चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० ऑगस्ट २०२१

Date : 20 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एमपीएससी उमेदवारांना खाते अद्ययावत करताना येणाऱ्या अडचणींसाठी सूचना :
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नव्या अर्ज प्रणालीवरील खाते अद्ययावत करण्यात अडचणी येत आहेत. हेल्पलाइनवर दूरध्वनी उचलला न जाणे, ई मेलला प्रतिसाद न मिळणे, अर्ज भरण्यासाठी पर्याय उपलब्ध न होणे, जुन्या किं वा सांकेतिक शब्दाद्वारे (पासवर्ड) खाते न उघडणे अशा अडचणी उमेदवारांना येत असून, या अडचणी सोडवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.

  • पासवर्ड बदलून खाते अद्ययावत करता येत नसल्यामुळे मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी बदलून मिळावा याकरीता उमेदवारांकडून आयोगाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. त्यामुळे टोल फ्री क्रमांक सतत व्यस्त राहात आहे. त्यावर आता आयोगाने काही सूचना जारी केल्या आहेत. यामुळे उमेदवारांच्या अडचणी सोडवण्यात मदत होणार आहे.

  • जुन्या खात्यामध्ये नोंदविण्यात आलेला मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी चुकीचा किंवा ज्ञात नसल्याने किंवा बंद असल्याने अडचणी येत आहेत.

  • मोबाईल नंबर किंवा ईमेल बंद असल्याने ओटीपी प्राप्त होण्यास आणि पर्यायाने पासवर्ड बदलण्यास अडचण येत आहे.

  • उमेदवारांना पुढील आठवड्यापासून ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना स्वत: खाते अद्ययावत करता येईल.

  • ४ सप्टेंबरला २०२१ होणाऱ्या नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० करीता प्रवेश प्रमाणपत्र नवीन संकेतस्थळावरील उमेदवारांच्या खात्याव्यतिरिक्त अन्य सुयोग्य पद्धतीने सर्व उमेदवारांना सुलभपणे उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

शाळा सुरु करण्याचा निर्णय येत्या ४ दिवसात?; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत :
  • राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय येत्या ४ ते ५ दिवसात होईल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि उच्च, तंत्र शिक्षण विभागांचा अहवाल टास्क फोर्सला प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भातला पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्य सरकारनं शाळा सुरु करण्यासंदर्भात यापूर्वीच निर्णय घेतला होता. पण मुलांचं लसीकरण न झाल्यानं टास्क फोर्सच्या विरोधानंतर हा निर्णय तात्काळ स्थगित करण्यात आला. आता काय निर्णय होतो, याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागून आहे.

  • “कॉलेज आणि शाळांच्या बाबतीत आम्ही स्पष्ट उल्लेख केला आहे की, त्या दोन्ही विभागाने त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत असतील, वर्षा गायकवाड असतील. या दोघांशी माझी चर्चा झाली आहे. त्या दोघांचं म्हणणं आहे की, टास्क फोर्सचं म्हणणं महत्त्वाचं आहे. चार-पाच दिवसात टास्क फोर्सचे अहवाल येतील. संबंधित विभाग चर्चा करतील आणि निर्णय घेतील.”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

  • वर्षा गायकवाड यांनी राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. यामध्ये ग्रामीण भागात जिथे ८ वी ते १२वी याआधीच सुरू आहेत, तिथे ५वी ते ७वीचे वर्ग देखील सुरू करणे आणि नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगर पालिका या ठिकाणी रुग्णसंख्या आणि इतर अटींची पूर्तता करणाऱ्या भागांमध्ये ५वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं होतं.

रणजी क्रिकेट स्पर्धा ५ जानेवारीपासून :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२१-२२चा देशांतर्गत क्रिकेट हंगाम गुरुवारी निश्चित केला. सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा २७ ऑक्टोबरपासून सुरू होईल, तर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा ५ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.

  • करोना साथीमुळे गतवर्षी रणजी करंडक स्पर्धा होऊ शकली नाही. जैव-सुरक्षित वातावरणात ३८ संघांसह स्पर्धा आयोजित करणे कठीण असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र यंदा इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटनंतर २७ ऑक्टोबरपासून मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेसह देशांतर्गत क्रिकेट हंगामाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर १ ते २९ डिसेंबर या कालावधीत विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होईल. महिलांची एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या दरम्यान खेळवण्यात येणार आहे. विनू मंकड करंडक १९ वर्षांखालील पुरुष आणि महिलांची स्पर्धा २० सप्टेंबरपासून सुरू होईल.

  • सहा गटांत ३८ संघांची विभागणी - वरिष्ठ पुरुषांच्या रणजी करंडक, विजय हजारे करंडक आणि सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धासाठी ३८ संघांची सहा गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी पाच एलिट गटांमध्ये प्रत्येकी सहा संघांचा समावेश असेल, तर एका प्लेट गटात आठ संघ असतील.

‘जैश’सारख्या दहशतवादी संघटनांना मोकळे रान :
  • लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महम्मदसारख्या दशहतवादी संघटना दंडमुक्ती आणि प्रोत्साहनासह कार्यरत आहेत, असे स्पष्ट करत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला लक्ष्य केले. अशा संघटनांना कोणीही थारा देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

  • ‘दहशतवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला असलेला धोका’ या विषयावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील (यूएनएससी) चर्चासत्रात बोलताना एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका ठामपणे मांडली. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महम्मद या संघटना भारतासारख्या देशांविरोधात मोकाट कारवाया करत असतात. या संघटनांचे आदरातिथ्य केले जाते आणि त्यांना प्रोत्साहनही दिले जाते, असे जयशंकर म्हणाले.

  • अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे स्वाभाविकच क्षेत्रीय व आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर त्यांच्या परिणामांबाबतची चिंता वाढली आहे, याकडेही जयशंकर यांनी लक्ष वेधले.

अफगाणिस्तानच्या विकासासाठी तालिबानचं चीनला आमंत्रण :
  • चीनने अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि सलोखा वाढवण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावली आहे आणि त्यामुळे त्यांचे देशाच्या पुनर्बांधणीत योगदान देण्यासाठी आपले स्वागत आहे असे तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी चीनच्या माध्यमांना सांगितले आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर हजारो नागरिकांनी तेथून पळ काढला आहे. २० वर्षांपूर्वीच्या तालिबान राजवटीत लादलेल्या इस्लामिक कायद्याच्या कठोर कायदे परत येण्याची अनेकांना भीती वाटत असल्याचे म्हटले जात आहे.

  • “चीन एक मोठी अर्थव्यवस्था आणि क्षमता असलेला मोठा देश आहे. मला वाटते की ते अफगाणिस्तानच्या पुनर्वसन, पुनर्बांधणीमध्ये खूप मोठी भूमिका बजावू शकतात,”असे शाहीनने गुरुवारी रात्री उशिरा सीजीटीएन टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी गेल्या महिन्यात तियानजिनमध्ये तालिबानच्या शिष्टमंडळाशी भेट घेतली होती आणि त्यांना आशा आहे की अफगाणिस्तान इस्लामी धोरण स्वीकारू शकेल असे म्हटले होते.

  • तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी गुरुवारी जगाने अफगाणिस्तानला पाठिंबा द्यावा, त्यावर दबाव आणू नये असे म्हटले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी ब्रिटीश परराष्ट्र सचिव डोमिनिक राब यांच्याशी फोनवर बोलताना सांगितले की, “जगाने अफगाणिस्तानला मार्गदर्शन आणि पाठिंबा द्यावा, त्यावर अधिक दबाव आणू नये, कारण अफगाणिस्तानमध्ये सध्या सत्ता हस्तांतरण सुरू आहे.”

पंतप्रधान मोदी दिवसातून एकदाच जेवतात; त्यांनीच सांगितलं यामागील कारण, म्हणाले :
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दिवसभरामध्ये एकदाच जेवतात. अर्थात ही माहिती पंतप्रधान मोदींनीच दिली आहे. मात्र आपण असं का करतो यासंदर्भातील मोदींनी सविस्तर माहिती दिली असून दिवसातून एकदाच जेवण्यामागील कारणाचा त्यांची खुलासा केलाय.

  • पंतप्रधान मोदींनी समोवारी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना आपल्या घरी ब्रेकफास्टसाठी बोलावलं होतं. यावेळेस त्यांनी ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रासाठी त्याचा आवडता पदार्थ म्हणजेच चूरमा मेन्यूमध्ये ठेवला होता. जेव्हा पंतप्रधान मोदींनाही नीरजने चुरमा खाण्यासाठी आग्रह केला.

  • तुम्हालाही माझ्यासोबत चूरमा खावा लागेल असं म्हणत त्यांना चूरमा खाण्यासाठी आग्रह केला. मात्र त्यावेळी मोदींनी नीरजला नकार दिला. सध्या चातुर्मास सुरु असून या कालावधीमध्ये मी दिवसातून एकदाच जेवतो असं मोदींनी नीरजला सांगितलं.

  • सध्या चातुर्मास सुरु असून प्रामुख्याने जैन धर्मातील लोकांमध्ये या कालावधीत खाण्यासंदर्भातील कठोर नियम पाळले जातात. चातुर्मासामध्ये हिंदू धर्मामध्येही अनेक धार्मिक विधी केले जातात. या कालावधीमध्ये शरीरामधील दाहकता वाढवणाऱ्या, पित्त वाढवणाऱ्या भाज्या खाल्ल्या जात नाहीत. 

कुंडलच्या डोंगरावर ‘तुरेवाला भारीट’चे आगमन :
  • पलूस तालुक्यातील कुंडलच्या डोंगरावर  झरी पाश्र्वनाथ मंदिराच्या परिसरात डोकीवर तांबूस-काळा तुरा असलेल्या युवराज पक्ष्याचे आगमन पक्षी प्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. उन्हाळी हंगामात पंजाब, हरियाणासह काश्मिर खोऱ्यात आढळणारा हा पक्षी आपल्या रूबाबदारपणामुळे लक्षवेधक ठरत आहे.

  • या युवराज पक्ष्याला ‘तुरेवाला भारीट’ नावाने ओळखले जाते. याशिवाय शेंडीवाली रेडवा, लहान काकड कुंभार, बोचुरडी, डोंगरफेंसा, दाबुडका, फेंस किंवा शेंडूरला फेंसा अशी त्याला अन्य नावेदेखील आहेत.   ‘इबर्ड’ सारख्या संकेतस्थळावरील नोंदीवरून हा पक्षी पावसाळा हिवाळ्यात गुजरात, महाराष्ट्रात आढळतो. तर उन्हाळ्यात भारताच्या उत्तरेकडील काश्मीर, हरियाणा, पंजाब या राज्यांमध्ये स्थलांतर करत असल्याचे पक्षिप्रेमी संदीप नाझरे यांनी सांगितले.

  • चिमणीच्या आकाराचा हा युवराज पक्षी रंगाने भारद्वाजसारखा असून हा डोंगराळ भागात आढळणारा पक्षी आहे. याची मादी मात्र चंडोलसारखी भुऱ्या रंगाची असते. कुंडल डोंगर परिसरात हा युवराज डिसेंबपर्यंत मुक्कामी असल्याची माहिती नाझरे यांनी दिली.

२० ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.