नीरज चोप्राच्या कामगिरीकडे नजरा!; जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेला आजपासून प्रारंभ
जागतिक अॅथलेटिक्स संघटनेच्या उपाध्यक्षपदी आदिल सुमारीवालांच्या नियुक्तीने जागतिक स्पर्धेत मैदानाबाहेर भारताची सकारात्मक सुरुवात झाली असली, तरी आज, शनिवारपासून प्रत्यक्षात ट्रॅकवर सुरू होणाऱ्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कौशल्याची खरी कसोटी लागेल. या स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राच्या कामगिरीवर सर्वाच्या नजरा असतील.
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेक करणाऱ्या नीरजला आतापर्यंत जागतिक स्पर्धेतील सुवर्णयशाने मात्र कायम हुलकावणी दिली आहे. अखेरच्या अमेरिकेतील स्पर्धेत नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. नव्या हंगामात यापूर्वीच सुवर्णयश संपादन केलेला नीरज या वेळी निश्चितपणे सुवर्णपदकाच्या शर्यतीत असेल. नीरजने येथे सुवर्णपदक मिळवल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा क्रीडापटू ठरेल. यापूर्वी अशी कामगिरी केवळ नेमबाज अभिनव बिंद्राला करता आली आहे. बिंद्राने १० मीटर एअर रायफल प्रकारात २००६च्या जागतिक स्पर्धेत आणि त्यानंतर २००८च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.
नीरजने या हंगामात डायमंड लीगमध्ये सुवर्णयश मिळवले असले, तरी तो केवळ दोनच स्पर्धात सहभागी झाला आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता जागतिक स्पर्धेत उतरताना नीरजने आपण शंभर टक्के तंदुरुस्त असून, आव्हान स्वीकारण्यास सज्ज असल्याचे सांगितले. चेक प्रजासत्ताकचा याकूब वाडलेज, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि गतविजेता अँडरसन पीटर्स या नेहमीच्याच खेळाडूंचे आव्हान नीरजसमोर असेल. सध्या या खेळाडूंमध्ये वाडलेज (८९.५१ मीटर) आणि वेबरची (८८.७२ मीटर) फेक सर्वोत्तम असून, नीरजने या वर्षी लोझान येथे ८८.६७ मीटर भाला फेकला होता.
वैद्यकीय प्रवेशातही गुणवत्तेचा ‘लातूर पॅटर्न’; प्रथम फेरीत १६०० विद्यार्थी, राज्यातील प्रवेशाच्या ३० टक्के प्रमाण
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची हमी देणारे शहर म्हणून लातूरची ओळख होत आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के विद्यार्थी लातूर शहरातून ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. पहिल्या प्रवेश फेरीअखेर ६,८४५ विद्यार्थ्यांमध्ये एकटय़ा लातूरचा वाटा १६०० हून अधिक आहे. त्यात दुसऱ्या फेरीत आणि केंद्रीय कोटय़ातील विद्यार्थ्यांची भर पडणार असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात ३१ शासकीय, तर २२ खासगी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. शासकीय महाविद्यालयांतील १५ टक्के जागा या केंद्रीय प्रवेशासाठी राखीव असतात, तर खासगी महाविद्यालयांतील १५ टक्के जागा व्यवस्थापन मंडळासाठी राखीव असतात. शासकीय महाविद्यालयांत ४,९५० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, तर खासगी महाविद्यालयांत ही संख्या ३,१७० आहे. शासकीय महाविद्यालयांतील राज्याचा कोटा ४,१५४ तर खासगी महाविद्यालयाचा कोटा २,६९१ आहे. शासकीय आणि खासगी महाविद्यालयांत राज्याचा कोटा हा ६,८४५ विद्यार्थ्यांचा आहे.
नवे प्रारुप नवी झळाळी
यंदा वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशाच्या पहिल्या फेरीत लातूरच्या १६००हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ही संख्या एकूण प्रवेश मर्यादेच्या विद्यार्थ्यांच्या २३.३७ टक्के एवढी होते. आणखीन दोन फेऱ्या बाकी आहेत. शेवटच्या फेरीपर्यंत त्यांत किमान ५०० विद्यार्थ्यांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या लातूर प्रारुपास नवी झळाळी आली आहे. शासकीय महाविद्यालयातील पहिल्या प्रवेश फेरीसाठी ५८७ गुण, तर खासगीसाठी ५३४ गुण असल्याचे स्पष्ट झाले आहे. लातूर शहरात ‘नीट’ परीक्षा दिल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी अर्ज करण्याचा सल्ला देणारी २० केंद्र आहेत. ‘व्हिजन करिअर कौन्सिलिंग सेंटर’चे योगेश्वर गुट्टे यांनी शहरातील सर्व कौन्सिलिंग केंद्रांशी संपर्क करून ही आकडेवारी मिळवली.
वंदे भारत एक्सप्रेस लवकरच येणार नवीन रूपात! असे असतील गाडीतील आधुनिक बदल…
केंद्र सरकारने देशभरात वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही अत्याधुनिक गाडी असल्यामुळे प्रवाशांमध्येही तिच्याबद्दल कुतूहल आहे. आता ही गाडी आणखी आधुनिक रूपात दाखल होणार आहे. सुरक्षा आणि तांत्रिक सुधारणांसह या गाड्यांचे उत्पादन चेन्नईतील रेल्वे उत्पादन प्रकल्पात सुरू आहे. लवकरच नव्या स्वरूपातील ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
रेल्वे मंडळाने दिलेल्या उद्दिष्टानुसार मागील वर्षीपासून चेन्नईतील प्रकल्पातून दोन हजार ७०२ रेल्वे डब्यांची निर्मिती करण्यात आली आहे. चालू वर्षात या प्रकल्पातून ३० प्रकारच्या तीन हजार २४१ डब्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यात नवीन प्रकारच्या वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. याच वर्षी वंदे भारत गाड्यांचे वंदे मेट्रो रूप सादर केले जाणार आहे. ही गाडी शहरांतर्गत जवळच्या अंतरासाठी वापरण्यात येईल. प्रवाशांना गाडीत सहजपणे चढता आणि उतरता यावे, यासाठी तिला समांतरपणे दोन्ही बाजूला उघडणारे दरवाजे असतील.
जम्मू आणि काश्मीर भागात तापमान गोठणबिंदूजवळ असते. त्यामुळे तिथे चालविल्या जाणाऱ्या वंदे भारत गाड्यांच्या डब्यात उष्ण तापमान करण्याची सुविधा आणि जलवाहिनी गोठू नये, अशी यंत्रणा विकसित केली जात आहे. पुढील वर्षी ही गाडी तयार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मालवाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी गतिशक्ती गाड्या विकसित केल्या जात आहेत. ई-कॉमर्ससह जलद वाहतूक गरजेची असणाऱ्या वस्तूंसाठी या गाड्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.
स्लीपर वंदे भारतचेही नियोजन
लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवासी स्लीपर म्हणजेच शयनयान सुविधा असलेल्या रेल्वे गाड्यांना प्राधान्य देतात. सध्या वंदे भारत गाड्यांमध्ये अशी सुविधा नाही. त्यामुळे स्लीपर सुविधा असलेल्या वंदे भारत गाड्यांची निर्मिती करण्याचे नियोजन सुरू आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत त्यावर शिक्कामोर्तब होईल.
‘विंध्यगिरी’चे जलावतरण ‘आत्मनिर्भर भारत’चे प्रतीक: राष्ट्रपती
हुगळी नदीकिनारी ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स इंजिनीयर्स लिमिटेड’ (जीआरएसई) केंद्रात भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट १७ अल्फा’अंतर्गत निर्मित ‘विंध्यगिरी’ या सहाव्या युद्धनौकेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरुवारी जलावतरण करण्यात आले. मुर्मू यांनी ही युद्धनौका ‘आत्मनिर्भर भारता’चे प्रतीक असल्याचे नमूद केले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, ‘विंध्यगिरी’च्या जलावतरण सोहळय़ाला उपस्थितीत राहिल्यामुळे मला आनंद वाटतो. हा कार्यक्रम भारताच्या सागरी क्षमता वृध्दिंगत करण्यासाठी टाकलेल्या पावलाचे प्रतीक आहे. जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. सागरी सुरक्षेसाठी भारतीय नौदलाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचाही राष्ट्रपतींनी विशेष उल्लेख केला. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या.
योजनेनुसार एकूण सात युद्धनौकांची निर्मिती करण्यात येणार आहे. यापैकी ‘विंध्यगिरी’ ही सहावी आहे. या अगोदर पाच युद्धनौकांचे जलावतरण २०१९ ते २०२२ दरम्यान करण्यात आले. कोलकाता येथील जीआरएसई या युद्धनौका निर्मात्याने ‘प्रोजेक्ट १७ अल्फा’ या योजनेअंतर्गत तयार केलेली ही तिसरी आणि अखेरची युद्धनौका आहे.
अंतिम पंघालचे ऐतिहासिक यश
भारताच्या मुलींनी २० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करताना तीन सुवर्ण, तीन कांस्य आणि एक रौप्य अशा सात पदकांची कमाई केली. यामध्ये अंतिम पंघालने ५३ किलो वजनी गटात सलग दुसऱ्या वर्षी जागतिक विजेतेपदावर आपले नाव कोरले. अशी कामगिरी करणारी अंतिम पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरली आहे. या व्यतिरिक्त शुक्रवारी सविताने (६२ किलो) सुवर्ण, अंतिम कुंडूने (६५ किलो) रौप्य, तर आरजू (६८ किलो), हर्षिता (७२ किलो) आणि रीना (५७ किलो) यांनी कांस्यपदक मिळवले. भारतासाठी तिसरे सुवर्णपदक प्रियाने (७६ किलो) यापूर्वीच मिळवले होते.
हरियाणातील हिस्सार गावातील अंतिमने चिवटपणा, ताकद आणि भक्कम बचाव याचे सुरेख दर्शन घडवताना युक्रेनच्या मारिया येफ्रेमोवाचा ४-० असा पराभव केला. मारियाने लढतीत अनेकवेळा अंतिमची पकड मिळवण्याचा प्रयत्न केला, पण अंतिमने एकदाही मारियाचा डाव यशस्वी होऊ दिला नाही. त्याउलट अंतिमने संधी मिळताच दुहेरी पट काढून मारियावर पकड मिळवली आणि आपल्या निर्विवाद वर्चस्वावर शिक्कामोर्तब केले. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीत विजेतेपद मिळवूनही सुरुवातीला अंतिमला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. मात्र, विनेश फोगटने माघार घेतल्यावर आता अंतिमला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
अन्य लढतीत सविताने व्हेनेझुएलाच्या अॅस्ट्रिड पाओला चिरीनोसला असेच एकतर्फी लढतीत तांत्रिक गुणांच्या १०-० वर्चस्वासह नमवून सुवर्णपदक मिळवले. अंतिम कुंडूला हंगेरीच्या एनिको एलेकेसविरुद्ध २-९ अशी सुवर्ण लढतीत हार पत्करावी लागली. रीनाने कझाकस्तानच्या शुग्याला ओमीर्बेकचा ९-४ असा, तर हर्षिताने मोल्डोवाच्या एमिलिया स्र्ोसिउनचा ६-० असा पराभव कांस्यपदक जिंकले.
ग्रीको-रोमनमध्ये अपयशी
ग्रीको-रोमन प्रकारात भारतीय कुस्तीगिरांना अपयश आले. अनिल मोरने (५५ किलो) चांगली सुरुवात केली. मात्र, अनिलला उपांत्यपूर्व फेरीत किर्गिस्तानच्या नुरीस्टान सुईओरकुलोवविरुद्ध ६-७ असा पराभव पत्करावा लागला. संदीपला (६३ किलो) पात्रता फेरीतच आव्हान गमवावे लागले.
क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धा - प्रज्ञानंदचा सलग तिसरा विजय :
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेतील विजयी घोडदौड सुरू ठेवताना गुरुवारी तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या हान्स निमनवर २.५-१.५ अशा फरकाने सरशी साधली. प्रज्ञानंदचा हा सलग तिसरा विजय ठरला.
१७ वर्षीय प्रज्ञानंदने पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अनुक्रमे अलिरझा फिरौझा आणि अनिश गिरी या आघाडीच्या खेळाडूंना पराभूत केले होते. त्यामुळे तीन फेऱ्यांअंती नऊ गुणांसह प्रज्ञानंद गुणतालिकेत संयुक्तरीत्या अग्रस्थानी आहे. त्याचे आणि जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनचे समान गुण आहेत. कार्लसनने तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या अनुभवी लेव्हॉन अरोनियनचा २.५-१.५ असा पराभव केला.
निमनविरुद्धच्या लढतीत प्रज्ञानंदला सुरुवातीला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. त्याने या लढतीचा पहिला डाव गमावला. मात्र, त्यानंतर दमदार पुनरागमन करताना प्रज्ञानंदने दुसऱ्या आणि चौथ्या डावामध्ये विजयाची नोंद केली, तर तिसरा डाव बरोबरीत सोडवला. त्यामुळे त्याला तीन गुण कमावण्यात यश आले.
तिसऱ्या फेरीच्या अन्य लढतींत, कनिष्ठ गटातील अव्वल बुद्धिबळपटू फिरौझाने गिरीवर टायब्रेकरमध्ये ४-३ अशी मात केली. चीनच्या क्वँग लिएम लीने पोलंडच्या यान-क्रिस्टोफ डुडाला २.५-१.५ अशा फरकाने नमवले.
दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश; श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय :
आज सर्वत्र श्रीकृष्ण जयंती साजरी केली जात असून उद्या (१९ ऑगस्ट) दहीहंडीचा थरार रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. विद्यमान सरकारने काही दिवसांपूर्वीच दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती.
राज्याच्या क्रीडा विभागाची बुधवारी (१७ ऑगस्ट) अत्यंत महत्वाची बैठक झाली. त्यात ‘दहीहंडी’ या उत्सवाचा खेळात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर राज्यात ‘प्रो दहीहंडी’ हा खेळ सुरु होणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी दिली होती.
स्पेन देशात मानवी मनोरे रचण्याचा खेळ खेळला जातो. त्यासाठी त्यांच्याकडे खेळाडूंना प्रशिक्षणही दिले जाते. स्पेनपेक्षा चांगले मानवी मनोरे आपली गोविंदा पथकं रचतात. त्यामुळेच त्यांचा क्रीडा प्रकारात समावेश केला जावा, अशी मागणी सातत्याने सुरू होती. राजकीय नेत्यांसह गोविंदा पथकेही गेल्या काही वर्षांपासून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची मागणी करत होते. या मागणली आता यश आले आहे.
दरम्यान, राज्य सरकारने मंगळवारी (१६ ऑगस्ट) दहीहंडीतील गोविंदा पथकांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता दहीहंडी उत्सवाला खेळाचा दर्जा मिळाला असल्याने गोविंदा पथकांनी आनंद व्यक्त केला आहे.
भारताविरुद्ध अपप्रचार करणाऱ्या आठ यूटय़ूब वाहिन्यांवर बंदी :
पाकिस्तानमधून सुरू असलेल्या एका यूटय़ूब वाहिनीसह आठ भारतीय यूटय़ूब वाहिन्या सरकारने गुरुवारी बंद केल्या. या वाहिन्यांद्वारे भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेविषयी सातत्याने अपप्रचार करण्यात येत होता.
बंदी घातलेल्या या वाहिन्यांना ११४ कोटी प्रेक्षकांनी पाहिले असून, त्यांचे ८५ लाख ७३ हजार सदस्य आहेत. या वाहिन्यांद्वारे आर्थिक उत्पन्न मिळवले जात होते. माहिती तंत्रज्ञान नियम-२०२१ अंतर्गत या वाहिन्या बंद करण्यात आल्या आहेत.
या वाहिन्यांवरून भारत सरकारने धार्मिक वास्तू पाडल्याचा, धार्मिक उत्सव साजरा करण्यावर बंदीच्या, भारतात धर्मयुद्ध जाहीर, असली खोटी माहिती सातत्याने प्रसृत केली जात असल्याचे सरकारी निवेदनात सांगण्यात आले आहे. त्यामुळे देशातील धार्मिक सहिष्णुता, सार्वजनिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता होती. या वाहिन्यांवरून भारतीय सुरक्षा दले आणि जम्मू-काश्मीरविषयक खोटय़ा बातम्या पसरवल्या जात होत्या. हा सर्व आशय अतिशय चुकीचा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील व भारताच्या मैत्रीपूर्ण परराष्ट्र संबंधांना बाधा आणणारा होता, असेही या निवेदनात नमूद केले आहे.
वर्धेच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची बदली ; राहुल कर्डीले नवे जिल्हाधिकारी :
लोकप्रतिनिधी सोबत विसंवाद झाल्याने चर्चेत आलेल्या वर्धेच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची अखेर बदली झाली असून नवे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डीले यांची नियुक्ती करण्यात आली आहे
कर्डीले यांनी यापूर्वी विदर्भात चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहलेले आहे. देशभ्रतार यांच्या बदलीमागे विविध कारणे दिली जातात. पण प्रामुख्याने भाजपच्या लोकप्रतिनिधी सोबत त्यांचे अनेकदा खटके उडाल्याचे सांगितल्या जाते.
जिल्ह्यातील भाजपचे खासदार रामदास तडस तसेच आमदार डॉ पंकज भोयर, दादाराव केचे व समीर कुणावार यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्याकडे देशभ्रतार यांच्या कार्यपद्धती बाबत नाराजी नोंदविली होती,अशी चर्चा आहे.
लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात चीनने बांधला विस्तृत पूल; सॅटेलाइट फोटोंमधून तथ्य उघड :
मागील काही दिवसांत पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात चीनने दोन स्वतंत्र पूल बांधल्याच्या काही बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर आता संबंधित परिसरात चीनने दोन स्वतंत्र पूल बांधले नसून केवळ एकच विस्तृत पूल बांधल्याचं समोर आलं आहे.
‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीने अमेरिकेतील एका ‘स्पेस टेक्नॉलॉजी फर्म’कडून काही सॅटेलाइट फोटो मिळवले आहेत. त्यामध्ये पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात चीननं एक विस्तृत पूल बांधल्याचं दृष्यांमध्ये दिसत आहे. हा पूल विस्तृत असल्याने अवजड लष्करी वाहने आणि उपकरणे वाहून नेण्यास सक्षम असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेतील स्पेस टेक्नॉलॉजी फर्म ‘प्लॅनेट लॅब्स पीबीसी’ने पुरवलेल्या उच्च रिझोल्यूशन उपग्रह छायाचित्रात पुलाचं बांधकाम अद्याप सुरू असल्याचंही दिसत आहे.
१५ ऑगस्ट रोजी हे फोटो संकलित करण्यात आले होते. या पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चिनी सैन्य भूदल, जड तोफखाना, मोठी वाहने आणि अवजड लष्करी उपकरणे उत्तर आणि दक्षिणेकडील किनारीपट्टी परिसरात सहजपणे हलवू शकतात. यामुळे चिनी सैन्यांना आता गलवान खोऱ्यापर्यंत यायला १२ तासांऐवजी अंदाजे चार तासांचा कालावधी लागू शकतो.
या पुलाखालून गस्त घालणाऱ्या युद्ध सामग्री सज्ज बोटींना जाण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक आहे की नाही? हे उपलब्ध फोटोंवरून अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या नवीन फोटोंमध्ये पुलाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ काही भाग मोकळा सोडल्याचं दिसून आलं आहे.