चालू घडामोडी आणि दिनविशेष - 18 ऑक्टोबर 2023

Date : 18 October, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू, आकर्षी दुसऱ्या फेरीत
  • भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि आकर्षी काश्यप यांनी डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेनला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.सिंधूने पहिल्या फेरीचा अडथळा पार केला असला, तरी तिला विजयासाठी तीन गेम आणि ५६ मिनिटे झुंजावे लागले.
  • सिंधूने स्कॉटलंडच्या किस्र्टी गिलमोरचा २१-१४, १८-२१, २१-१० असा पराभव केला. आकर्षी कश्यपलाही तीन गेम लढत द्यावी लागली. आकर्षीने जर्मनीच्या ली वोन्नेचे आव्हान १०-२१, २२-२०, २१-१२ असे संपुष्टात आणले. दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्काचे आव्हान असेल. सिंधूने ग्रेगोरियाविरुद्ध आठ लढती जिंकल्या असल्या तरी अखेरच्या तीनपैकी दोन लढतीत ग्रेगोरियाने सिंधूला पराभूत केले आहे. त्याच वेळी आकर्षी थायलंडच्या सुपानिदा केटथाँगशी खेळेल.
  • पुरुष एकेरीत श्रीकांतला मात्र, लय मिळवण्यात अपयश आले. त्याचा कडवा प्रतिकार कमी पडला. चीनच्या वेंग हाँग यांगने श्रीकांतवर १९-२१, २१-१०, २१-१६ असा विजय मिळवला. लक्ष्य सेनलाही पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही.
  • लक्ष्यला थायलंडच्या केन्टाफॉन वँगचारोएनकडून १६-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. दरम्यान, पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी, एम.आर. अर्जुन-ध्रुव कपिला, तर महिला दुहेरीत ट्रीसा जॉली-गायत्री वर्तक यांनी माघार घेतली.
आठ नव्या सदस्यांसह ‘आयओसी’ कार्यकारी मंडळात आता १०७ जण
  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) १४१व्या अधिवेशनात आठ नव्या सदस्यांची निवड करण्यात आली असून, आता ‘आयओसी’चे कार्यकारी मंडळ १०७ जणांचे असेल.
  • नव्याने समावेश करण्यात आलेल्या आठ सदस्यांमध्ये चार महिलांचा समावेश असून, यामुळे आता ‘आयओसी’मध्ये महिलांची टक्केवारी ४१.१ टक्के राहिली आहे.
  • ‘आयओसी’चे कामकाज करताना जास्तीत जास्त महिलांना सामावून घेण्याचे ‘आयओसी’चे धोरण असून, त्या दृष्टीने आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे, असे ‘आयओसी’ने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या निवडणुकीत इस्रायलच्या याएल अराद, हंगेरीच्या बलाझ फ्युरेस, पेरुच्या सेसिलिया रोक्साना टेट व्हिलाकोर्टा यांना स्वतंत्र सदस्य म्हणून सामावून घेण्यात आले आहे.
कंत्राटी पदभरतीला उच्च न्यायालयात आव्हान, निर्णय होईपयर्यंत…
  • राज्य शासनाच्यावतीने विविध शासकीय विभागातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कंत्राटी पदभरतीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांच्यावतीने ही जनहित याचिका दाखल केली गेली आहे.
  • कंत्राटी पद्धतीने पदभरतीचा निर्णय घेतल्याने स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांवर अन्याय होणार आहे. खासगी संस्थेच्यामार्फत होणारी कंत्राटी भरतीचा शासन आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. राज्य शासनाच्यावतीने कामगार, ऊर्जा आणि औद्योगिक विभागाची भरती सुरू करण्यात आली आहे. पदभरतीसाठी खासगी कंपन्यांना कंत्राट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पदाच्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची जाहिरात काढली जाणार नसल्याने प्रक्रिया पारदर्शक राहणार नाही.
  • मागील अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही बाब चुकीची आहे. कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविल्यास खासगी कंपनी मनमानी कारभार करतील आणि त्याचा परिणाम गुणवत्तेवर होईल. त्यामुळे कंत्राटी भरती प्रक्रियेचा शासन आदेश रद्द करावा आणि भरती प्रक्रिया थांबवावी अशी मागणी याचिकेत केली गेली आहे. याचिकेवर निर्णय होईपर्यंत प्रक्रियेवर तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड. अश्विन इंगोले बाजू मांडतील.
प्रशांत दामले यांना यंदाचे विष्णुदास भावे गौरवपदक
  • मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरवपदक जेष्ठ अभिनेते, नाट्य कलाकार प्रशांत दामले यांना मंगळवारी जाहीर करण्यात आले. गौरवपदक, रोख रक्कम रु. २५ हजार, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे गौरवपदकाचे स्वरूप आहे. ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
  • विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार हा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा पुरस्कार असून नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली ही संस्था गेली ८० वर्षे नाट्यक्षेत्रात कार्य करीत आहे. संस्थेतर्फे ५ नोव्हेंबर रंगभूमीदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगभूमीदिनाचे औचित्य साधून नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस विष्णुदास भावे गौरवपदक देऊन सन्मानित करणेत येते, अशी माहिती अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीचे अध्यक्ष अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी दिली.
  • अखिल भारतीय नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबईचे अध्यक्ष. प्रशांत दामले हे सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत, त्यांनी गेली चार दशके असंख्य मराठी नाटके, चित्रपट, आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. ते मराठी चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता, रंगमंच अभिनेता, गायक, पार्श्वगायक, नाट्यनिर्माते आहेत. विनोदी अभिनयासाठी मराठी नाटक आणि चित्रपट जगतात ते परिचित आहेत. कलेच्या प्रवासात त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या नावावर पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत. त्यांनी नाटकाशिवाय ३७ मराठी चित्रपट आणि २४ दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये ‘आम्ही सारे खवय्ये’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका समाविष्ट आहे. आतापर्यंत त्यांना २० पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, कलारंजन पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विविध पुरस्कार यांचा समावेश आहे.
  • फेब्रुवारी १९८३ पासून आज अखेर १२५०० पेक्षा जास्त नाटकांचे प्रयोग त्यांनी केले आहेत. त्यांची जी गाजलेली नाटके रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत त्यातील काही खालीलप्रमाणे.
तीन सरकारी कंपन्यांना केंद्राकडून टाळे ?
  • केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील तीन कंपन्यांना टाळे लावण्याची शक्यता आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडणार असून त्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील मेटल अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एमएमटीसी), स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी) आणि प्रोजेक्ट अँड इक्विपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पीईसी) बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने विशिष्ट उत्पादने आयात किंवा निर्यात केल्या जाण्याच्या श्रेणीतून या (कॅनलायझिंग एजन्सी) कंपन्यांचे नाव वगळल्यानंतर या कंपन्यांना टाळे लागण्याची शक्यता बळावली आहे. केंद्र सरकारने तिन्ही कंपन्यांच्या उपयुक्ततेची तपासणी पूर्ण केली असून, वाणिज्य विभागाने कोणत्याही कॅनलायझिंग एजन्सीची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे.
  • पीईसी ही यंत्रसामग्री आणि रेल्वे उपकरणे निर्यात आणि आयात करण्यासाठी कॅनलायझिंग एजन्सी होती, तर एसटीसी खाद्यतेल, डाळी, साखर आणि गहू यांसारख्या मोठ्या प्रमाणात वापराच्या आवश्यक वस्तूंच्या आयातीसाठी आणि एमएमटीसी ही उच्च दर्जाचे लोह धातू, मॅंगनीज धातू, क्रोम अयस्क, कोप्रा आणि इतर अनेक मौल्यवान धातूंची निर्यात आणि आयात करण्यासाठी कॅनलायझिंग एजन्सी होती.
२०३५ पर्यंत अवकाश स्थानक उभारा! मोदींचे ‘इस्रो’ला आवाहन
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) २०३५ पर्यंत अवकाश स्थानकाची उभारणी करण्याचे आणि २०४० पर्यंत पहिल्या भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
  • ‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी पंतप्रधानांना गगनयान मोहिमेच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ‘इस्रो’ २१ ऑक्टोबर रोजी प्रथमच अंतराळवीर बचाव यंत्रणा आणि इतर उपक्रमांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे.
  • अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची भारताची मोहीम २०२५ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. त्यांनी शुक्र मोहीम आणि मंगळावरील अवतरणासह विविध आंतरग्रह मोहिमांसाठी काम करण्याचे आवाहन केले.
भारतात समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यासाठीची लढाई किती जुनी? जाणून घ्या..
  • समलैंगिक विवाहाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रदीर्घ काळानंतर त्यांचा निर्णय दिला आहे. समलिंगी विवाहांना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली नाही.
  • आमच्या अधिकार क्षेत्रात हे येत नाही म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. समलिंगी विवाहांना भारतात मान्यता मिळाली पाहिजे यासाठीची लढाई ही आजची नाही. तर ही लढाई २००९ पासून सुरु आहे.
  • मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे आणि समलिंगी विवाहांना मान्यता दिलेली नाही.

 

भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांची नियुक्ती :
  • भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश यू यू लळित यांच्या निवृत्तीनंतर म्हणजेच ९ नोव्हेंबरपासून न्यायमूर्ती चंद्रचूड भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या. चंद्रचूड यांची नियुक्ती केली आहे.

  • तत्पूर्वी भारताचे विद्यमान सरन्यायाधीश यूयू लळित यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय वाय चंद्रचूड यांची शिफारस केली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड हे अयोध्या जमीन विवाद आणि गोपनीयतेचा अधिकार यासारख्या ऐतिहासिक निकालांचा भाग आहेत.

  • हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याच्या दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर, न्यायमूर्ती चंद्रचूड यांची वयाच्या ३९ व्या वर्षी वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आली. ते भारतातील सर्वात तरुण वकील बनले. यानंतर लगेचच, १९९८ मध्ये त्यांना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती देण्यात आली. वकीली करत असताना न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ओक्लाहोमा विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ विषय शिकवला. तसेच त्यांनी मुंबई विद्यापीठातही अध्यापक (व्हिजिटींग) म्हणून काम केलं आहे.

  • न्यायमूर्ती चंद्रचूड यांची २०१३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर तीन वर्षांत त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती चंद्रचूड हे सर्वाधिक काळ सेवा बजावलेल्या माजी सरन्यायाधीश वाय व्ही चंद्रचूड यांचे पुत्र आहेत.

भारतात गेल्या १५ वर्षात ४१.५ कोटी जनतेची गरिबीतून मुक्तता, ऐतिहासिक बदल असल्याचं संयुक्त राष्ट्रानं केलं नमुद :
  • भारतात गेल्या १५ वर्षांत ४१.५ कोटी लोकांची गरिबीतून मुक्तता झाल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. २००५-०६ ते २०१९-२१ या वर्षांमध्ये देशातील गरिबीमध्ये मोठी घट झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या ‘मल्टीडायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा एक ऐतिहासिक बदल असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. २०३० पर्यंत दारिद्रय रेषेखाली जगणाऱ्या सर्व वयोगटातील स्त्रिया, पुरुष आणि लहान मुलांचे प्रमाण निम्म्याहून अधिक कमी करण्याचे लक्ष्य शक्य असल्याचे संयुक्त राष्ट्राने या अहवालात म्हटले आहे.

  • संयुक्त राष्ट्राचा विकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड दारिद्रय आणि मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारतातील दारिद्रय निर्मुलनासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे या अहवालात कौतुक करण्यात आले आहे. जागतिक भूक निर्देशांकात इतर देशांच्या तुलनेत भारताची मोठी घसरण झाल्याचं समोर आल्यानंतर सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यातच देशातील गरिबीत घट होत असल्याचा अहवाल पुढे आल्यानंतर सरकारला दिलासा मिळाला आहे.

  • जागतिक भूक निर्देशांक अर्थात Global Hunger Index यादीमध्ये भारताची १०१व्या क्रमांकावरून १०७व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचं या निर्देशांकावरून स्पष्ट झालं आहे.

ब्रिटनमधील करकपातीचा निर्णय मागे ; प्राप्तिकराचा दर पूर्वीप्रमाणेच - अर्थमंत्री हंट :
  • पंतप्रधान लिझ ट्रस यांनी गेल्याच महिन्यात जाहीर केलेल्या जवळपास सर्वच करकपाती ब्रिटनचे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी सोमवारी मागे घेतल्या. घर खरेदीवर भरलेल्या मुद्रांक शुल्कातील कपात मात्र मागे घेण्यात आली नसल्याचे हंट यांनी स्पष्ट केले.

  • ट्रस यांच्या करकपातीच्या योजनेत प्रामुख्याने एप्रिलपासून प्राप्तिकराचा मूळ दर २० पेन्सवरून १९ पेन्स एवढा कमी करण्याच्या निर्णयाचा समावेश होता. तो मागे घेण्याची घोषणा अर्थमंत्री हंट यांनी केली आहे. जोपर्यंत कपातीसाठी आवश्यक आर्थिक परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत प्राप्तिकराचा दर २० पेन्स एवढाच राहील, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. सरकारने ‘छोटय़ा अर्थसंकल्पात’ (मिनी-बजेट) आणखी बदल करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

  • ऊर्जा शुल्काला असलेली सरकारी हमी केवळ येत्या एप्रिलपर्यंत असेल, ती आधीच्या घोषणेनुसार वर्षांसाठी नसेल. एप्रिलनंतर घरगुती आणि व्यावसायिक वीजदेयकांचा आढावा घेण्यात येईल, असेही हंट यांनी स्पष्ट केले. आर्थिक वाढीसाठी आत्मविश्वास आणि स्थैर्याची गरज असून ब्रिटन सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढील, असेही ते म्हणाले.

  • गेल्या महिन्यात ‘छोटय़ा अर्थसंकल्पात’ पंतप्रधान ट्रस यांनी करकपाती जाहीर केल्या होत्या. त्याचे तीव्र पडसाद देशाच्या भांडवली बाजारात उमटले. ट्रस यांच्या हुजूर पक्षातील अनेक खासदारांनीही करकपातीला विरोध केला होता.

भारतीय कुस्ती संघाला स्पेनचा व्हिसा नाकारला! ; २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेला मुकावे लागणार :
  • स्पेन दूतावासाने व्हिसा नाकारल्यामुळे भारताच्या २३ वर्षांखालील कुस्ती संघाला जागतिक स्पर्धेला मुकावे लागणार आहे. या स्पर्धेला सोमवारपासून स्पेनमधील पांटेवेद्रा येथे सुरुवात झाली.

  • या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीगीर महासंघाने ३० जणांची निवड केली होती. मात्र, स्पेन दूतावासाने व्हिसाबाबत नकारात्मक भूमिका घेतल्याने भारतीय खेळाडूंना या स्पर्धेस मुकावे लागले आहे. या सर्व घटनेबाबत भारतीय कुस्तीगीर महासंघाने निराशा व्यक्त केली आहे. ‘‘भारताच्या सर्व खेळाडूंची आवश्यक कागदपत्रे स्पेन दूतावासाकडे ४ ऑक्टोबरलाच जमा केली होती. मात्र, त्यांनी स्पर्धेच्या दिवसापर्यंत त्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही आणि सोमवारी व्हिसा नाकारल्याचे सांगून सर्व कागदपत्रे परत केली,’’ असे भारतीय कुस्तीगीर महासंघाचे साहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले.

  • ‘‘कागदपत्रे जमा केल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांशी वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी आमचे फोनही उचलले नाहीत आणि आमच्या ई-मेललाही उत्तर दिले नाही. त्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे आमच्या खेळाडूंना जागतिक स्पर्धेस मुकावे लागले आहे आणि आम्ही याची तक्रार जागतिक संघटनेकडे करणार आहोत,’’ असेही तोमर यांनी सांगितले.

  • भारतीय कुस्तीगीरांना जागतिक स्पर्धेसाठी व्हिसा नाकारण्याचा प्रसंग पहिलाच असला, तरी याचवर्षी इटली येथे झालेल्या मानांकन मालिकेतील स्पर्धेसाठीही भारतीय कुस्ती संघाला व्हिसा नाकारण्यात आला होता.

  • भारतीय कुस्तीगीर महासंघाने स्पेनविरुद्ध तक्रार करण्याची भूमिका घेतली असून, भविष्यात स्पेनला कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद न देण्याचे आवाहन करणार असल्याचे तोमर यांनी स्पष्ट केले.

एमचेस जलद बुद्धिबळ स्पर्धा : गुकेशकडून कार्लसनचा पराभव :
  • भारताच्या १६ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने एमचेस ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीत जगज्जेत्या मॅगनस कार्लसनला पराभूत केले आणि कार्लसनला पराभूत करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

  • चेन्नईचा गुकेशने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना २९ चालींमध्ये विजय मिळवला. बारा फेऱ्यानंतर गुकेश पोलंडच्या यान-क्रिस्तोफ डूडा (२५ गुण) आणि अजरबैजानच्या शख्रियार मामेदेरोव्ह (२३ गुण) यानंतर तिसऱ्या स्थानी आहे. गुकेशचे २१ गुण आहे. यापूर्वी १९ वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू अर्जुन एरिगेसीने कार्लसनला नमवले होते.एरिगेसीचे २१ गुण असून तो चौथ्या स्थानावर आहे.

  • कार्लसनला पराभूत करणारा गुकेश सर्वात युवा खेळाडू आहे. गुकेशचे वय १६ वर्षे, चार महिने आणि २० दिवस आहे. गेला विक्रम आर. प्रज्ञानंदच्या नावे आहे. प्रज्ञानंदने एअरिथग्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनला नमवले, तेव्हा त्याचे वय १६ वर्षे, सहा महिने आणि १० दिवस होते.

  •  विदित गुजराती १०व्या स्थानावर असून तो बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आदित्य मित्तम १२व्या स्थानी आहे. त्याने १२व्या फेरीत एरिगेसीला पराभूत केले होते, मात्र तो गेल्या तीन सामन्यात पराभूत झाला. पी. हरिकृष्णा १५व्या स्थानावर आहे.‘‘कार्लसनला पराभूत करणे हे विशेष असते, मी ज्या पद्धतीने खेळलो त्याने मी समाधानी आहे.’’ असे गुकेश विजय मिळवल्यानंतर म्हणाला.

  • गुकेश आणि कार्लसनमधील सामना चुरशीचा झाला. गुकेश नेहमी निर्भीडपणे खेळतो. कार्लसनने एक चूक केली आणि गुकेशने या संधीचा फायदा घेतला. गुकेशविरुद्ध खेळताना मलाही हा अनुभव आला आहे. प्रतिस्पर्ध्याने चूक केल्यास गुकेश त्याला पुनरागमनाची संधी देत नाही. या लढतीतही गुकेशने आपले कौशल्य दाखवले.

18 ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.