चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ नोव्हेंबर २०२२

Updated On : Nov 18, 2022 | Category : Current Affairs


मेल्टवॉटर बुद्धिबळ स्पर्धा - प्रज्ञानंद विजयी, एरिगेसीचा पुन्हा पराभव :
 • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने गुरुवारी मेल्टवॉटर चॅम्पियन्स टूरच्या अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. अर्जुन एरिगेसीला मात्र सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पराभूत होणाऱ्या प्रज्ञानंदने तिसऱ्या फेरीच्या लढतीत व्हिएतनामच्या लिएम क्वांग ली याच्यावर ३-० अशा फरकाने विजय मिळवला.

 • दुसरीकडे एरिगेसीने अमेरिकेच्या वेस्ली सोकडून ०.५-२.५ अशी हार पत्करली. विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने विजयी घोडदौड कायम ठेवताना अझरबैजानच्या शख्रियार मामेदेरोव्हवर ३-० अशी मात केली. पोलंडचा आघाडीचा खेळाडू यान ख्रिस्टोफ डुडाने नेदरलँड्सच्या अनिश गिरीचा २.५-०.५ असा पराभव करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

 • १७ वर्षीय प्रज्ञानंदने लिएमवर सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. या लढतीत प्रज्ञानंदने पहिला डाव ४१ चालींत, दुसरा डाव ४६ चालींत आणि तिसरा डाव ५३ चालींत जिंकला. या विजयासह प्रज्ञानंदने (४ गुण) गुणतालिकेत चौथ्या स्थानी आगेकूच केली. कार्लसन आणि डुडा (दोघांचेही ९ गुण) संयुक्तरीत्या अग्रस्थानी असून गिरी (४ गुण) तिसऱ्या स्थानी आहे.

अमेरिकेच्या ‘हाऊस’वर रिपब्लिकनांचे वर्चस्व; बायडेन यांच्यासाठी पुढली दोन वर्षे अडचणीची :
 • अमेरिकेतील कायदेमंडळाचे कनिष्ठ प्रतिनिधिगृह असलेल्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज’वर रिपब्लिकन पक्षाने निसटते बहुमत मिळवले आहे.

 • ४३५ सदस्यांच्या सभागृहात बहुमताचा २१८ आकडा ट्रम्प यांच्या पक्षाने गाठला असून सत्ताधारी डेमोक्रेटिक पक्ष २११ जागांवर विजयी झाला आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची धोरणे ‘हाऊस’मध्ये अडकण्याची शक्यता आहे.

 • नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी हाऊस आणि सेनेट या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत प्रस्थापित करेल, ही अपेक्षा पूर्ण झाली नसली तरी एका सभागृहात बायडेन यांची विधेयके अडवली जाऊ शकतात.

 • हाऊस स्पीकर म्हणून रिपब्लिकन पार्टीने केविन मॅकार्थी यांची बुधवारी निवड केली. डेमोक्रेटिक पक्षाच्या नॅन्सी पेलोसी यांची जागा ते घेतील. ‘अमेरिका नव्या दिशेसाठी सज्ज असून हाऊसमधील रिपब्लिकन त्यासाठी तयार आहेत’ असे ट्विट करून मॅकार्थी यांनी आगामी संघर्षांचे संकेत दिले आहेत.

हे युद्धाचे युग नाही!; जी-२० जाहीरनाम्यात नरेंद्र मोदींच्या विधानाचा पुनरुच्चार :
 • जी-२० राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेमध्ये जारी करण्यात आलेल्या संयुक्त जाहीरनाम्यात ‘हे युद्धाचे युग नाही’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा पुनरुच्चार करण्यात आला. येथे झालेल्या दोन दिवसीय परिषदेवर रशिया-युक्रेन युद्धाचे सावट राहिले. या युद्धाबाबत जी-२० सदस्यांमध्ये मतभेद असल्याची कबुलीही जाहीरनाम्यात देण्यात आली.

 • सप्टेंबरमध्ये समरकंद येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वाक्य उच्चारले होते. त्यानंतर पाश्चिमात्य राष्ट्रांनी या भूमिकेचे स्वागत केले होते. आता जी-२० राष्ट्रगटाच्या संयुक्त जाहीरनाम्यातही या वाक्याने स्थान मिळवले आहे. ‘युद्धात अडकलेल्या नागरिकांच्या संरक्षणासह आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे,’ असे आवाहन जाहीरनाम्यात एकमताने करण्यात आले आहे.

 • युक्रेन युद्धाबाबत ‘जी-२०’मध्ये दोन गट पडल्याचे प्रतिबिंब उमटले.  शिखर परिषदेच्या समारोपातील जाहीरनाम्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये घेतलेलीच भूमिका बहुतांश राष्ट्रांनी कायम ठेवली. अमेरिकेसह पाश्चिमात्य राष्ट्रांनी रशियाचा निषेध केला. मात्र त्याच वेळी आपापल्या संदर्भात परिस्थिती समजून घेऊन काही राष्ट्रांची ‘वेगळी मते’ असल्याचेही या राष्ट्रांना मान्य करावे लागले.  

 • शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणारे इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्यासह पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आदी  राष्ट्रांचे प्रमुख सहभागी झाले.

८०० कोटी..! : जागतिक लोकसंख्येचा नवा उच्चांक; भारत पुढील वर्षी चीनला मागे टाकण्याचा अंदाज :
 • मंगळवारी जगाच्या लोकसंख्येने ८०० कोटींचा नवा ‘मैलाचा दगड’ पार केला. विशेष म्हणजे यातील १०० कोटी लोकसंख्येची भर ही गेल्या १२ वर्षांमध्ये पडली आहे. पुढल्या वर्षी भारत लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकण्याची शक्यता असली तरी भारताचा लोकसंख्या वाढीचा दर स्थिरावत असल्याचे निरीक्षण संयुक्त राष्ट्रांनी नोंदवले आहे.

 • ‘८०० कोटी आशा. ८०० कोटी स्वप्ने. ८०० कोटी शक्यता. आपली वसुंधरा आता ८०० कोटी नागरिकांचे घर आहे,’ अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांनी ट्विट करून हा नवा पल्ला गाठल्याची घोषणा केली. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत झालेल्या सुधारणांमुळे मृत्यूचे घटलेले प्रमाण यामुळे लोकसंख्येने हा टप्पा गाठला असताना त्याच वेळी या आकडय़ापलिकडे बघून मानवतेच्या पातळीवर सामायिक जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

 • भारताच्या लोकसंख्येबाबत संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (यूएनएफपीए)ने म्हटले की, भारताच्या लोकसंख्यावाढीचा वेग नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय पातळीवरील प्रजनन दर २.२ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे नमूद करून ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रजनन दरावर नियंत्रण मिळवल्याचे यूएनएफपीएने स्पष्ट केले.

१८ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)