चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० फेब्रुवारी २०२०

Date : 20 February, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
हिलरॉड चषक बुद्धिबळ स्पर्धा - गुकेशला विजेतेपद : 
  • चेन्नई : ग्रॅँडमास्टर डी. गुकेश याने डेन्मार्क येथील ११०व्या हिलरॉड चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत ९ पैकी ८ गुण मिळवत गुकेशने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्यात सात विजयांचा समावेश आहे.

  • गुकेशने दोन लढती बरोबरीत सोडवल्या. १३ वर्षीय गुकेश गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जगातील दुसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला होता.

  • गुकेशला या स्पर्धेत दुसरे मानांकन देण्यात आले होते. ‘‘मी याआधी विविध वयोगटांतील स्पर्धा जिंकल्या आहेत. मात्र खुल्या स्पर्धेतील हे विजेतेपद माझ्यासाठी विशेष आहे. या स्पर्धेत सुरुवातीपासून माझी कामगिरी चांगली झाली आणि मी स्पर्धेत एकही लढत गमावली नाही. या स्पर्धेतील चांगल्या कामगिरीची पुनरावृत्ती फ्रान्समधील कान्स बुद्धिबळ स्पर्धेतही करण्याचा माझा प्रयत्न आहे,’’ असे गुकेशने सांगितले.

पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना राष्ट्रपतीपदक : 
  • जालना : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल जाहीर झालेले राष्ट्रपती पदक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मुंबई येथील राज्य पोलीस मुख्यालयात यानिमित्ताने आयोजित अलंकरण समारंभास गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आणि पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

  • १९९२ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळी सहा पारितोषिके मिळविली होती.

  • परिविक्षाधीन काळात लातूर जिल्ह्य़ात झालेल्या भूकंपाच्या वेळी त्यांनी कर्तव्य बजावले होते. किल्लारी, बाळापूर, औरंगाबाद, सोलापूर, हिंगोली इत्यादी ठिकाणी त्यांनी आतापर्यंत सेवा बजावली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, दहशतवादी विरोधी पथक इत्यादी विभागांमध्ये त्यांनी कर्तव्य बजावले आहे.

१०१ पक्षी प्रजातींच्या संवर्धनाची गरज : 
  • मुंबई, नागपूर: ‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार शिकारी, समुद्र किनाऱ्यावरील स्थलांतरित आणि पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ पक्ष्यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात गरुड आणि गिधाडांच्या संख्येत घट झाली असून, मोरांच्या संख्येत नाटय़मयरीत्या वाढ झाली आहे.

  • देशभरातील दोन सरकारी आणि सहा स्वयंसेवी संस्था आणि अनेक पक्षी निरीक्षकांनी ‘सिटिझन सायन्स’ या संकल्पनेचा वापर करून हा अहवाल तयार केला आहे. पंधरा हजार पाचशे पक्षी निरीक्षकांच्या सुमारे एक कोटी निरीक्षणांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला. यामध्ये देशभरातील सुमारे ८६७ पक्ष्यांच्या सद्य:स्थितीचा मागोवा घेण्यात आला. गेल्या २५ वर्षांतील निरीक्षणांचा यामध्ये समावेश आहे. ‘ई-बर्ड’ या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून ही माहिती संकलित करण्यात आली आहे. हा अहवाल गांधीनगर येथे स्थलांतरित पक्षी परिषदेत सोमवारी प्रकाशित करण्यात आला.

  • शिकारी पक्षी, स्थलांतरित पाणपक्षी आणि अधिवासनिष्ठ पक्ष्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे या अभ्यासातून दिसून येते. तसेच कीटकभक्षी पक्ष्यांची संख्या कमी होणे हेदेखील धोकादायक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्याचबरोबर १२६ प्रजातींच्या पक्ष्यांचे प्रमाण स्थिर अथवा वाढत असल्याचे यामध्ये आढळून आले. मात्र गेल्या पाच वर्षांत पक्ष्यांच्या संख्येत तब्बल ७९ टक्के घट झाल्याचे दिसून येते ही धोक्याची बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

आता मतदार कार्डलाही जोडणार ‘आधार’ : 
  • मतदार ओळखपत्रास आधार कार्डशी जोडणी करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या संदर्भातील निवडणूक आयोगाच्या प्रस्तावास कायदा मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. यासाठी आता सरकारकडून निवडणूक आयोगास कायदेशीर अधिकार मिळणार आहेत. मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डशी जोडणी केल्यानंतर बोगस मतदारांना रोखता येणार आहे. याचबरोबर प्रवाशी मतदारांना रिमोट वोटिंगचा अधिकार देणेही सोपे होणार आहे.

  • बोगस मतदानाला आळा घालून ‘एक व्यक्ती एक मत’ योग्यरित्या राबवायचे असेल तर मतदार कार्ड आधारला जोडणे आवश्यक असल्याची मागणी आयोगाकडून अनेक वर्षांपासून केली जात होती.

  • पेड न्यूज व चुकीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रासह निवडणूक सुधारणा या सारख्या मुद्यांवरही आयोगाची कायदा मंत्रालयाबरोबर बैठक झाली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा व सुशील चंद्रा यांनी कायदा मंत्रालयाचे सचिव जी नारायण राजू यांच्या ही बैठक पार पडली.

चीनमधील विषाणू बळींची संख्या दोन हजारावर : 
  • बीजिंग : चीनमध्ये करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या बुधवारी दोन हजारांचा आकडा ओलांडून गेली आहे. मंगळवारी एकूण १३६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण निश्चित रुग्णांची संख्या ही ७४,१८५ झाली आहे.

  • राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, सीओव्हीआयडी १९ या विषाणूने २००४ जण मरण पावले आहेत. मंगळवारी १७४९ जणांना नव्याने लागण झाली आहे. एकूण १३६ जण मंगळवारी मरण पावले असून त्यात हुबेई प्रांतात १३२ तर हेलाँगजियांग, शांगडाँग, ग्वांगडाँग, ग्विझू  येथे प्रत्येकी एक बळी गेला आहे.

  • नवीन ११८५ संशयित रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी २३६ जण गंभीर आजारी पडले असून १८२४ जणांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे. आयोगाने म्हटले आहे की, ११९७७  रुग्ण गंभीर अवस्थेत असून ५२४८ जणांना विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे.

  • हाँगकाँगमध्ये मंगळवारी ६२ निश्चित रुग्ण सापडले असून मकावमध्ये १० तर तैवानमध्ये २२ रुग्ण आहेत. हाँगकाँग व तैवानमध्ये प्रत्येकी एकाचा आधीच मृत्यू झाला आहे. चायना डेलीने म्हटले आहे की, बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही निश्चित रुग्णांपेक्षा प्रथमच जास्त झाली आहे.

हे आहेत जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग : 

ट्रान्स सैबेरियन रेल्वे : मॉस्कोपासून प्याँगयाँगपर्यंचा हा मार्ग जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. याची लांबी सुमारे १० हजार २१४ किमी आहे.

द कॅनेडियन, कॅनडा : कॅनडामधील टोरँटो ते व्हँकुव्हर या शहरांना जोडणारा हा रेल्वेमार्ग ४४६५ किमी लांब आहे. या मार्गावरील प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन दिवस लागतात.

चीन : शांघाई ते ल्हासा हा चीनमधील रेल्वेमार्ग 4372 किलोमीटर लांब आहे.

कॅलिफोर्निया, सायफर : एमेरविले ते शिकागोदरम्यान 3923 किलोमीटरचा रेल्वेप्रवास पूर्ण करण्यासाठी ५१ तास लागतात.

इंडियन पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया : सिडनी ते पर्थ मार्गावरील 4351 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ६५ तास लागतात.

विवेक एक्स्प्रेस : आसाममधील दिब्रुगड ते कन्याकुमारी या मार्गावरील 4237 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी या एक्सप्रेसला ८२ तास लागतात.

२० फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.