चालू घडामोडी आणि दिनविशेष - 02 ऑगस्ट 2023

Date : 2 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दोन हजारांच्या ८८ टक्के नोटा बँकांकडे जमा
  • चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर ३१ जुलै २०२३ अखेर बँकांकडे ८८ टक्के नोटा जमा केल्या गेल्या असून, चलनात असलेल्या ३.६२ लाख कोटी रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटांपैकी बँकिंग प्रणालीमध्ये ३.१४ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा जमा झाल्या आहेत, अशी माहिती बँकेने मंगळवारी दिली.
  • रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी अचानक दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून परत घेण्याचा निर्णय घेतला आणि ३० सप्टेंबपर्यंत बँकांमध्ये या नोटा जमा करण्याच्या किंवा त्याच मूल्याच्या दुसऱ्या नोटा बदलून घेण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले. त्यानंतर, दोन तृतीयांशपेक्षा अधिक म्हणजे जवळपास ८८ टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या असून अजूनही सुमारे ४२ हजार कोटी रुपये मूल्याच्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आलेल्या नाहीत. परत आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांपैकी ८७ टक्के ठेवी स्वरूपात आल्या आणि उर्वरित सुमारे १३ टक्के नोटा अन्य मूल्याच्या नोटांमध्ये बदलण्यात आल्या आहेत.
  • नागरिकांकडे असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी आणि/किंवा बदलण्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आणखी दोन महिन्यांचा उपयोग करून घेण्याचे आवाहन केले आहे.
टिळक पुरस्कार देशवासीयांना अर्पण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुरस्काराची रक्कम ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला
  • लोकमान्य टिळक म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या माथ्यावरचा टिळा आहे. त्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी कैक पटींनी वाढली आहे, असे नमूद करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशवासीयांना समर्पित केला. पुरस्काराची रक्कम त्यांनी ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला देण्याची घोषणा केली.
  • लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, रोहित टिळक, प्रणती टिळक आणि गीताली टिळक या वेळी व्यासपीठावर होते.
  • मोदी म्हणाले, की देशाला अनेक महानायक देणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीला मी वंदन करतो. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी जितका उत्साहित आहे तितकाच भावुकदेखील आहे. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या माथ्यावरचा टिळा आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी समाजसुधारणेसाठी दिलेले योगदान असाधारण आहे.
  • लोकमान्य टिळक आणि गुजरात यांचा संबंध उलगडताना मोदी यांनी सरदार पटेल यांचा दाखला दिला. ते म्हणाले, की स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात लोकमान्य अहमदाबाद येथील तुरुंगात होते. तेथून सुटल्यानंतर त्यांची सभा झाली होती. त्या काळी या सभेला ४० हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. त्यामध्ये सरदार पटेल होते. अहमदाबाद महापालिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पटेल यांनी अहमदाबादमध्ये टिळक यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ब्रिटिश महाराणीच्या नावाने बनवलेल्या व्हिक्टोरिया उद्यानाची जागा निवडली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला.
विश्लेषण: ‘आय फ्लू’ म्हणजे काय?
  • मागील काही दिवसांपासून मुंबईसह देशभरात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (एम्स) दररोज अंदाजे १०० रुग्ण सापडत आहेत, तर मुंबईतील जे. जे. रुग्णालयामध्ये दररोज साधारणपणे २० ते २५ रुग्ण सापडत आहेत. त्याचप्रमाणे नागपूरमधील जिल्हा रुग्णालयातही दररोज जवळपास २५ रुग्ण येत आहेत. त्यामुळे जुलैत राज्यासह देशात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे.

आय फ्लू होण्याचे कारण ?

  • आय फ्लू म्हणजेच एक प्रकारे डोळे येणे. साधारणपणे दरवर्षी पावसाळ्यात डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरते. पावसाळ्याव्यतिरिक्त वातावरणात होणारे बदल, वाढलेली आर्द्रता यामुळे ही साथ झपाट्याने पसरताना दिसते. डोळे येणे म्हणजेच आय फ्लूमध्ये डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह होतो. आर्द्रता आणि दूषित पाण्यामुळे या हंगामात बरेच जीवाणू आणि विषाणू वाढतात, त्यामुळे या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. त्याचा सामान्यतः प्रौढांपेक्षा लहान मुलांवर अधिक परिणाम होतो.

प्रादुर्भाव झाल्यास काय करावे?

  • वेदना, लालसरपणा, अंधुक दृष्टी, डोळे सूजणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, पापणी चिकट होणे, डोळ्यातून चिकट द्रव्य स्रवणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. कधीकधी अंधूक दिसते. हा आजार साधारणपणे पाच ते सात दिवसांत बरा होत असला तरी डोळे येतात त्यावेळी होणारा त्रास हा अत्यंत वेदनादायक असतो. त्यामुळे त्यावर स्वत:च्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत. डोळ्यांच्या डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर चिन्हे आणि लक्षणांच्या आधारे त्याचे निदान केले जाते. ज्यामध्ये प्रतिजैविक, दाहक-विरोधी आणि स्नेहक आयड्रॉप्स आणि मलमांचा समावेश आहे.

आय फ्लू कसा पसरतो ?

  • आय फ्लूचा प्रतिबंध आणि प्रसार रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वच्छतेच्या चांगल्या सवयी. संक्रमित व्यक्ती वापरत असलेल्या कोणत्याही वस्तू न वापरणे. हा आजार थेट संपर्कात आल्याने किंवा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णाच्या वस्तूंच्या संपर्कात आल्याने होते. साधारणपणे टॉवेल, उशाचे अभ्रे, नळ, दाराच्या कड्या इत्यादी वस्तूंच्या स्पर्शाने हा आजार पसरतो. संसर्गजन्य व्यक्ती जेव्हा संपर्कात येते तेव्हा संक्रमण होते. संक्रमित हात डोळ्यांना लागल्यास संसर्ग होतो.
इशान किशनने रचला इतिहास, सलग तिसरे अर्धशतक झळकावत धोनीच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी
  • भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आज त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जात आहे. या निर्णायक सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इशान किशन आणि शुभमन गिल या जोडीने शतकी भागीदारी करत शानदार सुरुवात केली. या काळात दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. या दरम्यान इशान किशन मालिकेत सलग तिसरे शतक झळकावत एक विक्रम केला आहे.
  • इशान किशनचे हे वेस्ट इंडिज दौऱ्यावरील सलग चौथे अर्धशतक आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक आहे. इशानने या मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक ४३ चेंडूत पूर्ण केले. त्याने दुसऱ्या आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यात आणि त्याआधी दुसऱ्या कसोटीतही अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर इशान किशन ६४ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. त्याचबरोबर त्याने एमएस धोनीच्या एका विक्रमाची बरोबर केली.

इशानने एमएस धोनीच्या विक्रमाशी केली बरोबरी -

  • वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सलग तिसरे अर्धशतक झळकावल्यानंतर इशानने एमएम धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. इशान आता वेस्ट इंडिजमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक ५० पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने तिसऱ्यांदा वेस्ट इंडिजमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक ५० प्लस धावा केल्या आहेत. हा पराक्रम तीन वेळा करण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. इशान आणि धोनी व्यतिरिक्त पार्थिव पटेल आणि संजू सॅमसन यांनी प्रत्येकी एकदा हा पराक्रम केला आहे.
रोहिणी आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींना सादर; वंचित ओबीसींना आरक्षणात प्राधान्य?
  • देशातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाचा लाभ त्यातील विविध उपजातींना मिळवून देण्यासाठी केंद्राने नेमलेल्या रोहिणी आयोगाने ओबीसी उपवर्गीकरणाबाबतचा अहवाल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूकडे सुपूर्द केला आहे. राजकीयदृष्टय़ा अत्यंत संवदनशील विषयावरील हा अहवाल गोपनीय ठेवण्यात आला असला तरी, आतापर्यंत आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या वंचित ओबीसी जातींना आरक्षणामध्ये प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण दिले जात असले तरी, केंद्रीय सूचीतील सुमारे २६०० जातींना त्याचा समान लाभ मिळालेला नाही.
  • ओबीसी कोटय़ातील आरक्षण लागू करताना होणारा हा अन्याय दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश जी. रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांचा आयोग ऑक्टोबर २०१७ मध्ये नेमण्यात आली. या समितीला १४ वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी तीव्र होत असताना तसेच, लोकसभा निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर आली असताना, रोहिणी आयोगाने राजकीयदृष्टय़ा संवेदनशील ठरणारा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे.
  • रोहिणी आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारने जाहीर केल्या नसल्या तरी, बिहारचे अर्थमंत्री विजयकुमार चौधरी यांनी केलेल्या विधानावरून शिफारशींचा अंदाज बांधला जात आहे. ‘‘ओबीसी आरक्षणाचा समन्यायी लाभ मिळालेला नसल्याने वर्गीकरण केले जाईल. मात्र, जातनिहाय जनगणना केल्याशिवाय त्याचा लाभ कसा मिळणार’’, असा प्रश्न चौधरी यांनी विचारला आहे.

 

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा ; भारताच्या ‘अ’ संघाची फ्रान्सशी बरोबरी :
  • खुल्या विभागातील दुसऱ्या मानांकित भारताच्या ‘अ’ संघाला सोमवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत फ्रान्सने २-२ असे बरोबरीत रोखले. तसेच दोन्ही विभागांतील भारताच्या ‘क’ संघांना पराभवाचा सामना करावा लागला.

  • भारताच्या सहाही संघांनी पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये या स्पर्धेवर वर्चस्व गाजवले होते. चौथ्या फेरीत मात्र भारताच्या तीन संघांची विजयाची मालिका खंडित झाली. खुल्या विभागातील भारताच्या ‘अ’ संघाला फ्रान्सविरुद्ध सर्वोत्तम खेळ करता आला नाही. पहिल्या पटावरील पी. हरिकृष्णाला जुल्स मोसार्ड, विदित गुजराथीला लॉरेंट फ्रेसिनेट, अर्जुन इरिगेसीला मॅथेऊ कॉर्नेट आणि एस. एल. नारायणनला मॅक्सिम लग्रेडने बरोबरीत रोखले.

  • भारताच्या ‘क’ संघाने स्पेनकडून १.५-२.५ अशी हार पत्करली. सूर्यशेखर गांगुली, एस. पी. सेतुरामन आणि मुरली कार्तिकेयन यांचे सामने बरोबरीत सुटले. त्यामुळे भारताची अभिजित गुप्तावर भिस्त होती. मात्र, तो डेव्हिड अँटोनकडून ४१ चालींमध्ये पराभूत झाल्याने भारताच्या ‘क’ संघाचाही पराभव झाला.

  • भारताच्या ‘ब’ संघाला मात्र विजयी घोडदौड कायम ठेवण्यात यश आले. त्यांच्या डी. गुकेश आणि निहाल सरिन यांनी विजयांची नोंद केली. रौनक साधवानी आणि आर. प्रज्ञानंद यांना मात्र बरोबरीवर समाधान मानावे लागले.

भारतीय वेटलिफ्टिंगपटूंचा नाद नाही करायचा! हरजिंदर कौरला कांस्य पदक :
  • बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय महिला वेटलिफ्टिंगपटू हरजिंदर कौरने ७१ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे. कौरने एकूण २१२ किलो वजन उचलून इंग्लंडच्या सारा डेव्हिस आणि कॅनडाच्या अॅलेक्सिस अ‍ॅशवर्थला मागे टाकत थरारक स्पर्धेत कांस्यपदकावर कब्जा केला.

  • स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई झाली होती. मीराबाई चानूने सुवर्ण, महाराष्ट्रच्या संकेत सरगरने रौप्य, गुरुराजा पुजारी कांस्य आणि बिंद्याराणी देवीने रौप्यपदकाची कमाई केली होती. ऑलिंपिक रौप्य पदक विजेता मीरबाई चानू एकून २०१ किलो ग्रॅम वजनाचा भार पेलवून भारताला यावर्षीचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. २०१ किलो ग्रॅम वजन उचलून तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एक नवीन विक्रम नोंदवला. २७ वर्षीय चानूने स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजनातही नवे विक्रम प्रस्थापित केले.

  • त्यानंतर तिसऱ्या दिवशी लालरिन्नुगा आणि अचिंत शेउलीने सुवर्णपदक पटकावत भारताचा गौरव वाढवला. अचिंत शेउलीने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत भारतासाठी तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. २० वर्षीय अंचितने ७३ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पश्चिम बंगालच्या या खेळाडूने १४३ किलो वजन उचलले. हा या स्पर्धेतील नवीन विक्रम ठरला आहे. अंचितच्या अगोदर युवा वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरिन्नुगाने पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये १४० किलो आणि क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १६० किलो असे एकूण ३०० किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले होते.

‘खरी शिवसेना कोणती हे ठरविण्याची मुभा केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावी’ :
  • खरी शिवसेना कोणती या वादावर निर्णय घेण्याची मुभा केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावी, असे प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. शिंदे सरकारची वैधता, खरी शिवसेना कोणाची या मुद्दय़ावर निवडणूक आयोगापुढील वाद, आमदार अपात्रता या मुद्दय़ांवर शिवसेना नेत्यांनी सादर केलेल्या याचिका फेटाळून लावाव्यात, अशी विनंती त्यांनी न्यायालयास केली आहे.

  • उद्धव ठाकरे यांच्याबरोबर केवळ १५ आमदार असून आपल्यामागे ४० आमदार आहेत. ठाकरे यांचा गट अल्पमतात असून त्यांची मागणी मान्य केल्यास अवघड राजकीय परिस्थिती निर्माण होईल. ठाकरे यांच्याबरोबर असलेल्या १५ आमदारांचा गट ४० आमदारांना बंडखोर ठरवून अपात्र ठरविण्याची मागणी करू शकत नाही. शिवसेनेतील आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या बैठकीत लोकशाही पद्धतीने व बहुमताने पक्षांतर्गत निर्णय घेतले. त्या निर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, अशी विनंती शिंदे यांनी न्यायालयास केली आहे.

  • शिवसेना फुटीसंदर्भातील आणि राज्य सरकारच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पीठापुढे बुधवारी सुनावणी होणार आहे. त्यावेळी या महत्वपूर्ण मुद्दय़ांवर न्यायालय अंतरिम आदेश देण्याची शक्यता आहे.

5G स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओचा दबदबा; तर दुसऱ्या नंबरवर अदानी समूह :
  • भारतातील दूरसंचार स्पेक्ट्रमच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठा लिलाव नुकताच पार पडला. यात उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी म्हणून पुढे आली आहे. तर दुसऱ्या नंबरवर गौतम अदानी समूह आहे.

  • या लिलावात एकूण १.५ लाख कोटी रुपयांच्या बोली लागल्या होत्या. यापैकी ८८ लाख ०७८ कोटी रुपयांच्या बोली मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने लावली होती. तर गौतम अदानी यांच्या समूहाने ४० मेगाहर्ट्झसाठी २१२ कोटी रुपयांची बोली लावली. तसेच सुनील भारती मित्तल यांच्या भारती एअरटेलने ४३ हजार ०८४ कोटी रुपयांची, तर व्होडाफोन-आयडिया लिमिटेडने १८ हजार ७९९ कोटी रुपयांची बोली लावत स्पेक्ट्रम खरेदी केले आहे.

  • 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात एकूण ५१ हजार २३६ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमची विक्री झाली असून यातून सरकारला पहिल्या वर्षी १३ हजार ३६५ कोटी रुपये मिळतील, अशी माहिती दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

भारतीय ज्युदोपटूंची कमाल; सुशीला देवीला रौप्य तर विजय कुमार यादवला कांस्य पदक :
  • बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरू आहे. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय ज्युदोपटूंची कमाल केली आहे. महिला ज्युदोपटू सुशीला देवी लिकमाबाम हिने रौप्य तर विजय कुमार यादवने कांस्य पदकाची कमाई केली.

  • सुशीला देवी लिकमाबामला ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या मायकेला व्हाईटबोईकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विजय कुमार यादवने पुरुषांच्या ज्युदोमध्ये सायप्रसच्या पेट्रोस क्रिस्टोडौलाइड्सचा पराभव करत कांस्यपदक जिंकले.

  • सुशीलाने यापूर्वीही राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकलेले आहे. २०१४ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी ज्युदोमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतही सुशीलाने भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते.

  • टोकियो ऑलिंपिकमध्ये ज्युदो क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणारी सुशीला ही एकमेव खेळाडू होती. सुशीला भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कोम हिला आपला आदर्श मानते.

०२ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.