चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ सप्टेंबर २०२२

Date : 2 September, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
१० वी, १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी; कुठे पाहाल निकाल जाणून घ्या :
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. १० वी, १२ वी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. यंदा १० वी ची परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान झाली तर १२वी ची परीक्षा २१ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. महाराष्ट्र बोर्डाचा पुरवणी निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.

  • १० वी, १२ वीचे विद्यार्थी पुरवणी निकाल अधिकृत वेबसाइट्स- mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि hsc.mahresults.org.in वर पाहू शकतात. इयत्ता १० वी, १२ वीचा निकाल व गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा हॉलतिकीट क्रमांक, व नोंदणीकृत जन्मतारीख माहित असणे आवश्यक आहे.

कसा पाहाल १० वी, १२ वी पुरवणी परीक्षा निकाल?

  • अधिकृत वेबसाइटवर जा – mahresults.nic.in
  • मुख्यपृष्ठावरील १० वी किंवा १२ वी निकालाच्या लिंकवर क्लिक करा
  • हॉलतिकीट क्रमांक व जन्मतारीख प्रविष्ट करून लॉग इन करा .
  • तुमचा पुरवणी परीक्षा निकाल तुम्हाला समोर दिसेल.
  • निकाल डाउनलोड करा
  • इथेच तुम्हाला पीडीएफ प्रिंट करण्याचा पर्याय सुद्धा दिसेल.
अभिमानास्पद - भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची ‘स्टारबक्स’च्या ‘सीईओ’पदी निवड :
  • आणखी एका भारतीयाने आपल्या कर्तृत्वाने आंतरराष्ट्रीय कंपनीत अव्वल स्थान मिळवले आहे. दिग्गज कॉफी ब्रॅण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टारबक्सने गुरुवारी भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ते आता हॉवर्ड शुल्त्झ यांची जागा घेतील.

  • नरसिंहन १ ऑक्टोबर रोजी कंपनीत रुजू होणार आहेत, तर शुल्त्झ हे एप्रिल २०२३ पर्यंत अंतरिम प्रमुख म्हणून कार्यरत राहतील, त्यानंतर ते स्टारबक्स संचालक मंडळाचे सदस्य म्हणून कायम राहतील.

  • स्टारबक्स संचालक मंडळाचे अध्यक्ष मेलोडी हॉबसन यांनी एका निवेदनात लक्ष्मण नरसिंहन यांना “प्रेरणादायी नेता” असे संबोधले आहे. “जागतिक ग्राहकाभिमुख व्यवसायांमध्ये धोरणात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांचा सखोल, व्यावहारिक अनुभव, त्यांना स्टारबक्सच्या वाढीला गती देण्यासाठी आणि आमच्यासमोरील संधी काबीज करण्यासाठी आदर्श पर्याय बनवतो,” असे त्यांनी म्हटले आहे.

अनेक नामांकित कंपन्यांमध्ये काम केले आहे -

  • ५५ वर्षीय नरसिंहन यांनी लायसोल आणि एन्फामिल बेबी फॉर्म्युलाचे निर्माते यूके स्थित रेकिट बेंकिसर ग्रुपचे मुख्य कार्यकारी म्हणून काम केले आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, स्टारबक्स बोर्डाचे अध्यक्ष मेलोडी हॉबसन म्हणाले, “कंपनीचा विश्वास आहे की आम्हाला आमच्या पुढील सीईओमध्ये एक असाधारण व्यक्ती मिळाली आहे.” त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामं केली आहेत.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा साजरा करणार ‘विविधतेत एकता’ उत्सव, पंधरवडाभर राबवणार सामाजिक कार्यक्रम :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजपा ‘विविधतेत एकता’ हा उत्सव साजरा करणार आहे. सेवा मोहिमेचा भाग म्हणून हा उत्सव देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून साजरा केला जाणार आहे. येत्या १७ सप्टेंबरला नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस आहे. या दिवसापासून उत्सवाला सुरुवात होणार असून २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सांगता होणार आहे.

  • देशभरातील पक्षाच्या कार्यक्रमांवर देखरेख करण्यासाठी भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या उत्सवाअंतर्गत रक्तदान शिबीरं, जल संवर्धनासंदर्भात जनजागृती कार्यक्रम, वृक्षारोपण, दिव्यांग व्यक्तींना उपकरणांचं वाटप, स्थानिक उत्पादनांचा प्रचार आणि स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे.

  • गेल्या काही वर्षांपासून भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून पंधरवडाभर साजरा करण्यात येतो. या पंधरवड्यात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन भाजपाकडून करण्यात येते. या उपक्रमासंदर्भात अरुण सिंह यांनी राज्यांना एका पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘नमो’ या अ‍ॅपवर या उपक्रमांचा तपशील भरण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना पक्षाकडून देण्यात आले आहेत. यातील पाच उत्कृष्ट विभागांना पुरस्कार दिला जाणार आहे. २ ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीदिनी भाजपा कार्यकर्त्यांसह इतर नागरिकांना खादी वापरण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

भुतियाविरुद्ध चौबे यांचे पारडे जड; आज भारतीय फुटबॉल महासंघाच्या निवडणुकीत तीन महत्त्वाच्या जागांसाठी लढती :
  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघात (एआयएफएफ) बदलांचे वारे वाहत असून शुक्रवारी ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका माजी फुटबॉलपटूची या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड होणार आहे. शुक्रवारी ‘एआयएफएफ’च्या निवडणुकीत तीन महत्त्वाच्या जागांसाठी थेट लढती होणार आहेत.

  • अध्यक्षपदासाठी माजी कर्णधार आणि दिग्गज आघाडीपटू बायच्युंग भुतियापुढे मोहन बागान व ईस्ट बंगालचे माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांचे आव्हान असेल. या दोघांमध्ये चौबे यांचे पारडे जड मानले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगाल येथील नेते चौबे यांना गुजरात, अरुणाचल प्रदेश अशा राज्यांचा पाठिंबा लाभला आहे. चौबे यांना ईशान्य भागातील एका नामांकित व्यक्तीचेही पाठबळ असल्याची चर्चा आहे. याच कारणास्तव भुतियाच्या उमेदवारीला त्याचे स्वत:चे राज्य सिक्कीमकडून पाठिंबा मिळत नसल्याचे म्हटले जात आहे.

  • उपाध्यक्षपद व कोषाध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांमध्ये थेट लढत पाहायला मिळेल. उपाध्यक्षपदासाठी राजस्थान फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते मानवेंद्र सिंग यांच्यापुढे कर्नाटक फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार एनए हॅरिस यांचे आव्हान असेल. दुसरीकडे, कोषाध्यक्षपदासाठी आंध्र प्रदेश फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष गोपालकृष्ण कोसाराजू आणि अरुणाचल प्रदेश फुटबॉल संघटनेचे सचिव किपा अजय हे दोन उमेदवार आहेत.

दिल्लीत केजरीवालच! ५८ मतांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव :
  • दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनादरम्यान अरविंद केजरीवाल सरकारने विश्वासदर्शक ठराव पास केला आहे. केजरीवाल यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ५८ मते पडली. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर केजरीवालांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “दिल्लीमध्ये ऑपरेश लोटसला अपयश आलं”, असं म्हणत केजरीवालांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

वाद घातल्यामुळे तीन भाजपा आमदारांना बाहेरचा रस्ता

  • दिल्लीत विधानसभेत ७० आमदारांपैकी ‘आप’चे ६२ आमदार असून, भाजपाचे आठ आमदार आहेत. अधिवेशनादरम्यान उपसभापतींसोबत झालेल्या वादानंतर तीन भाजपा आमदार विजेंदर गुप्ता, अभय वर्मा आणि मोहन सिंग बिश्त यांना सभागृहाबाहेर हाकलण्यात आले होते.

ऑपरेशन ‘लोटस’ नसून ऑपरेशन ‘किचड’

  • भाजपाने आपचा एकही आमदार फोडला नाही, हे सिद्ध करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरकारने विधानसभेत हा विश्वासदर्शक ठराव मांडला होता. आप सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राजधानीतील वातावरण चांगलेच तापले आहे. “ हे ऑपरेशन ‘लोटस’ नसून ऑपरेशन ‘किचड’ आहे. भाजपा ‘आप’चा एकही आमदार खरेदी करू शकला नाही, हे सिद्ध करण्यासाठी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडत आहोत”, असे केजरीवाल शुक्रवारी दिल्ली विधानसभेला संबोधित करताना म्हणाले होते.

  • ‘आप’चे तीन आमदार गैरहजर

  • विधानसभेत आम आदमी पक्षाचे एकूण ६२ आमदार आहेत. त्यापैकी दोन आमदार देशाबाहेर आहेत, एक तुरुंगात आहे. चौथा सदस्य हा सभागृहाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे आमच्या बाजूने एकूण ५८ मते पडली. प्रत्यक्षात पक्षाचे तीन आमदार विधानसभेच्या कामकाजाला उपस्थित राहू शकले नसल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले.

०२ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.