चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० ऑगस्ट २०२२

Date : 20 August, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रोनाल्डो डॉर्टमंडकडे :
  • नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून डॉर्टमंड आणि मॅंचेस्टर युनायटेड यांच्यापैकी कुणीच अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

  • ‘‘रोनाल्डो खेळाडू म्हणून मला आवडतो. रोनाल्डोला डॉर्टमंडकडून खेळताना पाहायलाही मला आवडेल. पण त्याला करारबद्ध करण्याच्या दिशेने आम्ही अजून योग्य पाऊल टाकलेले नाही,’’ असे बोरुसिया डॉर्टमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी हन्स जोशिम वॅटझके यांनी म्हटले आहे.

  • या वर्षी जुलैपासूनच रोनाल्डो मॅंचेस्टर युनायटेड सोडून नव्या क्लबशी करारबद्ध होणार अशी फुटबॉलविश्वात चर्चा केली आहे. रोनाल्डोचा व्यवस्थापक जॉर्ज मेंडिसनेच चेल्सी, अ‍ॅटलेटिको माद्रिद, नेपोली आणि बायर्न म्युनिक रोनाल्डोला करारबद्ध करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती दिली होती.

  • रोनाल्डोच्या क्लब सोडण्याविषयी अजून कुठलीच हालचाल झालेली दिसून येत नाही. खेळाडूंच्या संघबदलाची मुदत १ सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे रोनाल्डोच्या नव्या संघाची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. यात चालू आठवडय़ात डॉर्टमंड रोनाल्डोला घेण्यासाठी उत्सुक असल्याचे समोर आल्याने या चर्चेला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे.

भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज :
  • भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

  • भुतियाने अर्ज केला असला तरी या पदासाठी सध्या आणखी एक माजी फुटबॉलपटू कल्याण चौबे यांचे पारडे जड मानले जात आहे. भुतियाच्या नावाला त्याचा संघसहकारी दीपक मोंडलने प्रस्तावित केले आणि मधू कुमारीने अनुमोदन दिले.

  • ‘‘माजी खेळाडूंना भारतीय फुटबॉलची सेवा करता यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नव्याने खेळाडूंना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार मी खेळाडूंचा प्रतिनिधी म्हणून अर्ज दाखल केला आहे. खेळाडू म्हणूनच नाही, तर संघटक म्हणूनही खेळाडू चांगले काम करू शकतात, हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे,’’ असे भुतिया म्हणाला.

  • क्रीडा मंत्रालयाची विनंती : भारतातील श्री गोकुळम केरळ एफसी आणि एटीके मोहन बागान या क्लबच्या संघांना अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील बंदीनंतरही ‘एएफसी’ स्पर्धेत खेळू द्यावे, अशी विनंती क्रीडा मंत्रालयाने ‘फिफा’ आणि आशियाई फुटबॉल महासंघाला (एएफसी) केली आहे.

महत्त्वाची बातमी - राज्यसेवा २०२२ साठी ३४० पदांची भर :
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा २०२२मध्ये ३४० पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक अशा पदांचा त्यात समावेश आहे. 

  • एमपीएससीने ही माहिती दिली. एमपीएससीतर्फे ११ मे रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात १६१ पदांचा समावेश होता. मात्र शासनाकडून आता अन्य पदांची मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा २०२२च्या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

  • राज्यसेवा २०२२च्या जाहिरातीमध्ये केवळ १६१ पदेच असल्याने स्पर्धा परीक्षार्थींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता गट अ आणि गट ब संवर्गाची मिळून ३४० पदे वाढल्याने एकूण ५०१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. त्यामुळे उमेदवारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

  • या पदांचा आहे समावेश - वाढलेल्या पदांमध्ये उपजिल्हाधिकारी गट अ संवर्गाची ३३,  पोलीस उपअधीक्षक गट अ संवर्गाची ४१, सहायक राज्यकर आयुक्त गट अ संवर्गाची ४७, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट अ संवर्गाची १४, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ संवर्गाची दोन,  शिक्षणाधिकारी, गट अ संवर्गाची २०, प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी) गट अ संवर्गाची सहा, तहसीलदार, गट अ संवर्गाची २५, सहायक गट विकास अधिकारी,गट ब संवर्गाची ८०, उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब संवर्गाची तीन, सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब संवर्गाची दोन, उपशिक्षणाधिकारी, गट ब संवर्गाची २५, सहायक प्रकल्प अधिकारी, गट ब संवर्गाची ४२ पदांचा समावेश असल्याचे एमपीएससीने नमूद केले.

आशियाई क्षेत्रनिर्मितीबाबत जयशंकर यांच्या मताशी चीन सहमत :
  • भारत आणि चीन हे जोवर सहकार्यासाठी एकत्र येत नाहीत, तोवर आशियाई क्षेत्र उभे राहू शकत नाही, या भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या विचाराशी शुक्रवारी चीनने सहमती व्यक्त केली. या दोन देशांमध्ये जेवढे मतभेदाचे मुद्दे आहेत, त्यापेक्षा जास्त  परस्पर हितसंबंधांच्या बाबी आहेत, असे चीनने म्हटले आहे.

  • बँकाक येथील चुलॅलाँगकॉर्न विद्यापीठात गुरुवारी बोलताना जयशंकर यांनी सांगितले होते की, चीनने सीमाभागात जे केले आहे, त्यामुळे सध्या भारत-चीन संबंध अत्यंत कठीण स्थितीत आहेत. हे दोन शेजारी जोवर एकत्र येत नाहीत, तोवर आशिया क्षेत्र उभे राहू शकत नाही. 

  • यावर, चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते वांग बानबिन  म्हणाले की, चीनच्या नेत्यांनी आधीच स्पष्ट केल्यानुसार, जोवर चीन आणि भारत यांचा विकास होत नाही, तोवर आशियाई क्षेत्र उभे राहू शकत नाही. जोपर्यंत चीन, भारत आणि अन्य शेजारी देश यांचा विकास होत नाही, तोवर खऱ्या अर्थाने आशिया-प्रशांत क्षेत्र किंवा आशियाई क्षेत्र उभे राहूच शकत नाही. चीन आणि भारत या दोन प्राचीन मानवी संस्कृती आहेत. तसेच त्या दोन प्रमुख उभरत्या अर्थसत्ता आहेत.  एकमेकांना अडचणीत आणण्यापेक्षा एकदुसऱ्याला मदत करून विकास साधण्याचे शहाणपण आणि क्षमता दोन्ही बाजूंत आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग :
  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे गया येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. नितीश कुमार राज्यातील दुष्काळीस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या घटनेनंतर गया प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.

  • दुष्काळग्रस्त भागाची पहाणी दौऱ्यादरम्यान घटना : बिहारमध्ये पावसाच्या कमरतेमुळे भीषण दुष्काळ ओढावला आहे. कमी पर्जन्यमानामुळे अनेक जिल्ह्यांतील पीके उद्ध्वस्त झाली आहेत. नव्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार दुष्काळ भागाच्या पहाणी दौऱ्यावर होते. जहानाबाद, अरवल यांसह अन्य जिल्ह्यांमध्ये ते हवाई पाहणी करणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

  • नितीश कुमार रस्तेमार्गे पटणाला जाणार : गया येथे नितिश कुमारांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याच्या वृत्ताला गयाचे जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन यांनी दुजोरा दिला आहे. हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यानंतर गया जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली होती. जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी विमानतळावर पोहोचले. आता नितीश कुमार रस्तेमार्गे पाटणा येथे जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

२० ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.