कुस्तीमधील ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि मार्गदर्शक पंढरीनाथ पठारे यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती जीवनगौरव राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याचप्रमाणे युवराज खटके (अॅथलेटिक्स), बाळासाहेब आवारे (कुस्ती), नितीन खत्री (तायक्वांदो), जगदीश नानजकर (खो-खो) आािण अनिल पोवार (पॅराअॅथलेटिक्स) या पाच जणांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत २०१८-१९ या वर्षांसाठी ६३ जणांना शिवछत्रपती पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली. यात ४८ खेळाडूंचा (२३ पुरुष, २५ महिला) समावेश आहे. येत्या शनिवारी, २२ फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे.
गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ३०६ खेळाडूंनी पदक जिंकत अग्रस्थान मिळवून दिले. या विजेत्यांना एकूण सव्वातीन कोटी रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राखीव ठेवला. उमेदवारी अर्जात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फडणवीस यांनी फेरविचार याचिका केली.
या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याची गरज नसल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. त्याविरोधात वकील सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गेल्या ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल केला होता.
२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. फडणवीस यांच्या फेरविचार याचिकेवर न्या. अरुण मिश्रा, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या पीठापुढे सुनावणी झाली. लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांने केला होता.
लोकप्रतिनिधी कायद्याच्या ३३ अ (१) नुसार फौजदारी गुन्ह्यामध्ये आरोपनिश्चित झाले नसतील तर त्याची माहिती देण्याचे कोणतेही बंधन नाही. गुन्ह्यांची दखल न्यायालयाने घेतली म्हणून त्याची माहिती द्यावी असे नव्हे, असा प्रतिवाद फडवणीस यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुंद रोहतगी यांनी केला.
चीनमध्ये करोना संसर्गाचा प्रसार वेगाने होत असून, आतापर्यंत बळींची संख्या १८०० वर पोहोचली आहे. करोना विषाणूचे केंद्रस्थान ठरलेल्या वुहान येथील रुग्णालयाच्या संचालकाचा संसर्गाने मृत्यू झाला आहे.
वुहानमधील वुचांग रुग्णालयाचे संचालक लिउ झिमिंग यांचा मंगळवारी सकाळी करोना संसर्गाने मृत्यू झाल्याची माहिती चिनी माध्यमांनी दिली. एखाद्या रुग्णालयाचे संचालक करोना विषाणूचे बळी ठरल्याची ही पहिलीच घटना आहे. चिनी माध्यमांनी आधी प्रसारित केलेली ही बातमी नंतर हटविण्यात आली.
विषाणूने आतापर्यंत इतर सहा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे बळी घेतले असून, देशातील मृतांची संख्या १८६८ वर पोहोचली आहे. याआधी करोना विषाणूबाबत धोक्याचा इशारा देणारे नेत्ररोगतज्ज्ञ ली वेनलिंयांग यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमीही दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वुहानमध्ये आता मास्क व संरक्षक पोशाखाची टंचाई आहे. अनेक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास होत आहे.
प्रसिद्ध बंगाली अभिनेते व माजी तृणमूल काँग्रेस खासदार तपस पॉल यांचे मंगळवारी मुंबई येथील रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते.
पॉल यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जानेवारीत ते मुलीला भेटण्यासाठी मुंबईत आले होते. कृष्णनगर मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार होते. सीबीआयने रोझ व्हॅली घोटाळ्यात अटक केल्यानंतर ते डिसेंबर २०१६ मध्ये चित्रपटातून राजकारणाकडे वळले होते. त्यांच्या पश्चात कन्या सोहिनी व पत्नी नंदिनी असा परिवार आहे. साहेब, अमर बंधन यांसारखे त्यांचे चित्रपट गाजले. त्यांचा जन्म हुगळी जिल्ह्य़ातील चंदननगर येथे झाला. त्यांनी हुगळी मोहसीन कॉलेजमधून पदवी घेतली.
नंदिनी पॉल यांनी सांगितले की, तपस यांना १ फेब्रुवारी रोजी ते अमेरिकेत उपचारासाठी जात असताना मुंबई विमानतळावर कोसळल्याने रुग्णालयात दाखल केले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
इ.स. २००० मध्ये तपस पॉल यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता नंतर अलिपोर मतदारसंघातून ते आमदार झाले. २००९ पासून दोनदा ते कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. रोझ व्हॅली प्रकरणात त्यांना अटक झाली होती. त्यावेळी पक्षाने विचारपूसही केली नाही असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. नंतर ते जामीनावर सुटले आणि सक्रिय राजकारणातून माघार घेतली.
ब्रिटनचा फॉम्र्युला-वन ड्रायव्हर लुइस हॅमिल्टन आणि महान फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांनी यंदाच्या वर्षांतील सर्वोत्तम क्रीडापटूसाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या लॉरेयो पुरस्कारावर संयुक्तपणे नाव कोरले आहे. २० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच समान मते मिळाल्यामुळे दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सहा वेळा ‘फिफा’चा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणारा मेसी हा या पुरस्कारासाठी उपस्थित राहू शकला नाही. या दोघांनी गोल्फपटू टायगर वुड्स, केनियाचा धावपटू इलिड किपचोग, टेनिसपटू राफेल नदाल आणि मोटोजीपी विजेता मार्क मार्केझ यांच्यावर मात करत हा पुरस्कार पटकावला.
२०१९च्या जागतिक स्पर्धेत पाच सुवर्णपदके मिळवणारी अमेरिकेची जिम्नॅस्ट सिमोन बाइल्स हिने सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला. गेल्या चार वर्षांतील तिचा हा तिसरा पुरस्कार ठरला. याआधी तिने २०१७ आणि २०१९मध्ये सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्कारावर नाव कोरले होते. तिने जमैकाची धावपटू शेली अॅन-फ्रेसर-प्राइस, टेनिसपटू नाओमी ओसाका, अमेरिकेची अॅथलीट अॅलिसन फेलिक्स यांचे आव्हान मोडीत काढले.
दक्षिण आफ्रिकेच्या रग्बी संघाने जर्गेन क्लॉप यांच्या लिव्हरपूल आणि अमेरिकेच्या महिला फुटबॉल संघावर मात करत लॉरेओ जागतिक सांघिक पुरस्कारावर मोहोर उमटवली. दक्षिण आफ्रिका रग्बी संघाने २०१९मध्ये विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.
करोना विषाणूचा प्रसार वुहान येथील प्राण्यांच्या बाजारपेठेतून नव्हे तर तेथून जवळच असलेल्या एका प्रयोगशाळेतून झाल्याचे चिनी वैज्ञानिकांनी म्हटले आहे. चीनमध्ये बरीच माहिती हळूहळू बाहेर येत असून वुई चॅटमधून ही धक्कादायक बाब सामोरी आली आहे.
चीनच्या विज्ञान अकादमीने हा दावा फेटाळला आहे. जीवशास्त्रज्ञ बोटाओ झियाओ व ली झियाओ यांनी ‘दी पॉसिबल ओरिजिन्स ऑफ २०१९ एनसीओव्ही करोना व्हायरस’ हा शोधनिबंध सादर केला आहे. वुहानमध्ये सागरी अन्नाची बाजारपेठ असली तरी तेथून जवळच दोन प्रयोगशाळा आहेत. त्या प्रयोगशाळांचा इतिहास तपासला असता तेथूनच विषाणू पसरल्याचे सूचित होते असे शोधनिबंधात म्हटले आहे. हा विषाणू वटवाघळातून माणसात आला, पण तो वुहान येथील सागरी अन्न बाजारपेठेतील वटवाघळातून पसरला असे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजारपेठेत वटवाघळे नव्हती, असे शोधनिबंधात म्हटले आहे.
या प्रयोगशाळेत वटवाघळांना होणाऱ्या रोगांवर प्रयोग सुरू होते व त्यातून हा विषाणू पसरला आहे, कारण जो पहिला रुग्ण आहे तो कधीच वुहानच्या प्राणी बाजारपेठेत गेलेला नव्हता मग त्याच्यात विषाणू कुठून आला हा प्रश्न अनुत्तरित होता. एका आजारी वटवाघळाने संशोधकांवर हल्ला केला, त्यात एका महिलेचाही समावेश होता. या वटवाघळाचे रक्त, लघवी त्यांच्या अंगावर पडले होते.
पेड न्यूज आणि खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करणे यांना ‘निवडणूक गुन्हे’ म्हणून मान्यता द्यावी यासह निवडणूक प्रक्रियेत विविध सुधारणा करण्यासाठी निवडणूक आयोगाने मंगळवारी सरकारकडे नव्याने प्रस्ताव दिला आहे.
निवडणुकीसाठी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्यास त्याबद्दल सहा वर्षे तुरुंगवास ठोठावण्याची तरतूद सध्या अस्तित्वात आहे. पण, यामुळे अशी खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करणाऱ्यांना पुरेशी जरब बसू शकलेली नाही. खोटे प्रतिज्ञापत्र हा निवडणूक गुन्हा ठरविल्यास संबंधित उमेदवारास अपात्र घोषित करणे आयोगाला शक्य होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी अशोक लवासा आणि सुशील चंद्र या अन्य दोन निवडणूक आयुक्तांसह सचिव जी. नारायण राजू यांच्याशी चर्चा केली. दुहेरी नोंदी टाळण्यासाठी मतदार यादी आणि आधार क्रमांक जोडणीचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला.
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आणि ज्यांची नावे अगोदरच यादीत आहेत त्यांच्याकडे आधार क्रमांकाची मागणी करण्याची परवानगी निवडणूक आयोगाला मिळावी, यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींमध्ये सुधारणा करावी, असे निवडणूक आयोगाने विधि मंत्रालयाला यापूर्वीच पाठविलेल्या पत्रात प्रस्तावित केले आहे. आधारबाबतची माहिती मिळविण्यासाठी कायदेशीर पाठबळ मिळावे यासाठी हा प्रस्ताव स्वीकारताना विधि मंत्रालयाने, ही माहिती विविध स्तरावर सुरक्षित राहील याची खातरजमा करावी, असे निवडणूक आयोगाला सांगितले आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.