सहा विकेट्स घेणाऱ्या सिराजची मन जिंकणारी कृती, ग्राऊंड्समन्सना दिली ‘मॅन ऑफ द मॅच’च्या पुरस्काराची रक्कम
- भारताने रविवारी (१७ सप्टेंबर) आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेवर १० गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजने जबरदस्त अशी धारदार गोलंदाजी करत लंकेला दिवसा तारे दाखवले. त्याने ७ षटकांत २१ धावा देत सहा विकेट्स घेतल्या. सिराजला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने या सामन्यात केवळ भेदक गोलंदाजीच केली नाही तर त्याच्या बक्षिसाची रक्कम देखील मैदानावरील ग्राऊंड्समन्सना त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून दिली. त्याच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली.
- सिराजला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. त्याला बक्षीस म्हणून ५००० डॉलर (सुमारे ४.१५ लाख रुपये) मिळाले. सिराजने औदार्य दाखवत ही रक्कम मैदानातील ग्राऊंड्समन्सना सुपूर्द केली. तो म्हणाला, “हा रोख पुरस्कार मी ग्राऊंड्समन्सना देतो ज्यांच्या मुळे हा आशिया चषक पार पडू शकला. ते या पुरस्काराचे खरे मानकरी आहेत, त्यांच्याशिवाय ही स्पर्धा पूर्णच होऊ शकली नसती.” आशिया खंडातील बहुतांश सामने पावसाने विस्कळीत केले. या कालावधीत ग्राऊंड्समन्सना पुन्हा पुन्हा कव्हर आणावे लागले. या स्पर्धेच्या आयोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका यांनीही त्यांचे कौतुक केले.
काय म्हणाला सिराज?
- सिराजला समालोचक रवी शास्त्री यांनी बिर्याणीबाबत पहिला प्रश्न विचारला. त्यांनी त्याला विचारले, “आज बिर्याणी खाल्लीस का?” यावर सिराज म्हणाला की, “आज बिर्याणी खाल्ली नाही.” यानंतर तो त्याच्या गोलंदाजीबद्दल पुढे बोलला. सिराज म्हणाला की, “मी बऱ्याच दिवसांपासून चांगली गोलंदाजी करत आहे. जेव्हा वेगवान गोलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ असतो तेव्हा त्याचा संघाला फायदा होतो. ही माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी आहे.”
सिराजने वकार युनूसचा विक्रम मोडला
- सिराजने २१ धावांत सहा विकेट घेत श्रीलंकेविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम केला. सिराजने या प्रकरणात पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वकार युनूसला मागे सोडले. वकारने १९९० मध्ये शारजाहच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २६ धावांत सहा विकेट्स घेतल्या होत्या.
नव्या संसद भवनात ध्वजवंदन
- उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी रविवारी येथील नवीन संसद भवनात राष्ट्रध्वज फडकावून ध्वजवंदन केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमवेत नवीन संसद भवनाच्या ‘गज द्वारा’पाशी हा सोहळा झाला. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पाच दिवसीय अधिवेशनाच्या एक दिवस आधी हा ध्वजवंदन सोहळा झाला. त्यामुळे संसद अधिवेशनाचे कामकाज जुन्या इमारतीऐवजी नव्या इमारतीत होण्याची शक्यता बळावली आहे.
- तत्पूर्वी, केंद्रीय राखीव पोलीस दला (सीआरपीएफ) च्या संसदेच्या संरक्षण पथकाने धनखड आणि बिर्ला यांना मानवंदना दिली. या सोहळय़ानंतर धनखड पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, की हा ऐतिहासिक क्षण आहे. भारतात युग परिवर्तन होत आहे. भारताच्या सामर्थ्य आणि योगदानाची जगाला आता पूर्ण जाणीव झाली आहे. या सोहळय़ास केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी आणि अर्जुन राम मेघवाल यांच्यासह अनेक मंत्री आणि इतर पक्ष नेते उपस्थित होते. धनखड आणि बिर्ला यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
- काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या सोहळय़ाला उपस्थित राहता येणार नसल्याचे कळवले होते. या सोहळय़ाचे खूप उशिरा निमंत्रण मिळाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. खरगे यांनी शनिवारी राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांना पत्र लिहून १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी उशिरा या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्याचे कळवले. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीसाठी खरगे सध्या हैदराबादमध्ये आहेत.
Asian Games स्पर्धेपूर्वी इलावेनिल वालारिवनचा डबल धमाका, ISSF विश्वचषक स्पर्धेत जिंकले दुसरे सुवर्णपदक
- ऑलिम्पियन इलावेनिल वालारिवनने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (आयएसएसएफ) विश्वचषक रायफल/पिस्तूल स्पर्धेत शानदार कामगिरी केली. तिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात तिचे दुसरे सुवर्णपदक जिंकले. इलावेनिलने चमकदार कामगिरी केली, आठ महिलांमध्ये २४-शॉट फायनलमध्ये कधीही १०.१ पेक्षा कमी गुण मिळवले नाहीत.
इलावेनिल पात्रतेमध्ये आठव्या स्थानावर होती -
- इलावेनिलने २५२.२ गुण मिळवत फ्रान्सच्या २० वर्षीय ऑसियन मुलरचा २५१.९ गुणांसह पराभव करत दुसरा क्रमांक पटकावला. चीनच्या झेंग जियालने तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले. इलावेनिलने ६३०.५ गुणांसह आठव्या स्थानावर राहून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ऑसियन मुलरने पात्रता फेरीत ६३३.७ गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. चीनच्या झेंग जियाली आणि झेंग यू या दोन नेमबाजांशिवाय नॉर्वेची युरोपियन चॅम्पियन जेनेट हेग ड्यूस्टेडनेही अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
संदीप सिंग राहिला १४व्या स्थानावर -
- पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताचा संदीप सिंग ६२८.२ गुणांसह पात्रतेमध्ये १४ व्या स्थानावर राहिला. शुक्रवारी, इलावेनिलने संदीपसह १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत ६२९.९१ चा एकत्रित गुण नोंदवले. या स्पर्धेच्या पदक फेरीत चौथे आणि शेवटचे स्थान इस्रायलला मिळाले, ज्याने ४२ संघांच्या स्पर्धेत भारतापेक्षा ०.५ गुण अधिक मिळवले. इलावेनिलने ३१४.८ तर संदीपने ३१४.३ गुण केल्या. भारतीय जोडी थोड्या फरकाने कांस्यपदकासाठीची स्पर्धा गमावली.
- शेवटी इस्रायलने कांस्यपदक जिंकले. जर्मनीने सुवर्णपदक तर हंगेरीने रौप्यपदक पटकावले. भारताचा १६ सदस्यीय संघ रिओ विश्वचषकात सात ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. इटली दोन सुवर्णांसह आघाडीवर आहे, तर भारत आणि आर्मेनिया संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे.
सौरभचा खराब फॉर्म कायम -
- सौरभ चौधरी, गेल्या दीड वर्षातील आपली पहिली मोठी स्पर्धा खेळत आहेय. तो रिओ दि जानेरो येथे खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ (आयएसएसफ) रायफल/पिस्तूल विश्वचषकात पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये ३०व्या स्थानावर राहिला. अनेक विश्वचषक विजेत्या सौरभने फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये कैरो येथे आयएसएसफ स्पर्धेत शेवटचा सामना खेळला होता. गुरुवारी रिओमध्ये झालेल्या ६० शॉटच्या पात्रता स्पर्धेत ५७२ गुणांसह तो ३०व्या स्थानावर राहिला.
राज्य सरकारची ११ कलमी योजना जाहीर; पंतप्रधानांच्या वाढदिवसाची ७३ संख्या केंद्रस्थानी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शासकीय योजनांमध्ये ७३ अंक केंद्रस्थानी ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ११ कलमी योजनांची घोषणा केली. ७३ हजार बांधकाम मजुरांना सुरक्षा संच, तेवढीच शेततळी, सौर उर्जेचीही गावे, ७३ गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधकामापासून ते तीर्थस्थळे आणि गडकिल्ल्यांचा विकास करण्याची घोषणा पत्रकार बैठकीत केली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
- शासकीय योजनांची गाठ ७३ आकडय़ाभोवती व्हावी, अशाप्रकारे योजना जाहीर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचे लाभ देण्यात येतील, असे जाहीर केले. जाहीर केलेल्या सर्व योजनांमागे ‘नमो’ ही अक्षरे लावत योजनांची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगण्यात आले. राज्यात ‘नमो आदिवासी स्मार्ट शाळा’, दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारणार’, नमो क्रीडा मैदाने व उद्याने उभारली जातील, असे सांगण्यात आले. शिवाय ७३ शहरांमध्ये सौंदर्यीकरणाचे प्रकल्प राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांनी ‘सबका साथ सबका विकास’ कार्यक्रम हाती घेत देशाचे नाव उंचावले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. नमो महिला सशक्तीकरण अभियानातून ४० लाख महिलांना शक्ती गटाच्या प्रवाहात जोडण्यात येणार आहे.
- २० लाख नवीन महिलांच्या शक्ती गटाची जोडणी करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत पाच लाख महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण, उद्योग उभारणीसाठी भांडवल आणि तीन लाख महिलांना उद्योजिका बाजारपेठ व ग्राहक उपलब्ध करून दिले जाणार आहे.
नव्या संसदेत जाण्याचा मुहूर्त ठरला, विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी…
- संसदेच्या विशेष पाच दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठकीमध्ये अधिवेशनातील कामकाजासंदर्भात परिपत्रत जारी करण्यात आलं आहे. या परिपत्रकानुसार, संसदेच्या विशेष अधिवेशनात एकूण ८ विधेयके चर्चेसाठी येणार आहेत. विशेष म्हणजे, या विधेयकात केंद्रीय निवडणूक आयुक्तांचे अधिकार मर्यादित करण्यासंदर्भातील विधेयकाचा समावेश नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याशिवाय, नव्या संसद भवनातही याच अधिवेशनातून कामकाजाला सुरुवात होणार आहे.
कसं असेल कामकाज?
- विशेष अधिवेशनाचं कामकाज नेमकं कसं असेल? यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माध्यमांना माहिती दिली. “कामकाजाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या जुन्या इमारतीमध्ये दोन्ही सभागृह भरतील. पहिल्या दिवशी संसदेचा उज्ज्वल इतिहास आणि संसद भवनाची भव्य परंपरा यावर दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून चर्चा होईल. दुसऱ्या दिवशी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये खासदारांचं फोटोसेशन होईल”, असं ते म्हणाले.
नव्या संसद भवनात कधी जाणार?
- दरम्यान, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या देशाच्या नव्या संसद भवनामधून नेमकी नियमित कामकाजाला कधी सुरुवात होणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. यासंदर्भात आता केंद्र सरकारने काढलेल्या संसद अधिवेशन कार्यक्रम पत्रिकेवरून माहिती समोर आली आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जुन्या संसद भवनात फोटोसेशन झाल्यानंतर सर्व खासदार नव्या संसद भवनात जातील आणि तिथे अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल.
विरोधकांची टीका
- दरम्यान, विशेष अधिवेशनात नेमकं कामकाज कसं होणार आहे, याविषयी अद्याप स्पष्ट माहिती देण्यात न आल्याची टीका काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. “यामागे नेमका काय हेतू आहे हे फक्त सरकारलाच माहिती आहे. कदाचित हे सरकार सगळ्यांनाच काहीतरी नव्या अजेंड्याने धक्का देईल”, असं ते म्हणाले. “अजूनपर्यंत संसद अधिवेशनाचा पूर्ण अजेंडा मिळालेला नाही. केंद्र सरकारने अधिवेशनासंदर्भातल्या संसद बुलेटिनमध्ये सूचक विधानं केली आहेत. त्याचा अर्थ ऐनवेळी केंद्र सरकार आणखी विधेयकं चर्चेला आणू शकतं. ते संसदेला यासाठी विश्वासात का घेत नाहीयेत?” असा सवाल तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केला आहे.
18 सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)