भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यास सुरुवात; पुण्यातील चौकाचौकात थेट प्रक्षेपण
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामना सुरू झाल्यानंतर शहरातील रहदारी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण शहरातील विविध चौकात करण्यात येत असून, क्रिकेटप्रेमींचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. क्रिकेट सामन्याचा निकाल काय लागणार याची उत्सुकता सामान्यांना आहे. रविवार असल्याने अनेकांनी सकाळीच भाजीपाला, मटण, मासळी खरेदी केले. दुपारी बारानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली. अनेकांनी सहकुटुंब क्रिकेट सामन्याचा आनंद लुटण्याचा ठरविला.
सामिष खाद्यपदार्थ, पावभाजी तयार करण्याचा बेत अनेकांनी रचला. शहरातील प्रमुख चौकातील गणेश मंडळांनी क्रिकेट सामना मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना उपलब्ध करुन दिली आहे. नारायण पेठ, शनिवार पेठ, कसबा पेठ, रविवार पेठ, सदाशिव पेठ भागातील मंडळांनी क्रिकेटप्रेमींसाठी चहापान, तसेच अल्पहाराची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. सामना जिंकल्यानंतर विजयी जल्लोष करण्यासाठी ध्वनीवर्धक लावण्यात आले आहेत.
क्रिकेट सामना सुरू झाल्यानंतर मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आरती करुन श्री गणरायाला विजयाचे साकडे घातले. क्रिकेट सामना सुरू झाल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरात अघोषित संचारबंदी लागू झाल्याचे चित्र होते. दुपारनंतर वाहनांची वर्दळ कमी झाली. बाजारपेठेतील गर्दीही कमी झाली.
सामन्यापूर्वी अहमदाबादमधील विमानतळ राहणार ४५ मिनिटे बंद, ‘हे’ आहे कारण!
गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगणार आहे. या सामन्याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. देशभरात तर उत्साहाचं आणि उत्सुकतेचं वातावरण आहे. दरम्यान, सामन्याला सुरुवात होण्याआधी अहमदाबादेतील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ आज दुपारी १.२५ ते २.१० पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. यामागचं कारणही विमानतळ प्रशासनाने सांगितलं आहे.
सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाने शनिवारी रात्री एक निवेदन जारी केले. त्यानुसार, दुपारी १.२५ ते २.१० पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात भारतीय वायुसेनेचा एअर शो होणार आहे. याकरता विमानतळ ४५ मिनिटे बंद राहणार आहे.
तसंच, या काळात अहमदाबादेत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. विमातळावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी टर्मिनल आणि लँडसाइड येथे प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने येथे सर्व सुरक्षा पथके तैनात करण्यात आले आहेत.
Akasa Air Airlines ने देखील निवेदन जारी केले आहे. अहमदाबाद येथे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे शहरातून येणार्या आणि निघणार्या फ्लाइटला विलंब होऊ शकतो, असं एअरलाईनने सांगितले आहे.
संवैधानिक नैतिकता नाकारू शकत नाही.. ;सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन
विद्यमान सामाजिक पद्धतींबरोबर तणाव निर्माण होतो, या कारणासाठी आपण संवैधानिक नैतिकता नाकारू शकत नाही, असे स्पष्ट मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. सरन्यायाधीश म्हणून ९ नोव्हेंबर रोजी न्या. चंद्रचूड यांना एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर आपली मते मांडली.
संविधानाच्या नजरेतून विद्यमान भारतीय संस्कृतीकडे पाहिल्यास विरोधाभास निर्माण होऊ शकतो. आपली राज्यघटना दुसऱ्याचे अनुकरण असल्याचेही बोलले जाते. याबाबत न्या. चंद्रचूड यांना विचारले असता ते म्हणाले, की काही संवैधानिक मूल्ये ही वैश्विक असतात. अन्य काही देशांनी अंगीकारलेली अशी काही मूल्ये घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली व भारतीय जीवनाशी समरस होण्याकरिता त्यांच्यात आवश्यक बदल केले. राज्यघटना तयार झाल्यानंतरही त्यात शंभरापेक्षा जास्त दुरुस्ती करण्यात आल्याकडे न्या. चंद्रचूड यांनी लक्ष वेधले. अनेक पिढय़ांनी संसदेच्या माध्यमातून घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेद्वारे आपल्या स्वत:च्या आकांक्षांना वाचा फोडल्याचे ते म्हणाले. यासाठी त्यांनी पंचायतराज आणि जीएसटी परिषदेसारख्या केवळ घटनादुरुस्तीच्या आधारे तयार झालेल्या यंत्रणांचे उदाहरण दिले.
न्यायाधीश नियुक्त्यांमध्ये विविधतेचे धोरण
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने (कॉलेजियम) न्यायाधीशांची नावे सुचविताना ‘विविधता’ हे धोरण म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे विविध उच्च न्यायालयांमध्ये िलग, जात आणि प्रादेशिक विविधतेचा समावेश आढळून येतो, असे न्या. चंद्रचूड यांनी सांगितले. देशभरातील न्यायाधीशांच्या ज्येष्ठतेसह विविधतेचा समतोल साधण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे ते म्हणाले.
संसद आणि न्यायालय यांची संस्थात्मक रचना आणि अधिकार वेगवेगळे आहेत. मात्र काही प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता असते. महत्त्वपूर्ण सामाजिक बदल घडविणारे कायदे संसदेत होऊ शकतात, मात्र त्यातून वैयक्तिक प्रकरणांमध्ये अधिकारांचे उल्लंघन थांबविणे शक्य नसते. न्यायालय आणि संसद एकमेकांना पूरक पद्धतीने काम करतात.
भारताचे लष्कर माघारी घ्या! मालदीवच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचे औपचारिक निर्देश
मालदीवचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहमद मुइझ्झू यांनी शनिवारी भारतीय लष्कराचे त्या देशात असलेले जवान परत बोलाविण्याचे औपचारिक निर्देश दिले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मालदीवची राजधानी माले येथे मुइझ्झू यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या कार्यालयाने याबाबत माहिती दिली. तर जवानांना परत बोलाविण्याबाबत ‘चर्चेतून तोडगा’ काढण्याचे ठरल्याचा दावा केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे.
मुइझ्झू यांनी सप्टेंबरमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले विद्यमान अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला होता. भारतीय जवानांची पाठवणी करण्याच्या आश्वासनावर मतदारांनी आपल्याला कौल दिला असल्याचे मुइझ्झू यांनी सांगितले. शुक्रवारी त्यांनी मालदीवचे आठवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. या शपथविधीला भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते. शपथविधीनंतर २४ तासांच्या आत, शनिवारी झालेल्या भेटीत मुइझ्झू यांनी लष्कर परत बोलाविण्याची औपचारिक विनंती करून भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणाला धक्का दिल्याचे मानले जात आहे. मालदीवचे माजी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांचे मुइझ्झू हे निकटचे सहकारी आहेत. यामीन यांनीच २०१३ ते २०१८ या काळात चीनबरोबर संबंध अधिक दृढ केले असल्याने मुइझ्झूदेखील त्याच वाटेने जातील असे मानले जात आहे. मालदिव हा हिंदी महासागर प्रदेशातील मोक्याचे ठिकाण असलेला भारताचा प्रमुख सागरी शेजारी देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सागरमाला’ आणि ‘नेबरहूड फस्र्ट पॉलिसी’ या संकल्पनेमध्ये मालदीवला विशेष स्थान देण्यात आले आहे.
चर्चेतून तोडग्याची भारताची भूमिका
मुइझ्झू यांनी रिजिजूंबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान भारतीय जवानांच्या वापसीचा मुद्दा काढल्याचे भारतीय परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांनी मान्य केले. हे जवान तेथे वैद्यकीय मदत आणि अमलीपदार्थ तस्करी रोखण्याच्या कामात वैमानिक म्हणून जबाबदारी पार पाडत असल्याबद्दल मुइझ्झू यांनी समाधान व्यक्त केल्याचा दावाही या अधिकाऱ्यांनी केला. त्याच वेळी जवानांना परत बोलाविण्यासंदर्भात चर्चेतून तोडगा काढण्याचे दोन्ही देशांनी मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारतानं मालदीवमधून आपलं सैन्य मागे घ्यावं, राष्ट्रपती मोहम्मद मुईझ यांची विनंती
भारत आणि मालदीवमधील संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, मालदीवमधून भारतानं आपलं सैन्य मागे घ्यावे, अशी विनंती मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयानं केली आहे. मोहम्मद मुईझ यांनी मालदीवच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतरच हे निवेदन जाहीर करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती कार्यालयानं काढलेल्या निवेदनात म्हटलं, “मालदीव सरकारनं भारताला आपलं सैन्य मागे घेण्याची विनंती केली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मोहम्मद मुईझ यांची राष्ट्रपती कार्यालयात भेट घेतली. तेव्हा औपचारिकपणे ही विनंती करण्यात आली आहे.”
शनिवारी ( १८ नोव्हेंबर ) मोहम्मद मुईझ यांनी मालदीवच्या राष्ट्रपतीपदी शपथ घेतली. या शपथ ग्रहण सोहळ्याला मंत्री किरेन रिजिजू हेही उपस्थित होते.
मुईझ यांचा पीपल्स नॅशनल काँग्रेस हा पक्ष पूर्णपणे चीनधार्जिणा मानला जातो. मुईझ यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यास भारतीय फौजांना मालदीवमधून हटवू आणि मोठ्या प्रमाणात भारताला अनुकूल असलेल्या देशाच्या व्यापार संबंधांचे संतुलन साधू, असे आश्वासन दिलं होतं.
आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताला २५ सुवर्णपदके :
भारतीय नेमबाजांनी कोरियात दाएगू येथे झालेल्या १५व्या एअरगन अजिंक्यपद स्पर्धेत २५ सुवर्णपदकांची कमाई करताना आपली छाप पाडली. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी भारताने दोन सुवर्णपदके पटकावली. मनू भाकर आणि सम्राट राणा जोडीने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कुमार गटात सांघिक सुवर्णपदक जिंकले. तसेच रिदम सांगवान आणि विजयवीर सिद्धू यांनी याच स्पर्धा प्रकारात वरिष्ठ गटातून सोनेरी यश मिळवले. त्यामुळे भारताने या स्पर्धेत २८ प्रकारांतून २५ सुवर्णपदके मिळवून वर्चस्व राखले.
संगवान-सिद्धू जोडीने अचूक लक्ष्य साधताना मिश्र सांघिक गटात कझाकस्तानच्या व्हॅलेरी रखीमधान-इरिना युनुस्मेमटोवा जोडीचा १७-३ असा पराभव केला. शिवा नरवाल आणि युविका तोमर जोडीला कांस्यपदकाच्या लढतीत कोरियन जोडीकडून ६-१६ असा पराभव पत्करावा लागला.
कुमार गटात याव स्पर्धा प्रकारात मनू-सम्राट जोडीने (५७८ गुण) पात्रता फेरीतून दुसऱ्या क्रमांकासह अंतिम फेरीत प्रवेश केला. उझबेकिस्तानची जोडी ५७९ गुणांसह आघाडीवर होती. अंतिम फेरीत मात्र भारतीय जोडीने उझबेकिस्तानच्या निगिना सैदकुलोवा-मुखम्मद कामालोव जोडीवर १७-३ अशी मात केली.
‘एसटी’च्या ताफ्यात येणार पाच हजार इलेक्ट्रिक आणि दोन हजार डिझेल बसगाड्या :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने ‘एलएनजी’ मध्ये रुपांतर करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून स्वच्छता-टापटीपपणा ठेवून गाड्यांची निगा राखा आणि राज्यातील जनतेला दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची ३०२ वी बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनोटिया, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने, कामगार आयुक्त सुरेश जाधव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांचेसह एसटी महामंडळ, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत, यापूर्वीच्या बैठकीत मान्यता मिळालेल्या दोन हजार बसेस घेण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये वाढ करून ५ हजार१५० इलेक्ट्रिक बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्यता दिली. या बसगाड्या घेण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून कर्ज घेण्यासही मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. इलेक्ट्रिक बसेस या वातानुकुलित असल्याने त्याचे सध्याच्या वातानुकूलित बसेस पेक्षा तिकिटदर कमी ठेवून सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
देशाच्या अवकाश क्षेत्रात खासगी ‘विक्रमा’रंभ :
अवघ्या चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या नवउद्योगाने संपूर्ण विकसित केलेल्या ‘विक्रम-एस’ उपग्रह प्रक्षेपकाद्वारे तीन उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशातील नियोजित कक्षेत शुक्रवारी भारतातर्फे सोडण्यात आले. याद्वारे भारताच्या अवकाश मोहिमांमध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाची नांदी झाली आहे. आतापर्यंत भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) या दिग्गज सरकारी संस्थेची यात मक्तेदारी होती.
चेन्नईपासून सुमारे ११५ किलोमीटरवरील ‘इस्रो’च्या सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी साडेअकराला हे प्रक्षेपण झाले. ‘स्कायरूट एरोस्पेस’ या खासगी नवउद्योगाने (स्टार्ट अप) निर्मित केलेल्या या उपग्रह प्रक्षेपकाला ‘विक्रम-एस’ असे देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांचे नाव देऊन त्यांच्या या क्षेत्रातील योगदानास औचित्यपूर्ण अभिवादन करण्यात आले आहे. २०२० मध्ये केंद्राने अवकाश क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले केल्यानंतर ही प्रक्षेपकाची यशस्वी निर्मिती व प्रक्षेपण करणारी ‘स्कायरूट एरोस्पेस’ ही भारतातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे.
‘इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर’ या अवकाशविषयक नियामक संस्थचे अध्यक्ष पवन गोएंका यांनी येथील ‘इस्रो’च्या मोहीम नियंत्रण केंद्रातून बोलताना सांगितले, की ‘स्कायरूट एरोस्पेस’द्वारे ‘मिशन प्रारंभ’ मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. या प्रक्षेपकाने ‘स्कायरूट’ने नियोजित केलेली ८९.५ किलोमीटरची उंची आणि १२१.२ किलोमीटरची कक्षाश्रेणी नेमकी गाठली आहे. नियोजनानुसार हे प्रक्षेपक कार्यान्वित झाले. त्यामुळे ‘स्कायरूट एरोस्पेस’ने उपग्रह प्रक्षेपकातील उपप्रणीली निर्मितीची आपली क्षमता सिद्ध केली आहे. भारतीय खासगी क्षेत्रासाठी अवकाश क्षेत्रातील ही एक नवी सुरुवात आहे. आपल्या सर्वासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे.
या मोहिमेत तीन व्यावसायिक उपग्रह आहेत. यापैकी दोन देशांतर्गत ग्राहकांचे असून, एक परदेशी ग्राहकाचा आहे. ६ मीटर उंच उपग्रह प्रक्षेपक वाहन जगातील पहिल्या काही सर्व-संमिश्र प्रक्षेपकांपैकी एक आहे. त्यात प्रक्षेपकाच्या स्थैर्यासाठी ‘३-डी पिंट्रेड सॉलिड थ्रस्टर’ आहेत.
यूएईच्या १७ वर्षीय क्रिकेटपटूने रचला विश्वविक्रम, सचिन तेंडुलकरला मागे टाकून घेतली भरारी :
संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) युवा खेळाडू अयान अफझल खानने शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) नेपाळविरुद्धच्या, तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीने इतिहास रचला. अफझल खानने प्रथम फलंदाजीत अर्धशतक झळकावले आणि नंतर गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्याच्या जोरावर त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसनी घातली आहे.
या सामन्यात ८व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अफझल खानने ६३ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५४ धावा केल्या. त्यामुळे यूएई संघाने ९ गडी गमावून १७६ धावा केल्या. तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
प्रत्युत्तरात नेपाळच्या संघाने आसिफ शेख (नाबाद ८८) आणि ज्ञानेंद्र मल्ला (६४ धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ४०.१ षटकांत ४ गडी गमावून विजय मिळवला. गोलंदाजीत अफझलने १० षटकात २७ धावा देत १ बळी घेतला. कृपया सांगा की या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफझल खानने १४ धावांत ४ बळी घेतले होते, हा त्याचा या फॉर्मेटमधील पदार्पण सामना होता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करणारा आणि एका सामन्यात ४ विकेट घेणारा अफझल खान हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वयाच्या १७ वर्षे ३ दिवसांत हा पराक्रम करून त्याने सचिन तेंडुलकरला मागे सोडले आहे. अफझल खानने १७ वर्षे २१० दिवस वयात हा पराक्रम करणाऱ्या पाकिस्तानच्या मोहम्मद अमीरचा विक्रम मोडला. तर सचिन तेंडुलकरने १८ वर्षे १८१ दिवसांत हे स्थान मिळवले आहे.