चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ नोव्हेंबर २०२०

Date : 18 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
करोनानंतर आता ‘चापरे व्हायर’ची दहशत; या विषाणूने साथीचं रुप धारण केल्यास :
  • करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला मंगळवारी एक वर्ष पुर्ण झालं. मात्र आजही जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. एकीकडे जग करोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच दुसरीकडे मानवाकडून मानवाला संसर्ग होणारा आणखीन एक विषाणू वैज्ञानिकांना आढळून आला आहे. अमेरिकेतील आरोग्य विषयक संस्था असणाऱ्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनेही (सीडीसी) हा विषाणू सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

  • बोलिव्हियामध्ये या विषाणूच्या संसर्गाचे पुरावे आढळून आले आहेत. या विषाणूचा संसर्ग ताप येतो आणि हा ताप थेट मेंदूवर परिणाम करतो. या विषाणूमुळे ब्रेन हॅमरेजचा धोका असतो. हा विषाणू इबोलासारखाच आहे. इबोला हा विषाणूही संसर्ग होण्याच्या दृष्टीने खूपच धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यात यशही आलं होतं.

  • वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बोलिव्हियामध्ये सापडलेल्या या विषाणूचे नाव चापरे विषाणू (व्हायरस) असं आहे. सर्वात आधी हा विषाणू २००४ साली बोलिव्हियामध्ये चापरे भागात आढळून आला होता. लाइव्ह सायन्सने दिलेल्या वृत्तानुसार सीडीसीने २०१९ साली या विषाणूचा संसर्ग तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना झाल्याचे स्पष्ट केलं आहे. या तिघांपैकी दोघांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याचेही सीडीसीेने सांगितलं आहे.

रामायण, महाभारतामधील गोष्टी ऐकत मोठा झालो - बराक ओबामा :
  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्या राजकीय प्रवासापासून ते खासगी गोष्टींपर्यंत अनेक गोष्टींवर ओबामा यांनी भाष्य केलेलं पुस्तक सध्या भारतातही चांगलेच चर्चेत आहे. याच पुस्तकामध्ये भारतीय काँग्रेससंदर्भात ओबामा यांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र याच पुस्तकामध्ये ओबामा यांनी आपले बालपण हे रामायण, महाभारतामधील गोष्टी ऐकत गेल्याचे म्हटले आहे.

  • भारत आणि तेथील संस्कृतीबद्दल आपल्या मनात कायम विशेष स्थान राहिलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इंडोनेशियामध्ये बालपण गेलं असून तिथे मी बालपणी रामायण, महाभारतामधील गोष्टी अनेकदा ऐकल्याचा उल्लेख ओबामांनी केला आहे.

  • “भारताचे आकारमान आणि जागतिक लोकसंख्येपैकी प्रत्येक सहावी व्यक्ती या देशात रहात असल्याने, वेगवेगळ्या वंशाचे दोन हजारहून अधिक संस्कृती आणि सातशेहून अधिक भाषा बोलला जाणारा हा देश असल्याने त्याचा अधिक प्रभाव दिसून येतो,” असं ओबामा यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून २०१० साली आपण भारताला पहिल्यांदा भेट दिली. त्यापूर्वी आपण कधीही भारतामध्ये गेलो नव्हतो मात्र भारत देशाला माझ्या मनात कायमच विशेष स्थान होतं, असं ओबामा यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला जो बायडेन यांना फोन, अभिनंदन करत म्हणाले :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी यावेळी अमेरिकेसोबत असणाऱ्या धोरणात्मक भागीदारीचा पुनरुच्चारही केला. तसंच ही भागीदारी अजून मजबूत करण्यासंबंधी चर्चा केली.

  • मंगळवारी रात्री उशिरा ट्विट करत नरेंद्र मोदींनी जो बायडेन यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचंही अभिनंदन केलं. कमला हॅरिस यांचा विजय भारतीय-अमेरिकन समुदायासाठी अभिमानाची बाब असल्याचं ते म्हणाले आहेत.

  • नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे की, “अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फोन करुन अभिनंदन केलं. भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारीसंबंधी आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. याशिवाय आम्ही करोना महामारी, हवामान बदल, इंडो-पॅसिफिक भागात सहकार्य अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली”.

  • नरेंद्र मोदी यांनी यावेळी अजून एक ट्विट उपाध्यपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांचंही अभिनंदन केलं आहे.

  • याआधी मंगळवारी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जो बायडेन यांच्या नेतृत्वात अमेरिकेसोबत सकारात्मक संबंध निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला. दहशतवाद, हवामान बदल आणि करोनाविरोधातील लढ्यात भारत एकत्रितपणे काम करण्याची शक्यता आहे. याशिवाय जो बायडेन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरुपी जागा देण्याच्या दाव्याचं समर्थन करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १६ लाखांहून अधिक रुग्ण करोनामुक्त, रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांवर :
  • महाराष्ट्रात करोना संसर्ग झालेले एकूण १६ लाख २३ हजार ५०३ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट आहा ९२.६४ टक्के इतका झाला आहे. दरम्यान मागील २४ तासांमध्ये ५ हजार १२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज राज्यात २ हजार ८४० नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात मागील २४ तासांमध्ये ६८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

  • आज पर्यंत तपासण्यात आलेल्या ९८ लाख ४७ लाख ४७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ५२ हजार ५०९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ९१ हजार १० व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर ५ हजार ३६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला ८१ हजार ९२५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज महाराष्ट्रात २ हजार ८४० नवीन रुग्णांची नोंद झाली त्यामुळे करोना बाधितांची एकूण संख्या १७ लाख ५२ हजार ५०९ इतकी झाली आहे.

  • आज नोंद झालेल्या ६८ मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासातले आहेत. तर १२ मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित पाच मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे पाच मृत्यू नाशिक-२, लातूर-१, पुणे-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

महाराष्ट्राचे माजी कबड्डी कर्णधार रत्नाकर शेट्टी यांचे निधन :
  • महाराष्ट्राचे माजी संघनायक रत्नाकर शेट्टी यांचे सोमवारी दुपारी १२.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. घोडबंदर (ठाणे) येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • शेट्टी यांनी चार वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. १९६८मध्ये इंदूर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लबकडून खेळणाऱ्या शेट्टी यांची आक्रमक खेळाडू म्हणून ओळख होती. त्या काळी साऊथ कॅनरा संघात जया शेट्टी, शेखर शेट्टी, सदाशिव शेट्टी अशा अनेक शेट्टी आडनावाच्या खेळाडूंचा विशेष भरणा होता. ते हिंद सायकल या व्यावसायिक संघातून खेळत असत.

  • सोमवारी रुग्णालयात उपचारासाठी गेले असता शेट्टी यांचे निधन झाले. ना. म. जोशी मार्ग येथे राहणाऱ्या शेट्टी यांचा कबड्डी प्रवास डॉ. शिरोडकर विद्यालय या मराठी शाळेतून झाला. या शाळेत प्रथम अर्जुनवीर सदानंद शेट्टे कबड्डीत त्यांचे सवंगडी होते. ‘‘जुन्या काळातील एक आक्रमक खेळाडू काळाच्या पडद्याआड गेला,’’ अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

१८ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.