चालू घडामोडी आणि दिनविशेष - 02 नोव्हेंबर 2023

Date : 2 November, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
उपांत्य फेरीतील स्थान निश्चितीचे भारताचे लक्ष्य! वानखेडेवर आज २०११च्या अंतिम लढतीची पुनरावृत्ती
  • भारताचे २०११ सालचे विश्वविजेतेपद..धोनीचा तो षटकार..सचिनला संघ-सहकाऱ्यांनी उचलून मैदानावर मारलेली फेरी या सर्व आठवणी आज, गुरुवारी ताज्या होणार आहेत. याचे कारण म्हणजे, २०११च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम लढतीची आज पुनरावृत्ती होणार असून भारत आणि श्रीलंका हे संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर समोरासमोर येणार आहेत.
  • १२ वर्षांपूर्वी वानखेडेवरच झालेल्या अंतिम लढतीत श्रीलंकेकडून महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि मुथय्या मुरलीधरन यांसारखे दिग्गज खेळाडू खेळले होते. या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर श्रीलंका क्रिकेटचा स्तर ढासळला असून यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात त्यांनी सहापैकी केवळ दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान शाबूत राखण्यासाठी श्रीलंकेला विजय महत्त्वाचा आहे. त्यांना गेल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता.
  • दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यंदाच्या स्पर्धेत प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजवताना सहापैकी सहा सामने जिंकले आहे. भारताने पहिले पाच विजय हे धावांचा पाठलाग करताना मिळवले होते. मात्र, गेल्या सामन्यात लखनऊच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले.
  • भारताला ५० षटकांत २२९ धावांचीच मजल मारता आली होती. मात्र, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी यांच्यासह सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट मारा केला आणि गतविजेत्या इंग्लंडला केवळ १२९ धावांत गुंडाळत भारताला सलग सहावा विजय मिळवून दिला. आता श्रीलंकेला नमवण्यात यश आल्यास भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. वानखेडेवर यंदाच्या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना अनुक्रमे ३९९ व ३८२ धावांची मजल मारली होती. त्यामुळे या लढतीत भारताला प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यास पुन्हा मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकेल.
‘मनरेगा’च्या कामांवर यापुढे ‘ड्रोन’चे लक्ष; केंद्र सरकारचे सर्व राज्यांना आदेश
  • ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ (मनरेगा)मधून ग्रामीण भागात निर्माण करण्यात येणाऱ्या कामांवर ‘ड्रोन’द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. नियम डावलून ‘रोहयो’ कामांमध्ये यंत्रांचा करण्यात येणारा वापर आणि बांधकामांतील निकृष्टता याला चाप लावण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत.
  • महाराष्ट्रात ‘रोहयो’च्या कामांवर प्रतिवर्ष अडीच ते तीन हजार कोटी रुपये खर्च केले जातात. त्यातून सुमारे ३ लाख १० हजारांच्या आसपास वैयक्तिक व सार्वजनिक मत्ता निर्माण केल्या जातात. या कामांमधून कुशल-अकुशल ग्रामीण मजुरांना वर्षांला १०० दिवस रोजगार प्राप्त व्हावा, अशी अपेक्षा आहे. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची आणि यंत्राकरवी केली जातात. त्यामुळे या कामांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रोहयोच्या कामांविषयी तक्रारी आल्यास जिल्हा तक्रार निवारण अधिकाऱ्याने त्या कामांची ड्रोनद्वारे पाहणी करायची आहे. त्यासाठी ड्रोन भाडय़ाने घ्यायचा असून हा खर्च मनरेगाच्या प्रशासकीय खर्चातून करायचा आहे. रोहयोच्या कामांची तीन टप्प्यात ड्रोन पाहणी करावी. तसेच ड्रोनवर स्थिर आणि चित्रण असे दोन्ही प्रकारचे कॅमरे असणे आवश्यक केले आहे.
  • २०१५-१६ पासून रोहयोचे हजेरी पत्रक ऑनलाइन करण्यात आले आहे. मजुरांचा पगारही थेट बँक खात्यात जमा केला जातो. तसेच निर्माण आलेल्या कामांचे ८० टक्केपर्यंत ‘जीओ टॅिगग’ करण्यात येते. तरीसुद्धा या योजनेतील भ्रष्टाचार पूर्णपणे थांबलेला नाही. मागच्या वर्षी महाराष्ट्रात या योजनेत आर्थिक गैरव्यवहाराची १३१, अनियमिततेची ६५६ आणि प्रक्रिया उल्लंघनांची ५०० प्रकरणे नोंदली आहेत.एकीकडे ‘रोहयो’च्या कामांच्या सामाजिक मूल्यमापनास दोन वर्षांपासून केंद्र सरकार पैसे देत नाही. तसेच अनेक राज्यांतील रोहयो मजुरांची जॉब कार्ड केंद्राने बागेस, म्हणून रद्द केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर रोहयो कामांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्याचे आदेश काढण्यात आल्याने रोहयो विभागात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
  • ‘मनरेगा’च्या कामांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्याचे केंद्राचे परिपत्रक निघाले आहे. जिल्हा तक्रार निवारण अधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या जातील.
औषधनिर्माणशास्त्र पदवीच्या ३३ टक्के जागा रिक्त; गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट प्रमाण
  • राज्यातील औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत ३३ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत रिक्त जागांचे प्रमाण जवळपास तिपटीने वाढल्याचे चित्र आहे. तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या जागाही मोठय़ा प्रमाणात रिक्त राहिल्या आहेत.  औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या जागा आणि महाविद्यालयांची संख्या वाढत असल्याने या अभ्यासक्रमाची स्थिती अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाप्रमाणे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
  • गेल्या काही वर्षांपासून राज्यात औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याचे चित्र होते. पदवी अभ्यासक्रमाच्या बहुतांश जागांवर प्रवेश होत होते. करोना काळात या अभ्यासक्रमाला जास्तच पसंती मिळत होती. राज्य समायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिलेल्या माहितीनुसार  गेल्या वर्षी राज्यात ३९६ महाविद्यालयांमध्ये ३६ हजार ८८८ जागा प्रवेशांसाठी उपलब्ध होत्या. त्यातील ३२ हजार १३७ जागांवर प्रवेश झाले. तर चार हजार ७५१ जागा रिक्त राहिल्या होत्या.
  • यंदा ४५३ महाविद्यालयांमध्ये ४२ हजार ७९४ जागांवर केवळ २८ हजार ४३२ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. त्यामुळे १४ हजार ३६२ जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५६ नव्या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रियेत भर पडली होती, तर पाच हजार ९०६ जागा वाढल्या होत्या. मात्र विविध कारणांनी यंदा या पदवी अभ्यासक्रमाच्या ३३ टक्के जागा रिक्त राहिल्याचे दिसून येत आहे.
  •  असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिटय़ूट्स इन रुरल एरिया संघटनेचे अध्यक्ष रामदास झोळ म्हणाले, की राज्य शासनाने औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी बृहद् आराखडा केला आहे का, हा प्रश्न आहे. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या, उदाहरणार्थ, बीएमएसएस, बीएचएमएस, नर्सिग, फिजिओथेरपी अशा अभ्यासक्रमांबरोबर राबवणे आवश्यक आहे. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम तारीख एकच असावी. औषधनिर्माणशास्त्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाची नवी महाविद्यालये मोठय़ा प्रमाणात सुरू झाल्याने प्रवेशाच्या जागा वाढल्या आहेत. हे प्रमाण असेच वाढत राहिल्यास अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा ज्या प्रमाणात रिक्त राहत होत्या, तीच वेळ औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमावर येऊ शकते.
वित्तीय तूट ७.२ लाख कोटींवर, सप्टेंबरअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या ३९.३ टक्क्यांवर
  • केंद्र सरकारची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरअखेरीस ७.०२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी निर्धारित उद्दिष्टाच्या ३९.३ टक्क्यांवर ही तूट पोहोचली असून, मागील वर्षी याच कालावधीत ती उद्दिष्टाच्या ३७.३ टक्के होती.
  • सरकारचा खर्च आणि जमा होणारा महसूल यातील फरक म्हणजे वित्तीय तूट असते. महालेखापालांनी (कॅग) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरअखेर वित्तीय तूट ७.०२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ५.९ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ठेवले आहे. मागील आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या तुलनेत ६.४ टक्के होती.
  • केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरअखेर ११ लाख ६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. वार्षिक उद्दिष्टाच्या ४९.८ टक्के हा महसूल आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत निव्वळ कर संकलन वार्षिक उद्दिष्टाच्या ५२.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. केंद्र सरकारचा सप्टेंबरअखेर खर्च २१.१९ लाख कोटी रुपये आहे. वार्षिक उद्दिष्टाच्या तो ४७.१ टक्के आहे.
राजस्थानात काँग्रेसची चौथी यादी जाहीर
  • राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी ५६ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांना उदयपूरमधून तर भाजपमधून आलेल्या मानवेंद्र सिंह यांना सिवानामधून उमेदवारी देण्यात आली आहे.
  • राज्यात २५ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत १५१ उमेदवारांची घोषणा केली आहे. मंगळवारी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली.
  • काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) राज्याचे प्रभारी सुखजिंदर रंधवा आणि पक्षाचे प्रदेश प्रमुख गोविंद दोतसरा या बैठकीला उपस्थित होते. तसेच सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि छाननी समितीचे अध्यक्ष गौरव गोगोई हेही हजर होते. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी टोंक मतदारसंघातून निवडणूक अर्ज दाखल केला.

 

आदिवासींच्या बलिदानाला स्वातंत्र्योत्तर इतिहासात योग्य स्थान मिळाले नाही -मोदी :
  • ‘आदिवासी समाजाशिवाय भारताचा भूतकाळ आणि वर्तमान अपूर्ण आहे आणि देश या समाजाच्या बलिदानाचा ऋणी आहे. दुर्दैवाने आदिवासी समाजाच्या या संघर्षांला व बलिदानाला स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात योग्य स्थान मिळाले नाही. मात्र, आता देश ही चूक सुधारत आहे,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले.

  • राजस्थानातील बांसवाडाजवळील मानगड धाम येथे ‘मानगड धामची गौरवगाथा’ या कार्यक्रमात मोदी बोलत होते.

  • मानगड धामच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रानेही त्याचा विकास आराखडा तयार करून या दिशेने एकत्रित काम केले पाहिजे, असे आवाहन करून मोदी म्हणाले, की आपल्या स्वातंत्र्यलढय़ातील प्रत्येक टप्पा, इतिहासाचे प्रत्येक पान आदिवासींच्या शौर्याने भरलेले आहे. आम्ही आदिवासींच्या बलिदानाबद्दल व त्यांच्या योगदानाबद्दल ऋणी आहोत.

  • निसर्गापासून पर्यावरणापर्यंत व संस्कृतीपासून परंपरांपर्यंत या समाजाने भारताचे चारित्र्य जपले आहे. अशा या आदिवासी समाजाची सेवा करून देशाने त्यांचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे. त्या भावनेने आमचे सरकार आठ वर्षांपासून प्रयत्न करत आहे. मानगड धाम हे आदिवासी वीरांच्या तपाचे, त्याग, तपस्या आणि देशभक्तीचे स्फूर्तिस्थळ आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील नागरिकांचा हा समान वारसा आहे.

ट्विटर ‘ब्लू टिक’साठी आता दर महिन्याला मोजावे लागणार पैसे; मस्क यांची घोषणा :
  • ट्विटरचे मालकी हक्क मिळताच अब्जाधीश एलॉन मस्क यांनी कंपनीच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्विटरच्या वापरकर्त्यांना अकाऊंट वेरिफाईड करुन ‘ब्लू टिक’ मिळवण्यासाठी आठ डॉलर म्हणजेच अंदाजे ६६१ रुपये प्रती महिना मोजावे लागणार आहेत. ‘ब्लू टिक’ मिळवण्यासंदर्भातील ट्विटरची सध्याची यंत्रणा बकवास असल्याचंही ट्वीट त्यांनी केलं आहे. प्रत्येक देशाच्या खरेदी क्षमतेनुसार या फीमध्ये बदल होईल, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

  • ट्विटरच्या या ‘ब्लू टिक’ सेवेचे अनेक फायदे असतील, असे मस्क यांनी म्हटले आहे. ”रिप्लाय’, ‘मेन्शन’ आणि ‘सर्च’ या सेवांमध्ये नव्या धोरणानुसार वापरकर्त्यांना प्राधान्य मिळणार आहे. यामुळे स्पॅम आणि स्कॅमपासून वाचण्यास मदत होईल. याशिवाय वापरकर्त्यांना मोठे व्हिडीओ आणि ऑडिओदेखील पोस्ट करता येणार आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त जाहिरातींपासूनही वापरकर्त्यांची सुटका होईल”, अशी माहिती मस्क यांनी दिली आहे.

  • ट्विटरसोबत काम करण्यास उत्सुक असलेल्या प्रकाशकांना ‘पेवॉल बायपास’ मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कंपनीकडून अक्षरमर्यादेत मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. सध्या ट्विटरवर २८० शब्दांची मर्यादा आहे. ‘कंटेंट मॉडरेशन’ धोरणाचे पुनरावलोकन करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय मस्क यांनी घेतला आहे.

‘एमपीएससी’ उत्तीर्ण होऊनही नियुक्ती नाही ; स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांमध्ये संताप :
  • स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येने राज्यभर खळबळ उडाल्यानंतर तत्कालीन सरकारने विद्यार्थीप्रेमी असल्याचा पुळका आणत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) बळकट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ मध्ये निवड झालेले, कागदपत्र पडताळणी, चारित्र व वैद्यकीय पडताळणी झालेले ११४३ उमेदवार शासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे अद्यापही नियुक्तीपासून वंचित आहेत. निवडीच्या चार महिन्यानंतरही सरकार नियुक्ती देत नसल्याने उमेदवारांमध्ये संताप आहे.

  • लोणकर आत्महत्येचे पडसाद विधिमंडळातही उमटले. यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये ‘एमपीएससी’ला बळकट करत वेळेत परीक्षा व निकाल देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ‘पुढे पाठ मागे सपाट’ या म्हणीप्रमाणे कुठलीही घोषणा पूर्ण झाली नाही. नव्या सरकारनेही ‘एमपीएससी’ उत्तीर्णाकडे दुर्लक्षच केल्याचे चित्र आहे.

  • स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या मुलाखती रखडल्यामुळे स्वप्निलने कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर ‘एमपीएससी’ने मुलाखती घेतल्या. मात्र, याच स्थापत्य अभियांत्रिकीचा मुलाखतीनंतर निकाल जाहीर होऊनही ११४३ उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी आदी सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही उमेदवार आजही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

  • ‘एमपीएससी’ने मुलाखती घेऊन निकाल जाहीर केला असला तरी राज्य सरकार उत्तीर्ण उमेदवारांना वेळेत नियुक्तीच देणार नसेल तर या निकालाचा अर्थ काय? असा सवाल आता उमेदवार उपस्थित करीत आहेत. याविरोधात आता या ११४३ विद्यार्थ्यांनी शासनाविरोधात दंड थोपटले असून मुंबईच्या आझाद मैदानावर साखळी उपोषण सुरू आहे.

हायलो खुली बॅडिमटन स्पर्धा - लक्ष्य सेनचा पहिल्याच फेरीत पराभव :
  • भारताचा आघाडीचा बॅडिमटनपटू लक्ष्य सेनला हायलो खुल्या बॅडिमटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. हाँग काँगच्या एन्ग का लोंग अँगसने लक्ष्यला १२-२१, ५-२१ असे पराभूत केले.

  • भारताच्या २१ वर्षीय लक्ष्यला अवघ्या २७ मिनिटांत पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या हंगामातील लक्ष्यची ही सर्वात खराब कामगिरी ठरली. पहिल्या गेमच्या २-२ अशा बरोबरीनंतर अँगसने लक्ष्यला संधीच मिळू दिली नाही. पहिल्या गेममध्ये लक्ष्य पुढे १२ गुणांपर्यंत तरी मजल मारू शकला. मात्र, दुसऱ्या गेमला लक्ष्यला पाचच गुणांची मजल मारता आली. सलग नऊ गुणांची कमाई करताना अँगसने विजयावर शिक्कामोर्तब केले.

  • मिश्र दुहेरीत ईशान भटनागर आणि तनिशा क्रॅस्टो यांनाही पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. चीनच्या फेंग यान झे-हुआंग डोंग पिंग जोडीने भारताच्या ईशान-तनिशाचा २१-१३, २१-१२ असा पराभव केला.

  • किदाम्बी श्रीकांत, समीर वर्मा, एच. एस. प्रणॉय, सायना नेहवाल, मालविका बनसोड, फ्रेंच खुल्या स्पर्धेतील दुहेरीचे विजेते सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

02 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.