चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ मे २०२१

Date : 19 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लसपुरवठय़ासाठी सातत्याने प्रयत्न -मोदी :
  • करोनाविरुद्धच्या लढय़ात राज्यातील आणि जिल्ह्य़ातील अधिकारी हे ‘फिल्ड कमांडर’ आहेत, असे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, स्थानिक स्तरावर प्रतिबंधक क्षेत्र जाहीर करून चाचण्यांची व्याप्ती वाढविणे आणि जनतेला योग्य आणि परिपूर्ण माहिती देणे ही करोनावर मात करण्याचे मार्ग आहेत, असे मंगळवारी सांगितले. लशींचा पुरवठा मोठय़ा प्रमाणावर व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, असेही ते म्हणाले.

  • नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नऊ जिल्ह्य़ांतील ४६ जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या स्थानिक गरजांप्रमाणे तुम्हाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे या वेळी मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आणि धोरणात्मक बदल केल्यास त्याची माहिती कोणत्याही दबावाखाली न येता द्यावी, असेही ते म्हणाले.

  • लसीकरण हा करोनाशी लढण्याचा योग्य मार्ग आहे, त्यामुळे त्याबाबत ज्या अफवा पसरल्या आहेत त्याचे सामूहिकपणे उच्चाटन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

अमेरिकेकडून लवकरच जगभरात आठ कोटी लसमात्रांचा पुरवठा :
  • अमेरिका कोविड प्रतिबंधासाठी आणखी २ कोटी लस मात्रा जगाला देणार असून एकूण आठ कोटी मात्रा दिल्या जाणार आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.

  • त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, पुढील सहा आठवडय़ांत आठ कोटी मात्रा परदेशात पाठवण्यात येणार असून जूनअखेरीपर्यंत अमेरिकेने तयार केलेल्या १३ टक्के मात्रा परदेशांना देण्यात येणार आहेत. एखाद्या देशाने जगाला एवढय़ा मात्रा पुरवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

  • रशिया व चीन यांनीही एवढय़ा मात्रा दिलेल्या नसून त्यांनी केवळ १.५कोटी मात्रा दिल्या आहेत. लशींच्या संदर्भात चीन व रशिया यांचा बराच गाजावाजा होता पण तरी अमेरिकेनेच जास्त लशी पुरवल्या असून नवप्रवर्तनाचे दर्शन घडवित करोना काळात मदत केली आहे. करोना विरोधातील लढाईत अमेरिका हेच जगाचे शस्त्रागार ठरले आहे. जगात सगळीकडे करोनाची साथ संपावी यासाठी आम्ही लशी देत आहोत. इतर देशांकडून काही फायदा मिळावा अशी आमची कुठलीच इच्छा नाही असे सांगून बायडेन म्हणाले की, अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या ६ कोटी व परवाना मिळालेल्या इतर २ कोटी लशी आम्ही जगाला देणार आहोत.

  • मार्चमध्ये आम्ही चाळीस लाख अ‍ॅस्ट्राझेनेका लशी कॅनडा व मेक्सिकोला दिल्या होत्या. एप्रिलअखेरीस  आम्ही  ६ कोटी लशी परदेशांना देण्याचे ठरवले आहे.  अ‍ॅस्ट्राझेनेका लशीला अजून अमेरिकेत वापरासाठी मान्यता मिळालेली नाही. अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन लवकरच या लशीला मान्यता देईल.

पंतप्रधानांची जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक लाइव्ह दाखवताना प्रोटोकॉल तुटला नाही का?; ‘आप’चा सवाल :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नऊ जिल्ह्य़ांतील ४६ जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. करोनाविरुद्धच्या लढय़ात राज्यातील आणि जिल्ह्य़ातील अधिकारी हे ‘फिल्ड कमांडर’ आहेत, असे नमूद केलं.

  • स्थानिक स्तरावर प्रतिबंधक क्षेत्र जाहीर करून चाचण्यांची व्याप्ती वाढविणे आणि जनतेला योग्य आणि परिपूर्ण माहिती देणे ही करोनावर मात करण्याचे मार्ग आहेत, असं मोदींनी या बैठकीच्या वेळी सांगितलं.

  • अनेक वृत्तवाहिन्यांवरुन मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतलेली ही बैठक लाइव्ह दाखवण्यात आली. मात्र आता यावरुनच दिल्लीमध्ये सत्तेत असणाऱ्या आम आदमी पार्टीने आक्षेप घेत केंद्र सरकार आणि मोदींना प्रोटोकॉलची आठवण करुन दिलीय.

मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार, तर मुलांना मोफत शिक्षण, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा :
  • महाराष्ट्राप्रमाणेच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये देखील करोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढते आहे. दिल्लीमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काही रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यातच, करोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढू लागलेला असताना दिल्ली सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

  • “करोनामुळे जर कुणाचा मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात येईल. तसेच, ज्या विद्यार्थ्यांचे पालक करोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांना वयाच्या २५व्या वर्षापर्यंत महिना २५०० रुपये पेन्शन आणि मोफत शिक्षण दिलं जाईल”,

  • अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यामुळे आपल्या आप्तस्वकीयांना करोनामध्ये गमावलेल्या व्यक्तींना, विशेषत: पालक गमावलेल्या मुलांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

अमरावतीकर डॉ. संदेश गुल्हाने स्कॉटिश संसदेत खासदार :
  • मूळचे अमरावतीकर आणि सध्या स्कॉटलंड येथे वैद्यकीय सेवा देत असलेले डॉ. संदेश प्रकाश गुल्हाने यांनी नुकतीच स्कॉटिश संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे संदेश गुल्हाने हे भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहेत. त्यांनी स्कॉटिश संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. त्यांच्या यशाने अमरावतीत आनंद व्यक्त के ला जात आहे.

  • येथील भाजी बाजार परिसरातील प्रकाश व त्यांच्या पत्नी पुष्पा गुल्हाने यांचे चिरंजीव संदेश गुल्हाने यांचा जन्म लंडनमध्येच झाला. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या संदेश गुल्हाने यांनी पूर्व किल्ब्राईडमधील रुग्णालयात ऑर्थोपेडिक रजिस्ट्रार म्हणून काम केले आहे.

  • वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी विविध क्षेत्रात कार्य करत स्कॉटिश राजकारणात प्रवेश केला. २०२१ मध्ये डॉ. संदेश यांनी स्कॉटलंडच्या संसद निवडणुकीत ग्लासगो पोलॉक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. स्कॉटिश कन्झव्र्हेटिव्ह आणि युनियनवादी पार्टीकडून डॉ. संदेश खासदार म्हणून निवडून आले. डॉ. संदेश गुल्हाने यांनी कोविडसाठी आघाडीवर काम केले आहे.

राज्यात दैनंदिन ३ हजार मेट्रिक टन प्राणवायूची लवकरच निर्मिती -मुख्यमंत्री :

  • सध्याच्या परिस्थितीत प्राणवायूसाठी इतरांवर अवलंबून राहाणे परवडणारे नाही. त्यामुळे दैनंदिन तीन हजार मेट्रिक टन प्राणवायूनिर्मिती राज्यातच करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. शिर्डी येथील साईबाबा रुग्णालय परिसरात उभारलेल्या प्राणवायूनिर्मिती सयंत्राचे लोकार्पण आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळा शुभारंभ चाचणी सोहळा मंगळवारी दूरसंवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

  • ते म्हणाले की, पहिल्या लाटेनंतर आपण आरोग्य सेवा वाढविण्यास प्राधान्य दिले. दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त असल्याने आणि रुग्णांना प्राणवायू मोठय़ा प्रमाणात लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्राणवायूनिर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे ठरविले. आपल्या राज्यासाठी आवश्यक प्राणवायूनिर्मिती राज्यातच व्हावी यासाठी ठिकठिकाणी प्राणवायू प्रकल्पांना परवानगी देण्यात येत आहे.

  • उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  प्राणवायू प्रकल्प सुरू करून साईबाबा संस्थानने सामाजिक बांधिलकी जपली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात प्राणवायू तुटवडा असल्याचे दिसून आले. त्यातून आपण मार्ग काढला.

१९ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.