चालू घडामोडी आणि दिनविशेष - 02 जून 2023

Date : 2 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा: किरण, लक्ष्य उपांत्यपूर्व फेरीत
  • पात्रता फेरीतून आगेकूच करणाऱ्या किरण जॉर्ज आणि लक्ष्य सेन यांनी आपली विजयी लय कायम राखताना थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत सायना नेहवाल, अश्मिता चलिहा, तर पुरुष दुहेरीत भारताची आघाडीची जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टीचे आव्हान संपुष्टात आले.
  • लक्ष्यने चीनच्या लि शी फेंगला २१-१७, २१-१५ असे नमवले. उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर मलेशियाच्या लेओंग जून हाओचे आव्हान असेल. पुरुष एकेरीच्या अन्य लढतीत किरणने चीनच्या वेंग हाँग यांगला २१-११, २१-१९ असे सरळ गेममध्ये नमवताना आगेकूच केली.
  • महिला एकेरीत सायनाने चीनच्या हे बिंग जिआओकडून ११-२१,१४-२१ अशी हार पत्करली. अश्मिताला स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून १८-२१, १३-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या मोहम्मद शोशिबूल फिक्री व बेगास मौलाना जोडीने सात्त्विक व चिराग जोडीला २४-२६, २१-११, २१-१७ असे नमवले.
नागपूर ‘एम्स’ला ‘एनएबीएच’ मानांकन, देशात पहिलेच रुग्णालय, पंतप्रधानांकडून अभिनंदन
  • नागपूर ‘एम्स’ने स्वच्छतेपासून इतर सर्वच सोयींवर विशेष लक्ष दिले. त्यामुळे ‘एम्स’ला नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सचे (एनएबीएच) मानांकन मिळाले असून, देशातील हे मानांकन असलेले नागपूर ‘एम्स’ पहिले रुग्णालय ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीसाठी अभिनंदन केले आहे.
  • रुग्णांवर चांगला उपचार करण्यासाठी ‘एम्स’ प्रशासन येथील स्वच्छता, शस्त्रक्रियेचे तंत्र, प्रयोगशाळेतील विविध तपासणी, रुग्णांना औषधांच्या दिल्या जाणाऱ्या चिठ्ठ्यांसह लहान- सहान गोष्टींवर लक्ष ठेवते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी ‘एनएबीएच’ मानांकनासाठी अर्ज केला. त्यांनाच यासाठी नोडल अधिकारी नियुक्त केले गेले. ‘एनएबीएच’ चमूने पहिल्या निरीक्षणानंतर ‘एम्स’मध्ये सुमारे २५ त्रुटी काढल्या होत्या. या त्रुटी दूर करून ‘एम्स’ने पुन्हा आपली बाजू मांडली. त्यानंतर हे मानांकन ‘एम्स’ला मिळाले आहे. दरम्यान, नागपूर ‘एम्स’ने ‘ट्विट’ करून ही माहिती सार्वजनिक केली होती. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक ‘ट्विट’ केले. त्यात पंतप्रधान म्हणाले, की या कामगिरीबद्दल ‘एम्स’ नागपूरच्या चमूचे अभिनंदन, ही कामगिरी करत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचा एक मापदंड स्थापित केला आहे.

गडकरींची भूमिका महत्त्वाची

  • नागपूर ‘एम्स’साठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीच जोर लावला होता. त्यानंतर नागपूर एम्सला झटपट शैक्षणिक वर्ग सुरू करण्यासह या प्रकल्पाच्या बांधकाम व रुग्णसेवेला गती देण्यासाठी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घातले, हे विशेष.
भारत-नेपाळ संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्नशील; पंतप्रधान मोदींचे आश्वासन
  • भारत आणि नेपाळ यांच्या संबंधाने हिमालयाची उंची गाठावी यासाठी प्रयत्न करत राहू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर दिले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये गुरुवारी विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. या वेळी दोन्ही देशांमधील सीमावाद आणि इतर प्रश्न सोडवण्यावर एकमत झाले.
  • चर्चेनंतर माध्यमांना दिलेल्या निवेदनामध्ये मोदी यांनी नमूद केले की, भविष्यामध्ये दोन्ही देशांतील संबंध सुदृढ करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. गुरुवारी दोन्ही नेत्यांनी संयुक्तरीत्या काही प्रकल्पांचे दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केले आणि काही प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच भारत आणि नेपाळदरम्यान काही करारांवर सह्या करण्यात आल्या. त्यामध्ये सीमापार पेट्रोलियम पाइपलाइन, संयुक्त चेकपोस्ट उभारणे आणि जलविद्युत ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवणे यांचा समावेश आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याचा निश्चय दोन्ही नेत्यांनी केला.
  • या वेळी पंतप्रधान प्रचंड यांनी पंतप्रधान मोदींच्या शेजाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या धोरणाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध अतिशय जुने आणि बहुआयामी आहेत.

राष्ट्रपतींकडून प्रचंड यांचे स्वागत

  • नेपाळ हा भारतासाठी नेहमी प्राधान्यक्रमावरील देश राहिला आहे, असे आश्वासन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी नेपाळच्या पंतप्रधानांना दिले. पंतप्रधान पुष्पकमल प्रचंड यांनी राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. त्या वेळी दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे राष्ट्रपतींनी त्यांना सांगितले.
उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानंतर आता लोकशाही, राजकीय पक्षही NCERT च्या पुस्तकांमधून हद्दपार!
  • काही दिवसांपूर्वी NCERT च्या पुस्तकातून चार्ल्स डार्विनचा थिअरी ऑफ इव्होल्युशन अर्थात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वगळल्यामुळे मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यासंदर्भात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. देशभरातील शिक्षणसंस्थांमधून केंद्र सरकारकडे आपला निषेध व्यक्त करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा एनसीईआरटीनं मुलांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रम सुधारणा मोहिमेअंतर्गत दहावीच्या पुस्तकातून लोकशाहीसमोरील आव्हाने, राजकीय पक्ष, सत्तासंघर्ष आणि चळवळ यावरचे धडेच हद्दपार केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा यावरून देशभर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

नव्याने काय वगळलं NCERT ने?

  • NCERTने इयत्ता दहावीच्या पुस्तकातून विज्ञान आणि लोकशाही राजकारण अर्थात सायन्स आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स पार्ट वन या विषयांमधून प्रत्येकी तीन ती धडे गाळले आहेत. यामध्ये सायन्स विषयातील पिरिऑडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, सोर्सेस ऑफ एनर्जी आणि सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅच्युरल रिसोर्सेस हे तीन धडे वगळण्यात आले आहेत.
  • डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स पार्ट वन विषयातून पॉप्युलर स्ट्रगल्स अँड मूव्हमेंट्स, पॉलिटिकल पार्टीज आणि चॅलेंजेस टू डेमॉक्रसी हे तीन धडे वगळले आहेत. एकीकडे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वगळल्यानंतर निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नसताना आता पुन्हा एकदा नव्याने NCERTच्या पुस्तकातून हे धडे वगळल्याने त्यावर शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

NCERT म्हणते…

  • दरम्यान, यासंदर्भात एनसीईआरटीनं प्रतिक्रिया दिल्याचं एनडीटीव्हीनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. यानुसार, “करोनाच्या महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणं फार महत्त्वाचं झालं आहे. अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी, विषयांची द्विरुक्ती आणि सध्याच्या काळात गैरलागू ठरलेला मजकूर ही संबंधित धडे वगळण्यामागची महत्त्वाची कारणं ठरली आहेत”, असं एनसीईआरटीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Renault चा मोठा रेकॉर्ड; भारतात ११ वर्षांमध्ये केली तब्बल ‘एवढ्या’ लाख गाड्यांची विक्रमी विक्री
  • Renault ही एक फ्रेंच ऑटोमोबाईल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करत असते. मात्र कंपनीसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे रेनॉल्ट कंपनीने ११ वर्षांमध्ये तब्बल ९ लाख गाड्यांची विक्री केली आहे. तसेच विक्री करत असताना कंपनीने विविध प्रॉडक्ट्सच्या पोर्टफोलिओने देशातील ग्राहकांच्या विविध गरजा आणि प्राथमिकता पूर्ण केली आहे.
  • रेनॉल्ट कंपनीचे देशामध्ये ४५० पेक्षा जास्त विक्री आणि ५३० सर्व्हिस स्टेशन्सचे नेटवर्क आहे. हे नेटवर्क कंपनीच्या प्रत्येक ग्राहकाला मदत आणि व्यक्तिगत सर्व्हिस देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते.
  • रेनॉल्ट इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम ममिल्लापल्ले म्हणाले, ” या उल्लेखनीय कामगिरीमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. मागील काही वर्षांमध्ये आम्ही भारतामध्ये एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. सरकारच्या ‘मेक इन इंडियाच्या’ व्हिजनसाठी कंपनीची वचनबद्धता अतूट आहे. रेनॉल्टने आपल्या आगामी उत्पादनांसाठी ९० टक्के स्थानिकीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”
  • ” भारत एक धोरणात्मक देश असून रेनॉल्ट ग्रुपसाठी टॉप ५ बाजारपेठांपैकी एक आहे. भारतासाठी आमच्याकडे एक दीर्घकालीन धोरण देखील आहे. आम्ही भारतासाठी एक मजबूत उत्पादन योजना तयार केली आहे. त्यामध्ये स्थानिकरणावर जास्त जोर देण्यात आला आहे. ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी उत्पादन आणि सेवा यामध्ये काही नवीन कल्पना आणायची रेनॉल्ट ग्रुपची योजना आहे.” असे वेंकटराम ममिल्लापल्ले म्हणाले.

 

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा - आनंदचा लॅग्रेव्हवर विजय :
  • भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने मंगळवारी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या पारंपरिक (क्लासिकल) विभागातील पहिल्या फेरीत मॅक्झिमे वाशिये-लॅग्रेव्हला ४० चालींत पराभूत केले. भारतीय ग्रँडमास्टर आनंदने या विजयाद्वारे तीन गुणाची कमाई केली. याचप्रमाणे अमेरिकेच्या वेस्टली सो याने तैमूर राजाबोव्हला नमवून आनंदसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले आहे.

  • मॅग्नस कार्लसनने (१.५ गुण) चीनच्या वांग हाओशी (१ गुण) बरोबरी साधली. याचप्रमाणे अनिश गिरी (१.५ गुण) आणि व्हेसेलिन टोपालोव्ह (१ गुण) तसेच शाखरियार मॅमेडायारोव्ह (१.५ गुण) आणि आर्यन तारी (१ गुण) यांच्यातील सामनेसुद्धा बरोबरीत सुटले. पारंपरिक प्रकारात बरोबरीचा निकाल लागल्यास अर्मेगेडोन (सडन डेथ) डाव खेळवण्यात येतो.

  • पारंपरिक स्पर्धेआधी खेळवण्यात आलेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकारात आनंदने सातव्या फेरीत कार्लसनवर विजय मिळवून चौथा क्रमांक मिळवला. आनंदने अनिश गिरी (नेदरलँड्स) आणि व्हॅचिएर-लॅग्रेव्ह यांच्याकडून अनुक्रमे चौथ्या व नवव्या फेरीत हार पत्करली होती.

आशिया चषक हॉकी स्पर्धा - भारताला कांस्यपदक; राजकुमारच्या गोलमुळे जपानवर विजय :
  • युवकांचा समावेश असलेल्या भारताच्या पुरुष संघाने बुधवारी दिमाखदार कामगिरी करीत जपानला १-० असे नमवून आशिया चषक हॉकी स्पर्धेचे कांस्यपदक पटकावले. ‘अव्वल-४’ फेरीच्या मंगळवारी झालेल्या अखेरच्या लढतीत दक्षिण कोरियाने ४-४ असे बरोबरीत रोखल्यामुळे भारताला जेतेपद टिकवण्यात अपयश आले. परंतु जपानविरुद्धच्या लढतीत राजकुमार पालने सातव्या मिनिटाला झळकावलेला एकमेव मैदानी गोल निर्णायक ठरला. त्यानंतर उर्वरित सामन्यात भारतीय बचावपटूंनी प्रतिस्पध्र्याना गोल करण्याची कोणतीच संधी दिली नाही.

  • भारतीय संघाने पहिल्या पाच मिनिटांत आक्रमक खेळ दाखवला, परंतु जपानच्या बचावाने त्यांना रोखले. सातव्या मिनिटाला उजवीकडून उत्तम सिंगने त्वेषाने प्रतिहल्ला करीत राजकुमारला गोलसाहाय्य केले. राजकुमारने जपानचा गोलरक्षक ताकाशी योशिकावाला चकवत भारताचे खाते उघडले. तीन मिनिटांनी भारताला दोन सलग पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण ते दोन्ही वाया गेले. अखेरच्या पाच मिनिटांत जपानने बरोबरीसाठी कसून प्रयत्न केले. पण भारतीय संरक्षण फळीने आघाडी टिकवून ठेवली.

  • दुसऱ्या सत्रात जपानने आक्रमकतेवर भर देत २०व्या मिनिटाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण जपान आणि भारताला गोल करण्याच्या आणखी काही संधी चालून आल्या, परंतु दोन्ही संघ अपयशी ठरले. मध्यांतरानंतर जपानने बरोबरीच्या निर्धाराने आणखी दोन लागोपाठ पेनल्टी कॉर्नर मिळवले. परंतु भारतीय बचाव भेदण्यात ते अयशस्वी ठरले. त्यानंतर भारताला आघाडी वाढवण्याची सुवर्णसंधी चालून आली. परंतु एसव्ही सुनीलच्या पासवर राजकुमारला गोल साकारता आला नाही.

तळय़ातील तरुणाने टाकाऊ वस्तूंपासून बॅटरीवर चालणारी गाडी बनवली :
  • गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. याच गरजेतून तळा तालुक्यातील एका तरुणाने चक्क बॅटरीवर चालणारी जीप तयार केली आहे. टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली ही जीप सध्या सर्वाच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.

  • तळा येथील विराज टिळक हे केबल व्यवसाय करतात. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना सतत प्रवास करावा लागतो; पण इंधनाच्या वाढत्या दरामुळे त्यांना हा प्रवास खर्चीक ठरू लागला होता. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलशिवाय चालणारे एखादे वाहन आपल्याकडे असवा अशी गरज त्याला सातत्याने भासू लागली; पण बाजारात बॅटरीवर चालणाऱ्या गाडय़ांचा पर्याय उपलब्ध होता. पण त्या गाडय़ा महागडय़ा होत्या. हा खर्च परवडणारा नसल्याने त्याने स्वत:च बॅटरीवर चालणारी गाडी बनविण्याचा निर्णय त्याने घेतला. 

  • गावातील भंगारवाल्यांकडून टाकाऊ सामान गोळा केले. वेिल्डग मशिन, ड्रिल मशीन, कटर आणि रिबिट मशीन मित्रांकडून आणले. काही मित्रांनी या कामात लागेल ते सहकार्य देण्याचे मान्य केले. जुन्या मोडलेल्या गाडय़ांच्या सामानाची जुळवाजुळव केली. सात दिवसांनी गाडी बनविण्याचे काम सुरू केले. दोन-तीन प्रयत्न फसले; पण जिद्द सोडली नाही. पुन्हा जोमाने काम सुरू केले. मग मात्र यश मिळाले. स्टीअरिंग, सस्पेन्शन, पिक-अप, रिव्हर्स गिअरची चाचणी केली. ती यशस्वी झाली. 

  • या गाडीसाठी चार बॅटरींचा वापर करण्यात आला आहे. एकदा चार्ज केलेली गाडी साधारणपणे ७० ते ८० किलोमीटर धावते आहे. ३० किलोमीटर ताशी वेगाने ही गाडी प्रवास करू शकते आहे. गाडी चार्जिगसाठी दिवसाला २५ ते ३० रुपयांचा खर्च येतो आहे. 

अमेरिकेकडून युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्र पुरवठा :
  • युक्रेनला अत्याधुनिक मध्यम श्रेणी रॉकेट प्रणाली पाठवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अध्यक्ष जो बायडेन प्रशासनाने मंगळवारी हा निर्णय जाहीर केला.

  • युक्रेनच्या दोन्बस प्रदेश ताब्यात घेण्याचे रशियाचे प्रयत्न रोखण्यासाठी युक्रेनची धडपड सुरू आहे. अमेरिकेचा हा निर्णय म्हणजे ‘आगीत तेल ओतण्या’चा प्रकार असल्याची टीका रशियाने केली आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की युक्रेनच्या संरक्षण सहाय्यासाठी अमेरिकेने मंजूर केलेल्या ७० कोटी डॉलरच्या मदतीचा भाग म्हणून हेलिकॉप्टर, रणगाडाविरोधी शस्त्र प्रणाली, अत्याधुनिक क्षेपणास्त्र-रॉकेट प्रणाली पुरवली जाणार आहे.

  • प्रशासनाकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल. अध्यक्ष बायडेन यांनी सोमवारी सांगितले होते, की आम्ही युक्रेनला रशियाला लक्ष्य करणारी लांब पल्ल्याची रॉकेट यंत्रणा पाठवत नाही. रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपप्रमुख दिमित्री मेदवेदेव यानी या निर्णयाचे स्वागत केले होते.

  • युक्रेनला आधुनिक विमानविरोधी क्षेपणास्त्रे व रडार यंत्रणा देण्याची घोषणा जर्मनीने बुधवारी केली. युक्रेनला भरीव मदतीसाठी जर्मनी काही करत नाही अशा देशांतर्गत व मित्रराष्ट्रांच्या टीकेस जर्मन सरकारला तोंड द्यावे लागले होते.  चान्सलर ओलाफ शोल्त्स यांनी जर्मनीच्या लोकप्रतिनिधींना सांगितले, की जर्मनीची अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा ‘आयआरआयएस-टी एसएलएम’ क्षेपणास्त्रे युक्रेनला पाठवण्यात येतील. यामुळे युक्रेनला रशियाच्या हवाई हल्ल्यापासून अवघ्या शहराचे संरक्षण करता येईल.

वस्तू व सेवा कर संकलनात घट ; मे महिन्यात राज्यात २०,३१३ कोटी, देशात १.४१ लाख कोटी जमा :
  • राज्यासह देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनात मे महिन्यात घट नोंदविण्यात आली़  राज्यात मे महिन्यात २०,३१३ कोटींचे संकलन झाले असून, एप्रिलच्या तुलनेत ते २५ टक्के कमी आह़े  देशात या महिन्यात जीएसटी संकलनाने १.४० लाख कोटींच्या पुढे मजल मारली असली तरी एप्रिलच्या तुलनेत त्यात १६ टक्क्यांनी घट नोंदविण्यात आली आह़े

  • देशात चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनाने नवा विक्रम करत प्रथमच दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. एप्रिल २०२२ मध्ये देशभरात एकूण १ लाख ६७ हजार ५४० कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून गोळा झाला होता. त्या तुलनेत मे महिन्यात जीएसटी संकलन १६ टक्क्यांनी आटले आहे. मात्र, आर्थिक वर्षांतील पहिल्या महिन्याच्या तुलनेत दुसऱ्या महिन्यातील संकलन नेहमी कमीच असते, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी मासिक संकलनाची आकडेवारी जाहीर करताना सांगितले. गेल्या सलग ११ महिन्यांत जीएसटी संकलनाने मासिक एक लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.

  • राज्यात मे महिन्यात २०,३१३ कोटींचे जीएसटी संकलन झाले. एप्रिल महिन्यात राज्यात २७,४९५ कोटींचे संकलन झाले होते. त्या तुलनेत राज्यातील संकलनात सुमारे २५ टक्क्यांनी घट झाली.

  • गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राज्यात २२ हजार कोटींचे संकलन झाले तर मे महिन्यात १३,३९९ कोटींचे संकलन झाले होते. अर्थात तेव्हा करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्बंध लागू करण्यात आले होते. २०२१च्या मे महिन्यातील संकलनाच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यातील संकलनात मात्र ५० टक्क्यांची वाढ झाली आहे.

जैविक, रासायनिक शस्त्रांचा धोका - भारताचा संयुक्त राष्ट्र संघटनेत जगाला इशारा :
  • जैविक व रासायनिक घटकांचा शस्त्रे म्हणून गैरवापर होण्याचा धोका असल्याचा इशारा भारताने जगाला दिला आहे. कोविड- १९ महासाथीच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला. आंतरराष्ट्रीय समुदायाला या धोक्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. कारण या क्षेत्रात झपाटय़ाने विनाशकारी प्रगती झाली आहे. 

  •  ‘‘नवनवीन तंत्रज्ञानामुळे दहशतवादी संघटनांकडून मोठय़ा प्रमाणावर अशी सर्वंकष विनाशकारी शस्त्रे मिळवून वापरण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होऊ शकतो,’’ असा इशारा भारताच्या संयुक्त राष्ट्र संघटनेतील प्रतिनिधी ए. अमरनाथ यांनी मंगळवारी दिला. अण्वस्त्र, रासायनिक आणि जैविक शस्त्रांच्या प्रसारावरील ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद १५४० समिती’च्या खुल्या सत्रात अमरनाथ म्हणाले, की या अस्त्रांच्या प्रसाराच्या वाढणाऱ्या धोक्यांबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेणे आवश्यक आहे.

  • क्षेपणास्त्रे आणि ‘ड्रोन’सारख्या मानवरहित हवाई प्रणाली मिळवण्याची दहशतवादी आणि प्रस्थापित सरकारविरोधी गटांची क्षमता वाढत आहे.  त्यामुळे या अपारंपरिक अस्त्र-शस्त्रांच्या गैरवापराचा धोका वाढल्याचे

  • सांगून अमरनाथ म्हणाले, की ‘कोविड-१९’ महासाथीचा काळ व या काळात रसायन आणि जीवशास्त्रातील प्रगतीमुळे, जैविक घटक आणि रसायनांचा शस्त्रे म्हणून गैरवापर होण्याचा धोका वाढला आहे.

  • या मुद्दय़ांवर समिती संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य राष्ट्रांना कशी मदत करू शकते, यावर विचारमंथन करण्यासाठी हे खुले विचारविनिमिय व्यासपीठ उपयोगी ठरेल, असेही अमरनाथ यांनी नमूद केले. 

०२ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.