चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ जानेवारी २०२१

Date : 19 January, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“रिपब्लिक टीव्हीचे रेटिंग थांबवा, IBF सदस्यत्वही रद्द करा” :
  • अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणाचा रिपब्लिक टीव्हीला फटका बसण्याची शक्यता आहे. गोस्वामी व पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर एनबीएने (News Broadcasters Association) टीव्ही रेटिंगवरून ‘बार्क’वर (Broadcast Audience Research Council) ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिक टीव्हीचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी दूरचित्रवाणी वाहिन्यांची देशातील शिखर संस्था असलेल्या ‘आयबीएफ’कडे (Indian Broadcasting Federation) केली आहे.

  • टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरू असताना अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियातून व्हायरल झालं. या चॅटमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. गोस्वामी-दासगुप्ता यांच्यातील चॅटवर एनबीएने आश्चर्य व्यक्त केलं आहे. चॅटसंदर्भात सविस्तर पत्रक एनबीएकडून प्रसिद्ध करण्यात आलं असून, रिपब्लिक वृत्तवाहिन्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवर जोर देण्यात आला आहे. त्याचबरोबर वृत्तवाहिन्यांचं रेटिंग निश्चित करणाऱ्या ‘बार्क’च्या कार्यशैलीबद्दल सवाल करत ताशेरे ओढले आहेत.

  • इंडिया टीव्हीचे चेअरमन आणि मुख्य संपादक रजत शर्मा हे एनबीएचे अध्यक्ष आहेत. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यात मिलीभगत होती, असा आरोप एनबीएने केला आहे.

  • ”दासगुप्ता व गोस्वामी यांच्यातील हजारो व्हॉट्सअ‍ॅप चॅट बघून धक्काच बसला आहे. या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून स्पष्ट दिसतंय की गोस्वामी व दासगुप्ता यांनी हातमिळवणी केली होती. रिपब्लिक टीव्हीची प्रेक्षक संख्या वाढवून दाखवण्यासाठी रेटिंगमध्ये हेराफेरी करण्यात आली. रिपब्लिक टीव्हीच्या फायद्यासाठी इतर वाहिन्यांचं रेटिंग कमी करण्यात आलं. त्याच्यासाठी दोघांमध्ये हातमिळवणी होती,” असं एनबीएनं म्हटलं आहे.

भारतीय महिला हॉकी संघाची अर्जेटिनाशी बरोबरी :
  • शर्मिला देवी आणि दीप ग्रेस इक्का यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने अर्जेटिनाच्या कनिष्ठ संघाविरुद्धची लढत २-२ अशी बरोबरीत सोडवली.

  • अर्जेटिना दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. भारताची युवा आघाडीवीर शर्मिला हिने २२व्या मिनिटाला खाते खोलल्यानंतर पावला सान्तामारिना हिने २८व्या मिनिटाला अर्जेटिनाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर तीन मिनिटांनी दीप ग्रेस हिने भारताला पुन्हा आघाडीवर आणले. पण ब्रिसा ब्रगसेर हिने ४८व्या मिनिटाला अर्जेटिनासाठी दुसरा गोल करत हा सामना बरोबरीत राखला.

  • करोनामुळे वर्षभरानंतर मैदानात उतरून चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक शोएर्ड मरिन यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले, ‘‘बऱ्याच कालावधीनंतर आम्ही पहिला सामना खेळलो. सर्वानाच प्रतिस्पध्र्याशी दोन हात करण्याचा सराव व्हावा म्हणून आम्ही २३ खेळाडूंना मैदानावर उतरवले.’’

राज्यात आजपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण :
  • राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या तयारीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा घेतला. आठवड्यातील चार दिवस राज्यातील २८५ केंद्रांवर लसीकरण होणार असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

  • ‘वर्षा’ येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. शनिवारी राज्यात लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेचे कौतुक केले.

  • बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

  • लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन ॲपबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली. या ॲपची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरिता काही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. त्या केंद्र शासनाला पाठविण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

१९ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.