चालू घडामोडी आणि दिनविशेष - 19 मे 2023

Date : 19 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय विद्यार्थ्यांचा ब्रिटनला आर्थिक फायदा; शैक्षणिक संस्थांचा महत्त्वपूर्ण अहवाल
  • ब्रिटनमधील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसह परदेशी विद्यार्थ्यांमुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर बंधने आणण्यासंबंधी चर्चा सुरू असतानाच हा महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे.
  • पार्टनर अ‍ॅट लंडन इकॉनॉमिक्स या संस्थेने केलेल्या विश्लेषणामध्ये ही महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. ब्रिटनमध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध आणण्याच्या आणि अभ्यासानंतर नोकरी करण्याच्या व्हिसा अधिकारांमध्ये कपात करण्याच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पार्टनर अ‍ॅट लंडन इकॉनॉमिक्स या संस्थेने द हायर एज्युकेशन पॉलिसी इन्स्टिटय़ूट, युनिव्हर्सिटीज यूके इंटरनॅशनल आणि काप्लन इंटरनॅशनल पाथवेज या शैक्षणिक संस्थांसाठी हे विश्लेषण केले.
  • या विश्लेषणासाठी २०२०-२१ ची आकडेवारी विचारात घेण्यात आली आहे. युरोपीय महासंघाबाहेरून आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ब्रिटनला ९६ हजार पौंडाचा फायदा झाला आहे. परदेशी विद्यार्थ्यांमुळे विद्यापीठांना जागतिक दर्जाचे अध्यापन आणि संशोधन करणे शक्य होते, जे एरवी शक्य झाले नसते. या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यात या विद्यापीठांना आलेल्या यशाची प्रशंसा केली पाहिजे असे पार्टनर अ‍ॅट लंडन इकॉनॉमिक्सचे डॉ. गेवन कॉनन म्हणाले. यासंबंधी नियमांमध्ये बदल करायाचे असतील तर पुराव्यांवर आधारित करावेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
  • परदेशी विद्यार्थ्यांवर जितका खर्च होतो त्याच्या दहा पट त्यांच्याकडून ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. याचा फायदा स्थानिक आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला होतो.
एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन
  • एसटी महामंडळाची पहिली बस नगर ते पुणे अशी १ जून १९४८ रोजी धावली. या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे काल‌, बुधवारी रात्री नगर शहरातील माळीवाडा भागातील राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. एसटी महामंडळाच्या धावलेल्या पहिल्या बसचे वाहक ते गेल्यावर्षी धावलेल्या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटक अशा तब्बल ७५ वर्षांचे साक्षीदार लक्ष्मण केवटे होते.
  • आज, गुरुवारी सकाळी नगर शहरातील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एसटी महामंडळाच्या वतीने विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळे तसेच महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली अर्पण केली. नगर जिल्ह्यातील सर्व आगारातून लक्ष्मण केवटे या पहिल्या वाहकाला श्रद्धांजली अर्पण करणारे फलक लावण्यात आले आहेत.
  • एसटी महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी सकाळी ८ वा. धावली. ३० असनांची क्षमता होती. बेडफोर्ड कंपनीची बनावट होती. या प्रवासात चास, सुपे, शिरूर, लोणीकंद या ठिकाणी प्रवाशांनी बसला थांबवले व प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली. खाजगी बससेवा देणारे महामंडळाच्या बसला विरोध करतील, ही शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या पहिल्या बसला पोलीस बंदोबस्तही देण्यात आल्याची आठवण त्यांनी सांगितली होती.
संसदेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण कधी होणार? लोकसभा सचिवालयाकडून मोठी अपडेट
  • गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन कधी होणार? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. येत्या २६ मे रोजी या शपथविधीला नऊ वर्षे पूर्ण होतील. हेच औचित्य साधून मोदी नव्या संसदेच्या इमारतीचे लोकार्पण करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
  • पण आता संसदेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण कधी होणार? याची तारीख समोर आली आहे. २८ मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचं लोकार्पण करणार आहेत. लोकसभा सचिवालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
  • ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी मोदींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित केलं आहे. नवीन संसद भवनाचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. संसदेची नवीन इमारत आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असेल, असं लोकसभेच्या सचिवालयाने सांगितलं.

संसदेच्या नव्या इमारतीसाठी १ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च

  • संसदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन डिसेंबर २०२० मध्ये झाले होते. सध्याच्या संसदेच्या इमारतीच्या बाजुलाच ही नवी इमारत बांधण्यात येत आहे. एचसीपी डिझाईन्स, अहमदाबाद कंपनीचे वास्तूविशारद बिमल पटेल यांच्या देखरेखीखाली या इमारतीचे बांधकाम केलं जात असून इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडकडून केले जात आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी साधारण १ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. विशेष म्हणजे या इमारतीत एकूण ५ हजार कलाकृती असणार आहेत. त्रिकोणी आकार असलेली ही चार मजली इमारत एकूण ६४ हजार ५०० स्केअर किलोमीटर परिसरात वसलेली आहे.
Vodafone-Idea लवकरच लॉन्च करू शकते ५ जी नेटवर्क, जाणून घ्या सविस्तर
  • भारतामध्ये सध्या Reliance Jio, Airtel आणि Vodafone -Idea या तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. यामध्ये जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी आपले ५ जी नेटवर्क देशभरामध्ये सुरु केले आहे. याचा वापरकर्त्यांना मोठा फायदा होत आहे. आता तिसरी मोठी कंपनी व्होडाफोन -आयडिया देखील आपले ५जी नेटवर्क लॉन्च करण्यासाठी तयार आहे. वोडाफोन आयडिया त्यांची ५जी सेवा सुरु करण्यासाठी निधीची तरतूद करत असून लवकरच ५जी सेवेचा लाभ वापरकर्त्यांना मिळणार आहे.
  • दूरसंचार विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, व्हीआय कंपनी जून महिन्यापर्यंत निधी जमवू शकते. त्यानन्तर ५जी सेवा लॉन्च होऊ शकते. कंपनीने तिसऱ्या तिमाहीसाठी परवाना शुल्क आधीच क्लीअर केले आहे. त्यामुळे व्हीआय ५ जी ची स्पर्धा थेट जिओ आणि एअरटेलशी होणार आहे. याबाबतचे वृत्त  The New Indian Express ने दिले आहे.
  • आणखी एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे, व्हीआय फिनलँडची टेक कंपनी नोकियाशी ५जी उपकरणांबाबत चर्चा करत आहे. तसेच व्हीआय ५ जी चे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी नोकियाची मदत मिळू शकते. महत्वाचे नोकिया हा जिओ आणि एअरटेलचा देखील पुरवठादार आहे. व्हीआयची ५जी चाचणी आधीच पूर्ण झाली आहे. म्हणजेच ५जी सेवा लॉन्च होताच वापरकर्त्यांना ते वेगाने रोलआऊट करता येईल.
  • जेव्हापासून जिओ आणि एअरटेल यांनी आपली ५जी सेवा सुरु केली आहे. तेव्हापासून त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर दुसऱ्या बाजूला व्हीआयच्या वापरकर्त्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. ५जी स्पीडचा वापर करण्यासाठी अनेकांनी आपले व्हीआय कार्ड पोर्ट करून घेतले. ५जी लॉन्च केल्यानंतर व्हीआय आपल्या वापरकर्त्यांची संख्या राखू शेकेल अशी अपेक्षा आहे.
राज्यात विजेची मागणी २८ हजार मेगावॅटवर
  • राज्यातील अनेक भागात तापमान वाढल्याने विजेची मागणी २८ हजार मेगावॅटवर गेली आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीकडून १० हजार मे.वॅ.हून अधिक वीज निर्मिती केली जात आहे.
  • महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी उन्हाळ्यात विजेच्या मागणीत होणारी वाढ लक्षात घेऊन ‘मिशन औष्णिक ८००० मेगावॅट’ चे उद्दिष्ट निश्चित केले होते. राज्यात यावर्षी एप्रिल महिन्यात विजेची मागणी २९ हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली होती. मे महिन्यात ती २८हजार मेगावॅटवर गेली. पुढच्या काही दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने सर्व संसाधनांचे नियोजन केले.
  • १७ मे २०२३ रोजी रात्री ७.४५ वाजता एकूण १० हजार ७० मेगावाट वीज निर्मितीचा पल्ला गाठला. यापूर्वी १७ मार्च रोजी रात्री ८ वाजता १० हजार १०२ मेगावॅट वीज निर्मितीचा उच्चांक गाठला होता. सध्या महानिर्मितीच्या सर्व संचांतून वीजनिर्मिती सुरू आहे. त्यामुळे विजेची वाढीव गरज भागवण्यास मदत होत असल्याचा दावा महानिर्मितीने केला आहे.

 

महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा - निखत अंतिम फेरीत :
  • भारताच्या निखत झरीनने (५२ किलो) वर्चस्वपूर्ण विजयासह बुधवारी इस्तंबूल येथे चालू असलेल्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. परंतु उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यामुळे मनीषा मौन (५७ किलो) आणि परवीन हुडा (६३ किलो) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

  • उपांत्य सामन्यात निखतने आत्मविश्वासाने खेळ करीत ब्राझिलच्या कॅरोलिन डी अल्मेडाला ५-० असे सहज नामोहरम केले. कनिष्ठ विश्वविजेत्या निखतने संयमी खेळाचे प्रदर्शन करीत कॅरोलिनवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. पण, मनीषाने टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या इटलीच्या इरमा टेस्टाकडून ०-५ अशी हार पत्करली, तर परवीनने युरोपियन कांस्यपदक विजेत्या आर्यलडच्या एमी ब्रॉडहस्र्टकडून १-४ असा पराभव पत्करला.

  • २०१९मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या मनीषाने दुसऱ्यांदा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळताना ताकदीने फटके खेळत तांत्रिक गुणाधिक्याच्या बळावर विजयासाठी प्रयत्नांची शर्थ केली. परंतु इरमापुढे तिचा निभाव लागला नाही.

  • आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉिक्सगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत.

मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात दुप्पट वाढ, सत्या नडेला यांची मोठी घोषणा :
  • मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच त्यांच्या पगारात वाढ होणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी अलीकडेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे, की ते त्यांच्या अधिक गुणवत्ताधारक कर्मचाऱ्यांना जास्त पगार देणार आहे. तसेच कंपनी जागतिक गुणवत्ता बजेटला दुप्पट करणार आहे.

  • नडेला यांचा कर्मचाऱ्यांना ईमेल मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी सांगितले, की ते त्यांच्या कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या कामाचे नेहमीच कौतुक करतात. बाजारात ‘कंपनीच्या प्रतिभेला खूप मागणी आहे आणि यामुळे आम्हाला वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतो. तुम्ही आमच्यासाठी मौल्यवान आहात आणि ग्राहक आणि भागीदारांना सक्षम बनवण्याचे उत्तम काम करता.

  • कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार - सत्य नाडेला म्हणाले की, आम्ही आमचे जागतिक गुणवत्ता बजेट दुप्पट करत आहोत. त्याचे फायदे वेगवेगळ्या मार्केट डेटाच्या आधारे देशानुसार बदलतील आणि जास्तीत जास्त वाढ बाजाराची मागणी कुठे आहे यावर अवलंबून असेल. ६७ किंवा त्यापेक्षा कमी स्तरावरील सर्व स्तरांसाठी दरवर्षी किमान २५ टक्क्यांनी स्टॉक रेंज वाढवणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या ईमेलनंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कंपनीचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वास नडेला यांनी व्यक्त केला आहे.

  • अलीकडेच अ‍ॅमेझॉनने कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ केली होती - मायक्रोसॉफ्ट व्यतिरिक्त अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात आधीच वाढ केली असून यामध्ये अ‍ॅमेझॉनचे नाव अग्रक्रमाने आहे. फेब्रुवारीमध्येच, Amazon ने कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञान कर्मचार्‍यांस मूळ वेतन दुप्पट केले. ते $१६०,०० वरून $३५०,००० केले आहे.

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा १५ जूनपासून ऑफलाइन पद्धतीने :
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा येत्या १५ जूनपासून ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.

  • शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा विभागाकडून पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची तयारी करण्यात आली आहे.

  • बीए, बीकॉम, बीएस्सी, एम ए, एमकॉम, एम एससी, एमबीए, एमसीए आदी पारंपारिक व व्यवसायिक विद्याशाखांच्या सर्व विषयांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन व तयारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आली आहे.

  • त्यानुसार शहरात २४, तर ग्रामीण भागात ४७ असे एकूण ७१ केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. पदवी व पदव्युत्तर मिळून सुमारे ७० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सम सत्राच्या या परीक्षा आहेत. सुरुवातीला अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील. १५ जून ते २० जुलैपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

फिनलँड, स्वीडन यांचा ‘नाटो’च्या सदस्यत्वासाठी औपचारिकरीत्या अर्ज :
  • फिनलँड व स्वीडन यांनी ‘नाटो’च्या सदस्यत्वासाठी औपचारिकरीत्या अर्ज केला असल्याचे जगातील या सर्वात मोठय़ा लष्करी आघाडीचे महासचिव जेन्स स्टॉल्टेनबर्ग यांनी बुधवारी सांगितले. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाची पार्श्वभूमी या घडामोडीला आहे. ‘फिनलँड व स्वीडन यांच्या नाटोत सहभागी होण्याच्या विनंतीचे मी स्वागत करतो. तुम्ही आमचे सर्वात घनिष्ट भागीदार आहात’, असे या दोन देशांच्या राजदूतांकडून विनंती पत्रे मिळाल्यानंतर स्टॉल्टेनबर्ग यांनी पत्रकारांना बुधवारी सांगितले.

  • या अर्जाला आता ३० सदस्य देशांचा पािठबा मिळणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला सुमारे दोन आठवडे लागण्याची शक्यता आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी फिनलँड व स्वीडन यांच्या नाटोतील सहभागाबद्दल आक्षेप नोंदवला आहे.

  • आक्षेप नाकारण्यात आले आणि नाटो प्रवेशाबाबतची बोलणी ठरल्याप्रमाणे पार पडली, तर येत्या काही महिन्यांत हे दोन्ही देश सदस्य बनू शकतील. या प्रक्रियेला सहसा ८ ते १२ महिने लागतात, मात्र या दोन्ही नॉर्डिक देशांच्या डोक्यावर रशियाच्या धोक्याची टांगती तलवार लक्षात घेऊन नाटो ही प्रक्रिया लवकरात लवकर करू इच्छिते. उदाहरणच घ्यायचे तर, या दोन देशांच्या प्रवेशाला काही दिवसांतच मंजुरी देण्याची आपल्याला अपेक्षा असल्याचे कॅनडाने म्हटले आहे.

  • रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केल्यापासून, फिनलँड व स्वीडन या देशांतील जनमत त्यांनी ‘नाटो’चे सदस्यत्व घेण्याकडे मोठय़ा प्रमाणावर झुकले आहे. हे दोन्ही देश नाटोशी घनिष्ट सहकार्य करत आलेले आहेत.

मध्य प्रदेशातील स्थानिक निवडणुकांसाठी सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदिल :
  • मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. राज्यात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सोबतच ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर शिवराज सरकारने कोर्टात पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाचा निर्णय आला आहे.

  • मध्य प्रदेश सरकारनं ओबीसींना आरक्षण देण्यासाठी १२ मे रोजी रात्री उशिरा सुप्रीम कोर्टा एक पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. यावर १७ मे रोजी सुनावणीही झाली होती. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी सरकारने २०११ ची लोकसंख्येची आकडेवारी न्यायालयात सादर केली होती. त्यानुसार राज्यातील ओबीसी लोकसंख्या ५१ टक्के आहे. याच आधारावर सुप्रीम कोर्टात आरक्षणाची मागणी करण्यात आली होती. गेल्या १ वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

  • दुसरीकडे, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघू न शकल्यामुळे आरक्षणाशिवायच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने आता दिलेला निर्णय महत्त्वाचा मानला जात आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.

१९ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.