघ चार फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतो. अशा स्थितीत अक्षर पटेलचे खेळणे निश्चित आहे.

केएल राहुलचे रांचीत पुनरागमन होण्याची शक्यता -

  • रोहित शर्माच्या संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अनुभवी फलंदाज केएल राहुल पुढील सामन्यात खेळू शकतो. झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या चौथ्या कसोटीत राहुल पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. क्वाड्रिसेप्सच्या ताणामुळे राहुल दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही. हैदराबादमधील पहिल्या कसोटीत चमकलेल्या या स्टार फलंदाजाचा शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला होता, मात्र पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो राजकोटमधील सामन्यात खेळू शकला नाही.

 

कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ हजार धावा
  • भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत २५ हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील सहावा फलंदाज ठरला. मात्र, त्याने हा टप्पा सर्वात कमी सामन्यांत गाठण्याचा विक्रम आपल्या नावे केला.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात ८ धावा केल्यानंतर कोहलीने हा विक्रम आपल्या नावावर केला. कोहलीचा हा ४९२वा आंतरराष्ट्रीय सामना होता. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत २५ हजार धावा पूर्ण करण्यासाठी या सामन्यात कोहलीला ५२ धावांची आवश्यकता होती. त्याने पहिल्या डावात ४४ धावा, तर दुसऱ्या डावात २० धावा केल्या. आता कोहलीच्या नावावर २५,०१२ धावा आहेत.
  • २००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कोहलीने कारकीर्दीत २५ हजार धावा ५४९व्या डावात पूर्ण केल्या. त्यामुळे सर्वात कमी डावांत हा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने ५७७व्या डावात अशी कामगिरी केली होती.कोहलीच्या कसोटी क्रिकेटमध्ये १०६ सामन्यांत ८१९५ धावा, २७१ एकदिवसीय सामन्यांत १२,८०९ धावा, ११५ ट्वेन्टी-२० सामन्यांत ४००८ धावा केल्या आहेत.

‘नीट’ परीक्षेच्या वैधतेला तमिळनाडू सरकारचे आव्हान

  • देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (नीट) वैधतेला आव्हान देणारी याचिका तमिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. अशा प्रकारे एकच सामायिक परीक्षा आयोजित करणे हे संघराज्यवादाच्या तत्त्वाचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप राज्याने केला आहे.
  • सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस व बीडीएस यांसारखे पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रम, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ ही वैद्यकपूर्व प्रवेश परीक्षा घेतली जाते.
  • ‘नीट’ सारख्या परीक्षांमुळे शिक्षणाबाबत निर्णय घेण्याची राज्यांची स्वायत्तता हिरावून घेतली जाणार असल्यामुळे, या परीक्षांमुळे घटनेच्या मूलभूत रचनेचा भाग असलेल्या संघराज्यवादाचे उल्लंघन करतात, असा आरोप राज्य सरकारने घटनेच्या अनुच्छेद १३१ अन्वये दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.
  • पैसे देण्याच्या क्षमतेवर आधारित प्रवेश, कॅपिटेशन फी आकारणे, मोठय़ा प्रमाणावरील अनियमितता, विद्यार्थ्यांची पिळवणूक, नफेखोरी आणि व्यापारीकरण आदी गैरप्रकार रोखण्यासाठी नीट परीक्षा आवश्यक असल्याच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने २०२० साली ही परीक्षा वैध ठरवली होती, मात्र सरकारी जागांवरील प्रवेशाच्या बाबतीत हे आधार लागू नसून, हे तर्क केवळ खासगी महाविद्यालयांतील जागांसाठी लागू आहेत, असे अमित तिवारी या वकिलामार्फत सादर केलेल्या याचिकेत राज्य सरकारने म्हटले आहे.

दक्षिण अफ्रिकेतून भारतात आले आणखी १२ चित्ते, ग्वाल्हेरमध्ये उतरलं वायुसेनेचं विमान

  • ग्वाल्हेर या ठिकाणी १२ आणखी चित्ते पोहचले आहेत. दक्षिण अफ्रिकेतून आणण्यात आलेले हे पाहुणे आता भारतात वास्तव्य करणार आहेत. या चित्त्यांना भारतीय वायुसेनेच्या गॅलेक्सी ग्लोबमास्टर सी १७ या विशेष विमानातून भारतातल्या ग्वाल्हेर या ठिकाणी आणण्यात आलं आहे. विशिष्ट बॉक्समधून हे चित्ते भारतात आणले गेले आहेत.
  • कूनो अभयअरण्यात राहणार चित्ते - या १२ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहे. याआधीही चित्ते भारतात आणले आहेत. भारतातली चित्त्यांची संख्या वाढावी या अनुषंगाने दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात एक करार झाला होता. याआधी ८ चित्ते भारतात आणले गेले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात १२ चित्ते आणले गेले आहेत.
  • चित्ता भारतातून १९५२ मध्येच नामशेष - १९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. मध्य प्रदेशातील जंगलात सोडण्यात आलेले चित्ते नामिबियातील आहेत. त्यांना या वर्षांच्या सुरुवातीला स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराखाली आणण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुनो नॅशनल पार्कमध्ये आठ चित्ते सोडले आहेत. कुनो नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधानांच्या हस्तो चित्ता सोडणे हा भारतातील वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन आणि वैविध्य आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे, निवेदनात म्हटले आहे.

साक्षरतेलाच शिक्षण समजल्यामुळे देशापुढे संकट इतिहासतज्ज्ञ; रोमिला थापर यांचे मत

  • ‘साक्षरता म्हणजेच शिक्षण’ असा समज समाजावर लादला गेल्यामुळे देशापुढे संकट उभे राहिले आहे, असे परखड मत नामवंत इतिहासतज्ज्ञ रोमिला थापर यांनी व्यक्त केले, तसेच स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांमध्ये असलेला बुद्धिवाद सध्याच्या राजकीय नेत्यांमध्ये दिसत नाही अशी खंतही व्यक्त केली. इतिहासतज्ज्ञ एस. इरफान हबीब यांनी लिहिलेल्या मौलाना आझाद यांच्या चरित्राच्या प्रकाशन सोहळय़ामध्ये त्या प्रमुख पाहण्या म्हणून बोलत होत्या.
  • ‘केवळ बाराखडी शिकणे म्हणजे शिक्षण नव्हे तर त्यामुळे मनाचे दरवाजे उघडणे हे शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट असल्याची जाणीव थापर यांनी आपल्या भाषणातून करून दिली. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळचे अनेक नेते बुद्धिवादी होते. ते वाचत असत, विचार करत असत आणि भविष्यात चांगला समाज घडवण्यासाठी ते वचनबद्ध होते. आता ते वातावरण हरवले आहे’ असे त्या म्हणाल्या.
  • स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून काम करताना मौलाना आझाद यांनी सर्व भारतीयांना वय वर्षे १४ पर्यंत शिक्षण अनिवार्य करण्याचा पुरस्कार केला होता. प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे असा विचार त्यांनी मांडल्याची आठवण थापर यांनी करून दिली.

राज्यांना सर्व थकबाकी तातडीने अदा; वस्तू-सेवा कर परिषदेनंतर अर्थमंत्र्यांची घोषणा

अप्रत्यक्ष करप्रणालीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्यांना १६,९८२ कोटींची थकबाकी त्वरित अदा केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. शनिवारी येथे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची बैठक झाल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली. या बैठकीत द्रवरूप गूळ, पेन्सिल शार्पनर यावरील कर घटविण्यात आला आहे.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 20 फेब्रुवारी 2022

 

पंजाब, उत्तर प्रदेशात आज मतदान :
  • पंजाबमधील सर्व ११७ तर उत्तर प्रदेशातील ५९ जागांसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून तेथे मतदानाचे सात टप्पे आहेत.

  • पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असून यावेळी त्या पक्षाला आम आदमी पक्षाने आव्हान दिले आहे. त्याचबरोबर अकाली दल-बसप युती तसेच भाजप-पंजाब लोक काँग्रेस आणि अकाली दल (संयुक्त) यांच्या आघाडीत लढत होणार आहे. पंजाबमध्ये दोन कोटी १४ लाख मतदार असून १३०४ उमेदवार रिंगणात आहेत.

  • उत्तर प्रदेशातील १६ जिल्ह्यांतील ५९ मतदारसंघांत रविवारी मतदान होत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तेथेही मतदान होत आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार केंद्रीयमंत्री एस. पी. सिंह बघेल निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळी या ५९ पैकी ४९ जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्षाला नऊ जागा जिंकता आल्या होत्या.

हिजाब घातल्याने ५८ विद्यार्थिनी निलंबित; कर्नाटकातील अनेक शिक्षण संस्थांनी प्रवेशही नाकारला :
  • कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातील शिरालकोप्पा येथे हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या आणि प्रशासनाविरोधात निदर्शने करणाऱ्या ५८ विद्यार्थिनींना शनिवारी निलंबित करण्यात आले.

  • न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्नाटकाच्या अनेक भागांतील विद्यार्थिनी हिजाब घालून आल्याने त्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. शिवमोगा जिल्ह्यातील शिरालकोप्पा येथे हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या ५८ विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले. ‘‘आम्ही महाविद्यालयात आलो, पण प्राचार्यानी आम्हाला निलंबित केल्याचे सांगितले. पोलिसांनीही आम्हाला महाविद्यालयात येण्यापासून रोखले. आमच्याशी कोणीही संवाद साधला नाही’’, असे निलंबित विद्यार्थिनींनी सांगितले.

  • राज्य सरकारचा आदेश आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाद्वारे विद्यार्थिनींना वर्गात हिजाब किंवा भगवा स्कार्फ घालण्यास मज्जाव करण्यात आला असूनही मुली हिजाब घालून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आल्या होत्या.

‘इंडियन एक्स्प्रेस’चे राजकीय संपादक रवीश तिवारी यांचे निधन :
  • ‘इंडियन एक्स्प्रेस’चे राष्ट्रीय राजकीय संपादक आणि राष्ट्रीय ब्युरोचे प्रमुख रवीश तिवारी यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. रवीश तिवारी यांच्यावर जून २०२० पासून कर्करोगाचे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

  • राजकीय आणि सामाजिक बदलांचा तात्काळ, अचूक वेध घेत त्याचे परखड विश्लेषण करण्याबाबत त्यांची ख्याती होती. 

  • ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील वरिष्ठ पत्रकारांच्या चमूचे नेतृत्व तिवारी यांनी केले. यात केंद्र सरकार, राज्य आणि राष्ट्रीय निवडणुका, पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र धोरण, पायाभूत सुविधा आदी विषयांवरील बातमीदारी त्यांनी केली. बातमीदार आणि संपादक या नात्याने त्यांनी देशभर भ्रमंती केली. या दरम्यान त्यांनी ग्रामीण प्रश्न, शेती, राजकारण यावर लिखाण केले. सध्या ते उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या वार्ताकन मोहिमेचे नेतृत्व करीत होते.

मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची महत्त्वपूर्ण बैठक, ४०वर्षांनंतर भारताला मिळाले यजमानपद :
  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची १४० वी बैठक मुंबईत होणार आहे. शनिवारी बीजिंगमध्ये झालेल्या १३९ व्या ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत भारताने पुढील बैठकीचे यजमानपद मिळवले. या काळात कोणत्याही देशाने भारताला विरोध केला नाही.

  • आता २०२३ मध्ये, भारत दुसऱ्यांदा ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे, तर ही बैठक प्रथमच मुंबईत होणार आहे.

  • भारताकडून अभिनव बिंद्रा, नरिंदर बत्रा आणि नीता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १३९ व्या बैठकीत सहभागी झाले होते. ऑलिम्पिकमध्ये एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अभिनव हा भारताचा पहिला खेळाडू आहे. बत्रा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा आहेत, तर नीता अंबानी भारतीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य आहेत. भारताचे क्रीडा आणि युवा मंत्री अनुराग ठाकूरही या बैठकीला उपस्थित होते.

  • चार दशकांनंतर भारतात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होणार आहे. शेवटचा कार्यक्रम १९८३ मध्ये झाला होता. सत्रात, आयओसी सदस्य ऑलिम्पिक चार्टर आणि ऑलिम्पिकच्या यजमान शहराची निवड यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात.

२० फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.