चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ सप्टेंबर २०२१

Updated On : Sep 18, 2021 | Category : Current Affairs


पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ; ‘ही’ आहे नवी तारीख :
 • पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक केले नसतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख देण्यात आली होती. आता ही मुदत सहा महिन्यांनी वाढवण्यात आली असून ज्यांनी आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल केले ते ३१ मार्च २०२२ पर्यंत करू शकतात. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

 • आयकर विभागाने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख, जी आधी ३० सप्टेंबर होती, ती आता करोना महामारीमुळे करदात्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांमुळे आणखी ६ महिने वाढविण्यात आली आहे.

 • यावर्षी सरकारने चौथ्यांदा आधार-पॅन लिंक करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. याआधी जुलै महिन्यात, करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे येणाऱ्या अडचणींमुळे सरकारने शेवटची तारीख ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली होती.

अकरावीच्या ऑफलाइन परीक्षेस केरळला परवानगी :
 • करोना साथीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घेण्याची ग्वाही दिल्याबद्दल समाधान व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केरळला अकरावीची प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये (ऑफलाइन) परीक्षा घेण्याची परवानगी दिली.

 • न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि सी. टी. रवीकुमार यांच्या पीठाने केरळला अकरावीची परीक्षा घेण्याची मुभा देताना प्रामुख्याने राज्याने दाखल केलेल्या सविस्तर प्रतिज्ञापत्रातील करोना साथ नियमावलीशी संबंधित बाबींचा विशेष उल्लेख केला.

 • ‘‘याप्रकरणी समग्र दृष्टिकोन अंगीकारण्यात आला असून संबंधित सरकारी यंत्रणा आपल्या कर्तव्याविषयी सजग आहेत’’, अशा शब्दांत न्यायालयाने केरळने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील बाबींबद्दल समाधान व्यक्त केले. केरळने दाखल केलेल्या सविस्तर प्रतिज्ञापत्रात सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची ग्वाही दिली आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.

 • अकरावीच्या प्रत्यक्ष परीक्षा घेण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयात हस्तक्षेपास नकार देण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका अ‍ॅड. रसूनशान ए. यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रो २०२२ ला पाठवणार उपग्रह :
 • सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम उपग्रह २०२२ च्या तिसऱ्या तिमाहित प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने केली आहे. ‘आदित्य एल १’ असे या उपग्रहाचे नाव आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर ‘एल वन’ या पॉईंटवर हा उपग्रह कार्यरत असेल असं ‘मानव अवकाश उड्डाण केंद्र’ ( human spaceflight center )चे संचालक डॉ उन्नीकृष्णन नायर यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केलंय. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जिथे दोघांची गुरुत्वाकर्षण शक्ती समसमान असते त्या पॉइंटला ‘एल वन’ पॉईंट या नावाने ओळखलं जातं. या ठिकाणाहून सुमारे १५०० किलो वजनाचा ‘आदित्य एल वन’ उपग्रह विविध संवेदक आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करणार आहे.

 • ‘आदित्य’ मोहिम ही पूर्णपणे वैज्ञानिक मोहिम असणार आहे. पण त्या आधी आणखी एक वैज्ञानिक मोहिम हाती घेत असल्याची माहिती डॉ नायर यांनी दिली आहे. ‘X-PoSat’ही आणखी एक अवकाश दुर्बीण इस्त्रो पुढल्या वर्षी २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत अवकाशात पाठवणार आहे. अवकाशातील ‘वैश्विक क्ष किरण’ च्या स्त्रोताचा अभ्यास ही अवकाश दुर्बीण करणार आहे.

 • विशेष म्हणजे ‘X-PoSat’ ही अवकाश दुर्बीण इस्त्रोच्या नव्या प्रक्षेपकासह प्रक्षेपित केली जाणार आहे. Small Satellite launch Vehicle ( SSLV ) असे या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून या वर्षाअखेरीस याचे उड्डाण नियोजित केले आहे. या प्रक्षेकामुळे अत्यंत कमी वेळेत तयारी करत ३०० किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह हे ५०० किलोमीटर उंचीपर्यंत पाठवणे शक्य होणार आहे.

 • २०२०-२१ या काळांत तब्बल २० अवकाश मोहिमांचे नियोजन इस्त्रोने केले होते. मात्र करोनोनामुळे जेमतेम ४ उपग्रह प्रक्षेपण मोहिमा या शक्य झाल्यात. तेव्हा येत्या काळात अवकाश मोहिमांना वेग येईल अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्राच्या तेजसला सुवर्ण, कोमलला रौप्य :
 • जवाहरलाल नेहरू स्टेडियम, हनमकोंडा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्राचा तेजस शिर्से आणि कोमल जगदाळे यांनी आपापल्या प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली.

 • पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तेजसने १४.०९ सेकंद वेळ नोंदवताना सुवर्ण पटकावले. सचिन बिहूने (१४.२२) दुसरा, तर तरुणदीप सिंग भाटियाने (१४.२३) तिसरा क्रमांक मिळवला.

 • महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत रेल्वेच्या पारुल चौधरीने ९:५१.०१ मिनिटांत निर्धारित अंतर गाठताना सुवर्णावर नाव कोरले. कोमलने ९:५१.०३ अशी वेळ नोंदवल्याने तिचे सुवर्णपदक थोडक्यात निसटले. रेल्वेच्या प्रीती लांबाने १०:२२.०५ वेळेसह कांस्यपदक जिंकले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीतसुद्धा पारुलने कोमलवर सरशी साधूनच सुवर्ण मिळवले होते. पारुलची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसुद्धा ठरली.

 • याव्यतिरिक्त, रेल्वेच्या बी ऐश्वर्याने महिलांच्या उंच उडी प्रकारात ६.५२ मीटर इतकी झेप घेऊन यंदाच्या स्पर्धेतील विक्रमाची नोंद केली.

धावपटू हरमिलन कौरने १९ वर्षे जुना विक्रम मोडत मिळवलं पदक :
 • पंजाबच्या हरमिलन कौर बैन्सनं ६० व्या राष्ट्रीय ओपन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १५०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली आहे. २१ वर्षीय हरमिलने चार मिनिटं ५ सेंकदात अंतर पार केलं. यापूर्वी सुनीता राणीनं चार मिनिंटं ६ सेकंदात अंतर पार करत स्पर्धा जिंकली होती. बुसानच्या २००२ अशियाई स्पर्धेत हा विक्रम प्रस्थापित केला होता.

 • हरमिलनने ४:०५:३९ सेंकदात १५०० मीटर अंतर पार करत विक्रम आपल्या नावावर केला आहे. “मी आता मोकळपणाने धावू शकते”, असं हरमिलन कौर हीने सांगितलं. हरमिलनच्या घरात दोन क्रीडापटू आहेत. हरमिलन धावपटू अमनदिप सिंह आणि धावपटू माधुरी सिंह यांची मुलगी आहे. त्यामुळे तिच्यावर अपेक्षांचं ओझं होतं. मात्र हे दडपण दूर करत तिने ही कामगिरी केली आहे. विशेष हरमिलनने वारंगलपर्यंत एकटी आली होती.

 • तिचे वडील काही दिवसांनी आले आणि प्रेक्षकांप्रमाणे स्टॅण्डवरून शर्यत पाहिली. “त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रशिक्षकही दडपणाखाली होते. ते प्रत्येक बारकावे जवळून बघत होते. प्रत्येक तपशीलाबाबत ते सल्ला द्यायचे. त्यामुळे दडपण असायचं. त्यामुळे स्वत: इथे आली”, असं हरमिलन कौर हीने सांगितलं. “माझ्या प्रशिक्षकांनी पालकांची समजूत घातली. त्यानंतर सतत देखरेख करण्याचं त्यांनी थांबवलं. मला मोकळेपणा हवा आहे, असा त्यांचा सिद्धांत होता.”, असं हरमिलनने पुढे सांगितलं.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : औरंगाबादमध्ये संतपीठ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा :
 • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून हे संतपीठ व्हावं अशी चर्चा होती.

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने हे संतपीठ सुरू केलं जाणार असून लवकरात लवकर ते मोठं विद्यापीठ व्हावं, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या संतपीठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 • “मराठवाडा ही संतांची भूमी आहे. मराठवाड्याचं वेगळेपण काय आहे. त्यासाठी संतपीठ हे काही वर्षांपासून चर्चेत होतं. ते संतपीठ आपण स्थापन करत आहोत. त्या संतपीठात आपल्या संतांची शिकवणूक दिली जाईल.

 • संतांची शिकवण म्हणजे काय? आम्ही कुणावर अन्याय-अत्याचार करत नाही. पण जर कुणी अत्याचार केला, तर त्याचा प्रतिकार कसा करायचा, ही आम्हाला संतांची शिकवण आहे. म्हणून एक संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने आपण इथे सुरू करत आहोत. हे आज संतपीठ होतंय, ते विद्यापीठ झालं पाहिजे. जगभरातले अभ्यासक इथे अभ्यास करण्यासाठी यायला पाहिजेत”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

१८ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)