चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ नोव्हेंबर २०२०

Date : 19 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पूर्व लडाख सीमेवर सैनिकांसाठी सुविधायुक्त निवाऱ्याची व्यवस्था :
  • भारत-चीन यांच्यादरम्यान पूर्व लडाखमधील सीमेवर संघर्ष अजून मिटला नसताना थंडीच्या दिवसात भारतीय लष्कराच्या जवानांना अतिथंड अशा प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागत आहे, परंतु  आता तेथे  सैनिकांसाठी सर्व सोयींनी युक्त अशी निवारा व्यवस्था उभारण्यात आली आहे.

  • अतिउंचीवरील प्रदेशास अनुकूल असा हा आधुनिक अधिवास (निवारा) आहे. थंडीच्या काळात चीनने कदाचित पुन्हा आगळिक केलीच तर या आधुनिक निवाऱ्यांचा सैनिकांना मोठा फायदा होणार आहे.

  • सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या लडाख भागात थंडीच्या दिवसात नोव्हेंबरनंतर हिमकणांचा थर हा ४० फुटांचा असतो तापमान उणे ४० अंश सेल्सियस असते. त्यातही आपले सैनिक प्राणपणाने देशाचे रक्षण करीत असतात. आता या सैनिकांच्या सोयीसाठी खास निवारे तयार करण्यात आले असून त्यामुळे या जवानांची कार्यक्षमता वाढणार आहे.

  • लष्कराने हे निवारे बसवण्याचे काम पूर्ण केले आहे. भारतीय लष्कराचे किमान पन्नास हजार जवान अति उंचीवरील या प्रदेशात हाडे गोठवणाऱ्या थंडीत देशाचे रक्षण करीत असतात. पूर्व लडाखमध्ये तापमान शून्याखाली जात असते.

न्यूझीलंडमध्ये महिला पोलिसांना हिजाब परिधानाची परवानगी :
  • न्यूझीलंडमध्ये पोलीस दलात मुस्लीम महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या गणवेशात ‘हिजाब’चा समावेश करण्यात आला आहे. पण हा हिजाब विशिष्ट पद्धतीचा आहे. कॉन्स्टेबल झिना अली या ‘हिजाब’ गणवेश परिधान करणाऱ्या पहिल्याच आहेत.

  • झिना (वय ३०) या ख्राइस्ट चर्च दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या वर्षी पोलीस दलात सामील झाल्या. त्यावेळी न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर हल्ला करण्यात आला, त्यात ५१ जण ठार झाले होते.

  • या आठवडय़ात त्या पोलीस अधिकारी झाल्या असून हिजाब परिधान करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस ठरल्या आहेत. झिना यांनी हा गणवेश तयार करण्यात मोठी भूमिका पार पाडली. यात धर्म व संस्कृती दोन्हींचा समावेश आहे.

७४ वर्षात पहिल्यांदाच बिहारच्या कॅबिनेटमध्ये नाही एकही मुस्लीम मंत्री :
  • बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी नितीश कुमार यांनी सातव्यांदा शपथ घेतली. याचबरोबर यावेळी अन्य १४ मंत्र्यांना देखील शपथ देण्यात आली.  यानंतर परत एकदा बिहारमध्ये नितीशराज सुरू झालं. मात्र, यंदा प्रथमच बिहार कॅबिनेटमध्ये एकही मुस्लीम चेहरा नसल्याचं समोर आलं आहे. एवढच नाहीतर बिहारमधील सत्ताधारी एनडीएकडे मुस्लीम समाजाचा एकही आमदार नाही.

  • स्वातंत्र्यानंतर कदाचित असं पहिल्यांदाच होत असेल,की बिहारमधील सत्ताधारी आघाडी विधानसभेतील सत्तेच्या खुर्च्यांवर मुस्लीम आमदाराविना बसली आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

  • बिहारमधील एनडीएमध्ये भाजपा, जनता दल संयुक्त, हिंदुस्थान अवाम मोर्चा(सेक्युलर) व विकास इन्सान पार्टी या पक्षांचा समावेश आहे. तरी, यापैकी कोणत्याही एका पक्षाला मुस्लीम आमदाराला निवडून विधानसभेत पाठवता आलेले नाही. विशेष म्हणजे या राज्यात १६ टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लीम लोकसंख्या आहे.

बायडेन यांच्या मंत्रिमंडळात ‘या’ दोन भारतीय वंशाच्या नागरिकांना मिळू शकते स्थान :
  • मागच्या आठवडयात अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अमेरिकेतील जनतेने सत्तांतराचा कौल देत, जो बायडेन यांच्याहाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. लवकरच जो बायडेन आणि कमला हॅरिस आपले मंत्रिमंडळ जाहीर करतील.

  • बायडेन-हॅरिस प्रशासनात दोन भारतीय वशांच्या नागरिकांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

  • अमेरिकन प्रसारमाध्यमांनुसार, अमेरिकेचे माजी सर्जन जनरल विवेक मुर्ती यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. सध्या ते करोनाचा प्रसार रोखण्यासंदर्भात भावी अध्यक्ष जो बायडेन यांचे प्रमुख सल्लागार आहेत. त्यांची आरोग्य मंत्री पदावर नियुक्ती केली जाऊ शकते तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अरुण मजुमदार यांची ऊर्जा मंत्रीपदावर वर्णी लागू शकते.

हंगेरी बुद्धिबळ स्पर्धा - मेंडोसाला जेतेपद :
  • भारताचा १४ वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर लायन मेंडोसाने हंगेरी येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याबरोबरच गोव्याच्या या युवा खेळाडूने ग्रँडमास्टर किताबासाठीचा दुसरा टप्पा पार के ला.

  • ग्रँडमास्टर किताब पटकावण्यासाठी मेंडोसाला आता तिसरा टप्पा पार करावा लागणार आहे. मेंडोसाचे एलो मानांकन २५१६ असून हंगेरीतील स्पर्धा त्याने ७.५ गुणांसह जिंकली. संपूर्ण स्पर्धेत त्याने एकही पराभव पत्करला नाही.

  • याउलट त्याने स्पर्धेत दोन ग्रँडमास्टर्सवर विजय मिळवला. या स्पर्धेतील अव्वल खेळाडू आणि हंगेरीचा ग्रँडमास्टर फोगारासी टिबोरवरील मेंडोसाचा विजय विशेष होता. नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत मेंडोसाने सहा विजय आणि तीन बरोबरी अशी सर्वोत्तम कामगिरी केली.

१९ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.