चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ नोव्हेंबर २०२१

Date : 19 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
प्रकाश पादुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार :
  • जागतिक बॅडिमटन महासंघाचा (बीडब्ल्यूएफ) प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार यंदा भारताचे महान बॅडिमटनपटू प्रकाश पादुकोण यांना देण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी भारतीय बॅडिमटन संघटनेकडून पादुकोण यांचे नाव पाठवण्यात आले होते. त्यानंतर पुरस्कार समितीच्या शिफारशीनुसार, जागतिक बॅडिमटन महासंघाने पादुकोण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

  • जागतिक क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारे माजी बॅडिमटनपटू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पदक जिंकून देणाऱ्या पादुकोण यांनी बॅडिमटन खेळाला मोठे योगदान दिले आहे.

  • २०१८मध्ये त्यांना भारतीय बॅडिमटन संघटनेने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले होते. विशेष सेवा पुरस्कारासाठी ‘बीडब्ल्यूएफ’कडून देवेंदर सिंग (हरयाणा बॅडिमटन संघटनेचे अध्यक्ष), एस. ए. शेट्टी (महाराष्ट्र बॅडिमटन संघटनेचे सचिव), डॉ. ओ. डी. शर्मा (भारतीय बॅडिमटन संघटनेचे उपाध्यक्ष) आणि माणिक साहा (माजी प्रशासक) यांना नामांकने देण्यात आली आहेत.

एसटीचे खासगीकरण - चाचपणीसाठी महामंडळाकडून खासगी संस्थेची नियुक्ती :
  • संपाचा तिढा कायम आता असताना एसटीचा खासगीकरणाकडे प्रवास सुरू असल्याचे संकेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तोटय़ात गेलेली एसटी नफ्यात आणण्यासाठी एसटीच्या खासगीकरणाचा पर्याय पुढे आला असून, याबाबत अभ्यास करण्यासाठी ‘केपीएमजी’ या खासगी संस्थेची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब आणि एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गुरुवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • करोनाची साथ आणि निर्बंधांमुळे गेल्या वर्षांपासून प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणेही मंडळासाठी अवघड बनले. सणासुदीच्या काळात तरी उत्पन्न मिळेल, या आशेवर महामंडळ असतानाच ऐन दिवाळीत विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळे महामंडळाला प्रवासी उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

  • गेल्या चार वर्षांत घटलेली प्रवासी संख्या, करोनाच्या साथीचा फटका, संप आदींमुळे एसटीचे आर्थिक चाक आणखी खोलात रुतले. एसटीचे वार्षिक प्रवासी उत्पन्न सात ते आठ हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. मात्र, त्या तुलनेने खर्च अधिक असल्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती खालावत गेलीे. या पार्श्वभूमीवर एसटीला तोटय़ातून नफ्यात आणण्यासाठी महामंडळ पर्याय शोधू लागले असून, आता खासगीकरणाचा विचार करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘लाल सलाम’; पहिल्या पुस्तकाची केली घोषणा :
  • केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दंतेवाडामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यावर पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. स्मृती इराणी यांनी या पुस्तकाला ‘लाल सलाम’ असे नाव दिले आहे. स्मृती इराणी यांनी ट्विटरवर या पुस्तकाची घोषणा केली आहे. तसचे हे पुस्तक अॅमेझॉनवरून प्री-ऑर्डर केले जाऊ शकते, असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलंय. स्मृती इराणी यांचे हे पुस्तक वेस्टलँड या प्रकाशन संस्थेने आणले आहे.

  • स्मृती इराणी यांचे हे पुस्तक एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यापासून प्रेरित आहे. या हल्ल्यात ७६ जवान शहीद झाले होते. स्मृती इराणी म्हणाल्या की, “ही गोष्ट त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून सुरू होती. मग मी ही कथा कागदावर उतरवण्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष न करता लिहायला घेतली. मला आशा आहे की हे पुस्तक वाचणारे लोक पुस्तकाचा आनंद घेतील.”

  • लाल सलाम हे पुस्तक विक्रम प्रताप सिंग नावाच्या तरुण अधिकाऱ्याच्या जीवनावर आहे. त्यात विक्रम प्रताप सिंग यांना राजकारण आणि भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या व्यवस्थेचा कसा सामना करावा लागतो हे सांगितले आहे. प्रकाशनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या पुस्तकाची माहिती देताना, नक्षलवादी आणि माओवादी बंडखोर भागात आव्हानांचा सामना करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आहे. हे पुस्तक २९ नोव्हेंबरपासून वाचकांना उपलब्ध होणार आहे.

आता भारतातही करोना लसीचा तिसरा डोस दिला जाणार?; पुढील आठवड्यात तज्ज्ञांच्या समितीची बैठक :
  • करोना लसीचे बूस्टर शॉट्स देण्याची प्रक्रिया अनेक देशांमध्ये सुरू झाली आहे तर अजूनही अनेक देशांमध्ये यावर विचार केला जात आहे. आता भारतातही दोन डोसनंतर तिसरा डोस देण्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार असून त्यात हा निर्णय घेतला जाणार आहे. भारतातील करोना लसीच्या तिसऱ्या डोसबाबत प्रशासन धोरण ठरवू शकते. भारतात, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांना अतिरिक्त शॉट म्हणून करोनाचा तिसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सीएनएन-न्यूज१८ ला दिलेल्या माहितीमध्ये देशातील लसीच्या तिसऱ्या डोसवर धोरणात्मक दस्तऐवज तयार करण्यासाठी तज्ञ गट काम करत आहे. तिसऱ्या लसीच्या डोसची सुरुवातीला बूस्टर डोसऐवजी अतिरिक्त डोस म्हणून शिफारस केली जाईल.

  • न्यूज१८ नुसार, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे अशा लोकांना अतिरिक्त डोस दिले जातात, तर निरोगी लोकांना दुसरा डोस घेतल्यानंतर काही महिन्यांनंतर बूस्टर शॉट दिला जातो. कोणत्याही रोगामुळे कमी प्रतिकारशक्ती असलेले लोक सामान्य दोन-डोस कार्यक्रमाद्वारे पूर्णपणे संरक्षित नाहीत. त्यामुळे अशा लोकांना अतिरिक्त डोस देण्याची तयारी सुरू आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कर्करोगासारख्या रोगामुळे खराब झाली आहे ते दोन डोसच्या लसीकरणातून संरक्षित नाहीत. अशावेळी तिसरा डोस देणे महत्त्वाचे असते.

रेझांग ला येथील युद्ध स्मारकाचे नूतनीकरण :
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पूर्व लडाखच्या रेझांग ला येथे नूतनीकरण केलेल्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले. याच ठिकाणी १९६२ मध्ये भारतीय जवानांनी चिनी सैन्याशी शौर्याने मुकाबला केला होता.  

  • हे युद्ध स्मारक १३ कुमाऊँ  रेजिमेंटच्या शूर भारतीय सैनिकांना समर्पित आहे, ज्यांनी रेझांग लाच्या युद्धात चीनचा पराभव करताना आपल्या प्राणांची आहुती दिली.

  •   हे स्मारक म्हणजे भारतीय सैन्याने दाखविलेल्या दृढनिश्चयाचे आणि अतीव धैर्याचे उदाहरण आहे, अशा शब्दांत सिंह यांनी स्मारकाचे वर्णन केले. ‘केवळ इतिहासाच्या पानांमध्ये अमर नाही, तर आपल्या हृदयातही कयम अमर राहील,’ असेही संरक्षणमंत्री म्हणाले.

  • ‘१८ हजार फूट उंचीवर लढलेल्या रेझांग लाच्या ऐतिहासिक युद्धाची आजही कल्पना करणे कठीण आहे. जगातील दहा सर्वात मोठय़ा आणि अतिशय आव्हानात्मक लष्करी संघर्षांपैकी एक रेझांग लाची लढाई मानली जाते. मेजर शैतान सिंग

  • आणि त्यांचे सहकारी सैनिक ‘शेवटची गोळी आणि शेवटच्या श्वासापर्यंत’ लढले आणि शौर्य आणि बलिदानाचा नवा अध्याय लिहिला’, असे गौरवोद्गार सिंह यांनी काढले.

फुटबॉल समालोचक कपाडिया यांचे निधन :
  • ‘भारतीय फुटबॉलचा आवाज’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ क्रीडा समालोचक, पत्रकार आणि दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक नोव्ही कपाडिया यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाल़े  ते ६७ वर्षांचे होते.

  • कपाडिया हे गेली काही वर्षे मज्जाससंस्थेशी संबंधित विकाराने आजारी होते. त्यामुळे गेली दोन वर्षे ते व्हिलचेअर वापरायचे. गेल्या महिन्याभरापासून ते कृत्रिम श्वसनयंत्रणेवर होते. काही महिन्यांपूर्वी कपाडिया यांच्या निवृत्तिवेतनाच्या समस्येमुळे माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना चार लाख रुपयांची मदत केली होती.

  • कपाडिया यांनी ‘बेअरफूट टू बूट्स, दी मेनी लिव्हज ऑफ इंडियन फुटबॉल’ यांच्यासारख्या फुटबॉलवरील अनेक पुस्तकांचे लेखन केले आह़े  २०१४ मध्ये त्यांचे ‘दी फुटबॉल फॅनॅटिक्स इसेन्शियल गाइड बुक’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते.

  • फुटबॉलशिवाय कपाडिया यांनी आशियाई, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचे समालोचन केले होते. याशिवाय त्यांनी नऊ ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धाचे वृत्तांकन केल़े  याशिवाय, एसजीटीबी खालसा महाविद्यालयात कपाडिया हे प्राध्यापक होत़े  २००३ ते २०१० या कालखंडात त्यांनी दिल्ली विद्यापीठाचे प्रतिष्ठेचे पदही भूषवले होते.

१९ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.