चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ नोव्हेंबर २०२१

Date : 18 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धा - श्रीकांत, प्रणॉय दुसऱ्या फेरीत :
  • भारताचे बॅडिमटनपटू किदम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांनी दिमाखदार विजयांसह इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अभियानाला बुधवारी प्रारंभ केला. परंतु बी. साईप्रणीत आणि पारुपल्ली कश्यप यांचे आव्हान संपुष्टात आले.

  • श्रीकांतने जागतिक क्रमवारीत ७१व्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोव्हचा एक तास, १५ चाललेल्या सामन्यात २१-१८,१५-२१, २१-१६ असा पराभव केला. प्रणॉयने मलेशियाच्या लीव डॅरेनला २२-२०, २१-१९ असे नामोहरम केले. जागतिक क्रमवारीत १६व्या क्रमांकावर असलेल्या साईप्रणीतने इंडोनेशियाच्या शेसार रुस्टाव्हिटोविरुद्ध २१-१६, १४-२१, २०-२२ अशी हार पत्करली.

  • माजी राष्ट्रकुल विजेत्या कश्यपने डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्टियन सोलबर्ग व्हिटिंगहसकडून १०-२१, १९-२१ असा पराभव पत्करला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या प्रवीण जॉर्डन आणि मेलाटी ओक्टाव्हियांटीवर २१-११, २२-२० असा विजय मिळवला. बी. सुमीत रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांना इंडोनेशियाच्या हाफीज फैझल आणि ग्लोरिया विडजाजा जोडीने २१-१५, २१-१६ असे पराभूत केले.

चंद्राभोवती फिरणाऱ्या चांद्रयान २ ची टक्कर टळली :
  • इस्त्रोचे चांद्रयान २ हा उपग्रह ऑगस्ट २०१९ पासून सुमारे १०० किलोमीटर उंचीवरुन चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. चांद्रयान २ वर असलेल्या विविध उपकरणांच्या माध्यमातून चंद्राबद्दलची विविध माहिती ही गोळा केली जात आहे. तर नासाचा Lunar Reconnaissance Orbiter (LRO) हा उपग्रह जून २००९ पासून चंद्राभोवती २० किलोमीटर ते १८०० किलोमीटर अशा लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत चंद्राचा अभ्यास करत आहे. हे दोन्ही उपग्रह चंद्राच्या उत्तर ध्रुवावरुन जात असतात. मात्र या दोन्ही उपग्रहांची टक्कर होणार होती.

  • चंद्राभोवती फिरणाऱ्या नासाच्या आणि इस्त्रोच्या या उपग्रहांची टक्कर ही २० ऑक्टोबरला भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ११ वाजुन १५ मिनीटांनी होणार होती. यावेळी या दोन्ही उपग्रहांच्या कक्षेमध्ये १०० मीटरपेक्षा कमी अंतर असणार होते. या उपग्रहांचा आकार आणि सोलर पॅनेलचा विस्तार बघता ही टक्कर अटळ होती.

  • अर्थात नासा आणि इस्त्रो या अवकाश संस्थांना हा संभाव्य धोका काही दिवस आधीच लक्षात आला. दोन्ही संस्थांनी चर्चा केल्यावर इस्त्रोने चांद्रयान २ ची कक्षा बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा १८ ऑक्टोबरला म्हणजे संभाव्य टक्कर होण्याच्या दोन दिवस आधीच इस्त्रोने चांद्रयान २ च्या कक्षेत बदल केला आणि चंद्राच्या भोवती उपग्रहांची होणारी टक्कर ही टाळण्यात आली.

  • पृथ्वीभोवती काही हजार उपग्रह हे फिरत आहेत. तेव्हा उपग्रहांवर सातत्याने नजर ठेवावीच लागते. अनेकदा दोन उपग्रहांमध्ये टक्कर होऊ नयेत म्हणून उपग्रहांच्या कक्षेत बदल केला जातो. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे उपग्रहाच्या कक्षेत तेही चंद्राभोवती फिरणाऱ्या उपग्रहाबाबत बदल करण्याची वेळ इस्त्रोवर आली.

गांधी-बोस स्वातंत्र्य लढय़ातील महान नायक ; नेताजींच्या कन्या अनिता बोस यांच्याकडून कंगनाला कानपिचक्या :
  • अभिनेत्री कंगना राणावत हिने महात्मा गांधी आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावर टिप्पणी करून नवा वाद निर्माण केला आहे. स्वातंत्र्य लढय़ातील नेत्यांबद्दल अनादर दाखवणाऱ्या बेताल विधानांवर नेताजी बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी कंगनाला कानपिचक्या दिल्या.

  • ‘महात्मा गांधी आणि माझे वडील नेताजी बोस हे दोघेही देशाच्या स्वातंत्र्य लढय़ातील महान नायक होते’, असे मत अनिता बोस यांनी व्यक्त केले.कंगना राणावत हिने वृत्तपत्राच्या कात्रणाचा आधार घेत दावा केला की, नेताजी देशात परतले असते तर त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याची तयारी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महमद अली जिन्ना यांनी एका ब्रिटिश न्यायाधीशाकडे दाखवली होती.. भगत सिंह यांना फाशी दिली पाहिजे असेही गांधीजींचे मत होते व त्यासंबंधी पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा कंगनाने केला आहे. गांधीजी व नेताजी यांच्यावरील या दाव्यांना अनिता बोस यांनी कोणताही दुजोरा दिला नाही.

  • महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते. नेताजींचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी असल्यामुळे नेताजींना आपल्या नियंत्रणात ठेवता येणार नाही, असे गांधीजींना वाटत होते. पण, हे लक्षात घेतले पाहिजे की, माझे वडील नेहमीच गांधीजींचे प्रशंसक राहिले.

  • त्यांनी गांधीजींचा आदर केला. स्वातंत्र्य लढय़ासाठी आपण करत असलेल्या कामाबद्दल गांधींजी काय म्हणत आहेत, हे नेताजी नेहमी जाणून घेण्यास उत्सुक असत. गांधीजी आणि नेताजी यांचे उद्दिष्ट एकच होते पण, त्यांचे मार्ग वेगवेगळे होते. त्यांच्यातील या मतभेदात पंडित नेहरूंना कोणाची बाजू घ्यायची नव्हती. पण, नंतर नेहरू गांधीवादी समर्थकांमध्ये सामील झाले, असे अनित बोस यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

मराठी न शिकवल्यास शाळांना दंड ; राज्यातील सर्व शिक्षणसंस्थांना अनिवार्य; कारवाईची रक्कम एक लाखापर्यंत :
  • राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व परीक्षा मंडळाच्या पहिली ते दहावीच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करूनही मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाईचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. दरम्यान शाळांमध्ये शिकवण्याचा आढावा घेण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाचे मराठी भाषा, साहित्य, शिक्षण क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे.

  • राज्यात २०२०-२१ पासून राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. त्यात २०२०-२१ मध्ये पहिली आणि सहावी, २०२१-२२ मध्ये दुसरी आणि सातवी, २०२२-२३ मध्ये तिसरी आणि आठवी, २०२-२४ मध्ये चौथी आणि नववी, २०२४-२५मध्ये पाचवी आणि दहावी या पद्धतीने हा निर्णय लागू होणार आहे. मराठी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत शासन स्तरावरून वारंवार आढावा घेण्यात येत आहे.

  • मराठी शिकवत नसलेल्या संबंधित शाळा आणि व्यवस्थापनास एक लाख रुपयांपर्यंत दंड का करू नये, अशी नोटिस देण्यात यावी. त्यानंतर शाळांकडून खुलासा घ्यावा. खुलासा समाधानकारक नसल्यास किंवा विशेष करून मराठी भाषा विषयी संबंधित वर्ग सुरू न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार शिक्षणाधिकारी स्तरावरून संस्था किंवा शाळा यांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो निर्णय पारित करावा. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालकांकडे दंडाच्या वसुलीचा प्रस्ताव सादर करावा, असे टेमकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

अमेरिका राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर… बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये टोकाचा वाद?; उपराष्ट्राध्यक्ष बदलणार :
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यामधील संबंध कमालीचे ताणले गेले असून अमेरिकेमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत देणारं वृत्त समोर येत आहे. अमेरिकेच्या राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार बायडेन हे नवीन उपराष्ट्रपती निवडण्याची आणि कमला यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी सोपवण्याची तयारी करत आहेत.

  • अमेरिकन प्रसार माध्यमांनी व्हाइट हाऊसमध्ये सुरु असणाऱ्या या गोंधळाबद्दल वृत्तांकन केलं आहे. सीएनएनने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार वेस्ट विंगच्या प्रमुख कर्मचाऱ्यांनी उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचं पालन करणं बंद केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पुरेसा वेळ उपलब्ध नसणे हे यामागील मुख्य कारण सांगितंल जात आहे. वेस्ट विंगच्या अधिकारी प्रामुख्याने राष्ट्राध्यक्षांच्या कामाचा पसारा संभाळतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कायदेशीर आणि राजकीय विषयांसंदर्भात हे अधिकारी मदत करतात.

  • कमला यांनी मांडलेली व्यथा कमला हॅरिस या सध्या तीन डझन माजी आणि सध्या कार्यरत असणारे सहकारी, प्रशासकीय अधिकारी, डेमोक्रॅटिक नेते, सल्लागारांसोबत झालेल्या मुलाखतीमध्ये व्हाइट हाऊसमधील रचनेसंदर्भात भाष्य केलं होतं.

  • हॅरिस यांनी केलेल्या दाव्यानुसार व्हाइट हाऊसमधील अनेक संबंधित लोक यामुळे नाराज आहेत की त्यांना पूर्णपणे तयार केलं जात नाही (माहिती दिली जात नाही) आणि नियुक्त्याही रखडल्या आहेत. अनेकांच्या मनामध्ये डावललं जात असल्याची भावना असल्याचं उप-राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे. हॅरिस यांनी अनेकदा राजकीय निर्णयांबद्दल मी जे करण्यासाठी सक्षम आहे त्यामध्ये मला हवे तसे निर्णय घेता येत नाहीत असे संकेत दिले होते.

१८ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.